महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई,दि.१४ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू झाली आहे. असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक झाली. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनूपकुमार यादव,आयुक्तडॉ.प्रशांत नारनवरे, बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
महिला व बाल विकास मंत्री तटकरे म्हणाल्या की, राज्यात आतापर्यत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. अजूनही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पात्र महिलेचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे. असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.
००००
काशीबाई थोरात/विसंअ
विविध योजना व उपक्रमांनी महसूल पंधरवडा साजरा
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई, दि .१४:–नागरिकांमध्ये महसूल विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनाबाबत जागरूकता वाढावी, महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचाव्या, शासनाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी महसूल दिन व १ ते १५ ऑगस्ट, २०२४ कालावधीत महसूल पंधरवडा करून विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात आले, मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना मुंबई शहर जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा आरंभ
महसूल पंधरवडा कालावधीत महाराष्ट्र विधानसभे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचा आरंभ करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान पात्र लाभार्थी यांना उत्पन्न दाखला व विशेष कार्यकारी अधिकारी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव, अपर जिल्हाधिकारी रवि कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी व महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
२ ऑगस्ट रोजी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” उपक्रमाची माहिती जिल्हा कौशल्य विकास अधिकारी श्री. संदिप गायकवाड यांना दिली. उपस्थित विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी यांना योजनेची व्याप्ती व अंमलबजावणीबाबत माहिती देण्यात आली. याबाबतची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया व प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करणेबाबत सुचना देण्यात आल्या. “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” याबाबत जेष्ठ नागरिकांना प्रसिद्ध तीर्थस्थळांना भेटी देण्यासाठी राज्यातील सर्व धर्मातील वयोवृद्धांसाठी योजना लागू असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. प्रसाद खैरनार, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांच्या मार्गदर्शनात ३ ऑगस्ट रोजी “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ४ ऑगस्ट रोजी कार्यालयात स्वच्छतेची विशेष मोहिम राबविण्यात आली. कार्यालयातील अभिलेखांचे व्यवस्थापन कामे करण्यात आली.
तर “जमिन विषयक प्रश्नांबाबत मार्गदर्शन” कार्यक्रमाचे आयोजन ५ ऑगस्ट रोजी करण्यात आले. यावेळी नागरिकांना मुंबई शहरातील शासकीय भाडेपट्टा करिता भोगवटदार वर्ग १ च्या हस्तांतरण बाबत राबविण्यात येणाऱ्या प्रकियेची माहिती नगर भूमापन व भूमि अभिलेख शाखेमार्फत देण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबई शहरातील जमीन विषयक प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात आले.
6 ऑगस्ट रोजी “पाऊस आणि दाखले” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भारतीय हवामान विभाग कुलाबा येथील अतिरिक्त महासंचालक सुनिल कांबळे यांचे पर्जन्यमान व इतर हवामान घटकांविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले. पाऊस व इतर हवामानाचे अंदाज कशाप्रकारे व्यक्त केले जातात याबाबत माहिती दृक श्राव्य माध्यमातून देण्यात आली. तसेच मुंबईतील हवामान परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली.
७ ऑगस्ट रोजी “युवा संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महसूल अधिकारी यांनी प्रत्यक्ष जयहिंद कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज, एसएनडीटी कॉलेज, केसी कॉलेज इत्यादी महाविद्यालयांना भेटी देऊन युवकांशी संवाद साधला. ८ ऑगस्ट रोजी “महसूल जन संवाद” या कार्यक्रमाचे आयोजन, ९ ऑगस्ट रोजी “महसूल ई-प्रणाली” बाबत, ११ ऑगस्ट रोजी “आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन” करण्यात आले.
दिव्यांग मासिक अनुदान प्रमाणपत्रे वितरण
१२ ऑगस्ट रोजी “एक हात मदतीचा – दिव्यांगांच्या कल्याणाचा” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याबाबत समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिव्यांग व्यक्तीकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाबाबत माहिती दिली. ८ लाभार्थ्यांना मासिक अनुदान प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.१३ रोजी “कार्यरत व सेवानिवृत्त महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद”तर १४ ऑगस्ट रोजी ” महसूल पंधरवडा वार्तालाप” दिन झाला.तसेच १५ ऑगस्ट रोजी ” महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी पुरस्कार वितरण” व महसूल पंधरवडा सांगता समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
००००००
किरण वाघ/विसंअ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना संबंधित घटकांपर्यंत पोहोचवून महिलांना, वंचित-उपेक्षितांना आत्मसन्मान मिळवून देण्यात सहभागी व्हा! – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १४ :- भारतीय स्वातंत्र्याच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना, क्रांतीकारकांना, हौतात्म्य पत्करलेल्या शहिद वीरांना, अभिवादन केले आहे. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी वचनबद्ध होऊया, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्य-जबाबदारीच्या भावनेतून राष्ट्रविकासात योगदान देऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणतात की, स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव तितक्याच उत्साहात, आनंदात, व्यापक स्वरुपात साजरा करायचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ‘हर घर तिरंगा..’ अभियानाने याची सुरुवात झाली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपण दृढसंकल्प करुया की, राष्ट्रविकासात सर्वांना सोबत घेऊन जाताना शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांना प्रगतीची योग्य संधी उपलब्ध करून द्यायची आहे. त्यांचे आर्थिक-सामाजिक सक्षमीकरण करायचे आहे. देशाला आत्मनिर्भर बनवताना महिलांना, वंचितांना, उपेक्षितांना, अल्पसंख्याकांना समाजात मान, सन्मान, आदर, प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये अर्थसहाय्य देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वर्षाला तीन गॅस सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, पिंक ई-रिक्षा योजना, शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला मोफत वीज देणारी बळीराजा वीजसवलत योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, युवकांना विद्यावेतन देणारी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक पर्यटनासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा विविध महत्त्वाकांक्षी योजना संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
देशाचे स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मूल्ये अबाधित राखणे, भारतीय राज्यघटनेवरचा विश्वास अधिक दृढ करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी आजवर सर्वोच्च त्याग केला, अमूल्य योगदान दिले. त्या सर्वांबद्दल आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करुया, असेही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त संदेशात केले आहे.
००००
राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित; तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कारही जाहीर
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा
मुंबई दि. 14 : अठ्ठावनाव्या आणि एकोणसाठाव्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. तांत्रिक आणि बालकलाकार गटातील पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
सन 2020 वर्षासाठीचा 58 वा तसेच 2021 वर्षासाठीचा 59 वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार आहे. सन 2020 या वर्षाच्या अंतिम फेरीसाठी मी वसंतराव, फास, बापल्योक, गोष्ट एका पैठणीची, बीटर स्वीट कडुगोड, जयंती, चोरीचा मामला, सुमी, फनरल, गोदाकाठ या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकन झाले आहे. प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनाकरिता जून,जयंती, फनरल या तीन चित्रपटांना नामांकन मिळाले आहे.
उत्कृष्ट कला दिग्दर्शन अशोक लोकरे, ए.ऋचा ( मी वसंतराव), उत्कृष्ट छायालेखन अभिमन्यू डांगे ( मी वसंतराव ),उत्कृष्ट संकलन मनीष शिर्के (गोष्ट एका पैठणीची), उत्कृष्ट ध्वनीमुद्रण राशी बुट्टे ( बिटरस्वीट कडूगोड ), उत्कृष्ट ध्वनीसंयोजन अनमोल भावे (मी वसंतराव),उत्कृष्ट वेशभूषा सचीन लोवाळेकर ( मी वसंतराव ), उत्कृष्ट रंगभूषा सौरभ कापडे ( मी वसंतराव ), उत्कृष्ट बाल कलाकार अनिश गोसावी ( टकटक ) यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
58 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 28 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या.
सन 2021 च्या 59 व्या राज्य चित्रपट महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी तिचं शहर होणं, एकदा काय झालं, गोदावरी, फ्रेम, कारखानिसांची वारी, इरगल, येरे येरे पावसा, बाल भारती, राख, बाईपण भारी देवा या दहा चित्रपटांची सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पारितोषिकासाठी नामांकन झाली आहेत. याचबरोबर प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती करीता जननी, लकडाऊन be positive, आता वेळ झाली आणि दिग्दर्शनाकरीता तिचं शहर होणं, फ्रेम,कुलूप या तीन चित्रपटांचे नामांकन घोषित करण्यात आले आहे.
सन 2021 साठी उत्कृष्ट कला दिग्दर्शन भूषण राऊळ, राकेश कदम (पांडू ), उत्कृष्ट छायालेखन रणजित माने (पोटरा), उत्कृष्ट संकलन परेश मांजरेकर (लक डाऊन be positive), उत्कृष्ट ध्वनीमुद्रण अनिल निकम (बेभान), उत्कृष्ट ध्वनीसंयोजन अतुल देशपांडे (बाई पण भारी देवा), उत्कृष्ट वेशभूषा शफक खान, रोहित मोरे, निलेश घुमरे ( येरे येरे पावसा), उत्कृष्ट रंगभूषा पूजा विश्वकर्मा (हलगट), उत्कृष्ट बालकलाकार आर्यन मेगंजी ( बाल भारती ) यांना तांत्रिक विभागातील पुरस्कार जाहीर झाले आहेत.
दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2021 या कॅलेंडर वर्षात सेन्सॉर संमत झालेल्या मराठी चित्रपटांपैकी एकूण 50 मराठी चित्रपटांच्या प्रवेशिका 59 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीसाठी प्राप्त झाल्या होत्या.
58 व्या राज्य चित्रपट पुरस्काराचे नामांकने खालीलप्रमाणे आहेत.-
सर्वोत्कृष्ट कथा :- विठ्ठल काळे (बापल्योक), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची ), रमेश दिघे ( फनरल उत्कृष्ट पटकथा :- मकरंद माने, विठ्ठल काळे (बापल्योक ),गजेंद्र अहिरे( गोदाकाठ), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )
उत्कृष्ट संवाद :- रमेश दिघे (फनरल), मकरंद माने, विठ्ठल काळे (बापल्योक ), शंतनू रोडे ( गोष्ट एका पैठणीची )
उत्कृष्ट गीते :- गुरु ठाकूर, (बापल्योक), वैभव जोशी ( मी वसंतराव ), गजेंद्र अहिरे ( गोदाकाठ)
उत्कृष्ट संगीत: – विजय गवंडे ( बापल्योक ), राहूल देशपांडे ( मी वसंतराव ), रोहित नागभिडे ( फिरस्त्या )
उत्कृष्ट पार्श्वसंगीत:- सारंग कुळकर्णी, सौरभ भालेराव ( मी वसंतराव ), विजय गवंडे ( बापल्योक ), अद्वैत नेमळेकर (फनरल),
उत्कृष्ट पार्श्वगायक:- अजय गोगावले (बापल्योक), आदर्श शिंदे (फिरस्त्या), राहूल देशपांडे (मी वसंतराव)
उत्कृष्ट पार्श्वगायिका:– आनंदी जोशी (काळी माती), सावनी रवींद्र (जीवनाचा गोंधळ), प्राची रेगे (गोदाकाठ)
उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शक :- शर्वरी जेमनीस ( मी वसंतराव ), सुजितकुमार ( गोष्ट एका पैठणीची), सुजितकुमार (चोरीचा मामला ),
उत्कृष्ट अभिनेता:- आरोह वेलणकर (फनरल), राहूल देशपांडे ( मी वसंतराव ), सिद्धार्थ मेनन (जून )
उत्कृष्ट अभिनेत्री :- सायली संजीव ( गोष्ट एका पैठणीची ), अक्षया गुरव ( बीटर स्वीट कडुगोड ), मृण्मयी गोडबोले ( गोदाकाठ )
उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- जितेंद्र जोशी (चोरीचा मामला), हेमंत ढोमे (चोरीचा मामला)
सहाय्यक अभिनेता :- नितीन भजन (सुमी), विठ्ठल काळे (बापल्योक), पुष्कराज चिरपुटकर (मी वसंतराव)
सहाय्यक अभिनेत्री:- प्रेमा साखरदांडे (फनरल), नीता शिंडे (बापल्योक), स्मिता तांबे (बीटर स्वीट कडुगोड),
प्रथम पदार्पण अभिनेता :- ऋतुराज वानखेडे ( जयंती), ओमप्रकाश शिंदे ( काळीमाती), वैभव काळे ( काळोखाच्या पारंब्या )
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :- पायल जाधव ( बापल्योक ), पल्लवी पालकर ( फास ) रेशम श्रीवर्धन ( जून )
59 व्या राज्य चित्रपट पुरस्काराचे नामांकने खालीलप्रमाणे आहेत. –
सर्वोत्कृष्ट कथा :- मंगेश जोशी, अर्चना बोराडे ( कारखानिंसांची वारी), जयंत पवार ( भाऊ बळी ३६०० रुपयांचा सवाल ), सलिल कुलकर्णी ( एकदा काय झालं)
उत्कृष्ट पटकथा :- रसिका अगासे ( तिचं शहर होणं ), वैशाली नाईक ( बाईपण भारी देवा ), निखील महाजन, प्राजक्त देशमुख ( गोदावरी )
उत्कृष्ट संवाद :- रशिद उस्मान निंबाळकर ( इरगाल ), नितिन नंदन ( बाल भारती ), प्रकाश कुंटे ( शक्तिमान )
उत्कृष्ट गीते:- जितेंद्र जोशी ( गोदावरी ), वलय मुळगुद (बाई पण भारी देवा ), संदिप खरे ( एकदा काय झालं )
उत्कृष्ट संगीत: – अमित राज ( झिम्मा ), डॉ.रुद्र कर्पे ( कुलूप ) सलिल कुलकर्णी ( एकदा काय झालं )
उत्कृष्ट पार्श्वसंगीत :- पंकज पडघन ( आणीबाणी ) ए.व्ही.प्रफुलचंद्र ( गोदावरी ), सारंग कुलकर्णी ( कारखानीसांची वारी),
उत्कृष्ट पार्श्वगायक :- राहूल देशपांडे ( गोदावरी ), शुभंकर कुलकर्णी ( एकदा काय झालं ), डॉ.भीम शिंदे ( इरगाल )
उत्कृष्ट पार्श्वगायिका :- आनंदी जोशी ( रंगिले फंटर), आर्या आंबेकर ( कुलूप ) सुवर्णा राठोड ( बाईपण भारी देवा )
उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक :– फुलवा खामकर ( लक डाऊन be positive ), विठ्ठल पाटील ( पांडू ), सुभाष नकाशे ( बाईपण भारी देवा )
उत्कृष्ट अभिनेता :-जितेंद्र जोशी ( गोदावरी,) सुमित राघवन ( एकदा काय झालं ), संदीप पाठक ( राख )
उत्कृष्ट अभिनेत्री :- सोनाली कुलकर्णी ( तिचं शहर होणं ), मृण्मयी देशपांडे ( बेभान), स्मिता तांबे ( गौरीच्या लग्नाला यायचंहं )
उत्कृष्ट विनोदी अभिनेता :- भालचंद्र कदम ( पांडू ), आनंद इंगळे ( लक डाऊन be positive ), सिद्धार्थ जाधव ( लोच्या झाला रे )
सहाय्यक अभिनेता :- प्रियदर्शन जाधव ( शक्तीमान), मोहन आगाशे ( कारखानिसांची वारी ), अमेय वाघ ( फ्रेम )
सहाय्यक अभिनेत्री :- हेमांगी कवी ( तिचं शहर होणं ), क्षीती जोग ( झिम्मा ), शीतल पाठक ( जननी )
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता :- रसिद निंबाळकर ( इरगाल ), महेश पाटील ( कुलूप ), योगेश खिल्लारे ( इंटर नॅशनल फालमफोक )’
उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री :-श्रुती उबाले (भ्रमध्वनी), सृष्टी वंदना(कुलूप), सृष्टी जाधव(इरगाल)
उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री :– सुकन्या कुलकर्णी-मोने ( बाई पण भारी देवा ), निर्मिती सावंत ( झिम्मा ), शुभा खोटे ( लक डाऊन be positive )
00000
दीपक चव्हाण/विसंअ
महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त यांच्या हस्ते अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरण
नवी दिल्ली, 14 : प्रधान सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांच्या हस्ते महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना आज राष्ट्रध्वज वितरीत करून ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात आले.
स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई पासून देशभरात राबविण्यात येणारा ‘हर घर तिरंगा’ (घरो घरी तिरंगा) अभियानास प्रारंभ केला. राज्य शासनाच्यावतीने ‘घरोघरी तिरंगा अभियाना’ची सुरुवात झाली असून, या अभियानातंर्गत आज कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात निवासी आयुक्तांच्या हस्ते राष्ट्रध्वज वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदनाच्या परिसरात असणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या घरोघरी जावून यावेळी निवासी आयुक्तांनी राष्ट्रध्वज वितरित केले. हे ध्वज प्रत्येकांनी घरावर लावण्याचे आवाहन यावेळी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत सदनातील घराघरांवर राष्ट्रध्वज डौलाने फडकले. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘घरोघरी तिरंगा’, ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’ असे नारे दिले व वातावरण देशभक्तीमय केले.
निवासी आयुक्त रूपिंदर सिंग यांनी सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व श्रीमती स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह उपस्थित महाराष्ट्र सदनातील अधिकारी -कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वितरित केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रातही राष्ट्रध्वजाचे वितरण
‘घरोघरी तिरंगा अभियान’अंतर्गत महाराष्ट्र परिचय केंद्रातही उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांच्या हस्ते कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले.
000