शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 615

लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे, हीच या भावाची इच्छा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंदसोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी
  • लाडक्या भावाकडून रक्षाबंधानाची ओवाळणी मिळाल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण

पुणे, दि. १७: महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछपत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आदी उपस्थित होते.

आजचा दिवस लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे असे नमूद करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाखो बहिणी मिळाल्या याचा मनापासून आनंद आहे. त्यांचे प्रेम ही जीवनातील मोठी शिदोरी आहे. या योजनेसाठी पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे. या दीड हजार रुपयांचे मोल गरजू बहिणींसाठी खूप आहे. त्यांना या रकमेतून कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासोबत आर्थिक उन्नती साधता येईल. आता मदतीसाठी कुणासमोर हात फैलावे लागणार नाही.

महिलांना योजनेचे अर्ज भरण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. अर्ज भरल्यानंतर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याची एकत्रित रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. काही महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. प्रत्येक पात्र भगिनीला योजनेचा लाभ दिला जाईल. लाखो बहिणींच्या खात्यात दर महिन्याला निश्चित रक्कम जाईल याचे खूप समाधान आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महिला भगिनींसाठी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’च्या माध्यमातून वर्षाला ३ गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. भावालाही मदत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली. सर्वांच्या जीवनात सुखाचे क्षण यावे यासाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. जनतेची सेवा हेच शासनाचे ध्येय असून प्रत्येक योजना यादृष्टीनेच गतीने राबविण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

महिला लखपती झालेल्या बघण्याची, त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याची शासनाची इच्छा असून महिलांच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, बहिणींच्या हितासाठी शासन आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी असा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न  आहे. यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्थाही वेगाने वाढणार असून महिलांचा सन्मान करणारा महाराष्ट्र घडवून दाखवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मार्च २०२५ पर्यंतची तरतूद केली असून पुढेही दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, आजचा हा सावित्रींच्या लेकींचा कार्यक्रम आहे. पुणे ही समाजकारणाची आणि परिवर्तनाची भूमी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची सुरूवात पुण्यापासून केली जात आहे. हे सरकार बहिणींना लाभ देणारे सरकार आहे. १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे कार्यक्रमापूर्वीच जमा झाले आहेत. ऑगस्टमध्ये ज्या महिलांच्या अर्जाची छाननी होईल, त्यांना जुलैपासूनच लाभ मिळेल. सप्टेंबरमध्ये ज्या महिलांच्या अर्जांची छाननी होईल, त्यांनाही जुलैपासूनच लाभ मिळेल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि सचिव अनुपकुमार यादव यांच्या नेतृत्वात अतिशय गतीने योजनेचा लाभ देण्याचे काम झाले आहे.

विकसित भारत करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे. महिलांचा विकास झाला, तरच भारत विकसित होऊ शकतो, असे प्रधानमंत्री कायम म्हणतात. त्यामुळेच केंद्र आणि राज्यात आम्ही स्त्रियांना केंद्रस्थानी ठेऊन योजना सुरू केल्या. लखपती दिदी, लेक लाडकी, शिक्षण शुल्क माफी योजना आणि लाडकी बहीण योजना या दृष्टीकोनातूनच सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याच्या अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी असावी, असा आमचा प्रयत्न आहे.

ही योजना म्हणजे आम्ही महिलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. ही रक्षाबंधनानिमित्त दिलेली ओवाळणी आहे. आईचं आणि बहिणीचं प्रेम जगातील कोणतीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. माझ्या माय माऊलीला पंधराशे रुपयांचे मोल समजते, असेही ते म्हणाले.

रक्षाबंधनानिमित्त भावांकडून बहिणीला ओवाळणी-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील महिलांना अधिक सक्षम, सबल करण्यासाठी त्यांना मान, सन्मान प्रतिष्ठा मिळवून देण्याकरीता अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेला माता-भागिनींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आजपर्यंत १ कोटी ३ लाख रुपये माता-भागिनींच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये जमा करण्यात आले आहे. या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान, हसू दिसून येत आहे. रक्षाबंधनानिमित्ताने ओवाळणी म्हणून भेट दिली आहे.

