शनिवार, जुलै 26, 2025
Home Blog Page 663

‘ऑलिम्पिक’मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देणाऱ्या स्वप्नीलच्या आईवडिलांना सॅल्युट.. ! – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले ऋण

  • जिल्ह्यात अनेक कर्तबगार खेळाडू; खेळाला चालना देण्यासाठी अद्ययावत सुविधा देणार 
  • केशवराव भोसले नाट्यगृह उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

कोल्हापूर, दि.11(जिमाका): ‘ऑलिम्पिक’मध्ये देशाला कांस्यपदक मिळवून देवून जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव उंचावणाऱ्या स्वप्नीलला घडवणाऱ्या त्याच्या आई -वडिलांना सॅल्युट.. ! अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे ऋण व्यक्त केले. कोल्हापूर जिल्ह्यात अनेक कर्तबगार खेळाडू असून खेळाला चालना देण्यासाठी अद्ययावत सुविधा देण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी  यावेळी व्यक्त केला.

पॅरिस येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये 50 मीटर रायफल थ्री प्रकारात नेमबाज स्वप्नील कुसाळे याने कांस्य पदक मिळवल्याबद्दल त्याच्या आई अनिता व वडील सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरीत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गजापूर येथे झालेल्या घटनेत नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना एकूण एक कोटी 49 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 20 नुकसानग्रस्तांना 53 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. तसेच जुलै 2024 मधील महापुरात शिरोळ तालुक्यातील अकिवाट – बस्तवाड ओढ्याच्या पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन मृत झालेल्या सुहास पाटील, अण्णासो हसुरे व इकबाल बैरागदार यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, मध्यमवर्गीय असणाऱ्या स्वप्नील च्या आई-वडिलांनी स्वप्निल ऑलिंपिक पर्यंत पोहोचण्यासाठी आजवर खूप कष्ट सोसले आहे. प्रसंगी कर्ज काढून त्याच्यासाठी रायफल, बुलेट व आवश्यक त्या सोयी सुविधा दिल्या आहेत. ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळवून स्वप्नील ने आई-वडिलांचे कष्ट सार्थकी लावले आहेत. राज्य शासनाच्या वतीने लवकरच स्वप्नीलच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 केशवराव भोसले नाट्यगृहाची हेरिटेज वास्तू उभारण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी नाट्य कलाकारांसाठी उभं केलेलं केशवराव भोसले नाट्यगृह हे एक प्रकारचं वैभव होतं. त्या काळात शाहू महाराजांनी हे नाट्यगृह अत्यंत दर्जेदार पद्धतीने उभारलं होतं. आगीमुळे या नाट्यगृहाचे प्रचंड नुकसान झालं आहे. केशवराव भोसले नाट्यगृह हे केवळ कोल्हापूरच नाही तर राज्यभरातील कलाकारांचं घर होतं. या नाट्यगृहाविषयी असलेल्या भावना अनेक कलाकारांनी व्यक्त केल्या आहेत. कलाकार आणि कोल्हापूरकरांच्या भावना लक्षात घेऊन हे नाट्यगृह अद्ययावत पद्धतीने जसं आहे तसं हेरिटेज पद्धतीने लवकरात लवकर साकारण्यात येईल. हे नाट्यगृह उभारण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने 20 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे व पाच कोटी विम्याची रक्कम मिळणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. तथापि दर्जेदार पद्धतीने बांधकाम करताना निधीची कमतरता भासल्यास अधिकचा निधीही देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची शेवटची भेट झालेल्या ऐतिहासिक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, यासाठी शासनाच्या वतीने निधी देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

विशाळगड अतिक्रमण हटवण्याबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती निवारण्यासाठी जागतिक बँकेने 3200 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, यातून पूर निवारण्यासाठीच्या उपाययोजना केल्या जातील, असे सांगून त्यांनी जिल्ह्याशी संबंधित विविध बाबींचा उहापोह केला.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

****

 कागलच्या पाझर तलावातील संगीत कारंजा, कृत्रिम धबधबा, बोटिंग क्लबचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

कागलच्या धर्तीवर कृत्रिम धबधबा उपक्रम राज्यात राबवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि.11 (जिमाका): कागल मधील निसर्ग संपन्न पाझर तलाव परिसरात तयार करण्यात आलेला कृत्रिम धबधबा, बोटींग, म्युझिक फाऊंटन, व्हॉईस फाऊंटन हा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, असे उपक्रम बारामतीसह अन्य ठिकाणीही विकसित करण्यात येतील, अशा शब्दांत या उपक्रमाचे कौतुक करुन या आल्हाददायक परिसराला भेट देण्यासाठी अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

कागल नगरपरिषदेच्या वतीने पाझर तलाव या ठिकाणी बांधण्यात आलेला पादचारी मार्ग, संगीत कारंजा, कृत्रिम धबधबा तसेच बोटिंग क्लब तसेच मटण, चिकन व फिश, व्हेजिटेबल मार्केटच्या नवीन इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील,  जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, राधानगरी कागल विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अमरदीप वाकडे, नगरपालिका प्रशासन अधिकारी नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी तथा प्रशासक अजय पाटणकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कागल येथे 13 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून पाझर तलाव परिसर सुशोभित करण्यात आला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्याजोगे आल्हाददायक वातावरण निर्मिती या परीसरात करण्यात आली आहे. तलावाच्या काठावर छोट्या कार्यक्रमांसाठी लॉन, तलावात बोटिंग, म्युझिकल फाउंटन (संगीत कारंजा), कृत्रिम धबधबा तयार करण्यात आला आहे. पाझर तलाव परिसर पर्यटकांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत खुला राहणार आहे.

तसेच 15 कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मटण, चिकन, फिश, व्हेजिटेबल मार्केटच्या नूतन इमारतीत 93 गाळे आहेत. या सुसज्ज अशा महात्मा फुले मार्केटमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. याठिकाणी पार्किंग व अग्निशमन व्यवस्था करण्यात आली आहे.

****

 

प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हजारोंच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा’ साजरा;

सर्वांच्या हिताचा ‘डीपी प्लॅन’ करण्याची मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

छत्रपती संभाजीनगर दि. ११ : येत्या चार दिवसांनी आपण देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहोत. बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जाऊ लागलो. ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, बाबासाहेबांच्या संविधानाचा आदर वाढावा, त्याद्वारे सामाजिक न्यायाची भावना अधिक दृढ व्हावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.  तसेच शहराचा डीपी प्लॅन हा सर्वांच्या हिताचा असेल तोच करु अशी ग्वाही त्यांनी शहरवासियांना दिली.

 

छत्रपती संभाजीनगर येथील टीव्ही सेंटर चौकात आज ‘मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात  अजिंठा लेणी पायथ्याशी जागतिक दर्जाचे बुद्ध विहार विपश्यना केंद्र उभारणी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपये, भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरणासाठी पाच कोटी रुपये, टीव्ही सेंटर येथे छत्रपती संभाजीमहाराज पुतळा व अशोक स्तंभ उभारणीसाठी पाच कोटी रुपये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासाठी २५ कोटी रुपये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर डीजीटल प्रोजेक्टसाठी  २५ कोटी रुपये, तारांगणासाठी १० कोटी तसेच मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत बेरोजगारांना मदत अशा विविध विकास प्रकल्पांना निधी दिल्याबद्दल आज आंबेडकरी समाज समितीतर्फे मुख्यमंत्री श्री. ‍शिंदे यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

या सोहळ्यास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, आमदार प्रदीप जयस्वाल, संजय शिरसाट तसेच संयोजक जालिंदर शेंडगे व सर्व समिती सदस्य उपस्थित होते.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांना मानपत्र देऊन त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

कृतज्ञता महामानवाप्रति

मुख्यमंत्री म्हणाले की, आज आपण कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने माझ्यावर प्रेम व्यक्त करणाऱ्या छत्रपती संभाजीनगरातील आंबेडकरी जनतेचे मनापासून आभार मानतो.  पण, कृतज्ञता व्यक्त करण्यासारखे कोणतेही काम मी केलेले नाही. मी जे काही करतोय ते माझे कर्तव्य आहे आणि इथे जी काही कामे होत आहेत तो तुमचा तो अधिकार आहे. आपण सगळे बाबासाहेबांच्या महान कार्याला पुढे चालवणारे त्यांचे लहान अनुयायी आहोत. आपण भाग्यवान आहोत की, बाबासाहेबांसारखे मोठे व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले. आपण या महामानवा प्रति कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आज ज्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी उभा आहे, या भूमीवर बाबासाहेबांचे पवित्र पाऊल पडले आहे. बाबासाहेबांना या शहराबद्दल विशेष आपुलकी होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज आपण जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी सुंदर असं बुद्ध विहार, विपश्यना केंद्र उभारणार आहोत. बाबासाहेबांचा पुतळा उभारतो आहोत. शहरातल्या प्रत्येक झोपडपट्टीत वाचनालय, रिसर्च सेंटरचा डिजिटल प्रोजेक्ट, तारांगण सेंटर, मागास उद्योजकांना स्वत:च्या पायावर उभे करणे असे विविध उपक्रम आपण राबवत आहोत. यातून प्रेरणा मिळावी हा आपला हेतू आहे.

संविधानाबद्दल गौरवोद्गार

बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर आपला देश चालतो. चार दिवसांनी देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन आहे. बाबासाहेबांची घटना होती म्हणूनच आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून जगभर ओळखले जातो. त्यामुळे संविधान बदलण्याच्या अपप्रचाराला आपण बळी पडू नका, असे सांगून ‘जब तक सुरज चांद रहेगा, बाबासाहेबका संविधान रहेगा’, अशा शब्दात त्यांनी संविधानाबद्दल गौरव व्यक्त केला.

महाराष्ट्र माझा परिवार

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हे सरकार दुर्बल, मागास, कष्टकरी, कामगार, गरिबांचे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एक लाख कोटींच्या योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी ४५ हजार कोटी तर राज्यातील माझ्या भगिनींच्या बँक खात्यावर जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, युवा कार्य प्रशिक्षण, वर्षाला तीन सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना सुरू केली. मुलींचे संपूर्ण शिक्षण मोफत केले. दुर्बलांना मदत करणे, त्यांचे जीवन आनंदी करणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि महाराष्ट्र हा माझा परिवार आहे, अशा शब्दांत त्यांनी उपस्थितांबद्दल आपुलकी व्यक्त केली.

त्यांनी सांगितले की, मुंबईत इंदू मिल इथे बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम वेगाने सुरु आहे. बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना आम्ही फेलोशिप मंजूर केली. बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत, टीआरटीआय या संस्थाच्या अधिछात्रवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती या योजनांमध्ये समानता आणली. संजय गांधी, श्रावणबाळ योजनेत निवृत्तीवेतन वाढवले. राज्यातल्या ७३ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांना नवे रूप देतो आहोत.  संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या माध्यमातून गरीब, मागास, दुर्बलांना मुख्य प्रवाहात आणतोय, असे सांगून शासनामार्फत मागास घटकांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहितीही उपस्थितांना दिली.

सर्वांच्या हिताचा विकास आराखडा

त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा जळगाव जालना या महामार्गाच्या उभारणीसाठी शासनाच्यावतीने द्यावयाच्या ३५५२ कोटी रुपयांचा हिस्साही भरण्यास मान्यता दिली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर शहराच्या विकास आराखड्याबद्दल बोलतांना ते म्हणाले की, सर्वांच्या हिताचा विचार करणारा विकास आराखडा आपण तयार करु, हे घर देणारे सरकार आहे लोकांना बेघर करणारे नाही,असे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम खरात यांनी केले. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. प्रदीप जयस्वाल, खासदार संदिपान भुमरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  पंचशिला भालेराव यांनी ‘शिंदे साहेबांनी आणली लाडकी बहीण योजना’ हे गीत सादर केले.या सोहळ्यास मोठ्या संख़्येने नागरिक उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन केले.

००००००

‘हर घर तिरंगा’ अभियानात चंद्रपूर जिल्हा राज्यात ठरावा अव्वल, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

नागरिकांना तिरंगा उपलब्ध करून देण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश

चंद्रपूर, दि. 11 : ‘चलेजाव’ आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे 16 ऑगस्ट 1942 रोजी सर्वात प्रथम भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. देशात सर्वांत पहिले स्वातंत्र्य अनुभवण्याचे भाग्य आपल्या जिल्ह्यातील चिमूरला लाभले. ही शहिदांची आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली भूमी आहे. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या जाज्ज्वल्य आठवणींना उजाळा देऊन शहिदांचे स्मरण झालेच पाहिजे. त्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियान हा केवळ एक उपक्रम न समजता राष्ट्रभक्तीचे प्रतिक समजून काम करा. हे अभियान यशस्वी करण्यात चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरेल, यादृष्टीने जनजागृती करा, अशी सूचना सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मनुगंटीवार यांनी दिली.

नियोजन भवन येथे ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानचा आढावा श्री. मुनगंटीवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मंगेश खवले चंदनसिंग चंदेल, डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थिती होती.

13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसांत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज सन्मानपूर्वक फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘स्वातंत्र्यपूर्व काळात देशात सर्वात प्रथम चंद्रपूर जिल्ह्यात तिरंगा फडकला. आता अभियानातही चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहावा. भारताच्या तिरंगा ध्वजाचा सन्मान राखणे हे आपले कर्तव्य आहे. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता घरावर लावलेला तिरंगा सलग तीन दिवस ठेवून 15 ऑगस्ट रोजी सुर्यास्तापूर्वी सन्मानपूर्वक उतरवावा. यासाठी ध्वज संहितेमध्ये रात्री तिरंगा फडकविण्याबाबत शिथिलता देण्यात आली आहे.’ ‘हर घर तिरंगा’ अभियानादरम्यान राज्य शासनाच्या निर्देशानुसार दिलेले कार्यक्रम ग्रामीण आणि शहरी भागात विभागून उत्कृष्ट नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी सादरीकरण केले.

नागरिकांसाठी ‘सेल्फी पॉईंट’

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना तिरंगा ध्वज उपलब्ध करून द्यावा. तसेच या अभियानांतर्गत सरकारी इमारतींवर आकर्षक विद्युत रोशनाई करावी. देशभक्तीपर गीते आणि संदेश प्रसारीत करावे. तसेच ‘तिरंगा सेल्फी पॉईंट्स’ मोठ्या प्रमाणात लावावे. नागरिकांनीसुध्दा तिरंगा ध्वजासोबतचा सेल्फी ‘harghartiranga.com’ या संकेतस्थळावर अपलोड करावा. नागरिकांना ध्वज वाटप करताना त्यांच्याकडून संकल्पपत्र सुध्दा लिहून घेण्याचे नियेाजन करावे, अशी सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिली.

0000

शेतकऱ्यांचे पीक विमाबाबत प्रश्न निकाली निघाल्याचे समाधान – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • ३१ ऑगस्टपर्यंत मिळणार शेतकऱ्यांना रक्कम

  • शेतकऱ्यांकडून पालकमंत्री मुनगंटीवार यांचे आभार

चंद्रपूर, दि. ११ : राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेसाठी तरतूद करूनसुद्धा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीच्या विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होती. याबाबत शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन केवळ पाच दिवसांत चंद्रपूर येथे दोन बैठका तर मुंबई येथे कृषिमंत्री आणि सचिवांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न निकाली निघाला असून जिल्ह्यात प्रथमच पीक विम्याची 202 कोटी 76 लाखांची रक्कम 31 ऑगस्टपर्यंत मिळणार असल्याचे समाधान आहे, अशा भावना राज्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

नियोजन भवन येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार, उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, चंदनसिंग चंदेल, नियोजन समितीचे सदस्य डॉ. मंगेश गुलवाडे, ब्रिजभूषण पाझारे, बंडू गौरकर आदी उपस्थित होते.

पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन 5 ऑगस्ट रोजी चंद्रपूरात, लगेच 7 ऑगस्ट रोजी मुंबई येथे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि (शनिवारी )10 ऑगस्ट रोजी पुन्हा चंद्रपूर येथे पीक विमा योजनेचा आढावा घेण्यात आला, असे सांगून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांचे पीक विमा योजनेचा प्रश्न सुटलेला आहे.

पुढे पालकमंत्री म्हणाले, नो रेनफॉल या अटीअंतर्गत 20095 शेतकऱ्यांचे अर्ज होते. हे सर्व अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने म्हटले आहे. तसेच पेरील नॉट कव्हर्ड या अंतर्गत असलेले 6864 अर्ज, लेट इंटिमेशन (सुचना वेळेवर न देणे) अंतर्गतचे 7959 अर्ज, क्लेम स्क्रुटीनी अंतर्गत 4811 अर्ज व इतर त्रृटी असलेले असे साधारणत: 37 हजारांच्या वर अर्ज आता मान्य करण्याचे विमा कंपनीने कबूल केले आहे. याशिवाय 4668 डुप्लीकेट अर्जांची पुन्हा पडताळणी करून स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये मान्य करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. क्रॉप मिसमॅचचे 1762 अर्जांची कृषी विभाग आणि विमा कंपनी पुन्हा नव्याने पडताळणी करणार असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनीसुध्दा मार्गदर्शन केले. सादरीकरण जिल्हा कृषी अधिक्षक शंकर तोटावार यांनी केले.

प्रशासनाची ही तत्परता

प्रधानमंत्री पीक विमा योजना या संवेदनशील विषयावर जिल्हाधिकारी विनय गौडा, तसेच संपूर्ण जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाची अतिशय तत्परता जाणवली. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करून संबंधित विभागाचा आढावा घेतला आणि सुचना केल्या. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चांगले काम केल्याबद्दल पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाचे कौतुक केले.

जिल्ह्यात प्रथमच पीक विम्यासाठी ऐवढी मोठी रक्कम

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे एकूण 202 कोटी 76 लाख 23 हजार 944 रुपयांचे क्लेम आहेत. यात 1 लाख 51 हजार 352 शेतकऱ्यांचा समावेश असून यापैकी 86,657 शेतकऱ्यांना 80 कोटी 66 लाख 34 हजार 910 रुपयांचे विमा रक्कम मिळाली आहे. कंपनीकडून उर्वरीत 63 कोटी रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सुचना दिल्या आहेत. शासनाच्या वतीने उर्वरित 59 कोटीची रक्कम लवकरच देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विम्याचे 3 लक्ष 46 हजार अर्ज

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यापूर्वी केवळ 62 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. मात्र गतवर्षी 1 लक्ष 84 260 शेतकऱ्यांचे 3 लक्ष 41 हजार 233 अर्ज आले. तर यावर्षी आतापर्यंत 1 लक्ष 79 हजार 443 शेतकऱ्यांचे 3 लक्ष 46 हजार 692 अर्ज आले आहेत.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे उर्वरित 46,500 हजार शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

ज्या शेतकरी बांधवांना आतापर्यंत पीकविम्याचा क्लेम मिळाला नाही . अशा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना त्यांच्या लाभ होणार आहे. उर्वरित 46500 हजार शेतकऱ्यांना आवश्यक बाबींची पूर्तता करून लवकरच साधारण 56 कोटी रुपये मिळणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामूळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दरवर्षी पेक्षा सर्वाधिक पीक विमा रक्कम या वर्षी मिळणार आहे. हे विशेष.

शेतकऱ्यांनी मानले पालकमंत्री यांचे आभार

सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व विशेष प्रयत्नाने ही पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

000000

 

आगीत नुकसान झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

नाट्यगृह पुन्हा उभारण्यासाठी लागणारा निधी वेळेतच देणार; नव्याने बांधकाम करताना जसं नाट्यगृह होतं तसं उभं करण्याच्या केल्या सूचना

कोल्हापूर दि. ११ (जिमाका) : दुर्देवी घटनेत कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे अतोनात नुकसान झाले. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेला निधी वेळेअभावी न मिळाल्याने काम थांबले ही अडचण येवू देणार नाही, निधी वेळेतच देणार असल्याची ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.

आगीमुळे नुकसान झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज पाहणी केली, त्यावेळी उपस्थित कलावंतांशी संवाद साधाला. ते म्हणाले, ऐतिहासिक वास्तूचे जसे बारकावे असतात तसेच पुन्हा करण्यासाठी या कामाला वेळ लागू शकतो परंतु कामे चांगली करण्यात येतील. लाकडी काम, दगडी काम आणि सिसम सारख्या लाकडांचा वापर करण्यात येणार असल्याने बारकावे लक्षात घेवून नाट्यगृह उभारण्याच्या सूचना प्रशासनाला त्यांनी दिल्या.

यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमकार दिवटे तसेच महापालिका प्रशासनाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री यांनी काल्हापूरमध्ये आल्यानंतर विमानतळावरून थेट केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट दिली. सुरूवातीला आल्यानंतर त्यांनी भीषण आगीमुळे भस्मसात झालेल्या मुख्य रंगमंचाची पाहणी केली. याठिकाणी त्यांनी शक्य असेल तर नव्याने काम करताना नाट्यगृहाची उंची वाढविण्याच्या सूचना केल्या. नाट्यगृहाशी कलावंत आणि श्रोत्यांचं जिव्हाळ्याचं नातं जोडलं गेलं आहे. जशा कोल्हापूरवासियांच्या या नाट्यगृहाशी भावना जोडल्या आहेत त्याप्रमाणे आमच्याही भावना जोडल्या गेल्या आहेत. हे पुनर्बांधनीचे काम मोठं असून यासाठी लागणारा वेळ आर्किटेक्चरच सांगतील असेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या निधीपेक्षा जरी जास्त निधी लागला तरी तो दिला जाईल, मात्र नाट्यगृह पुर्वीसारखे पुन्हा तयार झाले पाहिजे अशा सूचना त्यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या.

त्यानंतर त्यांनी बाहेरील संरक्षक भिंतीची पाहणी करून खासबाग मैदानावरील स्टेजच्या नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एसी नव्याने बसविताना त्याचे बाहेरील युनिट सुरक्षित ठिकाणी बसवा. खासबाग मैदान आणि नाट्यगृहासाठी आवश्यक छताचा पत्रा उत्कृष्ट दर्जाचा वापरा. बाहेरील संरक्षक भिंतीही जुने पुरावे किंवा छायाचित्र पाहून चांगल्या पद्धतीने तयार करण्याच्या सूचना केल्या. स्वच्छतागृह, इतर भिंती आणि दगडांचे बांधकाम करताना मजबूत, एकसारखे ऐतिहासिक दिसेल अशा पद्धतीने करा. ऐतिहासिक बांधकाम करणाऱ्या आर्किटेक्चरची निवड करून त्यांच्याकडून सर्व इमारत जशी आहे तशी एकसारखी दिसेल असा आराखडा तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या.

००००

कापूस-सोयाबीन अर्थसहाय्यासाठी प्रती हेक्टरी ५ हजारांचे अनुदान; ई-पीक पेरा नोंदणी असणारे सर्व शेतकरी लाभार्थी – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Virendra Dhuri DGIPR,Mantralaya

मुंबई दि. ११ :  सन २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी त्यांच्या आधार व बँक खात्याशी संलग्न असलेल्या माहितीचा वापर व्हावा यासाठी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना-हरकत पत्र आपल्या कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

२०२३ च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीवर उपाययोजना म्हणून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे, दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याच्या निर्णय घेतला आहे.

सदर रक्कम सोयाबीन-कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई-पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी. यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक नाहरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करावे, जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी वितरीत करता येईल असेही मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.

00000

शासन निर्णय वाचा : [pdf-embedder url=”https://mahasamvad.in/wp-content/uploads/2024/08/202407291753274401.pdf”] 

 

शिक्षण, संस्कृती आणि संस्कारातून करा जीवनाची वाटचाल -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

  • महर्षी विद्या मंदिर येथे पुलाचे लोकार्पण
  • एक झाड एक विद्यार्थीउपक्रमाचा शुभारंभ

चंद्रपूर दि. १०: भारताची अध्यात्मिक संस्कृती जगाने अनुभवली आहे. भारत आता शिक्षण क्षेत्रातही अग्रेसर होत आहे. मात्र संस्कृती आणि शिक्षणाला संस्कारांचीही जोड आवश्यक आहे. महर्षी विद्या मंदिरने हेच ब्रीदवाक्य जोपासले आहे. या मार्गाने विद्यार्थ्यांनी वाटचाल केली, तर त्यांचे उज्ज्वल भवितव्य निश्चित आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

महर्षी विद्या मंदिर येथील पुलाचे लोकार्पण तसेच ‘एक विद्यार्थी एक झाड’ या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, उपअभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रवींद्र भिलावे, संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक, उपाध्यक्ष वसुधा कंचर्लावार, सचिव दत्तात्रय कंचर्लावार, उमेश चांडक, अनुपम चिलके, वीरेंद्र जयस्वाल, डॉ. मंगेश गुलवाडे, कल्पना पलीकुंडवार, मनोज सिंघवी, सोहम बुटले, आदींची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘केवळ सहा महिन्यांत 1 कोटी 97 लक्ष 63 हजार 726 रुपये खर्च करून शाळेच्या विद्यार्थ्यांकरिता हा पूल बांधण्यात आला आहे. महर्षी विद्या मंदिर ही केवळ एक शाळा नव्हे, तर ज्ञानाचे मंदिर आहे. शिक्षण, संस्कार आणि संस्कृती हे या शाळेचे ब्रीदवाक्य असून हाच जीवनाचा खरा मार्ग आहे. आज आपण शिक्षणामध्ये अग्रेसर आहोत, मात्र संस्कारांमध्ये कमी पडत आहोत, ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांना संस्कारी शिक्षण मिळणे गरजेचे आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यामागे एक झाड, ही शाळेची अतिशय उत्तम संकल्पना आहे. माता आणि धरणीमाता यांचे आपल्यावर फार मोठे ऋण आहे. वसुंधरेच्या रक्षणासाठी प्रत्येकाने एक झाड लावलेच पाहिजे. वृक्ष लावूनच आपण या वसुंधरेचे ऋण फेडू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू केला असून महाराष्ट्र राज्याने वृक्ष लागवडीकरिता ‘अमृत ॲप’ विकसित केले आहे. विद्यार्थी आणि नागरिकांनी एक झाड लावून या ‘अमृत ॲप’मध्ये सेल्फी अपलोड करावा. राज्य शासनाकडून त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांजवळ हे प्रमाणपत्र राहील त्याला भविष्यात या प्रमाणपत्रामुळे फायदा होईल, असेही श्री. मुनगंटीवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘आजपासून शाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. हा प्रवास रौप्य महोत्सवापासून सुरू होऊन सुवर्ण महोत्सवापर्यंत आणि त्याहीपुढे होईल. शाळेकडून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचाही आवर्जून प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बघून त्यासाठी परिश्रम सुद्धा करावे. केवळ पैशाच्या मागे न धावता आनंदी, संस्कारी आणि समाधानी जीवन जगावे. या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. ‘एक झाड एक विद्यार्थी’ हा शाळेने सुरु केलेला उपक्रम अतिशय चांगला आहे.’ प्रास्ताविकातून संस्थेचे अध्यक्ष गिरीश चांडक यांनी उपक्रमाबद्दल माहिती दिली.

विद्यार्थी व पालकांना वृक्षांचे वाटप

पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात साईश कोंडावार, निहाल भोयर, आर्यन चौधरी, कीर्तन पटेल, महेक बेले, प्रेरित बोरकर, अर्जुन माताघरे, नक्ष उरकुडे, इशिता ठाकरे, समाइरा राजुरकर या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वृक्ष वाटप करण्यात आले.

०००

नक्षत्रवाडी गृह प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार -गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

छत्रपती संभाजीनगर, दि.१०,(विमाका) :  नक्षत्रवाडी गृह प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे  हा संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्ष कालावधीत पुर्ण होईल, असा विश्वास गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

छत्रपती संभाजीनगर  क्षेत्रविकास मंडळ प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत  नक्षत्रवाडी येथील 1056 अत्यल्प उत्पन्न गट अंतर्गत गृह प्रकल्पाचे भूमिपूजन गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल ना सावे यांच्या हस्ते करण्यात आले.

नक्षत्रवाडी येथे आयोजित कार्यक्रमाला आमदार संजय सिरसाट, गृहनिर्माण  क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वैद्य, कार्यकारी अभियंता नितीन शिंदे, राजेंद्र जंजाळ, विकास जैन, अनिल मकरिये, हर्षदा सिरसाट, विवेक देशपांडे  आदी उपस्थित  होते.

गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गरजू कुटुंबाला आपले हक्काचे असावे म्हणून त्यांनी 2014  पासून प्रधानमंत्री योजनेतंर्गत देशभरात 3 कोटी घरे उभारण्यात आली आहेत तर 3 कोटी घरांची कामे बाकी आहेत. नक्षत्रवाडी मधील 6.4 हेक्टर क्षेत्रावर 1056  सदनिकांच्या प्रकल्पास मंजूरी मिळाली असून सदर घराची किंमत 14 लाख ठेवण्यात आली आहे.  त्यापैकी 2.5 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्रदान करण्यात येणार आहे.

नक्षत्रवाडी प्रकल्पाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाने करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे  हा संपूर्ण प्रकल्प दीड ते दोन वर्ष कालावधीमध्ये पुर्ण होईल. यामध्ये स्लॅबप्रमाणेच भिंतीचेही काम करण्यात येणार आहे.सर्व इमारती भूकंप अवरोधक असण्याच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आली आहे. या प्रकल्पामध्ये रस्तालगत, मोकळया जागेवर बाग, वृक्षरोपण, पथदिवे, सुरक्षा सुरक्षा विभाग आदी सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर विभागात म्हाडाकडून यापुर्वी  1494 घराची लॉटरी प्रमाणे सोडत काढण्यात आली आहे.  2800 घराची उपलब्धता बाकी आहे.

महाराष्ट्रात  म्हाडाने 1 लाख घरे तयार करण्याचा संकल्प केला आहे. तर मुंबई येथील गिरणी कामगार यांच्यासाठी 98 हजार कुटुंबीयांची स्वतंत्र गृह प्रकल्प निर्मितीचा संकल्प आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे विविध प्रकल्पासाठी 50 ते 52 हजार कोटी रुपयाची  नवीन कंपन्याची गुतंवणूक करण्यात येणार आहे.

आमदार संजय सिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे 200 कोटी रुपयाचा निधी हा ड्रेनेज लाईनसाठी मंजूर करण्यात आला असून भविष्यात पाईपलाईचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसेच म्हाडा हा प्रकल्प माझ्या मतदार संघात निर्सगरम्य ठिकाणी उभा राहतोय याचा  मला आनंद आहे. सुत्रसंचालन ज्योती सुर्यवंशी यांनी केले तर आभार सिमरन सोळंखी यांनी मानले.कार्यक्रमास नक्षत्रवाडी येथील ग्रामस्थ व म्हाडाचे अधिकारी व  कर्मचारी उपस्थित होते.

०००

निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यात नोकरशाहीची भूमिका महत्त्वाची -मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

  •  मतदार याद्या बिनचूक असाव्यात याबाबत दक्षता घ्यावी
  • शाळा- महाविद्यालयातील अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी

सोलापूर, दि. १० (जिमाका): लोकशाहीच्या बळकटीकरणात नोकरशाहीचाही सहभाग मोठा व महत्त्वाचा असतो. त्यामुळे नोकरशाहीने निष्पक्ष व भयमुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी अत्यंत तटस्थपणे आपली भूमिका पार पाडली पाहिजे, असे आवाहन राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत आयोजित आढावा बैठकीत श्री. चोक्कलिंगम मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर,  उप जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, स्वीप चे नोडल अधिकारी सुधीर ठोंबरे व सर्व उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.

श्री. चोक्कलिंगम पुढे म्हणाले की, आगामी निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी अत्यंत जबाबदारीने काम करावे. विशेष मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदार यादया अत्यंत बिनचूक होतील याची संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी यांनी खात्री करावी. मतदार यादीतून नावांची वगळणी करत असताना निवडणूक आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे कार्यवाही करावी. स्थलांतरित होणाऱ्या मतदाराबाबत संबंधित जिल्ह्याच्या उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून नावे वगळणे अथवा मतदार यादीत ठेवण्याची कार्यवाही करावी, असेही त्यांनी सुचित केले.

जिल्ह्यातील 18 ते 19 वयोगटातील मतदारांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी शाळा महाविद्यालयात विशेष मोहीम राबवावी. या गटातील मतदारांची मोठ्या प्रमाणावर मतदार म्हणून नोंदणी होण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रारूप मतदार या प्रत्येक राजकीय पक्षाला त्वरित पोहोच कराव्यात. तसेच या याद्या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिद्ध होतील याची खात्री करावी. सर्व मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री आत्ताच करणे आवश्यक आहे, ऐनवेळी मतदानाच्या दिवशी मतदान यादीत नाव नसल्याबाबतच्या तक्रारी येतात, त्या होऊ नयेत यासाठी संबंधित मतदारांनी व प्रशासनाने ही योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर जिपीएस ट्रॅकिंग सिस्टीम व वेब कास्टिंग ॲप हे राज्यस्तरावरून प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चांगला अभ्यास करावा व तंत्रज्ञानाचा वापर निवडणूक कामकाज अधिक सुलभ व गतीने कशा पद्धतीने करता येईल यावर अधिक भर द्यावा, असे श्री. चोक्कलिंगम यांनी सांगून लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचा 57 कोटीचा खर्च झालेला असून राज्याकडून 22 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले होते. त्यापैकी फक्त 11 कोटीचा खर्च झालेला दिसून येत आहे. तरी 14 ऑगस्ट 2024 पर्यंत शंभर टक्के खर्च होण्याच्या दृष्टीने सर्व उपविभागीय अधिकारी यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी निर्देशित केले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 1 जुलै 2024 च्या अहर्ता दिनांकावर आधारित प्रारूप मतदार यादी दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या असून पाच राजकीय पक्षांनी सदरील याद्या घेऊन गेलेले असून उर्वरित पक्ष प्रतिनिधींना त्वरित याद्या पोहोच करण्यात येणार आहेत. दिनांक 6 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात एकूण 36 लाख 92 हजार 409 इतके मतदार असून मतदान केंद्राच्या संख्येत 124 ने वाढ होऊन सध्या 3 हजार 723 इतकी मतदान केंद्रांची संख्या आहे. लोकसभा निवडणुकीनंतर 35 हजार 576 इतकी मतदार संख्या वाढलेली आहे. मतदार नोंदणी प्रलंबित अर्ज, वयानुसार मतदार संख्या, फॉर्म नंबर 6 ची सद्यस्थिती, होम टू होम सर्व्हेची माहिती तसेच स्वीप कार्यक्रमाची सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली.

श्री. चोक्कलिंगम यांची रामवाडी गोदामाला भेट व पाहणी:

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम यांनी आज सकाळी रामवाडी येथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाला भेट देऊन ईव्हीएम मशीनची प्रथम स्तरीय तपासणीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

कोल्हापुरी चप्पल : देशी हस्तकलेचा अनमोल वारसा

0
भारतातील सर्वात जुन्या पारंपरिक हस्तकलांपैकी एक असलेल्या अशा कोल्हापुरी चपला आज पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या वलयात येत आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीचं आकर्षण महाराष्ट्रात आणि देशात...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

0
मुंबई, दि.२५ : भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन...

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी

0
गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडणार, सांडपाणी प्रक्रिया, बांबू क्लस्टर, विदर्भात खतांचा प्रकल्प, एनसीडी स्क्रिनिंगसाठी एआय, अनेक प्रकल्पांना गती नवी दिल्ली, दि. 25 : राज्यातील विविध विकास...

प्राचार्यांचे निवृत्ती वय ६५ करण्यासाठी सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा...

0
अमरावती, दि. २५ :  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीत प्राध्यापक आणि प्राचार्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी धोरणाचे सर्व पैलू...

विदर्भ ज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठ दर्जासाठी सहकार्य करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...

0
अमरावती, दि. 25 (जिमाका) : शहराच्या हृदयस्थानी 167 एकरावर आणि साडेतीनशे विविध वनस्पती असलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी सहकार्य...