बुधवार, जुलै 16, 2025
Home Blog Page 498

नंदुरबार जिल्ह्यात गृह मतदानाला उत्साहात सुरूवात

नंदुरबार, दि. १४ (जिमाका वृत्त): निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर या चार विधानसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आज (14 नोव्हेंबर) गृह मतदानाला उत्साहात सुरूवात झाली.  उल्लेखनीय बाब म्हणजे आज नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील रजाळे येथील 101 वर्षे वयाच्या आजी श्रीमती उमताबाई  गिरासे यांनी अतिशय उत्साहात आपल्या घरून मतदानाचा हक्क बजावला.

जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी सर्वश्री अनय नावंदर (अक्कलकुवा),  सुभाष दळवी (शहादा), श्रीमती अंजली शर्मा (नंदुरबार), महेंद्र चौधरी (नवापूर) यांच्या यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त 48 पथकांमार्फत हे मतदान सलग चार दिवस दोन फेरीत रविवार 17 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.

गृह मतदानाची पहिल्या फेरीची भेट 14 व 15 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. पहिल्या फेरीत मतदार न भेटल्यास द्वितीय भेटीची फेरी 16 व 17 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.  त्यासाठी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना  मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत 12 डी फॉर्म भरून घेतला आहे. या फॉर्मची तपासणी केल्यानंतर जिल्ह्यातील 1 हजार 164 मतदार गृहमतदानासाठी पात्र ठरले आहेत. 85 वर्षावरील  ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांमध्ये अक्कलकुवा-221, शहादा-257, नंदुरबार-383, नवापूर-285 असे एकूण 1 हजार 164  ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत.

गृहमतदानासाठी विधानसभाक्षेत्रात नियुक्त  48 पथके गृह मतदानाची नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी जाऊन पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करून घेत आहेत. गृहमतदानाची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने करण्यात येणार आहे. मतदारांनी लेखी मागणी केल्यास त्यांना मदतनीसाची मदत घेता येईल. मात्र एका मदतनीसाला केवळ एका मतदाराला मदत करता येणार आहे. गृहमतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षक करावयाचे असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहता येणार आहे.

०००

मॅरेथॉन दौडद्वारे केली मतदार जनजागृती; जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग

छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका): १०८-औरंगाबाद (पश्चिम) मध्ये मतदार जनजागृतीसाठी  मॅरेथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः या रॅलीत सहभागी झाले.

१०८-औरंगाबाद (पश्चिम) विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीसाठी सकाळी ८ वा. क्रांती चौकातून मॅरेथॉन दौड सुरु झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या दौडची सुरुवात करण्यात आली.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी, उपायुक्त मनपा अंकुश पांढरे, उपसंचालक आपत्ती व्यवस्थापन स्वप्नील सरदार, सहसंचालक तंत्रशिक्षण अक्षय जोशी, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर व गटशिक्षणाधिकारी तथा स्विप नोडल अधिकारी दीपाली थावरे यांची यावेळी उपस्थिती होती.

सहभागी धावपटू व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी व सर्व उपस्थित मान्यवरांनी मॅरेथॉन मध्ये सहभागी होऊन धावण्यास सुरवात केली. ‘मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो’, ‘माझे मत माझा अभिमान’, ‘आपले अमूल्य मत-करेल लोकशाही मजबूत’ अशा घोषणा देत मतदान जनजागृती करत मोठ्या संख्येने सहभागी झाले. या रॅलीमध्ये एमआयटी, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय, हायटेक महाविद्यालय,छत्रपती शाहू महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, श्रेयस अभियांत्रिकी महाविद्यालय आदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या आयोजनासाठी देवगिरी महाविद्यालयातील एनसीसी व रासेयो  विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन प्रविण लोहाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक नोडल अधिकारी मनोज बिरुडे, गोविंद उगले, साहेबराव धनराज,अनंत कणगारे,परसराम बाचेवाड, तुकाराम वांढरे आदींनी परिश्रम घेतले. देवगिरी महाविद्यालयाच्या प्रांगणात या दौडचा समारोप झाला.

०००

शकुंतला आजींचे गृह मतदान नोंदविण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जातात तेव्हा…

छत्रपती संभाजीनगर, दि.१४(जिमाका): श्रीमती शकुंतला मारुती अनवडे (वय ८६ वर्षे) कन्नड शहरातील शांतीनगर येथील रहिवासी. त्यांनी आज आपल्या राहत्या घरीच मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील सर्वच मतदार संघात गृह मतदान नोंदविण्याचे काम सुरु आहे. मात्र शकुंतला आजींचे  मतदान विशेष ठरले कारण त्यांचे मतदान नोंदविण्यासाठी स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी त्यांच्या घरी गेले होते.

भारत निवडणूक आयोगाने वय वर्षे ८५ व त्यापेक्षा अधिक वय असणारे वृद्ध व्यक्ति तसेच दिव्यांग व्यक्ति ज्यांना मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नाही अशा मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी गृह मतदानाचा पर्याय देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदार संघांत गृहमतदान प्रक्रिया सुरु झाली आहे.

गृह मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणेतील गृह मतदानासाठी नियुक्त चमू मतदाराच्या घरी जाऊन मतदाराचे मतदान नोंदवून घेतात. त्यासाठी आवश्यक ती गोपनियता पाळली जाते.  मतदाराला त्याचे मतदान नोंदविण्यासाठी त्यांच्या घरात पुरेशी गोपनीयता उपलब्ध करुन दिली जाते.

१०५-कन्नड मतदार संघात गृहभेटीद्वारे मतदानासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे स्वतः चमूत सहभागी झाले. त्यांनी श्रीमती शकुंतला मारुती अनवडे वय ८६ वर्षे  यांचे मतदान  नोंदविण्यासाठी आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, १०५ कन्नडचे निवडणूक निर्णय अधिकारी संतोष गोरड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर, गृह मतदान नोंदणी पथक क्रमांक १ चे अधिकारी संदीप महाजन, संदीप पाटील, श्रीमती अनिता जालनापुरकर, पोलीस कर्मचारी श्रीमती गिरी , सूक्ष्म निरीक्षक संजय देशपांडे यांच्यासह टपाली मतदान कक्षाचे योगेश मुळे व दिलीप मगर उपस्थित होते.

०००

टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल प्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई, दि. १५ : पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे  यांनी २३१-आष्टी विधानसभा मतदार संघ, जिल्हा बीड या मतदार संघासाठी टपाली मतपत्रिकेव्दारे मत नोंदविल्यानंतर, त्यांच्या भ्रमणध्वनीमध्ये मतपत्रिकेचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल  केला. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल  केल्यामुळे कायदेशीर आदेशाची अवज्ञा केली तसेच मतदानाची गोपनियता भंग केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती १८५ मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली.

मलबार हिल मतदार संघात विल्सन महाविद्यालय, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नीरोड मुंबई  येथे पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टपाली मतदानासाठी फॅसिलिटेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटर मधील मतदान केंद्र क्रमांक 3 वर सदर घटना घडली आहे. सर्व मतदारांना मतदान केंद्रावर भ्रमणध्वनी वापरण्यास पुर्णपणे बंदी असल्याबाबत तसेच मतदारांनी त्यांचे मतदान करीत असताना पुर्णतः गोपनियता बाळगून, मतदान करावे व मतदान पुर्ण केल्यानंतर, बॅलेट मतपत्रिका व 13ए फॉर्म हा त्यासोबत असलेल्या लिफाफ्यात भरुन सदरचा लिफाफा बंद अवस्थेत केवळ मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकण्याबाबत सुचित केले होते, अशी माहिती मतदान केंद्राध्यक्ष प्रसन्न मधुसुदन तांबे यांनी दिली.

पोलीस शिपाई  गणेश अशोक शिंदे यांनी मतपत्रिकेची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

००००

निवडणूक आयोगाचे विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांच्याकडून जिल्ह्यातील निवडणुकीचा आढावा

जळगाव दि. 15 ( मीडिया कक्ष ) केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नियुक्त केलेले विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व 11 विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचा आढावा घेतला. चांगले नियोजन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी निवडणूक तयारीचे सादरीकरण केले. यावेळी सर्वसाधारण निरीक्षक राजेशकुमार (आय.ए.एस),भुसावळ, जळगाव शहर, सर्वसाधारण निरीक्षक रणजित कुमार सिन्हा (आय.ए.एस) जळगाव ग्रामीण, अमळनेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी सर्वसाधारण निरीक्षक अरुणकुमार (आय.ए.एस) चोपडा, रावेर, सर्वसाधारण निरीक्षक ब्रजेश कुमार (आय.ए.एस) एरंडोल, चाळीसगाव, सर्वसाधारण निरीक्षक श्रीमती स्मिताक्षी बरुआ (आय.ए.एस) पाचोरा,जामनेर,
मुक्ताईनगर, पोलीस निवडणूक निरीक्षक तौहिद परवेझ (आय.पी.एस) सर्व 11 मतदार संघ, खर्च निरीक्षक हरकेश मीना (आय. आर.ए.एस) चोपडा, रावेर, भुसावळ,जळगाव शहर, जळगाव ग्रामीण,  खर्च निरीक्षक रोहित इंदोरा (आय. आर.एस) (सी. अॅण्ड सी.ई)अमळनेर,एरंडोल,चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर हे उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी,नोडल अधिकारी, 11 विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मतदान केंद्रावर सर्व सुविधा असतील याबाबत खात्री करून घ्यावी, जिथे सुविधा कमी आहेत, तिथे सुविधा पुरवाव्यात. कायदा सुव्यवस्थेबाबत अधिक दक्ष राहावे असे सांगून मतदानाचा टक्का अधिक वाढेल यासाठी मतदान जनजागृतीवर भर द्यावा अशा सूचना विशेष सामान्य निरीक्षक राममोहन मिश्रा यांनी केल्या.

यावेळी सर्व सामान्य निरीक्षक, पोलीस निरीक्षक, खर्च निरीक्षक यांनीही सर्व निवडणूक यंत्रणेवर आमचे लक्ष असल्याचे सांगून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे निवडणूक प्रशासन काम करत असल्याचे सांगितले. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व 11 विधानसभा मतदार संघतील पूर्व तयारीचे सादरीकरण केले.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाची तयारी, आता पर्यंत केलेल्या सर्व कारवाईची माहिती दिली.

00000

राजकीय पक्ष अन् उमेदवारांच्या जाहिरातींवर ठेवून आहे लक्ष…; माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती कक्ष..!

भारत निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची अधिसूचना निर्गमित होताच दि.15 ऑक्टोबर 2024 पासून संपूर्ण राज्यात व ठाणे जिल्ह्यातही आचारसंहिता लागू झाली आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावर विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दूरचित्रवाहिनी, रेडिओ, चित्रपटगृहे, सोशल मिडिया इत्यादी ठिकाणी प्रसारित करण्यात येणाऱ्या निवडणूक विषयक जाहिरातींच्या संदर्भात पूर्व प्रमाणपत्र देण्यासाठी व निवडणूकीतील पेड न्यूज पडताळणी करण्यासाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (Media Certification and Monitoring Committee – MCMC) गठीत करण्यात येते. या लेखाच्या माध्यमातून जाणून घेवू, या माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज..

ठाणे जिल्ह्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे हे अध्यक्ष आहेत, तर ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी, राष्ट्रीय वृत्तसंस्था पीटीआय या वृत्तसंस्थेचे पत्रकार श्री.रामकृष्णन अय्यर, समाज माध्यम तज्ञ प्रसाद कुलकर्णी हे सदस्य तर जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.

एम.सी.एम.सी.ची कर्तव्ये :-

या स‍मितीमार्फत निवडणूकीतील विविध प्रकारच्या जाहिरातींवर लक्ष ठेवले जाते. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचाराशी संबंधित इतर माध्यमांमध्ये (प्रथित किंवा अप्रथित) राजकीय जाहिरातींचे खर्चाच्या अनुषंगाने देखरेख करणे, ज्यामध्ये उमेदवार, स्टार प्रचारक किंवा इतर व्यक्तींनी उमेदवाराच्या निवडणूक संधींवर परिणाम करण्यासाठी केलेली जाहिरात, प्रचार किंवा आवाहन यांचाही समावेश असेल.

प्रिंट मीडियामध्ये प्रकाशित कोणत्याही जाहिरातीचे निरीक्षण करणे, जर ती उमेदवाराच्या संमतीने किंवा माहितीने प्रकाशित केली असेल, तर ती उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केली जाईल. तथापि, जर ती जाहिरात उमेदवाराच्या अधिकृततेशिवाय प्रकाशित केली असेल, तर प्रकाशकाविरुद्ध IPC च्या 171H कलमाचे उल्लंघन केल्याबद्दल खटला चालविण्यासाठी कारवाई केली जाऊ शकते.

आरपी ॲक्ट, 1951 च्या कलम 127A अंतर्गत निवडणूक पत्रक, पोस्टर, हँडबिल आणि इतर दस्तऐवजांवर प्रकाशक आणि मुद्रकाची नावे व पत्ते छापलेली आहेत का, याची तपासणी करणे.

प्रत्येक उमेदवाराच्या निवडणूक जाहिरातीवरील किंवा बातमी प्रकाशित करण्यासाठी केलेल्या प्रत्यक्ष खर्चाच्या अनुषंगाने, प्रत्येक उमेदवाराच्या खर्चाबाबत दैनिक अहवाल लेखा पथकाला सादर करणे, ज्याची प्रत निवडणूक निर्णय अधिकारी आणि खर्च निरीक्षकांना पाठविली जाते.

एमसीएमसीद्वारे पार पडणारे कार्य :-

  • राजकीय जाहिरातींचे (छापील / व्हिडिओ / जिंगल्स / सोशल मीडिया रिल्स स्वरूपातील जाहिराती) पूर्व-प्रमाणीकरण.
  • पेड न्यूजच्या तक्रारी/मुद्यांची तपासणी करणे.
  • इलेक्ट्रॉनिक मीडियामधील राजकीय जाहिरातींवर लक्ष ठेवणे, जाहिरातींचे प्रसारण केवळ समितीच्या प्रमाणपत्रानंतरच झाले आहे, याची खात्री करणे.

जाहिरात पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे :

1.अर्जाचा फॉर्म

2.जाहिरातीत वापरलेली भाषा (जाहिरात दोन प्रतांसह इलेक्ट्रॉनिक स्वरूपात सादर करावयाची आहे व त्यासोबत प्रमाणित केलेली ट्रान्सक्रिप्टही जोडणे आवश्यक आहे)

3.ऑडिओ तसेच व्हिडिओ जाहिरात पेन ड्राईव्हमध्ये द्यावी

4.सुचविलेल्या प्रसारणाचा अंदाजे खर्च व त्या प्रसारणातील विविध प्रसारणांची संख्या आणि दर यांचे विभाजन

5.प्रसारण कोठे करावयाचे आहे याबाबतचा खर्चाचा तपशील

6.मतदानाच्या दिवशी आणि मतदानपूर्व दिवशी वर्तमानपत्रात जाहिरातीचा मजकूर तपासणे अनिवार्य आहे.

ठाणे जिल्ह्याकरिता कार्यान्वित असलेल्या माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीने दि.14 नोव्हेंबर 2024 पर्यंत 111 अर्जांचे प्रमाणिकरण पूर्ण केले आहे. यामध्ये 328 व्हिडिओ, 46 ऑडिओ, 106 डिजिटल पोस्टर, 5 पथनाट्य, 2 आयविआर कॉल, 1 टेक्स्ट एसएमएस व 1 व्हॉट्सॲप मेसेज अशा 487 मजकूर प्रमाणित करून दिले आहेत.

मतदानपूर्व आणि मतदान दिवशीच्या जाहिरातींना ‘एमसीएमसी’चे प्रमाणिकरण बंधनकारक

कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दि.20 नोव्हेंबर 2024 मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी प्रिंट माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात, जोपर्यंत राज्य/जिल्हास्तरावरील माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) यांच्याकडून पूर्व-प्रमाणित केली जात नाही तोपर्यंत वृत्तपत्रात प्रकाशित करु नये. भारत निवडणूक आयोगाच्या या निर्देशाचे सर्व राजकीय पक्ष व त्यांच्या अधिकृत उमेदवारांनी काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी प्रिंट माध्यमांमधून कोणत्याही भडकावू, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये. ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होवू नयेत, याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दि.20 नोव्हेंबर 2024 मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच दि.19 नोव्हेंबर 2024 रोजी प्रिंट माध्यमांमध्ये कोणतीही राजकीय जाहिरात,जोपर्यंत राज्य/जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व-प्रमाणित केली जात नाही, तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना या कालावधीत प्रिंट माध्यमांमध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास, अर्जदारांनी जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती (MCMC) कडे जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वर, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे अर्ज करावा, अशा सूचनाही निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.

दि.13 ते 20 नोव्हेंबर 2024 या कालावधीत निवडणूक निकालाचे अंदाज प्रसारित करण्यास प्रसारमाध्यमांना प्रतिबंध

भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) दि.13 नोव्हेंबर 2024 सकाळी 7.00 वाजेपासून ते दि.20 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंध केल्याचे कळविले आहे. सर्व प्रसारमाध्यमांनी (प्रिंट मीडिया/ इलेक्ट्रॉनिक मीडिया/ सोशल मीडिया इत्यादी) या अधिसूचनेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.

00000

मनोज सुमन शिवाजी सानप, 

जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

तथा नोडल अधिकारी, एकत्रित मीडिया कक्ष आणि

सदस्य सचिव माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, ठाणे

 

कुलाबा विधानसभा मतदारसंघातील नेव्ही नगर येथे भारतीय नौदलातील नौसैनिकांसाठी मतदार जागरूकता अभियान

मुंबई, दि. १५ : कुलाबा मतदारसंघातील नेव्ही नगर परिसरातील रहिवासी व नोंदणी केलेल्या भारतीय नौदलात कार्यरत नौसैनिक मतदारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मोठ्या संख्येने आवर्जून मतदान करून लोकशाहीतील राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुलाबा विधानसभा मतदारसंघातील नेव्ही नगरमधील रहिवासी नौसैनिकांसाठी नेव्ही चिल्ड्रेन स्कूलमधील संवाद सभागृहात मतदार जागरूकता अभियानानिमित्त आज मतदार जागरूकता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी श्री. यादव बोलत होते. नवमतदार नोंदणीसह मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाने ‘सिस्टीमेटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्ररोल पार्टीसिपेशन (स्वीप) हे अभियान राबविण्यात येत आहे.

यावेळी श्री. यादव म्हणाले की, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी बघता कुलाबा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रांवर मतदानाची टक्केवारी कमी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत नेव्ही नगर परिसरातील रहिवासी व नोंदणी केलेल्या भारतीय नौदलात कार्यरत नौसैनिक मतदारांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी जास्तीत जास्त संख्येने आवर्जून मतदान करून मतदानाच्या टक्केवारीत वाढ करण्याबाबत दक्षता घ्यावी. मतदारयादी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांकडे दिली जाणार असून मतदारयादीत नाव असलेल्या मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान करण्याबाबतचे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयातर्फे व नौदलातर्फे केले जाणार असल्याचे श्री. यादव म्हणाले. ज्या मतदारांचे मतदारयादीत नाव नसेल त्यांचे नाव नोंदवून घेण्यासाठी तसेच स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे वगळण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचनाही श्री. यादव यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या.

भारतीय नौदलाचे स्टेशन कमांडर व आयएनएस आंग्रेचे कमांडिंग अधिकारी ऋषिराज कोहली म्हणाले की, मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून जशी आपण नौदलात शपथ घेऊन कर्तव्य बजावतो त्याचप्रमाणे मतदान करण्याची शपथ घेऊन नौसैनिकांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे. विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची माहिती नौदलात कार्यरत सर्व विभागातील कर्मचारी यांच्यापर्यन्त पोहोचण्याचे आवाहन श्री. कोहली यांनी केले.

मुंबई शहरचे ‘स्वीप’ विभागाचे  समन्वय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा, मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. लोकशाहीला खर्‍या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा अभियानाचा मूळ उद्देश असल्याचे श्री. सूर्यवंशी यांनी सांगितले.   यावेळी सभागृहातील उपस्थितांना मताधिकार बजावण्याची शपथही देण्यात आली.

यावेळी कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी महादेव किरवले, नेव्ही नगरचे मुख्य प्रशासकीय अधिकारी कॅप्टन ज्योतिर्मय रवी, पंकज कुमार आदींसह भारतीय नौदलात कार्यरत नौसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

मुंबई शहर जिल्ह्यात ८५ वर्षांवरील १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग मतदारांचे गृह मतदान

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता दि. २० नोव्हेंबर, २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतदान केंद्रावर उपस्थित राहू शकत नसलेल्या व प्रपत्र १२ ड भरून दिलेल्या ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना टपाली मतदान पथकामार्फत गृह टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेत मुंबई शहर जिल्ह्यात १९२२ ज्येष्ठ नागरिक व १८७ दिव्यांग अशा एकूण २१०९ मतदारांनी आतापर्यंत गृह टपाली मतदान केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपासून ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृह टपाली मतदानाला प्रारंभ करण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील २१३९ ज्येष्ठ नागरिक मतदार व २१७ दिव्यांग मतदार गृह टपाली मतदानासाठी पात्र ठरले आहेत. १६ नोव्हेंबर २०२४ पर्यंत गृह टपाली मतदान घेतले जाणार आहे.

धारावी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २१ पैकी २० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर १२ पैकी ०९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८ पैकी २३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २७ पैकी १६ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ३९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

वडाळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २५८ पैकी २२९ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २४ पैकी २२ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २५१ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

माहीम विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण ६२१ पैकी ५५८ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २५ पैकी २३ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ५८१ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

वरळी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण १२१ पैकी १११ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर २० पैकी १९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण १३० मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

शिवडी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २२६ पैकी २०१ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ३४ पैकी ३२ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २३३ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

भायखळा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण १९० पैकी १६७ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ४२ पैकी ३९ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २०६ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २८६ पैकी २६९ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ११ पैकी १० दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २७९ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण ११८ पैकी १०३ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर १३ पैकी ११ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण ११४ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

कुलाबा विधानसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २७० पैकी २४१ ज्येष्ठ नागरिक मतदारांनी तर ०९ पैकी ०६ दिव्यांग मतदारांनी अशा एकूण २४७ मतदारांनी गृह टपाली मतदान केले.

या सर्व मतदारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्रपत्र १२ ड भरून जमा केले होते. प्रपत्र १२ ड भरून जमा केलेल्या अर्जदारांचे गृह टपाली मतदान घेण्यात आले आहे.

००००

आचारसंहिता भंगाच्या ७३६० तक्रारी निकाली; ५४६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

मुंबई, दि. १५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२४ दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण ७ हजार ४०० तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ७ हजार ३६० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.

५४६ कोटी ८४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी १५ ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण ५४६ कोटी ८४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

००००

मतदार जनजागृतीसाठी धावले चंद्रपूरकर; मिनी मॅरॅथॉन ‘­रन फॉर व्होट’ मध्ये विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग

चंद्रपूर, दि. 15 : येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग वाढवावा, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी मिनी मॅरेथॉन ‘रन फॉर व्होट’ चे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये विद्यार्थी, तरुण- तरुणी आणि नागरिकांनी सहभागी होऊन मतदार जनजागृतीचा संदेश दिला.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयद्वारा मतदार जनजागृतीकरीता मिनी मॅरेथॉन ‘रन फॉर व्होट’ चे आयोजन आझाद बगीचा, चंद्रपूर येथे करण्यात आले होते. चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार यांनी मॅरेथॉनला हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. यावेळी सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, रविंद्र भेलावे, महानगर पालिकेचे उपायुक्त मंगेश खवले, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, उपशिक्षणाधिकारी निवास कांबळे, नायब तहसीलदार श्री. गाद्देवार व इतर नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मिनी मॅरॅथॉनला सुरुवात झाली. ‘माझे मत माझा अधिकार’, ‘होय मी मतदान करणारच’, ‘आपण सगळे मतदान करू या – लोकशाहीला बळकट करू या’ अशा विविध घोषवाक्यांसह चंद्रपूरकरांनी यात सहभाग नोंदविला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समारोप व विजेत्यांना पुरस्कार वितरण : सदर मॅरेथॉन आझाद बगीचा पासून गिरनार चौक, गांधी चौक, जटपुरा गेटला वळसा घालून गेल्यानंतर आझाद बगीचा या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या उपस्थितीत समारोप करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आपण सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन केले. मिनी मॅरेथॉन मध्ये मुले, मुली व ज्येष्ठ नागरिक या तिन्ही गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त धावपटुला 3 हजार, 2 हजार, 1 हजार रुपयाचा धनादेश, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यांचा होता सहभाग : या रॅलीमध्ये विविध शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. सोबतच  जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे शिक्षक, चंद्रपूर योग नृत्य परिवार, फन ग्रुप, पतंजली ग्रुप, पोलीस भरती ग्रुप, कराटे ग्रुप, नेटबॉल ग्रुप, यांनी जिल्हा प्रशासनामार्फत दिलेल्या टी शर्ट, टोपी परिधान करून मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतला. सहभागी सर्व धावपटुंना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व खाऊचे वाटप करण्यात आले.

समारोपीय कार्यक्रमाचे संचालन अविनाश जुमडे यांनी तर आभार विस्तार अधिकारी धनपाल फटिंग यांनी मानले. यावेळी मनपाचे प्रशासन अधिकारी श्री. नीत, निखिल तांबोळी, अविनाश जुमडे, अनिल दागमवार, सुरेंद्र शेंडे, प्रशांत मत्ते, आत्राम सर, गेडाम सर आदी उपस्थित होते.

०००००

ताज्या बातम्या

विधानसभा इतर कामकाज

0
अर्धा तास चर्चा ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, दि. १६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक...

एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १६: "एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी...

अंबादास दानवे हे विधानपरिषदेत चर्चेची उंची वाढवणारे विरोधी पक्षनेते – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई, दि. १६ : अंबादास दानवे हे विधानपरिषदेतील चर्चेची उंची वाढवणारे आणि संयमी, परखड भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

कामगार विभागाच्या नव्या अभ्यासक्रमामुळे न्यायालयांवरील ताण कमी होईल – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

0
मुंबई,  दि. १६ : कामगार विभागांतर्गत कार्यरत ना. मे. लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था या राज्यातील एकमेव शैक्षणिक संस्थेमार्फत, उद्योग व आस्थापनांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कायदेशीर...

धुळ्यात उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब उभारणीला गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. १६ : धुळे शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार नागरी सुविधा आणि उद्योग विस्तारासाठी लॉजिस्टिक हब (ड्राय पोर्ट व स्टोरेजसाठी विशेष टर्मिनल) उभारणे अत्यावश्यक आहे....