माता-भगिनी जीवन जगताना त्यांच्या आशा – अपेक्षा असतात परंतु, स्वतःचे हीत बाजूला ठेऊन कुटुंबाच्या भल्याकरीता त्या काम करीत असतात. या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या आशा- अपेक्षापूर्तीसाठी काम करण्यात येत आहे. यापुढेही या योजनेत सातत्य राहणार असून एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत व्यवसायिक शिक्षण अशा विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्याच्या हिताकरीता बेरोजगारी कमी करण्यासाठी, सर्व सामान्य नागरिकांचे जीवन सुखकर करण्यासाठी, मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र व राज्य शासन मिळून काम करीत असून नागरिकांनी विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांना दिलासा मिळेल – डॉ. नीलम गोऱ्हे

तीन दशकांच्या महिला धोरणाच्या इतिहासात या कार्यक्रमाच्या कार्यक्रमपत्रिकेत मान्यवरांच्या नावापुढे आईचे नाव लावल्याबद्दल समाधान व्यक्त करून विधान परिषद उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, महिलांची संख्या निम्मी असून दोन तृतीयांश तास त्या काम करतात. जगातील १ टक्के संपत्ती महिलांच्या नावावर आहे. अशा स्थितीत या योजनेमुळे महिलांना निश्चितपणे दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रबोधनाची परंपरा आणि महिला विकासाचा वारसा असलेल्या पुण्यात या योजनेचा समारंभ होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेद्वारे २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न- मंत्री आदिती तटकरे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंत्री आदिती तटकरे यांनी केले. दोन दिवसांनी रक्षाबंधन साजरा होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तीन लाडक्या भावांनी आधीच ओवाळणी दिली. या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला. १ कोटी ३५ लक्ष महिला लाभासाठी पात्र ठरल्या, त्यापैकी १ कोटी ३ लक्ष महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक आदींनी यासाठी खूप परिश्रम केले. २ कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसळेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘यशस्विनी प्लॅटफॉर्म’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात योजनेच्या धनादेशाचे आणि स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, खासदार मेधा कुलकर्णी, सुनील तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार प्रा. राम शिंदे, उमा खापरे, योगेश टिळेकर, प्रसाद लाड, दिलीप मोहिते पाटील, माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, राहुल कुल, महेश लांडगे, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, सुनील कांबळे, सुनील शेळके, महिला व बालविकास सचिव अनुपकुमार यादव, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, क्रीडा आयुक्त डॉ.राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले, महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, एकात्मिक बालविकास योजना सेवा आयुक्त कैलास पगारे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.

०००

बहिणी, युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासकीय योजनांच्या यशाची खरी पावती – पालकमंत्री अनिल पाटील

  • सर्वांना स्वावलंबी आणि समृद्ध करण्यासाठी शासनाच्या योजनांची आखणीआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ, मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षणाचा आदेश वितरण सोहळा संपन्न

 नंदुरबार, दि. १७ (जिमाका) : आज नंदुरबार शहरात आल्यानंतर शासनाचा प्रतिनिधी या नात्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि ‘मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजने’च्या लाभार्थ्यांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले, त्यामुळे मी अक्षरश: भारावून गेलो आहे. बहिणी आणि युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासनाने राबवलेल्या या योजनांच्या यशाची खरी पावती असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती नियंत्रण, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.

ते आज शहरातील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ व मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या आदेश वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमशा पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, रतन पाडवी अभिजित मोरे, जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी, कृष्णा राठोड (जि.प.), कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेत भगिनींच्या खात्यात 14 ऑगस्टपासून पैसे जमा व्हायला सुरूवात झाली असून  जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 61 हजार 997 महिला भगिनींच्या खात्यात येत्या 19 ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशीपर्यंत  जुलै व ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाचवेळी जमा होणार आहे. या भगिनींना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा” योजनेत वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. येणाऱ्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त 2 लाख 70 हजार 99 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या लेक लाडकी योजनेत चालू वर्षात 1 हजार मुलींच्या बॅंक खात्यावर 5 हजार रूपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. तरुणांना खाजगी तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा, म्हणुन सुरु केलेल्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेत जिल्ह्यात 2 हजार उमेदवारांना प्रथम टप्प्यामध्ये लाभ मिळणार असुन सध्या 617 उमेदवार या योजनेंतर्गत कामावर रुजू झालेले आहेत. आज 63 लोकांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीचे आदेश वाटप करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे.  65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता 100 टक्के अर्थसहाय्य देणारी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ शासनाने सुरू केली आहे.  दारिद्र्य रेषेखालील दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे या योजनेत खरेदी करता येणार आहेत, या सर्व योजना समाजातील सर्व घटकांसाठी असून या योजनांपासून जिल्ह्यातील एकही नागरीक वंचित राहणार नाही, असा विश्वासही यावेळी पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिला.

सर्वांना स्वावलंबी आणि समृद्ध करणाऱ्या योजनांची शासनाकडून आखणीआदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व कुटुंब नजरेसमोर ठेवून योजना तयार केल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना व यासारख्या काही योजना यापूर्वी मध्य प्रदेश आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये राबवल्या गेल्या आहेत. त्यांची फलश्रृती आणि त्यातून सर्वसामान्य माणसाचे झालेले समाधान लक्षात घेवून महाराष्ट्र शासनानेही आता अशा प्रकारच्या योजना हाती घेतल्या आहेत. या सर्व योजना अतिशय विचारपूर्वक सुरू करण्यात आल्या आहेत. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरूणांमध्ये प्रशिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आदिवासी विकास विभागाने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना गाईंचे वितरणाची योजना सुरू केली, ती योजना आता सर्वांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर राबवली जाणार आहे. सर्व सामान्य जनतेच्या डोक्यावर असलेले वीजबिल, रोजगार, पाणी यासारख्या प्रश्नांवर शासनाने प्राथमिकता दिली असून शहरे आणि गावे या सर्वांना बारमाही  पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

सर्वसामान्य जनतेच्या गणिताच्या या योजनांच्या अंमलबजवणीतील गतीमानता बघून त्याचा अपप्रचार केला जातो आहे, अशा अपप्रचार करणाऱ्यांपासून सावध राहून या योजनेचा लाभ सर्वांनी घेणे हेच या अपप्रचाराचे खरे उत्तर असेल. जिल्ह्यातील दळणवळण अधिक सुलभ व्हावे यासाठी 704 कोटी रूपए खर्चाच्या रस्ते, संरक्षक भितं व लहान पूलांच्या एकूण 902 कामांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 300 वाड्यावस्त्या रस्त्यांनी जोडल्या जाणार आहेत. यात 300 किलोमीटर रस्ते व 30 लहान, मोठ्या पुलांचा समावेश आहे, असेही यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांसाठी प्राथमिकता-धनंजय गोगटे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या सर्व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहेत, या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राथमिकता ठेवली आहे, या योजनांची जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आपल्या प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी केले आहे.

सहा लाडक्या बहीणींना दिला प्रातिनिधीक लाभ

यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील 06 लाभार्थी महिला भगिनींना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरीत करण्यात आले, तसेच त्यांनी यावेळी आपल्या बोली भाषेतून मनोगतही व्यक्त केले. त्यात सावित्री सुभाष पाडवी, नंदिता उखाजी वसावे, अरुणा शरद राठोड, पूनम कृष्णा बागुल, उषा सुदाम भिल, अनिता आत्माराम गावित यांचा समावेश होता.

21 आस्थापनांवर 63 युवकांना दिल्या नियुक्त्या

आज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यातील 21 शासकीय आस्थापनांमधील 63 पदांवर युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले.

राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रसारण

या कार्यक्रमानंतर पुण्यातील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी येथून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थित अतिथी व लाभार्थी तसेच नागरिक यांच्यासाठी प्रसारित करण्यात आले.

०००

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘उमेद’ अभियान बचतगटातील महिला एक कोटी राख्या पाठविणार

विविध योजना आणल्याबद्दल महिलांनी व्यक्त केली कृतज्ञता

मुंबई, दि. १७:  राज्य शासनाने महिलांसाठी विविध कल्याणकारी योजनांसह ‘मुख्यमंत्री माझी  लाडकी बहीण योजना’ सुरु केली आहे. या योजनेचा पहिल्या दोन महिन्यांचा लाभ राज्यातील पात्र भगिनींना डिबीटीद्वारे नुकताच वितरित करण्यात आला. या योजनेत महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. या निर्णयाचा फायदा अडीच कोटीहून अधिक महिलांना होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून महिलांना वर्षातून तीन गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणले आहे. यामुळे राज्यातील बचतगट चळवळीतील उमेद अभियानातील महिला ह्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविणार आहेत.

राज्यातील बचत गटाच्या महिलांमार्फत राखी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना राखी पाठविण्यात येणार आहे. शासनाने आणलेल्या नवीन योजनांमुळे सर्वत्र आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. १९ ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी ‘चलो मुंबई’ असा नारा गावोगावात महिला देत आहेत. मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाऊन ‘उमेद’ संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना राखी बांधली जाणार असल्याची माहिती ‘उमेद’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

शासनाने मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. महिलाना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. लेक लाडकी अभियान, महिलांना ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास योजना यापूर्वीच सुरु झाली आहे. व्यक्तिचे नाव लिहिताना त्यामध्ये पित्यासोबत आता मातेचे नाव टाकण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अशा विविध निर्णयांमुळे राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांनी महिलांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील महिलांमध्ये आशा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांत अधिक योजना आणत आहेत. मुख्यमंत्री हे आपले मोठे भाऊ आहेत, अशी भावना राज्यातील महिलांमध्ये निर्माण होत आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधताना महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्रीसाहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखाएवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत.  या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.

१४ ऑगस्टपासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच प्रातिनिधीक स्वरूपात ऑनलाईन संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेल्या पैशातून जर्मन भाषेचे शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होईल, अशा शब्दात ई – संवादात सहभागी झालेल्या पुणे जिल्ह्यातील साक्षी सुरुशे यांनी लाभ मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी रक्षाबंधनापूर्वीच आम्हाला ओवाळणी दिली, अशी हृदयस्पर्शी भावना मैना कांबळे यांनी व्यक्त केली. पल्लवी हराळे यांनी शिलाई व्यवसाय वाढवता येईल, असे सांगताना मुख्यमंत्री स्वतः बोलले याचा आनंद योजनेच्या लाभपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. उमेद अभियानाने महिलांना आर्थिक उन्नतीची उमेद दिली अशा शब्दात कविता कंद यांनी शासन बचतगटांना करीत असलेल्या सहकार्याबाबत धन्यवाद दिले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतुद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे, तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्या पुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असेलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने १०८ योजना सुरू केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या संवादावेळी केले.

०००

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘मोबाईल मेडिकल क्लिनिक’चे लोकार्पण

फिरत्या मेडिकल क्लिनिकच्या माध्यमातून रुग्णांना घरपोच उपचार सुविधा उपलब्ध होईल – पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

अमरावती, दि. 16 : मोबाईल मेडिकल क्लिनिकच्या माध्यमातून मेळघाटसह परिसरातील गरजू रुग्णांना घरपोच वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होईल, असे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांनी सांगितले.

आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून उपलब्ध झालेल्या फिरते मेडिकल क्लिनिक असलेल्या मोठ्या रुग्णवाहिकेचे पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. चांदुरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथील आमदार बच्चू कडू यांच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधिनस्त निवासी मूकबधीर विद्यालयाला सदिच्छा भेटप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते.

यावेळी आमदार बच्चू कडू, आमदार राजकुमार पटेल, माजी आमदार प्रवीण पोटे पाटील, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे पदाधिकारी यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले की, मेळघाटातील अतिदुर्गम गावात रस्ते सुविधा कमी असल्याने प्राथमिक औषधोपचारासह इतर वैद्यकीय उपचार सुविधा घेण्यासाठी खूप अडचणी येतात. वैद्यकीय सुविधा मिळविण्यासाठी दूर अंतरावरच्या आरोग्य केंद्रात जावे लागते. फिरते मेडिकल क्लिनिकमुळे आजारी व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचणे शक्य होऊन वेळेत संबंधित रुग्णाला उपचार सुविधा देता येईल, असे त्यांनी सांगितले. ही फिरते मेडिकल युनिट असलेली अँम्ब्युलन्स मेळघाटातील 25 गावात वैद्यकीय सेवा पुरविणार आहे. या मोबाईल मेडिकल क्लिनिकमध्ये सर्व प्रकारच्या वैद्यकीय, रक्त चाचण्या उपलब्ध आहेत, अशी माहिती बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

यावेळी पालकमंत्र्यांनी चांदुरबाजार तालुक्यातील कुरळपूर्णा येथील आमदार बच्चू कडू यांच्या सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था अधिनस्त निवासी मूकबधीर विद्यालयाला येथे सदिच्छा भेट देऊन विद्यालयाची पाहणी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम उद्या बालेवाडी येथे होणार

लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार

 

पुणे, दि. १६: ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही गरजू महिलांच्या घरसंसाराला हातभार लावणारी कल्याणकारी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आकाराला आली आहे. या योजनेच्या राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या (दि. १७) शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे होणार आहे.

राज्य शासनाने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वावलंबीकरण, आत्मनिर्भर करण्याबरोच त्यांच्या सशक्तीकरणाला चालना देण्याकरीता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना सुरू केली आहे. राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाची गोड भेट म्हणून रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमात महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील लाभ जमा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आदींसह खासदार, आमदार, प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील १५ हजाराहून अधिक लाभार्थी प्रातिनिधिक स्वरुपात कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्यावेळी लाभार्थींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, बैठक व्यवस्था, पार्किंग, महिलांना कार्यक्रमस्थळी आणण्याची व्यवस्था, त्यांची आरोग्य तपासणी, भोजन, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आदी व्यवस्था चोख होतील यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.

पुणे जिल्ह्यातील ५ लाखावर महिलांच्या खात्यावर रक्कम जमा

या योजनेंतर्गत पात्र महिलांना प्रतिमाह १ हजार ५०० रुपयांचा लाभ देण्यात येत असून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे एकत्रित ३ हजार रुपये लाभार्थी भगिनींच्या खात्यावर जमा होण्यास १४ ऑगस्टपासूनच सुरूवात झाली आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यातील ५ लाखाहून अधिक लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर या योजनेची रक्कम जमा झाली आहे.

बहिणींसाठी अखंड कार्यरत आहे यंत्रणा

उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’अंतर्गत सर्व पात्र महिलांना लाभ मिळेल, कोणीही पात्र भगिनी वंचित राहणार असे निर्देश दिले होते. त्यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा अखंड कार्यरत ठेवल्यामुळे राज्यात सर्वाधिक महिलांची नोंदणी पुणे जिल्ह्यात झाली आहे. राज्यात १ कोटी ५६ लाख ६१ हजार २०९ महिलांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी राज्यात सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील ९ लाख ७४ हजार ६६ महिलांनी नोंदणी केली आहे.

प्रशासनाच्या गतीमानतेमुळे ऑनलाईनसह ऑफलाईन अर्ज स्वीकारणे, ऑफलाईन अर्ज ऑनलाईन पोर्टलवर भरणे, अर्जांची छाननी करणे आदींसाठी २४ बाय ७ तत्त्वावर काम केल्यामुळे ९९.५४ टक्के अर्जांवर निर्णय घेण्यात आला.

प्रत्येक पात्र महिलेचा अर्ज तपासून तिला लाभ देण्याची प्रक्रिया लाभ मिळेपर्यंत सुरू राहणार आहे. योजनेचा लाभ हस्तांतर करण्यासाठी महिलांचे बँकखाते आधार संलग्न करण्याची कार्यवाही प्रशासनाच्यावतीने सुरू असून सर्व पात्र महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेकरिता उर्वरित पात्र महिलांना ३१ ऑगस्टअखेर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मंत्री कु. तटकरे आणि उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी घेतला तयारीचा आढावा

उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महिला व बाल विकास मंत्री कु. तटकरे आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे भेट देऊन सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमात येणाऱ्या महिलांची कोणतीही गैरसोय होणार नाही याकडे विशेष लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

संतांच्या निरुपणातून मनाला उभारी, समाजाला सकारात्मक दिशा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  • पंचाळे येथील श्री संत सद्‌गुरू योगिराज गंगागिरीजी महाराज १७७ व्या अखंड हरिनाम सप्ताहास भेट
  • नाशिक जिल्ह्यातील ६ वारकऱ्यांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांच्या मदतीची घोषणा

नाशिक, दि. 16 : संतांचे आध्यात्मिक अधिष्ठान मोठे आहे. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची ताकद मोठी आहे. ही परंपरा भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून गावागावात सुरू आहे. भजन कीर्तनातून समाजप्रबोधनाचे मोठे काम केले जाते. संतांच्या अभंग, प्रवचन आणि निरुपणातून मनाला उभारी व समाजाला सकारात्मक दिशा मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच आषाढी वारीमध्ये मृत्यू झालेल्या नाशिक जिल्ह्यातील 6 वारकऱ्यांच्या वारसाना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

सिन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र पंचाळे येथे आयोजित श्री संत सद्‌गुरू योगिराज गंगागिरीजी महाराज 177 व्या अखंड हरिनाम सप्ताहास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, आमदार माणिकराव कोकाटे, जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार हेमंत गोडसे आणि सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महंत गुरूवर्य रामगिरीजी महाराज, प्रा. रमेश बोरनारे, शिवाजी तळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

10 ऑगस्टपासून हा सप्ताह सुरू असून उद्या काल्याचा दिवस आहे. अखंड नामस्मरणाने वातावरणात प्रसन्नता आहे. हरिनाम सप्ताहाची परंपरा 177 वर्षे सुरू ठेवल्याबद्दल अभिनंदन करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून माणूस धावपळीच्या युगात थोडा काळ हरिनामात तल्लीन होतो. त्यामुळे भक्त वारकऱ्यांना सोयी सुविधा मिळाव्यात ही मुख्यमंत्री म्हणून आपली जबाबदारी आहे. आषाढी कार्तिकीसाठी पंढरपूरमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, उपस्थित टाळकरी, माळकरी यांना वंदन करुन आपण माझ्यासाठी विठ्ठलरूप आहात, असे ते म्हणाले.

संतांच्या आशीर्वादाने चांगले काम करण्याची उर्मी मिळते, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थक्षेत्र यात्रा करता यावी यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजनाही शासनाने सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे शासन सर्वसामान्यांचे आहे. त्यांच्यासाठी अनेक योजना शासनाने सुरु केल्या आहेत. माता भगिनींना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली असून आतापर्यंत 80 लाख भगिनींच्या खात्यात पैसे जमा आहेत. उर्वरित महिलांच्या खात्यातही रक्कम जमा होतील. ही योजना बंद होणार नाही, याची तरतूद केल्याचे सांगून त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे सांगितले. तसेच, लेक लाडकी लखपती योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी  मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजना, आनंदाचा शिधा अशा विविध योजना राज्य शासनाने सुरु केल्या आहेत, असे ते म्हणाले.

पर्यटन मंत्री गिरीश महाजन म्हणाले, महाराष्ट्रातील सर्वात मोठा हरिनाम सप्ताह इथे सुरू आहे. लाखो वारकरी संप्रदायातील भाविक येथे भवरूपी कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी येथे उन्हाची तमा न करता उपस्थित आहेत. 177 वर्षापासून सुरू असलेला हा सप्ताह असाच पुढे अखंड सुरू राहणार आहे. वारकऱ्यांना सेवा सुविधा देण्यासाठी दहा कोटींच्या निधीची तरतूद कऱण्यात येत आहे. यापूर्वी सरला बेटला 7.5 कोटींचा निधी वारकऱ्यांच्या मंडपासाठी उपलब्ध करून दिला आहे. बालाजी तीर्थक्षेत्राच्या धर्तीवर पंढरपूर येथे 120 कोटींच्या निधीतून शेड उभारण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रास्ताविक माणिकराव कोकाटे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

0000

 

 

राज्यपालांच्या उपस्थितीत ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ-लोणेरे’चा २६ वा दीक्षान्त समारंभ

भारत देशाची २०४७ पर्यंत विकसित भारत ओळख निर्माण होईल – राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

रायगड (जिमाका)दि.16:- भारतामध्ये सेवा क्षेत्रातील नेतृत्वासोबतच जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता आहे. 2047 पर्यंत विकसित भारत ही आपली ओळख असणार आहे. या काळात तरुणांना मोठया प्रमाणावर संधी निर्माण होणार आहे. प्रत्येक युवकाने आपले ध्येय निश्चित करावे. कठोर आणि प्रामाणिक मेहनत आणि सर्वोत्तम सातत्यपूर्ण कामगिरी ही यशस्वी होण्याची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे च्या 26 व्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर, अध्यक्ष राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रायगड उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री कु.अदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, उपमुख्य कार्यकारी डॉ.भरत बास्टेवाट, विद्यापीठ कुलगुरू डॉ.कारभारी काळे, कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, परीक्षा नियंत्रक डॉ.नरेंद जाधव आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.राधाकृष्णन म्हणाले, नव्या पिढीने तंत्रज्ञान, संशोधन, विचार आणि अर्थ अंमलबजावणी यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देवूनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल. भारताची झपाट्याने होणारी वाढ, लोकसंख्या शास्त्रीय लाभांश आणि जागतिक स्तरावर वाढते महत्त्व यामुळे आजच्या पदवीधरांसाठी अकल्पनीय संधी निर्माण झाल्या आहेत.आपण आपले ध्येय निश्चित करून आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.  आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे विद्यार्थी-केंद्रित धोरण तयार केले आहे. याचा फायदा निश्चित होणार आहे. यामुळे शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होईल.. तसेच हे नवीन विचार आणि नवीन उर्जा निर्माण करेल आणि बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करेल आणि उद्योजक पर्यावरण प्रणाली तयार करण्यासाठी सहाय्यक होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपल्या भारताची संस्कृती जिवंत राहिली व तिचे जतन झाले आहे त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशवासीयांना संविधान मिळाले आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रबोधन करून त्यांना त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून देशाचे नाव मोठे करणे व अर्थव्यवस्था सुदृढ करण्याबाबत आवाहन केले.

पद्मविभूषण डॉ.अनिल काकोडकर म्हणाले, एखा‌द्याचा ‘जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासासाठी आत्मसात केलेल्या कौशल्यांचा आणि ज्ञानाच वापरआपल्या दैनंदिन आयुष्यात करावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे राजदूत या नात्याने संपूर्ण राष्ट्रासाठी भरीव योगदान द्यावे असे सांगितले.

उद्योग मंत्री तथा पालकमंत्री श्री.उदय सामंत म्हणाले आपल्याला देशाला बलशाली बनवायचे आहे. यासाठी प्रत्येक युवकांने आपल्या ज्ञानाचा उपयोग करावा. आपले सामाजिक भान आणि दायित्व कायम लक्षात ठेवावे असे सांगितले. विद्यापीठाच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी शासनाकडून सेवा सुविधा देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगितले.

मा.राज्यपाल महोदय व मंत्री महोदयांच्याहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्र विद्यापीठातील सुवर्णपदक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव तसेच विद्यावाचस्पती पदवी प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्य गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यापीठातील विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.

0000000

 

समाज कल्याण अधिकारी व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी, गट-ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट-ब करीता संयुक्त चाळणी परीक्षेचे आयोजन दि. १८ ऑगस्ट, २०२४ रोजी तसेच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ या परीक्षेचे आयोजन दि. २५ ऑगस्ट, २०२४ रोजी करण्यात आले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ

 

 

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारामध्ये १२८ अर्ज निकाली

पालघर दि. 16(जिमाका):  जिल्हाधिकारी कार्यालय येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबारामध्ये 128 अर्ज निकाली काढण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10:30 वाजता जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सवरा, माजी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व सर्व विभागातील विभाग प्रमुख आणि नागरिक उपस्थित होते.

जनता दरबारामध्ये नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून 340 नागरिकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 128 अर्ज निकाली काढण्यात आले. तर 112 अर्ज प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी स्वतः नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न जाणून घेऊन त्यांचे अर्ज निकाली काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

पालघर दि 16 : काही दिवसांपूर्वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत आश्रमशाळांमधील 300 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याची दुर्घटना घडली होती. असे प्रकार बंद करण्यासाठी आश्रमशाळांमधील पोषण आहारात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

कांबळगाव येथील आश्रम शाळेच्या परिसरात असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहाला पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

पाहणी दौऱ्यावेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम खासदार डॉ. हेमंत सवरा आदी मान्यवर उपस्थित होते. पोषण आहाराबाबत इतरही काही तक्रारी निर्माण झाल्या होत्या. जिल्हा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी या घटनेची अद्ययावत माहिती जाणून घेतली असे पालकमंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.

पोषण आहार बनवत असताना यासाठी असणाऱ्या आदर्श पद्धती (sop) चे पालन केले जात नसल्याचे प्रथमदर्शनी लक्षात आले असून या सर्व बाबींची नियमित देखरेख करणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. २० ऑगस्टला याप्रकरणी विस्तृत अहवाल सादर करण्यात येणार असून कोणी हेतुपुरस्सर असे गैरप्रकार करत असेल, तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आश्रमशाळेतील पोषण आहार व्यवस्थेची पाहणी केली. विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत चर्चा करून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या.

ताज्या बातम्या

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्त्तेचा होणार चपखल वापर-  मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
नागपूर वन विभाग पेंच, ताडोबा-अंधारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील गावात ३ हजार १५० कॅमेरे व सायरन करणार वाघांची निगराणी गावात वाघ शिरताच वाजणार वस्त्यांमध्ये...

विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या विकासाचे प्रतिबिंब दिसावे – पालकमंत्री जयकुमार रावल

0
धुळे, दि. १२ (जिमाका): पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार, सबलीकरण आदी क्षेत्रांतील प्राधान्यक्रम ठरवून जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासात्मक कामांतून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे...

बिहारमध्ये ८०.११ टक्के मतदारांनी भरले नावनोंदणी फॉर्म

0
मुंबई, दि  १२ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) बिहारमधील जवळपास सर्व मतदारांशी थेट संपर्क प्रस्थापित केला असून, आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ६ कोटी...

सातत्य, एकाग्रता आणि समर्पण ही यशाची त्रिसूत्री – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
देशाच्या स्वावलंबन व सामरिक सज्जतेच्या वाटचालीत विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे नागपूर, दि. १२ : भारत आज जागतिक स्तरावर सर्वच क्षेत्रात अग्रेसर असणारा देश म्हणून पुढे...

शिवतीर्थावर शिवभक्त, शिवप्रेमींचा जल्लोष

0
सातारा दि. १२ (जिमाका):  छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान कर्तृत्वाचा वारसा सांगणाऱ्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील...