बुधवार, जुलै 2, 2025
Home Blog Page 425

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा

मुंबई, दि. ३१ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२५ नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे.

कृषी, उद्योग व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान कायम ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर सुरू असलेली वाटचाल कायम ठेवून महाराष्ट्राला, देशाला विकासाच्या दृष्टिकोनातून आणखी गतिमान करूया, असं सांगतानाच  नववर्षाचे स्वागत उत्साहाने मात्र आरोग्यभान राखत संयमाने करा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

०००००

वखार महामंडळाने शेतमाल साठवणूक क्षमता वाढवावी – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 31 : वखार महामंडळ साठवणूक केलेल्या शेतमालाचा विमा उतरवून शेतकऱ्यांना साठवणूक भाड्यामध्ये सवलत देते. ही सुविधा निश्चितच शेतकऱ्यांच्या लाभाची आहे. शेतकरी हिताच्या सुविधा देणाऱ्या वखार महामंडळाने गोदामांचा विस्तार करून साठवणूक क्षमतेत वाढ करण्याचे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन व महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाच्या बैठकीमध्ये श्री. रावल आढावा घेताना बोलत होते.

बैठकीस महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाचे क्षेत्रीय प्रबंधक आप्पासाहेब धुळाज, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डूबे पाटील, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर, सह व्यवस्थापकीय संचालक दीपक शिंदे, व्यवस्थापकीय संचालक प्रशांत बारगावकर उपस्थित होते.

सध्या अस्तित्वात असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामांच्या दुरुस्तीचा कार्यक्रम राज्यभर राबविण्यात यावा. ज्या ठिकाणी गोदामांमध्ये शीतगृहाची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे, तिथे देण्यात यावी. राज्यात होत असलेल्या ड्राय पोर्टमध्ये प्राधान्याने गोदामांची निर्मिती करावी. शेतमालाच्या उत्पादकतेनुसार विशिष्ट शेतमाल साठवण्यासाठी ‘सायलो’ निर्मितीवर भर देण्यात यावा. रेल्वे मार्गाजवळ मालवाहतुकीच्या दृष्टिकोनातून गोदामांची निर्मिती करावी, अशाही सूचनाही श्री. रावल यांनी दिल्या.

पणन मंत्री श्री. रावल म्हणालेकी, भारतीय कापूस महामंडळाकडील रक्कम येण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. राज्यात मागणीनुसार व कापूस उत्पादनाच्या अंदाजानुसार सी.सी.आयकडे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाच्या विविध समस्या सोडविण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून यासाठी निश्चितच पावले उचलण्यात येतील.

महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनच्या गोदामांची क्षमतेनुसार व परिस्थितीनुसार श्रेणीबद्धता करावी. यामध्ये सद्यस्थितीत उपयोगात असणारे, निर्लेखित करण्यात येणारे यांची श्रेणी करावी. सोयाबीन खरेदीमध्ये फेडरेशनने आपला सहभाग वाढवावा. बारदाण्याअभावी कुठल्याही परिस्थितीत खरेदी रखडू नये, याची काळजी घ्यावी. बारदाणा उपलब्धतेसाठी सातत्याने प्रयत्न करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. रावल यांनी दिल्या.

 राजशिष्टाचार विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करावी

राजशिष्टाचार विभागातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही पुढील काही दिवसात पूर्ण करावी, अशा सूचना राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिल्या.

बैठकीस विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर- पाटणकर, उपसचिव श्री हांडे, कक्ष अधिकारी श्री. साखरे उपस्थित होते.

पणन मंत्री श्री. रावल यांनी राजशिष्टाचार विभागातील आकृतीबंधानुसार असलेल्या पदांची संख्या, त्यानंतर महत्त्वाच्या अति महत्त्वाच्या व्यक्तींसाठी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, वाहनांची संख्या, राज्यअतिथी गृह येथील सोयी सुविधा तसेच विभागांतर्गत असलेल्या बाबींचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

निलेश तायडे/विसंअ/

नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा – मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई, दि. ३१ : नाशिक येथे सन २०२७-२८ या वर्षात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था, नियोजित साधूग्राम, नागरिकांची सुरक्षा व घनकचरा व्यवस्थापन या संदर्भातील कामांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन नियोजित आराखडा सादर करावा, अशा सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

सन २०२७-२८ या वर्षात  नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजनासंदर्भात मंत्रालयात आयोजित उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, नगरविकास विभाग-१ चे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, नगरविकास विभाग-२ चे प्रधान सचिव डॉ.के.एच.गोंविदराज, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, नाशिक महापालिका आयुक्त मनिषा खत्री, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांसह विविध विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

मुख्य सचिव सुजाता सौनिक म्हणाल्या की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा लक्षात घेऊन पायाभूत सोयीसुविधांची कामे, साधूग्राममध्ये साधू-महंताची निवासव्यवस्था, वाहनतळ उभारणे, नागरिकांची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था, परिसर सुशोभीकरण, गोदावरी नदी आणि उपनद्या संवर्धन, शुद्धीकरण व सुशोभीकरण, ग्रीन झोन, गर्दीचे सनियंत्रण, आरोग्य तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इतर अनुषंगिक कामे याबाबत स्थानिक प्रशासन स्तरावर बैठका घेऊन कामे अंतिम करून त्याचा आराखडा राज्यस्तरावर सादर करावा.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यासाठी जिल्हा व राज्यस्तरावरील कामांचा आढावा घेण्यासाठी ठराविक कालावधीत बैठका आयोजित केल्या जाव्यात, सर्व यंत्रणांना सोबत घेऊन काम करावे, या कामांबाबत उच्चस्तरीय समिती स्थापन करावी, जेणेकरून नियोजित कामांमध्ये आवश्यक तिथे सुधारणा करण्यासाठी मदत होईल, अशा सूचनाही मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिल्या.

यावेळी नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठीच्या प्रस्तावित कामांचे सादरीकरण केले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

 

सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ – पणनमंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. ३१ :- राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास ६ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची घोषणा पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केली.

पदभार स्वीकारल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. विभागाचे कामकाज गतीने करण्यासाठी या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीस पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, उपसचिव संतोष देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पणन मंत्री श्री. रावल म्हणाले की, सोयाबीन उत्पादक शेतकरी, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता सोयाबीन खरेदी नोंदणीची मुदत सात दिवसांनी म्हणजेच ६ जानेवारी २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीच्या निर्णयानुसार ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. तसेच नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी नाफेड आणि एनसीसीएफ यांच्यामार्फत १२ जानेवारीपर्यंत केली जाणार आहे, अशी महिती देखील मंत्री श्री. रावल यांनी दिली.

पणनमंत्री श्री. रावल म्हणाले की, किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू आहे. आतापर्यंत सोयाबीनची तीन लाख ३४ हजार ३३१ मेट्रिक टन एवढी विक्रमी खरेदी झाली आहे. मागील वर्षी केवळ ७ हजार ४०० क्विंटल एवढी खरेदी झाली होती. यावर्षी शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. राज्यात सध्या ५६१ खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत ६ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

शेतकऱ्यांना हमी भाव, तर ग्राहकांना रास्त दरात माल मिळाला पाहिजे यासाठी विभागाच्या माध्यमातून यापुढे प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती असली पाहिजे यासाठी प्रयत्न केला जाईल. त्याअंतर्गत आदिवासी भागातील तालुक्यांवर भर देण्यात येईल, या भागात शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल, अशी माहिती मंत्री श्री. रावल यांनी दिली.

पणन विभागामार्फत शेतकरी हिताचे धोरण आखण्यात येणार आहे. सोयाबीन, धान, कापूस यासारख्या पिकांना हमीभाव मिळवून देण्यासह कांद्यासारख्या नाशवंत पिकांना रास्त भाव मिळण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. त्यासाठी जगातील उत्तम बाजार व्यवस्थेचा अभ्यास करून तेथील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या राज्यात वापर करण्यात येणार आहे.  बाजार समित्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे वर्गीकरण करण्यासह त्यांचे बळकटीकरण केले जाईल, अशी ग्वाही मंत्री श्री. रावल यांनी दिली.

नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट केला जाणार आहे. आशियातील अग्रेसर बाजार समिती म्हणून तिचा लौकिक होण्यासाठी जगातील उत्तमोत्तम व्यवस्था याठिकाणी राबविण्यात येणार आहे. शेतकरी, हमाल, मापारी, व्यापारी यासारख्या सर्व संबंधित घटकांचा विचार केला जाणार आहे, असा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यात शीतगृहांची उभारणी, गोदामांची निर्मिती, गाव तेथे गोदाम, माथाडी कामगार कायदा, शेतमालांची आयात-निर्यात, बाजार समित्यांना मिळणारा सेस, राज्यातील पीक पद्धती, दांगट समितीचा अहवाल, बाजार समिती सभापतींची परिषद यासारख्या बाबींचाही पणन मंत्री श्री. रावल यांनी यावेळी आढावा घेतला.

००००

संतोष तोडकर/विसंअ/

 

 

प्रगतीशील महाराष्ट्र, गतीशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करुया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 31 :- नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ..महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात नमूद केला आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणतात, ‘येणारे वर्ष सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडीत फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहो, हीच मनोकामना. छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर संतांच्या आशीर्वादाच्या छत्रछायेखालील महाराष्ट्राला आधुनिकीकरणाच्या या युगात जगातील सर्वोत्तम राज्य म्हणून अग्रेसर ठेवायचे आहे. आपल्या कष्टकरी, शेतकरी, कामगारांच्या राबणाऱ्या आणि कला-क्रीडा-साहित्य-संस्कृती क्षेत्रातील सर्जक हातांनी या राज्याच्या वैभवात भरच घातली आहे. हा लौकिक आपल्याला वाढवायचा आहे. शेती-माती व सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग- ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान ते नवनव्या औद्योगिक क्रांती यांना पादाक्रांत करायचे आहे. यासाठी राज्यातील शांतता-सलोखा, परस्पर स्नेह, आदरभाव वृद्धिंगत होईल. पर्यावरण आणि जल-जंगल-जमीन यांचं जतन-संवर्धन होईल, असे प्रयत्न करायचे आहेत. हा संकल्प घेऊन वाटचाल करायची आहे, त्यासाठी नववर्ष चैतन्यदायी ठरेल. सकारात्मक ऊर्जेने भारलेल्या नवसंकल्पना घेऊन येईल. यातून आपला महाराष्ट्र आता थांबणार नाही, हा यत्न पूर्णत्वास जाईल. अशी मनोकामना करतो. तशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे नमूद करून मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी शुभेच्छा देऊन सगळ्यांचे नववर्षाभिनंदन केले आहे.

००००

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वनहक्क पट्ट्यांचे जतन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३१ : राज्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत वनहक्क कायद्यांतर्गत डेटा एंट्री पूर्ण करणे आणि स्कॅनिंगद्वारे सर्व डेटाचे डिजिटायझेशन सुरू असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वनहक्क पट्ट्यांचे जतन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आदिवासी विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शबरी कॉर्पोरेशन अंतर्गत ‘वन धन’ केंद्रांद्वारे उत्पादित केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘शबरी नॅचरल्स’ नावाचा ब्रँड तयार करण्यात आला आहे. हा कौतुकास्पद उपक्रम आहे. ‘वन धन’ केंद्रांद्वारे उत्पादित उत्पादनांसाठी ई-कॉमर्स वेब पोर्टल सुरू करण्यात यावे. आदिवासी जिल्ह्यात गोदामांची संख्या वाढवून त्याचे जाळे वाढवावे. ही गोदामे ‘नाबार्ड’ राबवित असलेल्या योजनेतून घेण्याबाबत प्रयत्न करावे. आदिवासी जिल्ह्यांमधून शेतकऱ्यांची सौर ऊर्जेवर कृषी पंप देण्याची मागणी आल्यास  ती पूर्ण करण्यात यावी. आदिवासी क्षेत्रातील आश्रमशाळांमध्ये क्रीडा आणि कला शिक्षकांची नेमणूक करून  आदिवासी बांधवांमधील आद्य क्रांतीकारांचा इतिहास पुढील पिढीला माहीत होण्यासाठी छोट्या पुस्तकांच्या स्वरूपात तो समोर आणावा. ‘पीएम जनमन योजने’अंतर्गत सर्व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात यावे.

यावेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या ‘शबरी नॅचरल्स’ या किटचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

या बैठकीस आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे,  शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड तसेच  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान ‘डिबीटी’ प्रणालीद्वारे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ३१ : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधार व्यक्तींना दिलासा मिळतो. मात्र निराधार व्यक्तींना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण (DBT) पोर्टलच्या माध्यमातून वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागाच्या पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या  योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात याव्यात. आवश्यक असेल तिथे शासकीय वसतीगृह इमारतींची तात्काळ दुरुस्ती करावी. वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनीना सर्व सोयी-सुविधा वेळेवर मिळतील याची खात्री करावी. वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया, जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करावी.मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे. विभागांतर्गत येणाऱ्या सर्व महामंडळांसाठी एक ‘एस.ओ.पी.’ तयार करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे तसेच  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

जल जीवन मिशन योजना सोलरायझेशनवर आणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. ३१ :- जल जीवन मिशन  योजना ही एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक असण्यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर पूर्ण करून योजना संपूर्ण सोलरायझेशनवर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलजीवन मिशन योजनेतून घेण्यात येणाऱ्या योजनांचे सोलरायजेशन झाल्यास वीजेबरोबरच वीज बिलात बचत होईल. यासाठी  विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन एक सर्वसमावेशक आराखडा तयार करावा. नल जल मित्र या योजनेसाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री कौशल्य विकास योजनेतून या तरुणांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे पाणी पुरवठा  व स्वच्छता विभागाच्या पुढील १०० दिवसाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

गळीत हंगामातील ऊस उत्पादन, उत्पादकतेसाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. ३१ :- साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), रिमोट सेन्सिंग (RS) व जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा (GIS) वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.

सहकार विभागाच्या पुढील १०० दिवसाच्या कामकाजाच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा घेतला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. एआय हे तंत्रज्ञान वापरात आल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखान्यांसाठीही ते  फायदेशीर ठरू शकते. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गाळपासाठी उपलब्ध ऊसाचे योग्य नियोजन करणे सोपे होईल.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजनेअंतर्गत राज्यात १०० विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमध्ये जागेनुसार ३०० मे. टन ते १००० मे. टनाची गोडाऊन बांधण्यात येणार आहेत. या योजनेतून गडचिरोली, नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातही गोडाऊन उभी करावीत. तसेच सहकारी गृह निर्माण संस्थांचे १०० टक्के डिजिटलायझेशन करण्यावर भर द्यावा.  साखर कारखान्यांना देण्यात आलेला मार्जीन मनी आणि साखर कारखान्यामधील वजन काटे मॉनिटरिंगबाबतही सहकार विभागाने दक्ष रहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे आणि संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

००००

एकनाथ पोवार/विसंअ/

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सुविधांना दिली भेट

ठाणे,दि.31(जिमाका):- राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष श्री.जयकुमार रावल यांनी काल, दि.30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील सुविधांना भेट दिली. या भेटीवेळी पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांनी सुविधेवर सुरू असलेले कामकाज याबाबतीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. यावेळी कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक श्री.विनायक कोकरे व सुविधेवर काम करीत असलेले अधिकारी उपस्थित होते.

कृषी पणन मंडळाच्या अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश, जपान, न्यूझीलंड, मलेशिया, दक्षिण कोरिया इ. देशांना कृषीमाल निर्यात करण्याकरिता आवश्यक असलेल्या वाशी येथील विकिरण सुविधा केंद्र, उष्ण बाष्प प्रक्रिया केंद्र व भाजीपाला प्रक्रिया केंद्र याबाबतीतील संपूर्ण माहिती सादर करण्यात आली. मंत्री श्री.रावल यांनी याबाबतीत सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

या कामकाजाच्या चर्चेवेळी मंत्री श्री.रावल यांनी विकसित देशांची निर्यात कशा पद्धतीने वाढविता येईल याबाबत देखील चर्चा केली. भारत सध्या जगातील पाचवी अर्थव्यवस्था म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे आपल्याला आपल्यापेक्षा विकसित अमेरिका व चीन या देशांमध्ये कृषीमालाचे मार्केटिंग कशा पद्धतीने केल्या जाते, याबाबतची माहिती प्राप्त करून घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचित केले. चीनमधील कृषीमालाच्या लागवडीखालील क्षेत्र हे भारताच्या लागवडीखाली क्षेत्राच्या तीन पट असून तेथे उत्पादित कृषीमालाचे मार्केटिंग कशा पद्धतीत केले जाते, याबाबत देखील अभ्यास करावा अशा सूचना केल्या. अतिदूरवरच्या देशांना समुद्रमार्गे कृषीमाल निर्यात करण्यासंदर्भात प्रोटोकॉल विकसित करण्यात आला असून रशिया येथे केळीची चाचणी कन्साईनमेंट पाठवण्यात आली व ही कन्साईनमेंट यशस्वीरित्या रशिया येथे पोहोचली आहे, अशी माहिती कृषी पणन मंडळाचे सरव्यवस्थापक श्री.विनायक कोकरे यांनी दिली. आपल्याला यापेक्षा देखील चांगल्या पद्धतीने कामकाज पुढे नेता येईल, याबाबत विचार विनिमय करण्याबाबत सूचित केले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी 2025 च्या सुमारास विविध कृषीमालाचे निर्यातदार व संबंधित घटकांची एकदिवशीय कार्यशाळा मुंबई येथे आयोजित करण्याबाबत पणन व राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल यांनी सूचित केले आहे.

या बैठकीवेळी विधानपरिषद सदस्य तथा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री.शशिकांत शिंदे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अशोक डक आणि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.पी.एल.खंडागळे व इतर अधिकारी उपस्थित होते.

00000

ताज्या बातम्या

विधानपरिषद इतर कामकाज

0
अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारी दाखल करण्यासाठी लवकरच टोल फ्री क्रमांक - मंत्री नरहरी झिरवाळ मुंबई, दि. १ : राज्यात अन्नपदार्थांची घरपोच सेवा...

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरतील – कृषी आयुक्त सूरज मांढरे

0
मुंबई दि. १: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार लावणाऱ्या आहेत. 'महाकृषी एआय धोरण शेतीमध्ये अचूकता आणून शेतीची उत्पादकता ते विक्रीमध्ये आमूलाग्र बदल घडवेल,...

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

0
एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले मुंबई, दि. १: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मदतीचा हात...

महाराष्ट्र सदन येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना अभिवादन

0
नवी दिल्ली, दि. १ : महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी त्यांना विन्रम अभिवादन...

‘विकसित भारत युवा कनेक्ट’ कार्यक्रम १२ ऑगस्टपासून

0
मुंबई, दि. १: विकसित भारत अभियानात युवकांना सक्रीय सहभागी करून घेण्यासाठी केंद्र सरकारने ‘विकसित भारत युवा कनेक्ट’ हा व्यापक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे....