रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 58

विधानसभा लक्षवेधी

अतिक्रमित जमिनींवरील अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. ९ : नंदुरबार जिल्ह्यात अतिक्रमित जमिनींवर उभारण्यात आलेली अनधिकृत धार्मिक स्थळे निष्कासित करण्यात येतील. तसेच तक्रारी करण्यात आलेल्या अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामाबाबत विभागीय आयुक्त यांच्यामार्फत पुढील सहा महिन्यात संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील अनधिकृत धार्मिक स्थळांच्या बांधकामाबाबत सदस्य अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान सदस्य अतुल भातखळकर, सुधीर मुनगंटीवार, डॉ. संजय कुटे, गोपीचंद पडळकर, शंकर जगताप यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, फसवणूक करून विविध प्रलोभने दाखवून जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरणावर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून गृह विभागाच्या माध्यमातून कडक कायदा करण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या 5 मे 2011 च्या निकालानुसार व 7 मे 2018 च्या गृह विभागाच्या निर्णयानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाई करण्यात येईल.

यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके म्हणाले, धर्मांतरण केलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना त्यांच्या मूळ प्रवर्गाच्या लाभाची तपासणी करण्याबाबत अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या 26 आमदारांची बैठक घण्यात येईल. तसेच आदिवासी कुटुंबातील जबरदस्तीने धर्मांतरण केलेल्या नागरिकांना परत हा अनुसूचित जमाती प्रवर्गाचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. यासाठी अनुसूचित जमाती प्रवर्गातील आमदारांची समिती गठीत करण्यात येईल. या समितीमार्फत चौकशी करून एखाद्या विशेष योजनेचे नियोजन या घटकांसाठी करता येईल का, याचीही पडताळणी करण्यात येईल.

००००

निलेश तायडे/विसंअ

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्दमहसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

  • आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार
  • ५० लाख कुटुंबांना लाभ

मुंबई, दि.९ : राज्यातील महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणारा कायदा १९४७ नुसार ठराविक प्रमाणात कमी क्षेत्रफळ असलेल्या जमिनींची खरेदी-विक्री कायद्याने प्रतिबंधित होती. या पार्श्वभूमीवर १ जानेवारी २०२५ पर्यंत शहरी भाग, गावठाण पासून २०० मीटर पर्यंत आणि विविध प्राधिकरणांमधील भागात झालेले सर्व तुकड्यांचे व्यवहार मान्य करण्यात येणार आहेत. अशाप्रकारे एक गुंठेपर्यंत जमिन व्यवहारासाठी तुकडेबंदी कायदा रद्द केला जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत केली.

याबाबतची अधिकची माहिती देताना मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १५ दिवसात आदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सुमारे ५० लाख कुटुंबांना जमीन व्यवहाराचा फायदा होणार आहे. १ जानेवारी २०२५ नंतर अशा व्यवहारांमध्ये प्रचलित नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.

याबाबत सदस्य अमोल खताळ यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेचा चर्चेदरम्यान सदस्य जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, प्रकाश सोळंके, विक्रम पाचपुते, अभिजीत पाटील यांनीही उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.

मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाने ८ ऑगस्ट २०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अकोला आणि रायगड जिल्हे वगळता राज्यातील इतर ३२ जिल्ह्यांमध्ये स्थानिक क्षेत्र घोषित करून बागायतीसाठी १० आर आणि जिरायतीसाठी २० आर इतके प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले आहे. यामध्ये महानगरपालिका व नगरपरिषदा हद्दीतील क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला नाही. धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत १९४७ च्या कायद्यातील कलम ७, ८ व ८अ नुसार स्थानिक क्षेत्रामध्ये जमिनीचे तुकडे निर्माण होणार नाहीत, अशा पद्धतीनेच हस्तांतरण करता येते. मात्र, १ जानेवारी २०१६ रोजीच्या अधिसूचनेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण किंवा नगरविकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या, तसेच प्रादेशिक योजनेत अकृषिक वापरासाठी निश्चित केलेल्या जमिनी या कायद्याच्या तुकडेबंदीच्या नियमांपासून वगळण्यात आलेल्या आहेत.

तुकडेबंदी कायद्यामुळे अनेक व्यवहार प्रलंबित होते. नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हा कायदा रद्द केल्यामुळे कमी क्षेत्राची खरेदी-विक्री करता येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महसूल विभाग व नगरविकास १ चे अपर मुख्य सचिव, जमाबंदी आयुक्त आणि नोंदणी महानिरीक्षक अशा चार अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती गठित केली जाणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधीच्या सूचना असतील त्यांनी अपर मुख्य सचिव, महसूल यांच्याकडे लेखी स्वरूपात सात दिवसात पाठवाव्यात असेही मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

०००

शैलजा पाटील/विसंअ/  

पुण्यातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची बैठक- मंत्री दादाजी भुसे यांची माहिती

मुंबई, दि. ९ : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी लवकरच पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधींची विशेष बैठक आयोजित करून यामध्ये वाहतूक सुधारणा उपाययोजनांचा आढावा घेण्यात येईल, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य राहुल कूल, महेश लांडगे, भिमराव तापकीर यांनी पुण्यातील वाहतूक समस्येबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री श्री. भुसे म्हणाले की, पुणे शहरासाठी वर्ष २०२४ मध्ये सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून, त्यामध्ये रिंग रोड, बायपास रस्ते, उड्डाणपूल, मेट्रो यांसारख्या पर्यायी वाहतूक व्यवस्थांचा समावेश आहे.

पुणे रिंग रोड प्रकल्पाअंतर्गत नऊ बांधकाम पॅकेजेसपैकी ९० टक्के भूसंपादन पूर्ण झाले असून, हा प्रकल्प डिसेंबर २०२७ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हडपसर ते यवत सहापदरी उड्डाणपूल, पुणे-शिरूर उन्नत मार्ग व पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर सहापदरी ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाचे कामही सुरू आहे.

मेट्रो प्रकल्प व वाहतूक नियोजनावर भर

हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत संबंधित विभाग प्रमुख, वाहतूक पोलिस विभाग व पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत वेळोवेळी बैठक घेऊन आढावा घेतला जाईल. अधिवेशन संपण्यापूर्वी पुणे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील वाहतूक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यास उपाय योजना करणार – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे

मुंबई दि. ९ :- हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आयटीएमएस (ITMS) प्रणालीच्या माध्यमातून महामार्गावरील वेगमर्यादा, लेन शिस्त आणि इतर १७ प्रकारच्या नियमभंगावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याबरोबरच या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी आवश्यक उपाय योजना केल्या जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.

विधानसभा सदस्य काशिनाथ दाते यांनी समृद्धी महामार्गावर होणारे अपघात यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य विठ्ठल लंघे यांनीही सहभाग घेतला.

या लक्षवेधीच्या उत्तरात मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ मदत व्हावी यासाठी महामार्गावर अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद २१ वाहने (या वाहनामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी फायर फायटिंग, हायड्रॉलिक जॅक, कटरर्स, ऑक्सिजन सिलेंडर सिस्टीम इत्यादी प्रथमोपचार सुविधांची सोय करण्यात आली आहे), २१ रुग्णवाहिका,  १६ गस्त वाहने,  महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र १६ आणि ३० टन क्षमतेच्या १६ क्रेन यासह महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत १७२ सुरक्षा रक्षक अशी सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच २१ रुग्णवाहिका १०८ (आपत्कालीन वैद्यकीय सेवा महाराष्ट्र राज्य) अशी जोडलेल्या आहेत.

याव्यतिरिक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवेची रुग्णवाहिका (१०८) अहिल्यानगर जिल्ह्यात ४०,  अमरावती  ३१,  छत्रपती संभाजीनगर ३१, बुलढाणा  २३,  जालना १५, नागपूर ४०, नाशिक ४६, ठाणे ३९, वर्धा ११, वाशिम ११ अशा २८७ रुग्णवाहिका आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध असतात, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

विधानसभा सदस्य श्री. दाते यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित अपघात घटनेबाबत मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले, या अपघाताची माहिती कंट्रोल रूमला मिळताच तत्काळ मदतीसाठी वाहन पाठविण्यात आले. सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णांस आवश्यक उपचार मिळाले नाहीत या संदर्भात योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच सदस्य विठ्ठल लंघे यांच्या मतदारसंघातील रुग्णालयाबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी बैठक घेणार – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई दि. ९ :- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना उपयुक्त आहे. या महापालिका क्षेत्रातील आशा इमारतीच्या पुनर्विकास संदर्भात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य नरेंद्र मेहता यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना विधानसभेत मांडली. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य राजन नाईक यांनीही सहभाग घेतला.

मिरा भाईंदरमध्ये २४ क्लस्टर तयार करण्यात आले असून, त्यापैकी सात क्लस्टरची कार्यवाही सुरू असल्याचे सांगून राज्यमंत्री श्रीमती मिसाळ  म्हणाल्या, मिरा भाईंदर ग्रामपंचायतची नगरपालिका आणि नंतर महानगरपालिका झाली आहे. महापालिकेने घोषित केलेल्या युआरपी (URP) मधील बहुतांशी इमारती या ग्रामपंचायत कालावधीतील अनधिकृत इमारती तर काही इमारती या अधिकृत आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिकेने यावर्षी महापालिका क्षेत्रात ४२ अतिधोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. या इमारतींपैकी १६ इमारती या क्लस्टर मध्ये अंतर्भूत असल्याचेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.

मिरा भाईंदर मधील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकास संदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या बैठकीसाठी तेथील लोकप्रतिनिधीना आमंत्रित केले जाईल, असेही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

अर्धापूर नगरपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करणार – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. ९  : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर नगरपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य डॉ. तुषार राठोड व श्रीजया चव्हाण यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ बोलत होत्या.

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, तत्कालीन अर्धापूर ग्रामपंचायतीने युनानी दवाखान्याच्या बांधकामासाठी काही जमीन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दानपत्राद्वारे हस्तांतरित केली होती. मात्र, या जागेवर एका व्यक्तीकडून अनधिकृतपणे अतिक्रमण करून घराचे बांधकाम करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकरण सध्या जिल्हा न्यायालय, नांदेड येथे न्यायप्रविष्ट असून, न्यायालयाच्या निर्णयानुसार त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जळगाव दि.०९ जुलै – राष्ट्रीय राजमार्गच्या कामाकरिता शेत जमिनीचे भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, तसेच भूसंपादन करीत असताना दुजाभाव होता कामा नये, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग क्र. ७५३-एल (बोरगांव बुजूर्ग मुक्ताईनगर) येथील मौजे मुक्ताईनगर, अंतुर्ली व सातोड ता. मुक्ताईनगर जि. जळगांव येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन दराबाबत व इतर प्रलंबीत विषयांबाबत नुकतीच विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी श्री. बावनकुळे यांनी निर्देश दिले आहेत.

इंदूर ते छत्रपतीसंभाजीनगर (एल-७५३) राष्ट्रीय महामार्गाचा मुक्ताईनगर तालुक्यातून जाणारा मार्ग काहीसा वळणाचा असून त्यामध्ये दिशा (अलाइनमेंट) बदल केल्यास संपूर्ण रस्त्याचे अंतर कमी होऊ शकते तसेच खर्चातही बचत होईल. महामार्गाच्या संदर्भात मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले भूसंपादन करण्यात आलेल्या व ज्यांना भूसंपादनाचा मोबदला दिला आहे, याबाबत शासनस्तरावर तक्रारी प्राप्त होत असल्याने याबाबत प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे. असे श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.

शेत जमिनीचे भूसंपादन करताना यंत्रणांनी व्यक्तिभेद न करता सर्व शेतकऱ्यांना समान न्याय देण्याची भूमिका प्रशासनाने स्वीकारावी, जमिनीचे दहा-बारा वर्षा पूर्वीचे दर व आताचे चालू वर्षातील दर यामध्ये तफावत असल्याने शेतकऱ्यांना सुधारित दराने जमिनीचा मोबदला दिला पाहिजे. असे यावेळी राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री श्री गिरीश महाजन यांनी सुचित केले.

यावेळी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, उपस्थित होते तर दूरदृष्य प्रणाली द्वारे जिल्हाधिकारी जळगाव आयुष्य प्रसाद, यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, प्रांत अधिकारी, भूसंपादनाधिकारी, शेतकरी संघर्ष समिती मुक्ताईनगर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

 

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात; एसडीआरएफ, एनडीआरएफ  यंत्रणा सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ९: मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूर्व विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) सज्ज  आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात सभागृहात विषय मांडला होता.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूरस्थितीमुळे काही प्रवासी एसटी बसमध्ये अडकले होते. त्यांना नजिकच्या शाळेत स्थलांतरित करण्यात येऊन सर्व प्रवाशांना सुखरूपपणे घरी पाठवण्यात आले आहे.

गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग बंद असून, पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गडचिरोलीपर्यंत सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर शहरातील सखल भागांत पाणी साचले असून यावर संबंधित यंत्रणा लक्ष ठेऊन आहे, बचावकार्य सुरू आहे. या पूरस्थितीत एक व्यक्ती वाहून गेल्याचीही माहिती मिळाली आहे. याठिकाणी एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यांना सज्ज ठेवले आहे. आजही नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्याने संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असे, आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

नाशिक ‘मनपा’तील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 8 : नाशिक महानगरपालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांवर वेतनाबाबत अनेक गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत. या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येईल. संबंधित ठेकेदार आणि महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

याबाबत सदस्य देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कामगारांच्या खात्यात जमा होणाऱ्या वेतनातील रक्कम दुसऱ्याने काढल्यास, तो प्रकार फौजदारी गुन्हा मानला जाईल आणि दोषींवर कडक फौजदारी कारवाई केली जाईल. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी कामगार विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येईल. या समितीच्या माध्यमातून कामगारांचे वेतन थेट व सुरक्षितपणे त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

 

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

मुंबई, दि. 8 : राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे.

ही अधिसूचना काल (7 जुलै) राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली असून, पुढील तीन वर्षांसाठी हे प्राधिकरण कार्यरत राहणार आहे.

महाराष्ट्रातील विविध शासकीय आणि खासगी प्रकल्पांना सीआरझेड अंतर्गत मान्यता आवश्यक असते. यासाठी 1998 पासून महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण कार्यरत होते. मात्र, या प्राधिकरणाची मुदत डिसेंबर 2024 मध्ये संपुष्टात आली. त्यामुळे नवीन प्रकल्पाना मंजुरीसाठी अडचणी निर्माण होतं होत्या.

राज्य शासनाने नव्या प्राधिकरणाची स्थापना लवकर व्हावी म्हणून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. यानंतर राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेत, सातत्याने केंद्राशी संपर्क ठेवत हा विषय मार्गी लावला.

प्राधिकरणाच्या पुनर्रचनेमुळे राज्यातील प्रकल्प मार्गी लागतील आणि राज्याच्या शाश्वत विकासाला चालना मिळेल. या निर्णयामुळे विकास आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये समतोल राखत कार्य करता येईल. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला, यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानते, असे मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

प्राधिकरणाची रचना

नव्या प्राधिकरणात प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, वैज्ञानिक, पर्यावरण तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्था यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई येथून हे प्राधिकरण कामकाज पाहणार आहे.

प्राधिकरणातील प्रमुख सदस्य पुढीलप्रमाणे :

– पर्यावरण व हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव – अध्यक्ष (कार्यभारिक)

– महसूल, ग्रामविकास, नगरविकास, मत्स्यव्यवसाय व उद्योग विभागांचे सचिव – सदस्य

– मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी – सदस्य

– मँग्रोव्ह सेलचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक – सदस्य

– केंद्रीय सागरी मत्स्य संशोधन संस्था, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ – सदस्य

– पर्यावरण तज्ज्ञ: डॉ. एल. आर. रंगनाथ, डॉ. मिलिंद सरदेसाई, डॉ. अमित बन्सीवाल, डॉ. अनिश अंधेरिया

– बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे अध्यक्ष

– स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी

– पर्यावरण विभागातील संचालक स्तरावरील अधिकारी – सदस्य सचिव

प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्या :

* सीआरझेड अधिसूचनेनुसार प्रकल्प प्रस्तावांचे परीक्षण व शिफारस

* सागरी व किनारी परिसंस्थेचे संरक्षण आणि जैवविविधतेचे संवर्धन

* किनारी क्षेत्रातील विकास कामांवर नियंत्रण ठेवणे

* अधिनियमाचे उल्लंघन झाल्यास चौकशी आणि कारवाई

* केंद्र सरकारकडे आवश्यक बदलासाठी प्रस्ताव पाठवणे

* पारदर्शकतेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ स्थापन करून कामकाजाची माहिती प्रसिद्ध करणे

* पारंपरिक मच्छीमार व किनारपट्टी समाजाच्या हक्कांचे रक्षण

दर सहा महिन्यांनी अहवाल देणे बंधनकारक

प्राधिकरणाने कामकाजाचा तपशीलवार अहवाल दर सहा महिन्यांनी केंद्र सरकारला सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे केवळ पर्यावरण रक्षण नाही, तर शाश्वत विकासाच्या दिशेनेही राज्य शासनाची वाटचाल अधिक गतीमान होणार आहे. प्राधिकरणाची ही पुनर्रचना म्हणजे पर्यावरण रक्षण आणि विकास यामधील समतोल राखण्याचा प्रयत्न असून, मंत्री पंकजा मुंडे यांच्या सक्रिय पुढाकारामुळे प्राधिकरण गठीत झाले आहे.

000

नंदकुमार वाघमारे/विसंअ/

 

महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • विदेशी पतसंस्था करणार १२० कोटींची गुंतवणूक

मुंबई, दि. ८ : बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था (ECA) या सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहेत. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक ‘आयटीआय’ संस्थाचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. दरवर्षी ५००० ते ७००० विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या कौशल्यांचे प्रशिक्षण मिळून रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

विधानभवन येथे कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे, एम.डी अटल सोल्युशन इंटरनॅशनल बीव्ही नेदरलँडचे  व्यवस्थापकीय संचालक एडविन सिएसवर्दा, रुरल एन्हासन ग्रुपचे अंबर आयदे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, वाढवण बंदर विकास कंपनी लिमिटेडचे संचालक उन्मेष वाघ, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.प्रदीप, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाढवणसारख्या मोठ्या प्रकल्पात आता रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील. या करारामुळे आवश्यक मनुष्यबळ निर्मिती होऊन तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतील. कौशल्य विभागाने खासगी आणि सार्वजनिक भागीदारी धोरणातून महाराष्ट्राला कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात महत्वाचे स्थान मिळवून दिले आहे. आजच्या करारामुळे राज्यातील तरुणांना वाढवणच नाही तर इतर ठिकाणीही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असा विश्वास आहे.  बंदरे क्षेत्रातील कौशल्य विकासात महाराष्ट्र जागतिक ओळख निर्माण करेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘आयटीआय’ आता सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्था ‘आयटीआय’ या देशाच्या कौशल्य विकास व्यवस्थेचा कणा आहेत, ज्या व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम युवक घडवतात. सागरी वाहतूक, बंदर व्यवस्थापन आणि संलग्न क्षेत्रांत कुशल मनुष्यबळ आवश्यकता लक्षात घेऊन या क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी आयटीआय सज्ज झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उ‌द्योजकता विभागाकडून पीपीपी (सार्वजनिक-खासगी भागीदारी) मॉडेलनुसार ‘आयटीआय’ संस्थांना जागतिक दर्जाच्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचा उ‌द्देश आहे. हा सामंजस्य करार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत स्किल इंडिया मिशन, महाराष्ट्र आयटीआय आधुनिकीकरण धोरण 2025 आणि शाश्वत विकास उद्द‍िष्ट  यांच्याशी सुसंगत आहे. या निर्णयामुळे रोजगार निर्मिती होऊन आयटीआय काळानुरूप प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाली आहे, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

जेएनपीटी, वाढवण बंदर प्राधिकरणांसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

बंदर आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासत असते. सागरी वाहतूक आणि बंदर व्यवस्थापन मध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन जेएनपीटी, वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. परस्पर  सहकार्यातून कुशल मनुष्यबळ तयार करून रोजगार निर्मितीद्वारे राज्याच्या विकासाला नक्कीच अधिक चालना मिळेल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

महाराष्ट्राला उच्च दर्जाच्या कौशल्य विकासाचा केंद्रबिंदू बनवण्यासाठी ‘आयटीआय’चे बळकटीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर काळानुरूप व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा ‘आयटीआय’च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात येत आहे. सागरी वाहतूक आणि बंदर व्यवस्थापनमध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेवून जेएनपीटी, वाढवण आणि इतर बंदर प्राधिकरणांसाठी भविष्यकालीन कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक येथील ‘आयटीआय’ संस्थांचा समावेश असेल. महाराष्ट्र शासनाच्या सागरी केंद्राच्या व्हिजनला पूरक असे हे धोरण आहे.

‘आयटीआय’चे आधुनिकीकरण करणे, प्रगत सिम्युलेशन लॅब्स निर्माण करणे, ‘आयटीआय’मध्ये सागरी वाहतूक अभ्यासक्रम शिकवणे, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांचा समावेश करणे, या प्रशिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे प्रशिक्षण, प्रमाणपत्र कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या सामंजस्य करारामुळे भारतातील पहिले “निर्यातसक्षम” व्यावसायिक शिक्षण मॉडेल तयार होईल ज्याचे इतर राज्य नक्कीच अनुकरण करतील. या प्रकल्पासाठी ईसीए-आधारित वित्तपुरवठा मॉडेलचा अवलंब करण्यात येणार आहे. यामध्ये 12 दशलक्ष युरोची गुंतवणूक असून या प्रकल्पाची रूरल एनहान्सर ग्रुप ऑफ इंडिया अंमलबजावणी करणार आहे. जेएनपीटी व महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड यासाठी निधी सहाय्य करणार आहे. यामध्ये 98 टक्के राजकीय आणि 95 टक्के आर्थिक जोखीम कव्हर असलेले विमा संरक्षण (ECA framework) अंतर्गत हा एक सामाजिक परिणाम आधारित प्रकल्प आहे. भविष्यातील बंदरे कौशल्य विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी हा सामंजस्य करार निर्णायक ठरेल.

 

*****

संध्या गरवारे/विसंअ/

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांचा युनेस्कोमधील राजदूतांकडून सन्मान

मुंबई, दि. 8 : – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेतील शब्दांचा गौरवपूर्ण उल्लेख हा तमाम शिवप्रेमी आणि महाराष्ट्रासाठी एक आनंददायी आणि अभिमानास्पद क्षण आहे. युनेस्कोमधील ग्रीसचे राजदूत जॉर्जिओस कौमुत्साकोस यांनी राजमुद्रेतील शब्दांचा “अतिशय विद्वत्तापूर्ण शब्द” असा उल्लेख केला आहे.

युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांनी ग्रीसचे राजदूत श्री. कौमुत्साकोस यांना शिवछत्रपतींच्या राजमुद्रेचे स्मृतीचिन्ह भेट दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेत श्री. कौमुत्साकोस यांनी ही प्रतिक्रिया उत्स्फुर्तपणे व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेतील शब्दांची योजकता अत्यंत समर्पक असल्याचा उल्लेख त्यांनी केला. राजमुद्रेतील “शहाजींचे पुत्र शिवाजी (महाराज) यांच्या या मुद्रेचा महिमा चंद्राच्या कलांप्रमाणे वाढत राहील. जग त्याचा सन्मान करेल आणि ते केवळ लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.” या ओळीतील प्रत्येक शब्दांचा अर्थही त्यांनी समजून घेतला आणि राजमुद्रेतील शब्द खरे ठरत आहेत, असेही नमूद केले.

0000

 

वारी मार्गावर ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

मुंबई, दि . ८ : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमांतर्गत ९ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांना विनामूल्य आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या विशेष उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य विभागाने ९ लाख २३ हजार ५०९ वारकऱ्यांना आतापर्यंत आरोग्य सेवा पुरविली असून, परतीच्या वारीमध्येही दि. १० जुलैपर्यंत विभागामार्फत वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे. पालखी मार्गावर १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमार्फत आतापर्यंत एकूण १,११४ वारकऱ्यांना अत्यावश्यक आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे. त्यामुळे या वारकऱ्यांना जीवनदान मिळाले आहे.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि दिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या लाखो वारकऱ्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविली. या उपक्रमाच्या माध्यमातून पालखी मार्गावर आरोग्य विभागातर्फे प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, आरोग्य संदर्भ सेवा देण्यात आली. ५ चित्ररथांच्या माध्यमातून आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी विभागामार्फत नावीन्यपूर्ण व कल्पक पद्धतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. वारकऱ्यांना पालखी मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. त्यासाठी विभागाचे ४,३७६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ रात्रंदिवस कार्यरत होते.

पालखी मार्गावर वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहायक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाई कामगार अशा सर्व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटरवर ‘आपला दवाखाना’ तात्पुरता उभारण्यात आला होता. तातडीच्या आरोग्य सेवेसाठी फिरत्या दुचाकी वाहनासह आरोग्यदूत तैनात ठेवण्यात आले होते. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने प्रत्येक ठिकाणी अॅम्बुलन्स फिरू शकत नाही, त्यामुळे फिरते दुचाकी आरोग्यदूत प्रथमोपचार पेटीसह सज्ज ठेवण्यात आले होते. त्यांच्या माध्यमातून वारकऱ्यांना तातडीची आरोग्य सेवा पुरविण्यात आली. याशिवाय १०२ व १०८ या क्रमांकाच्या अॅम्बुलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत होत्या. पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आली होती. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सुविधा देण्यात आली. पुणे परिमंडळ, पुणे व पुणे जिल्हा परिषद स्तरावरुन २ आरोग्य पथके सुसज्ज रुग्णवाहिकेसह अविरत पालखी परतेपर्यंत होते.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी दरम्यान ३,५६,३८९ वारकऱ्यांना, श्री संत तुकाराम महाराज पालखी दरम्यान २,२९,१८३ तर श्री संत सोपानकाका महाराज पालखी दरम्यान १९,३६४ वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. मानाच्या इतर पालख्या व दिंड्यांमध्ये ८५,३८६ वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यात आली आहे. पंढरपूर – संस्था व एचबीटी (बूथ) मध्ये ६२,६७० वारकऱ्यांना, पंढरपूर – उपजिल्हा रुग्णालय व ट्रामा आयसीयू.मध्ये ८६,९२२ वारकऱ्यांना तसेच तीन रस्ता शिबिरामध्ये ८३,५९५ वारकऱ्यांना आरोग्य सेवा पुरविण्यात आली आहे. आरोग्य सेवा पुरविण्यात आलेल्या बाह्यरुग्ण संख्या ९,१८,४९९ तर आंतररुग्ण संख्या ५,०१० अशी एकूण ९,२३,५०९ वारकरी भक्तांना आरोग्य सेवा पुरविण्यात आलेली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत पालखी मार्गावर पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेची वैशिष्ट्ये

– पालखी सोहळा २०२५ साठी एकूण मनुष्यबळ – ४,३७६

– प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ – २०३

– वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका २४ x ७ उपलब्ध – ३३१

– दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट – ३५००

– महिला वारकऱ्यांसाठी रुग्णालयामध्ये कार्यरत स्त्री रोग तज्ज्ञ – १५

– पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष – ३७

– पालखी मार्गावर आरोग्य दूत – २९०

– पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ – ५

– पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष – ४६

– आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.

– विविध माध्यमाद्वारे आरोग्य जनजागृती.

– पालखी मार्गावरील सर्व हॉटेल्स व त्याअंतर्गत असलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी तसेच पाणी नमुने तपासणी.

– पालखी मार्गावर १८६ टँकरव्दारे शुध्द पाणी पुरवठा व मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी.

– पाण्याच्या सर्व स्रोतांची ओटी टेस्ट तसेच आरोग्य संस्थांमार्फत जैवकचरा विल्हेवाट.

0000

संजय ओरके/विसंअ/

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ : विद्यार्थी हितासाठी निर्णय

मुंबई, दि. 8 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध आरक्षण प्रवर्गांतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्युएस/एनसीएल/सीव्हीसी/टीव्हीसी (EWS/NCL/CVC/TVC) बाबतची मूळ प्रमाणपत्रे अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या  दिनांकापर्यंत सादर करण्याची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र आणि जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक विद्यार्थी आणि पालक करत होते. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते, ज्यांची तारीख 8 जुलै 2025 होती. ती आता 11 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी विविध आरक्षण प्रवर्गांतून अर्ज सादर करताना ज्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र पडताळणी ऐवजी फक्त जात पडताळणीसाठी अर्ज केला आहे.आणि त्याची पावती सादर केली आहे. या विद्यार्थ्यांना आता केंद्रीय अंतिम प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रवेश घेता  येणार आहे. विद्यार्थी व पालकांची मागणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देऊन ही मुदतवाढ देण्यात येत आहे.

यानंतरही जात पडताळणी प्रमाणपत्र सादर (एससी,एसटी वगळून) करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांना आल्या तर याबाबत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेऊन यावर धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना आपला प्रवेश घेण्यासाठी वेळ मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अधिक माहितीसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी, असे आवाहनही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी – सरन्यायाधीश भूषण गवई

मुंबई, दि. ८ : भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून भारतीय राज्यघटना अद्वितीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या सक्षम राज्यघटनेमुळे देशातील कोणतीही व्यक्ती सर्वोच्च पदावर पोहोचू शकते, ही राज्यघटनेची ताकद असल्याचे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

विधानमंडळाच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना भारताची राज्यघटना या विषयावर सरन्यायाधीश श्री. गवई बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्रीगण, दोन्ही सभागृहाचे सदस्य उपस्थित होते.

राज्यघटनेचा इतिहास सांगून सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, एक देश आणि सर्वसमावेशक एकाच राज्यघटनेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठाम भूमिका घेतली. यामुळेच जात, धर्म बाजूला ठेवत न्यायदानात आणि सर्व बाबतीत देश एकसंध राहण्यास मदत मिळाली आहे. देशाने राज्यघटनेचा अमृत महोत्सवी कार्यकाल पूर्ण केला आहे. गेल्या ७५ वर्षांच्या कालखंडामध्ये कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळाने राज्यघटनेला अभिप्रेत काम केले आहे. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समान न्याय राज्यघटनेमुळेच सर्वांना मिळाला.

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे महिलांना शिक्षणाचे दालन खुले झाले. यामुळे महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष या देशाच्या सर्वोच्च पदावर महिला राज्यघटनेच्या समानतेमुळेच पोहोचल्या. आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती या घटकातील नागरिकांनाही राज्यघटनेमुळे उच्च पदावर विराजमान होता आल्याचे सरन्यायाधीश श्री. गवई यांनी सांगितले. उपेक्षित, वंचित, शोषित, पिडीत समाजासाठी समान न्याय देण्याचे काम पार पाडता आल्याबद्दल त्यांनी राज्यघटनेच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे सुपुत्र भारताचे सरन्यायाधीश झाले. महाराष्ट्राचा मराठी माणूस भारताच्या सर्वोच्चपदी पोहोचल्याने राज्याला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मानवता आणि संवेदनशीलता हा सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या स्वभावातील महत्वाचा गुण आहे. राज्यात न्यायाधीश असताना त्यांनी विविध महत्वाच्या संदर्भात व्यापक जनहित पाहून न्यायदानाचे काम करून मार्ग काढण्यावर भर दिला. नागपूरमधील झोपडपट्टी तोडण्याच्या वेळीही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावून त्यावर तोडगा काढून स्थगिती मिळवून दिली. अतिशय सामान्य माणूस असा असामान्य होऊ शकतो, हे सरन्यायाधीश श्री. गवई यांनी दाखवून दिले आहे. आमदार निवासात असताना ते जनतेच्या राहण्याची व्यवस्था करून स्वत: व्हरांड्यात बसून अभ्यास करीत. मात्र त्यांनी अभ्यासामध्ये खंड पडू दिला नाही.

टायगर कॉरिडॉरच्यावेळी रस्त्याची अनेक कामे अडलेली होती, मात्र सरन्यायाधीश श्री.गवई यांनी यावर समिती नेमून मानवतेचा दृष्टिकोन, व्यापक जनहित समोर ठेवून न्यायदान केले. यामुळे अडलेली कामे पूर्ण होऊ शकली, अशी आठवण मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितली. सरन्यायाधीश श्री. गवई हे समन्वय आणि चर्चेतून प्रत्येक विषयावर मार्ग काढतात. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्यांच्या न्यायदानाच्या कार्याची इतिहासात दखल घेतली जाईल, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

न्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी भूषण गवई यांची नियुक्ती सामाजिक समतेचा आणि सर्वसमावेशकतेचा विजय आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अनेक निर्णयांनी मानवता, संवेदनशीलता आणि संविधानिक मूल्यांची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केले.  सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकांना त्यांनी न्याय, हक्क मिळवून दिला. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी माणुसकीचे तत्व कायम जपले. केवळ न्यायमूर्ती म्हणून नव्हे तर, एक आदर्श नागरिक, कठोर परिश्रमी विद्यार्थी, आणि एक संवेदनशील माणूस म्हणूनही त्यांचे व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. न्यायदान करताना त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले असून त्यांची भाषा सौम्य असली तरी निर्णय ठाम असतात आणि म्हणून त्यांचे कर्तृत्व दीपस्तंभासारखे आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले.

सरन्यायाधीशांचा सत्कार न्यायमंडळ स्तंभाचा गौरव – उपमुख्यमंत्री अजित पवार

विधिमंडळातील सरन्यायाधीश श्री. गवई यांच्या सत्काराची इतिहासात नोंद होईल. कारण हा सत्कार लोकशाहीच्या एका स्तंभाने दुसऱ्या स्तंभाचा केलेला गौरव असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

देशाच्या सरन्यायाधीशांचे महाराष्ट्राच्या विधिमंडळात राज्यघटनेचे विविध पैलू उलगडणारे व्याख्यान ही घटना विधिमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली जाणारी आहे. लोकशाहीला देखील अधिक बळकटी देणारी आहे.

लोकशाही व्यवस्थेत कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ हे तीन महत्त्वाचे स्तंभ आहेत. माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानतो. लोकशाहीची व्यवस्था अधिक सुदृढ होण्यासाठी, टिकवण्यासाठी, मजबूत राहण्यासाठी या सर्व संस्थांनी परस्परांचा मान, सन्मान, आदर ठेवून आपापल्या अधिकाराच्या मर्यादेत स्वतंत्रपणे काम करणे अपेक्षित आहे. यातूनच आपली लोकशाही बळकट होणार आहे. न्याय प्रक्रियेमध्ये विकेंद्रीकरणाची सरन्यायाधीश भूषण गवई यांची भूमिका देशातल्या गावखेड्यात, दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना न्याय देणारी आहे, हा महाराष्ट्राचा गौरव वाढविणारा क्षण असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

शोषित, वंचितांचा कळवळा असणारे सरन्यायाधीश – सभापती  प्रा.राम शिंदे

सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सभागृहात होत असलेला सत्कार म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. अभ्यासू वृत्ती, चिकित्सक स्वभाव, धाडसी आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी असणारे आणि शोषित, वंचितांचा कळवळा असणारे सरन्यायाधीश असल्याचे सभापती  प्रा.राम शिंदे यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले.

न्यायाधीशांनी समाजाशी एकरूप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य पद्धतीने न्यायदान होईल. भारताच्या राज्यघटनेचे श्रेष्ठत्व, बेसिक स्ट्रक्चर, फंडामेंटल राईट्स यांना प्राधान्य देऊन समता आणि न्याय याची प्राप्ती करणारी शक्ती असणारी न्यायाधीशांची महत्त्वाची भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, मराठी माणूस सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे.

सूत्रसंचालन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले तर आभार अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मानले.

0000

धोंडिराम अर्जुन/गजानन पाटील/ससं/

 

ताज्या बातम्या

जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी लवकरच धोरणात्मक बदल –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २ - जनतेला उत्तम प्रशासनाचा प्रत्यय यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणेत बदल व्हावे ही अनेकांची भावना होते. ती लक्षात घेऊन एप्रिल महिन्याच्या पहिल्या...

“सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख – डॉ. नीलम गोऱ्हे”

0
पुणे, दि. २ ऑगस्ट २०२५ : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या...

पिंपळस ते येवला रस्त्याच्या कामास अधिक गती द्या –मंत्री छगन भुजबळ

0
नाशिक, दि. २ ऑगस्ट,(जिमाका वृत्तसेवा): पिंपळस ते येवला चौपदरी रस्ता काँक्रीटीकरण कामास अधिक गती देण्यात येऊन काम नियोजित वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना राज्याचे...

आगामी काळात धुळे जिल्ह्याला अधिक गतीने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू – पालकमंत्री...

0
धुळे, दि ०२ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्याचा मागील काळातील विकासाचा अनुशेष भरून काढून धुळे जिल्ह्याला अधिक वेगाने विकासाच्या दिशेने नेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे...

विश्वविजेती दिव्या देशमुखचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचेकडून अभिनंदन

0
नागपूर, दि. ०२ : जॉर्जिया येथे नुकत्याच पार पडलेल्या फिडे महिला बुद्धिबळ वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत दिव्या देशमुख हीने इतिहास रचला  असून विश्वविजेती ठरली आहे....