शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025
Home Blog Page 527

मुलांनी फुलाप्रमाणे प्रफुल्लित, आनंदी राहावे – न्यायाधीश सुनीता तिवारी

सांगली, दि. २९ (जि. मा. का.) : मुलांनी त्यांच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीकरिता फुलाप्रमाणे प्रफुल्लित, आनंदी, विवेकी जीवन व्यतीत करावे, असे प्रतिपादन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश सुनीता तिवारी यांनी केले.

कौटुंबिक न्यायालय सांगली यांच्या वतीने बालसुरक्षा सप्ताह अंतर्गत पक्षकार, वकील वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्या मुलांकरिता मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी  सामाजिक कार्यकर्ते वैभवी प्रेमलता संजय व रोहित वनिता गजानन यांनी मुलांसाठी विविध खेळ व गाणी घेतली. यामध्ये सर्व बालकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या कार्यक्रमांतर्गत सर्व सहभागी बालकांसाठी माणुसकीची भिंत या विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत बालकांसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. सर्व बालकांना त्यांच्या आवडीच्या अनेकविध वस्तू मिळाल्याने मुले आनंदीत झाली होती.

सूत्रसंचालन कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक ज्योती बावले भालकर यांनी केले तर आभार न्यायालयाच्या सहाय्यक अधिक्षक शैलजा वेदपाठक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायालयाचे कर्मचारी विकास राऊत, संजय लोणकर, महेश खटावकर, सुनीता चौगुले, श्रुती दुधगावकर, शरद चांदवले, तृप्ती फासे आदिंनी परिश्रम घेतले.

00000

गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना प्रधानमंत्री यांच्याकडून मदतीची घोषणा

नवी दिल्ली, 29 :- महाराष्ट्रातील गोंदिया येथे झालेल्या भीषण बस अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. प्रधानमंत्री यांनी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून मृतांच्या कुटुंबियांसाठी 2 लाख रुपयांची मदत तर जखमी झालेल्या प्रवाशांसाठी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

या दु:खद घटनेबाबत प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी समाजमाध्यम एक्सवर नमूद केले आहे की, महाराष्ट्रात गोंदिया येथे झालेल्या बस अपघातात जीवितहानी झाल्यामुळे अत्यंत व्यथित आहे. जखमींनी लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करत असून मृतांच्या कुटुंबियांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी’तून 2 लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये मदत देण्यात येणार आहे.

0000

 

काश्मिरी विद्यार्थ्यांचा राज्यपालांशी संवाद

मुंबई, दि. २९ : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक-युवतींनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले.

काश्मीर हा भारतातील सर्वात सुंदर प्रदेश आहे व जीवनात एकदा तरी काश्मीरला भेट देण्याची इच्छा प्रत्येक भारतीयाला असते असे सांगून एम. जी. रामचंद्रन यांच्या तामिळ चित्रपटात आपणास काश्मीरचे दर्शन घडल्यापासून आपण काश्मीरला भेट देण्याचे स्वप्न बाळगून असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

विविध प्रदेशांना भेट दिल्यास आपण परस्परांना चांगले समजून घेऊ शकतो असे राज्यपालांनी सांगितले. या दृष्टीने काश्मीरच्या युवकांची महाराष्ट्र भेट परस्पर सबंध दृढ करण्यास उपयुक्त ठरेल असे राज्यपालांनी सांगितले. काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग असून पुढे देखील राहील असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले. आपण सर्वांनी एक देश म्हणून एकत्र राहिल्यास जगातील कोणतीही महाशक्ती आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही, असे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी श्रीनगर, अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम व पहलगाम या जिल्ह्यातील युवक- युवतींनी राज्यपालांशी संवाद साधला. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनांचे राज्य संचालक प्रकाश मनुरे, जिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला व इतर उपस्थित होते. या भेटीनंतर काश्मिरी युवकांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.

0000

Group of 125 Kashmiri Youths meet Maharashtra Governor

Mumbai A group of 125 youths from the six districts of Kashmir, currently on a visit to Mumbai called on Maharashtra Governor C P Radhakrishnan at Raj Bhavan. The youths comprising 30 girl students are visiting Maharashtra under the ‘Watan Ko Jaano’ programme organised by the Nehru Yuva Kendra Sanghatan as part of the Kashmir Youth Exchange Programme.

State Director of Nehru Yuva Kendra Sanghatan Prakash Manure, District Youth officer Nishant Rautela and others were present.

००००

 

गोंदिया जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २९ : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.
अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
0000

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ३ डिसेंबरला डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची मुलाखत

मुंबई. दि. २८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्रकार्यक्रमात महापरिनिर्वाणदिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व आर्थिक विचार या विषयावर अर्थशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. भालचंद्र लक्ष्मण मुणगेकर यांची विशेष मुलाखत मंगळवार दि. ३ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.०० वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून देशाची राज्यघटना लिहिली आणि देशाला एक सर्वंकष असे संविधान दिले. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असेही संबोधले जाते. त्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य कार्याबद्दल डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमात माहिती दिली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवरही मुलाखत प्रसारित होणार आहे.  निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

एक्स – https://x.com/MahaDGIPR,  

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR,  

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

पसंतीच्या वाहन नोंदणी क्रमांक आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा

मुंबई, दि. २७ : नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षीत नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची गरज नाही. पसंतीचे वाहन नोंदणी क्रमांक आरक्षीत करण्यासाठी राज्यातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी  ऑनलाईन सुविधा कार्यान्वीत करण्यात आली आहे.

ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहराविरहित) स्वरूपाची असून त्यासाठी अर्जदारास आधार संलग्न मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. हा मोबाईल क्रमांक नोंद करून आधार ओटीपी किंवा मोबाईलद्वारे ओटीपी प्राप्त करून https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करता येणार आहे.

सद्यस्थितीत नवीन मालिका सुरू केल्यानंतर नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची कार्यपद्धती पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. विविध संवर्गातील वाहनांसाठी नवीन मालिका सुरू केल्यानंतर प्रथम संबंधित कार्यालयामार्फत आकर्षक अथवा पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जातील. त्यामध्ये पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्याबाबत लिलावाची प्रक्रिया पूर्ण करून जास्तीच्या रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास संबंधित कार्यालयातील रोखपालद्वारे पसंतीच्या क्रमांकाचे शुल्क भरणा केल्याची पावती जारी करण्यात येईल.

या फेसलेस सेवेमुळे सुमारे २.५० लाख वाहन मालकांना परिवहन कार्यालयांना भेट देण्याची आवश्यकता नाही. नागरिकांना काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी dytccomp.tpt-mh@gov.in येथे ई-मेलद्वारे संपर्क साधावा. आकर्षक/पसंती क्रमांक आरक्षित करण्यासाठी वरीलप्रमाणे (workflow) कार्यपद्धतीचा अवलंब वाहनधारकांनी करावा व या फेसलेस सेवेचा लाभ घ्यावा,  असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी केले आहे.

अशी करा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी

अर्जदाराने https://fancy.parivahan.gov.in/ या संकेतस्थळावर जावून न्यू युजर / रजिस्टर नॉऊ यावर क्लिक करावे. यामध्ये संपूर्ण नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून ईमेल व मोबाईल क्रमांक ओटीपीद्वारे पडताळून घ्यावे. त्यानंतर संकेतस्थळावर लॉग इनमध्ये जावून ईमेल किंवा मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेले युजर आयडी व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. त्यानंतर अर्जदाराने ऑनलाईन उपलब्ध असणारे पसंती क्रमांक निवडावे. यासाठी घेण्यात येणारे शुल्क एसबीआय ई पे या पेमेंट गेटवेवरून ऑनलाईन अदा करावे आणि प्रक्रिया पूर्ण करावी. त्यानंतर ई पावती प्रिंट काढून संबंधित वाहन विक्रेत्याकडे (डीलर)कडे नोंदणीसाठी देण्यात यावी.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

वाहन वितरकांच्या स्तरावरच होणार हलक्या मालवाहू वाहनांची ऑनलाईन नोंदणी 

मुंबई, दि. २७ : हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी फेसलेस (चेहरा विरहित) स्वरूपात वाहन वितरक यांच्या स्तरावरच ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा २८ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.  राज्यभरातील सर्व परिवहन कार्यालयांसाठी ही सुविधा कार्यान्वित असणार आहे. तसेच ही सुविधा सर्व संबंधित वाहन वितरकांकडे उपलब्ध असणार आहे.

ही सेवा पूर्णपणे फेसलेस (चेहरा विरहित) स्वरुपाची असून वाहन वितरकास त्यासाठी www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहन मालकाचा वाहन नोंदणी अर्ज करावा लागणार आहे. तसेच वाहन नोंदणी शुल्क व वाहन कराचा भरणा करून नोंदणी करता येणार आहे.

सद्यस्थितीत खाजगी वाहनांच्या नोंदणीप्रमाणेच हलक्या मालवाहू वाहनांची नोंदणी या सुविधेमुळे वाहन वितरकांकडे करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता हलकी मालवाहू वाहने, यापुढे परिवहन कार्यालयात नोंदणीसाठी आणण्याची आवश्यकता राहणार नाही व नोंदणीची प्रक्रिया विनासायास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहन धारकांच्या वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. वाहन वितरकांस काही तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी dytccomp.tpt-mh@gov.in येथे ई-मेलद्वारे संपर्क साधावा.

तरी, सर्व नागरिकांनी व संबंधित वाहन वितरकांनी याची नोंद घेऊन, त्याप्रमाणे कार्यवाही करावी व सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन आयुक्त विवेक भिमनवार  यांनी केले आहे.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

 

 

‘विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको’- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन 

मुंबई, दि. २७ : देशाच्या प्रगतीसाठी तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी विकासासोबतच पर्यावरण रक्षणही महत्त्वाचे आहे. मात्र पर्यावरण रक्षणाबाबत अनेकदा दुराग्रही भूमिका घेतली जाते. पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजे, पर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावी, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

‘पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन’ या विषयावरील चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, मुंबई येथील सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते.

चर्चासत्राचे आयोजन गोवर्धन इको व्हिलेज संस्थेने ‘कोटक स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी’,  नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, एनआयटी वारंगल आदी संस्थेच्या सहकार्याने केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण रक्षणाला प्राधान्य दिले आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी तसेच कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.  मात्र कधी-कधी पर्यावरण विषयांवर ताठर भूमिका घेतली जाते. दक्षिण भारतातील एका मार्गावरील चार झाडांच्या रक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली गेली. या महामार्गावर पंधरा वर्षात जवळजवळ तीन हजार लोकांचे बळी गेले, असे सांगून चार झाडे कापणे आवश्यक असेल तर त्याऐवजी २५ नवी झाडे लावण्यासारखी सकारात्मक अट घातली गेली पाहिजे, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

देशात जलसंवर्धन व नदीजोड प्रकल्पांचे काम झाल्यास देशातील अन्नधान्याचे उत्पादन अनेक पटींनी वाढेल व भारत संपूर्ण जगासाठी अन्नधान्य उत्पादन करू शकेल, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

भारतीय संस्कृतीमध्ये नदी, पर्वतराजी व वृक्षवल्लीची पूजा केली जाते. आपण निसर्गाचे व नैसर्गिक संपदेचे मालक नसून विश्वस्त आहोत ही भूमिका भारतीय विचारातून अधोरेखित केली जाते. वसुंधरा आपल्या विविधतेसह पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

यावेळी गोवर्धन इको व्हिलेजचे संचालक गौरांग दास यांनी भारतीय विचारधारेतील पाण्याचा, अन्नधान्याचा व ऊर्जेचा जबाबदारीने विनियोग याबाबतचे चिंतन यावर भाष्य केले तसेच प्लास्टिक व इलेक्ट्रॉनिक कचऱ्याच्या आव्हानाबद्दल चिंता व्यक्त केली.

उद्घाटन सत्राला भारतीय नदी परिषदेचे सदस्य, ‘रिव्हर मॅन ऑफ इंडिया’ रमण कांत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

0000

Maharashtra Governor inaugurates Conference on ‘Lifestyle for Environment’

‘We should not be environmentally fanatic’: Governor C P Radhakrishnan

 

Mumbai, 27th Nov : Maharashtra Governor C P Radhakrishnan has said that there is a need to strike a fine balance between development and environment concerns. Stating that protection of the environment is receiving high priority, he said we should not be ‘environmentally fanatic’ when it comes to addressing the real problems of the people.

The Governor was speaking at a Conference on ‘Lifestyle for Environment: Bharatiya Perspective on Sustainability’ at National Stock Exchange Convention Centre in Mumbai on Wed (27 Nov).

The Conference was organised by the Govardhan Eco Village in association with Kotak School of Sustainability,  IGBC, NIT Warangal and other organisations.

The Governor said, Indian spirituality and festivals underscore sustainable practices. Worshiping rivers, mountains, and trees is not mere ritualism but a reminder of their indispensable role in sustaining life.

The Governor said Indian culture teaches us that we are not the owner of this planet but merely its trustee. He said the earth is not to be owned but nurtured and passed on, in all its richness, to future generations.

According to him, this perspective of trusteeship aligns beautifully with the principles of sustainability and forms the foundation of a holistic approach to development.

‘Riverman of India’ Raman Kant and Director of Govardhan Eco Village Gauranga Das were prominent among those present.

००००

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासनाचे काम उल्लेखनीय – मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम

नाशिक, दि. २६ (जिमाका): महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी  नाशिक जिल्हा प्रशासनाने केलेले नियोजन, मतदानाची वाढलेली टक्केवारी व केलेले काम उल्लेखीनय आहे, अशा शब्दात मख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी कौतुक केले.

यावेळी बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्यासह 15 विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रत्यक्ष व ई-उपस्थित होते.

श्री. एस.चोक्कलिंगम यांनी  जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या संवाद साधत निवडणूक कामकाज संदर्भात आलेला अनुभव, त्यांना आलेल्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा केली व मार्गदर्शक सूचनांचे स्वागत केले.

०००

 

आगामी सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आवश्यक नियोजन करावे : जिल्हाधिकारी जलज शर्मा

नाशिक, दि.26 नोव्हेंबर, 2024 (जिमाका वृत्तसेवा): आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने अंतिम आराखडा तयार  करण्यासाठी माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणांनी आवश्यक बाबींचा सार्वांगीण विचार करून समन्वयाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्याना दिल्या.


आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी श्री. शर्मा बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, त्रंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले सन २०२७ मध्ये नाशिक शहर व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. देशपातळीवरचा हा महत्त्वाचा सोहळा असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत. त्यामुळे  सर्व यंत्रणांचा सहभाग महत्वाचा असून सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. यासाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दर मंगळवारी सायंकाळी 4 वाजता सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात बैठक होणार असून या बैठकीत प्रत्येक यंत्रणांनी केलेल्या कार्यपूर्तीचा आढावा घेतला जाणार आहे. या प्रत्येक बैठकीस संबंधित यंत्रणांचे अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य  असल्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिका व त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी तयार केल्याल्या आराखड्याचे सादीकरण बैठकीत केले. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी आराखड्यात आणखी समाविष्ठ करावयाच्या बाबी व करावयाचे बदल याबाबत मार्गदर्शन केले.  सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक असलेल्या सोयी-सुविधा, आवश्यक सूचना जाणून घेण्यासाठी लवकरच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील साधु महंत, आखाडा प्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी बैठकीत सांगितले.
0000000

ताज्या बातम्या

राजधानीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीदिनी अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १ : "संघर्ष हा माझा धर्म आहे" या विचारांचे प्रतिक, समाजक्रांतीचे प्रणेते आणि थोर साहित्यिक साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी...

स्वातंत्र्यदिनासंदर्भात  संकल्पना  पाठविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना आवाहन

0
नवी दिल्ली दि. ०१ :  स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना...

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे हस्ते मुंबई उपनगर जिल्ह्यात महसूल सप्ताहाचा आरंभ

0
मुंबई, दि.०१ : शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा, यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे...

राज्यात उद्यापासून ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरूवात – सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी

0
मुंबई, दि. ०१: देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, राज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने 2 ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान...

नागरिकांच्या अधिकारांची जोपासना अधिक जोमाने होईल – मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे

0
‘माहिती आयोग आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत गडचिरोलीत १०० अपील प्रकरणांची सुनावणी गडचिरोली, दि. १: राज्य माहिती आयोगाने गडचिरोलीसारख्या दूरस्थ भागात पारदर्शक प्रशासनासाठी सकारात्मक पावले उचलत...