मंगळवार, जुलै 1, 2025
Home Blog Page 422

 मंत्रिमंडळ निर्णय

महसूल विभाग

आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार

महाराष्ट्र जमीन महसूल संहितेतील सुधारणा विधेयक

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. यामुळे छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. याबाबतचे सुधारणा विधेयक मांडण्यास मंजूरी देण्यात आली.  तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या  आकारीपड म्हणून शासन जमा करण्यात येतात.  अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज १२ वर्षाच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे.  तथापि १२ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर अशा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती.

आता अशा जमिनी प्रचलित बाजारमूल्याच्या २५ टक्के रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० मध्ये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.  तसे विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येईल.

—–०—–

वित्त विभाग

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन, भत्यांसाठी मुंबई जिल्हा बँकेत खाते उघडण्यास मान्यता

शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

सन २०२४-२०२५ या वर्षासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली. तसेच निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता तसेच शासनाच्या सार्वजनिक उपक्रम , महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीकरीता बँकेस प्राधिकृत करण्यास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली.

—–०—–

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा

गडचिरोलीसह परिसरातील नागरिकांचे प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई दि. २ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, असा विश्वास प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध विकासकामांची सुरूवात करतानाच सामाजिक सलोखा आणि शांतता अबाधित रहावी यासाठी आपला संकल्प जाहीर केला.  गडचिरोली यापुढे महाराष्ट्रातील शेवटचा जिल्हा राहणार नसून तो पहिला जिल्हा ठरण्यासाठी प्रयत्न करण्याबरोबरच, याठिकाणी सुरू असलेल्या औद्योगिकीकरणामुळे इथल्या नागरिकांना अत्याधुनिक पायाभूत सुविधा मिळतील, अशी ग्वाही यावेळी दिली.

गडचिरोलीच्या विकासासाठी राज्य शासनाने घेतलेला पुढाकार आणि त्यास मिळत असलेल्या नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी गडचिरोली आणि परिसरातील नागरिकांचे विशेष अभिनंदन केले आहे.  महाराष्ट्र शासन राबवित  असलेले विविध उपक्रम, योजना, अभियान यामुळे राज्याच्या प्रगतीचा मार्ग आणखी प्रशस्त होईल, असा विश्वास प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावर व्यक्त केला आहे.

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात गडचिरोली नक्षलमुक्त करण्यासह नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन यामुळेच गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासी भागांच्या विकासासाठी अथक प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळत असल्याचे आपल्या ‘एक्स’ या समाजमाध्यमावर नमूद केले आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या नेतृत्वात गडचिरोली नक्षलमुक्त करून आदिवासी बांधवांचे जल, जमीन आणि‍ जंगल हे हक्क अबाधित ठेवत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा या बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला. या बसमधून त्यांनी प्रवासही केला. लॉईडच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून 6 हजार 200 कोटींची गुंतवणूक होत असून, चार हजारावर रोजगारनिर्मिती होत आहे.  गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे श्री. फडणवीस यांनी लोकार्पण केले. पेनगुंडा येथे जवानांशी आणि ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत. गडचिरोली जिल्ह्याची ही विकासयात्रा यापुढेही सुरू राहील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी येथील नागरिकांना दिला.

0000

महाराष्ट्राचे पहिले एआय धोरण तयार करा  – मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई, दि. ०१ : आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिले.

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळेल व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल, असे त्यांनी सांगितले.

मंत्री ॲड. शेलार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे माहिती तंत्रज्ञान विभागाचा आढावा घेतला. या बैठकीस आयटी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, महाआयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, एआय तंत्रज्ञानाचे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग व व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे.

मार्च २०२४ मध्ये सुरू केलेल्या ‘इंडिया एआय मिशन’ अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी ₹१०,३७२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा यांचा समावेश आहे.

केंद्र सरकार जानेवारी २०२५ पासून वैयक्तिक नसलेल्या डेटासेट्सचे संकलन सुरू करणार आहे. यामुळे स्टार्टअप्स, कंपन्या, शैक्षणिक संस्था आणि संशोधन ॲप्स विकसित करण्यासाठी, विविध भाषांची सेवा देण्यासाठी तसेच विशेष सेवा देण्यासाठी उपयोग होणार आहे.

आपला देश तंत्रज्ञानाच्या आघाडीवर प्रगती करत असताना महाराष्ट्र यात अग्रेसर राहिले पाहिजे, असेही मंत्री अ‍ॅड. शेलार यावेळी म्हणाले.

०००

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, दि. ०१: मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी मंत्रालयातील दालनात त्यांच्या विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावाही घेतला. यावेळी सहसचिव कैलास गायकवाड, सहसचिव  अरुण कोल्हे, सहसचिव संजय इंगळे यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

तत्पूर्वी मदत व पुनर्वसन मंत्री श्री. जाधव यांनी  छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

 

एकनाथ पोवार/विसंअ/

अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, दि. ०१ :  अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयात अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी क्रांतीवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे यांच्या प्रतिमांना अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मंत्री श्री. झिरवाळ यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविण्यावर भर देणार – मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. ०१ : रुग्णसेवा ही ईश्वरसेवा असून राज्यातील जनतेचे आरोग्य जपण्याची जबाबदारी महत्त्वपूर्ण आहे. उत्कृष्ट वैद्यकीय उपचार, औषधे आणि अनुषंगिक सेवांच्या माध्यमातून राज्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पुरविण्यात आलेल्या औषधांच्या नमुन्यांची त्रयस्थ पद्धतीने तपासणी करण्याचे निर्देशही सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आरोग्य भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी विभागाचा आढावा घेतला. बैठकीला अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान सचिव नवीन सोना, वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत डांगे, आरोग्य सेवा आयुक्त अमगोथू श्री. रंगा नायक, राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, संचालक स्वप्निल लाळे यांच्यासह आरोग्य विभागातील विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण अधिक सक्षम करावे

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, रुग्णालयांत चांगल्या दर्जाची व नामांकित कंपन्यांची औषधे पुरवण्यात यावी. सध्या देण्यात येत असलेल्या औषधांतील ‘ड्रग कन्टेन्ट’ तपासून घ्यावा.  महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण अधिक सक्षम करावे, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. प्राधिकरणाचे कंपन्यांशी झालेले दर करार तपासण्यात यावेत. गरीब रुग्णांना मिळणारी औषधे दर्जेदार असावी, याविषयी विशिष्ट कार्यपद्धती तयार करावी. औषध नमुन्यांच्या तपासणीमध्ये दोषी आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करावी.बॉम्बे नर्सिंग कायद्यानुसार नोंदणीकृत रुग्णालयांनी त्यांच्या तपासणीचे आणि सुविधांचे दर ठळक स्वरूपात रुग्णालयांमध्ये प्रसिद्ध करावेत. कुठल्याही प्रकारे रुग्णांची आर्थिक फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. राज्यात सुरू असलेल्या रक्त तपासणी व अन्य प्रयोगशाळांच्या सनियंत्रणासाठी कायदा करण्यासंदर्भातील प्रक्रिया त्वरीत करण्यात यावी. प्रयोगशाळांच्या तपासणीसाठी भरारी पथके तयार करावी, याबाबतीत विशिष्ट कार्यपद्धती अंमलात आणावी.

मनोरुग्णालयांचे सक्षमीकरण करावे

सार्वजनिक आरोग्य विभागाची काही रुग्णालये वैद्यकीय शिक्षण विभागाकडे तात्पुरत्या स्वरूपात हस्तांतरित करण्यात आली आहेत. रुग्णालयांचा याबाबतचा करार संपला असल्यास ती पुन्हा विभागाकडे घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. विभागाकडे अत्यंत महत्वाचा असलेला मानसिक आरोग्य कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. मानसिक रुग्णांचे वाढते प्रमाण पाहता असल्याने विभागाकडे सद्यस्थितीत असलेल्या मनोरुग्णालयांचे सक्षमीकरण करावे. यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, असे निर्देशही श्री. आबिटकर यांनी दिले.

सद्यस्थितीत डायलिसिस, एमआरआय, सिटी स्कॅन तसेच अन्य रक्त चाचण्यांचे अहवाल विलंबाने मिळत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यामुळे निदान उशिरा होऊन उपचार योग्य पद्धतीने मिळत नाहीत. याबाबतीत सेवा घेतलेल्या कंपनीचे करार तपासावेत. तपासणी अहवाल विलंबाने येण्याची चौकशी करावी. याविषयी समिती नियुक्त करून तातडीने चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करावी, अशा सूचनाही श्री. आबिटकर यांनी दिल्या.

 

रुग्णालयांच्या इमारतींचे विशिष्ट मॉडेल तयार करावे.

श्री. आबिटकर म्हणाले की, आरोग्य विभागाच्या रुग्णालयांच्या इमारतींचे एक विशिष्ट मॉडेल तयार करावे. इमारत सुंदर असावी, यासाठी विभागाने वास्तूविषारदांचे पॅनल तयार करावे. उत्कृष्ट दर्जाच्या इमारती असण्यासाठी आग्रह असावा. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत असलेल्या पायाभूत सुविधा, विकास शाखेचे बळकटीकरण करावे. या शाखेंतर्गत रुग्णालये, इमारती पायाभूत सुविधांची निर्मिती करावी.

आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी

राज्यात शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा उत्तम असावा. आयुष्मान कार्डच्या वितरणाला गती द्यावी. योजनेंतर्गत असलेल्या रुग्णालयांमध्ये रुग्णाला कुठेही पैसे भरावे लागू नये, अशा तक्रारी समोर आल्यास संबंधितांवर कारवाई करावी. महात्मा फुले जन आरोग्य अभियानातील अंगीकृत असलेल्या रुग्णालयांचे कामकाज चुकीचे आढळल्यास चौकशी करून संबंधित रुग्णालय पॅनलवरून कमी करण्यात येईल. महिलांमध्ये सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्शवभूमीवर महिलांमधील कर्करोगाचे निदान व तातडीने उपचार मिळण्यासाठी जिल्हास्तरावर तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देशही श्री. आबिटकर यांनी दिले.

बैठकीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान, वैद्यकीय अधिकाऱ्यांची पद भरती, सध्या उपलब्ध असलेले मनुष्यबळ व रिक्त पदे, मानसिक आरोग्य आस्थापना, डायलिसिस व अन्यसेवांचा विस्तार, अर्थसंकल्पीय तरतुदी, माता व बाल आरोग्य तपासणी कार्यक्रम, १५ व्या वित्त आयोगाचा निधी, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, नियमित लसीकरण, राष्ट्रीय कीटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम, सिकलसेल निर्मूलन कार्यक्रम, कर्करोग निदान कार्यक्रम, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य कार्यक्रम, अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, महात्मा फुले जन आरोग्य अभियान, मोबाईल मेडिकल युनिट, महाराष्ट्र वैद्यकीय आपत्कालीन सेवा आदींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

०००

नववर्षासोबत गडचिरोलीत विकासाची नवी पहाट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • माओवाद्यांनी संविधानाचा मार्ग स्विाकारावा
  •  ताराक्कासह ११ जहाल नक्षलवादी शरण
  • स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात प्रथमच अहेरी-गर्देवाडा बससेवा सुरु
  • लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ, ६ हजार २०० कोटींची गुंतवणूक, ९ हजार रोजगार
  • कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान
  • गडचिरोलीपासून २०० कि.मी. दूर पेनगुंडा येथे जवान, ग्रामस्थांशी संवाद
  • सी- ६० जवानांचाही सत्कार
  • पोलीस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलीचे ‍लोकार्पण

गडचिरोली, दि. ०१: नववर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीसाठी विकासाची नवीन पहाट घेवून आला असून विकासाच्या, सामाजिक सलोख्याच्या, शांततेच्या आणि औद्योगीकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात व्यतित केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर 77 वर्षांत प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि त्या बसमधून प्रवासही केला. लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यातून 6 हजार 200 कोटींची गुंतवणूक होत असून, चार हजारावर रोजगारनिर्मिती होत आहे.

आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस हे थेट ताडगुडा ब्रीज येथे गेले. गट्टा-गर्देवाडा-वांगेतुरी मार्ग तसेच ताडगुडा पुलाचे त्यांनी लोकार्पण केले. पेनगुंडा येथे त्यांनी जवानांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. हा परिसर अतिदुर्गम व नक्षलप्रभावीत मानला जातो. थेट मुख्यमंत्र्यांनी त्याठिकाणी जाऊन एक वेगळा संदेश दिला. या भागात जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री आहेत.

त्यानंतर दुपारी कोनसरी येथे, लॉईड्सच्या विविध उपक्रमांचा त्यांनी शुभारंभ केला. यात कोनसरी येथे डीआयआय प्लांट (400 कोटी रुपये गुंतवणूक, 700 रोजगार), पेलेट प्लांट आणि स्लरी पाईपलाईन (3000 कोटी रुपये गुंतवणूक, 1000 रोजगार), हेडरी, एटापल्ली येथे आयर्न ओअर ग्राईडिंग प्लांट (2 हजार 700 कोटी रुपये गुंतवणूक, 1 हजार 500 रोजगार), वन्या गारमेंट युनिट (20 कोटी रुपये गुंतवणूक, 600 रोजगार) याचा समावेश आहे. शिवाय लॉईडस काली अम्मल हॉस्पीटल आणि लॉईडस राज विद्यानिकेतन सीबीएसई शाळेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केला. सुमारे 1 हजार 200 विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मिळणार आहे. पोलिसांसाठी निवासस्थाने, जिमखाना, बालोद्यान इत्यादींचेही लोकार्पण करण्यात आले. कामगार आणि पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांना कंपनीचे 1000 कोटींचे समभाग प्रदान करुन एकप्रकारे मालकी देण्याचाही स्तुत्य उपक्रम लॉईड्सने हाती घेतला. हे समभाग मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

गडचिरोलीत ग्रीन माईनिंगचाही शुभारंभ करण्यात आला. यातून खाणींचे संरक्षण होणार असून लोहखनिजासाठी स्लरी पाईपलाईनमुळे इंधन बचत होणार, कार्बन उर्त्सजन कमी होणार, रस्त्यावरील अपघातही कमी होणार आहेत. ग्रीन माईनिंगचा प्रयोग देशातून गडचिरोलीत प्रथमच राबविण्यात येत आहे. गोंडवाना विद्यापीठ ऑस्ट्रेलियन विद्यापीठाशी एक करार करणार असून, त्यातून मायनिंगशी संबंधित सर्व अभ्यासक्रम सुरु करण्यात येतील. यातून गडचिरोलीतील तरुणांना रोजगार मिळणार आहे, अशीही माहिती, मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

११ जहाल नक्षलींचे समर्पण

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 11 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यात 8 महिला आणि 3 पुरुष यांचा समावेश आहे. यात दोन दाम्पत्य आहेत. या 11 जणांवर महाराष्ट्रात 1 कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते. छत्तीसगड सरकारने सुद्धा त्यांच्यावर बक्षिस जाहीर केले होते. यात दंडकारण्य झोनल कमिटीच्या प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का आहेत. 34 वर्षांपासून त्या नक्षली चळवळीत आहेत. 3 डिव्हिजन किमिटी मेंबर तर 1 उपकमांडर, 2 एरिया कमिटी मेंबर आहेत. या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी 86 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली. निवडणूक आचारसंहितेच्या काळात 5 नक्षली ठार झाले. 2024 या वर्षांत 24 नक्षली ठार झाले आणि 18 माओवाद्यांना अटक करण्यात आली. गेल्या 6 महिन्यात 16 जहाल नक्षलवादी आणि आज 11 असे 27 जण मुख्य प्रवाहात आले आहेत. पोलीस दलाच्या प्रयत्नामुळे सातत्याने माओवादींचे आत्मसमर्पण सुरू असून यामुळे माओवादाची कंबर तोडण्याचं काम होत असल्याचे ते म्हणाले.

उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या 4 वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादात सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. 11 गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे. सी-60 च्या जवानांनी जनतेचा विश्वास संपादन केला. आता संविधानविरोधी चळवळीत कुणीही जायला तयार नाही, ही आनंदाची बाब आहे. न्याय मिळायचा असेल तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. येत्या काळात गडचिरोलीला पोलाद सिटीचा दर्जा मिळणार, असे श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते पोलीस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलीचे ‍लोकार्पण करण्यात आले. तसेच येथील पोलीस दलाच्या नूतन हेलिकॉप्टर हॅंगर चे उद्घाटनही करण्यात आले. तसेच विविध नक्षल चकमकीमध्ये शौर्य दाखविणाऱ्या सी-60 च्या पोलीस जवानांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, विशेष पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. मिलिंद नरोटे, पद्मश्री पूर्णामासी जानी, पद्मश्री परशुराम खूणे, लॉईड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन उपस्थित होते.

०००

पर्व महिला सक्षमीकरणाचे..

महिलांच्या अंगी असणाऱ्या विविध क्षमतांचे संवर्धन करुन त्यांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याचबरोबर राज्यातील महिला आणि मुलींना आवश्यक संधी व सेवा-सुविधा उपलब्ध करुन देवून महिला सक्षमीकरणासाठी राज्याचे चौथे महिला धोरण मार्च २०२४ मध्ये जाहीर करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कृतीतून महिला सबल होण्यासाठी राज्य शासन भरीव योगदान देत आहे. याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे व जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील यांच्या सुक्ष्म नियोजनातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ‘लेक लाडकी’ योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांना आत्मनिर्भर बनवत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, याचाच हा थोडक्यात आढावा…

महिलांच्या विकासासाठी राज्याचे चौथे महिला धोरण महत्वपूर्ण – महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने सन १९९४ मध्ये पहिले, सन २००१ मध्ये दुसरे तर २०१४ मध्ये तिसरे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी ७ मार्च २०२४ रोजी महाराष्ट्र राज्याचे “चौथे महिला धोरण-२०२४” जाहीर झाले आहे. या धोरणाच्या कृती आराखड्याबरोबरच अंमलबजावणीच्या प्रगतीचे संनियंत्रण करण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि विकास साधण्यासाठी या धोरणातील विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या त्या प्राधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर गट व समित्या स्थापन करण्यात येत आहेत. राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती ही मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्हा स्तरीय अंमलबजावणी सुकाणु समिती ही त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात येत आहे.

या धोरणामध्ये महिलांचे आरोग्य, पोषण, आहार, स्वास्थ्य, शिक्षण व कौशल्य, लिंगाधारीत हिंसाचारास आळा, लिंगभाव समानता पूरक रोजगार, उद्योजकता व कौशल्य विकास इ. उपजिवीकेची साधने वृद्धिंगत करणे, परिवहन, निवारा व स्वच्छतेच्या सुविधांसारख्या लिंगभाव समावेशक पायाभूत सुविधांमध्ये वाढ करणे, लिंगसमभाव संवेदनशील प्रशासन व राजकीय सहभाग तसेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, हवामान बदल व आपत्ती व्यवस्थापन तसेच अन्य महत्वाच्या क्षेत्रांचा विकास या धोरणामुळे साधण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक हातभार – जन्मजात अंगी असणारी विविध कौशल्ये आणि क्षमतांचा विकास साधत महिला प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करुन दाखवत आहेत. महाराष्ट्रातील गरजू महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून २०२४ पासून सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांच्या बॅंक खात्यात दरमहा १५०० रुपये डीबीटीव्दारे थेट लाभ हस्तांतरीत करण्यात येत आहेत. यामुळे त्यांना आर्थिकदृष्ट्या हातभार मिळत त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होण्याबरोबरच आरोग्य आणि पोषणातही सुधारणा होत आहे. तसेच  कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका अधिक मजबूत होत आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जिल्ह्यात ॲप व पोर्टलनुसार एकूण १० लाख ५४ हजार २०५ अर्ज महिला व बाल विभागाकडे सादर झाले होते यापैकी १० लाख ३७ हजार ५८५ अर्ज मंजूर होवून या महिलांना या योजनेचा लाभ वाटप करण्यात आला आहे.

महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी पिंक ई- रिक्षा योजना –पिंक ई- रिक्षा योजनेच्या माध्यमातून  महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत असून यात एकल महिला, विधवा, परित्यक्तांना प्राधान्य देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत रिक्षा किंमतीच्या २० टक्के रक्कम शासनाकडून देण्यात येते तर १० टक्के रक्कम महिलांनी भरावयाची असून उर्वरित ७० टक्के रक्कम बॅंक कर्जाच्या माध्यमातून भरावी लागणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात ६०० ई रिक्षांची संख्या निश्चित केली असून याचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत ११८ अर्ज प्राप्त झाले आहेत. या योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत.

 पिडितांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’- ग्रामीण, शहरी भागातल्या तसेच वाड्या-वस्त्या, पाड्यांवरील पिडीत, अर्जदार महिलांपर्यंत राज्य महिला आयोग पोहोचत आहे. महिलांना त्यांच्याच जिल्ह्यात जलद न्याय मिळवून देण्यासाठी तसेच पिडितांना सुरक्षिततेचा आत्मविश्वास देण्यासाठी राज्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जात आहे.  या उपक्रमांतर्गत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली २० डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जनसुनावणी घेण्यात आली. यात १५६ तक्रारी प्राप्त झाल्या असून यापैकी २६ केसेस सामोपचाराने मिटवण्यात आल्या. राज्यात आजवर झालेल्या जनसुनावण्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक केसेस मिटणे हे या उपक्रमाचे यश म्हणावे लागेल.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांनी प्रेरित होवून राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात विधवा प्रथा बंदीचा ठराव सर्वप्रथम मंजूर करण्यात आला आहे. याच विचारांनी प्रेरित होवून राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी हेरवाड ग्रामपंचायतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून “विधवा प्रथा बंदी”चा असा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा श्रीमती चाकणकर यांनी कोल्हापूर दौऱ्यावेळी  व्यक्त केली असून यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.

‘लेक लाडकी’ योजनेतून मुलींना अर्थसहाय्य – महिलांचा सन्मान वाढण्यासाठी ‘लेक लाडकी’ ही नवीन योजना राज्य शासनाने सुरु केली आहे. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलीसाठी अर्थसहाय्य देण्यात येत आहे. यात मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासाठी लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येत आहेत. याप्रमाणे पात्र लेकीला एकुण १ लाख १ हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. या जिल्हा परिषदेच्या योजनेअंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाच्यावतीने सन २०२३- २४ मध्ये १ हजार ४०० लाभार्थ्यांना ७० लाख रुपयांचा तर सन २०२४-२५ मध्ये ४ हजार ४१७ लाभार्थ्यांना ३ कोटी ४३ लाख ६५ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुली व महिलांची उन्नती- कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने १० टक्के जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून मुलींच्या व महिलांच्या उन्नतीसाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. ग्रामीण भागातील सर्वसाधारण घटकातील इयत्ता ५ वी ते १२ वी मध्ये शिकत असलेल्या मुलींना सायकल खरेदीसाठी अनुदान देण्यासाठी १५ लाख ६० हजार  रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून ४०० मुलींना लाभ देण्यात येणार आहे. यामुळे शाळेच्या वेळेत एस.टी. ची सोय नसलेल्या किंवा दुर्गम भागातील मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकलचा उपयोग होणार आहे. त्यामुळे मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

ग्रामीण भागातील सर्वसाधारण घटकातील इयत्ता ७ वी ते १२ वी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी अनुदान देण्यासाठी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून १ हजार मुलींना लाभ देण्यात येणार आहे. संगणक प्रशिक्षणामुळे मुलींना तांत्रिक ज्ञान मिळणार असून त्याचा उपयोग त्यांना नोकरी वा व्यवसायासाठी होईल. त्याचबरोबर महिलांना पिको, फॉल मशिन खरेदीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामधून ६१७ महिलांना लाभ देण्यात येणार आहे. या मशिनमुळे महिलांना घरबसल्या व्यवसाय मिळून त्यांची आर्थिक उन्नती साधण्यास मदत होणार आहे.

मातृशक्तीचा सन्मान –आतापर्यंत मुलगा किंवा मुलीला आपल्या नावापुढे केवळ वडिलांच्या नावाचा उल्लेख करणे बंधनकारक होते. पण जन्मदात्या आईच्या नावाचा उल्लेख करणे सक्तीचे नव्हते. मातृशक्तीचा सन्मान व्हावा, म्हणून आता मुलांच्या नावापुढे आईचे नाव लावणे बंधनकारक करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून १ मे २०२४ पासून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.

राज्यात ५० नवीन शक्तीसदनची निर्मिती- शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्र सरकारच्या मदतीने ५० वसतीगृहांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्यातल्या निराधार, निराश्रित तसेच कौटुंबिक हिंसाचारात बळी पडलेल्या बेघर आणि लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी व सक्षमीकरणासाठी ‘शक्तीसदन’ ही योजना राज्य शासनामार्फत राबवण्यात येत आहे.

नव-तेजस्विनी ग्रामीण महिला उद्यम विकास योजना- नव-तेजस्विनी महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी महिलांना एकत्र आणून त्यांचे उप प्रकल्प तयार करण्याची प्रक्रिया महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) वतीने सुरु आहे. यामध्ये महिला स्वतःची गुंतवणूक करीत असून त्यासाठी प्रकल्पातून २५ टक्के देण्यात येत आहेत.

महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणात महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) राज्यात महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. माविम कोल्हापूर मार्फत २ हजार १७१ गटामध्ये ३० हजार महिलांचे संगठन झाले आहे. नवतेजस्विनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत महिलांना विविध बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देणे, व्यवसाय प्रशिक्षण, आरोग्य शिबीर, शासकीय योजना यांचा लाभ १८ हजार ९५० महिलांना देण्यात आला आहे.

पीडित महिलांसाठी मनोधैर्य योजना- ॲसिड हल्ला व लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांचे पुनर्वसन आणि त्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी मनोधैर्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या निकषात बदल करुन आता पेट्रोल, डिझेल, रॉकेल आणि स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारा गॅस यासारख्या ज्वलनशील पदार्थांच्या हल्ल्यातील पीडितांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अशा पीडित महिलांना सुद्धा मदत होत आहे.

 सखी वन स्टॉप सेंटरचा पिडीत महिलांना आधार – कौटुंबिक हिंसा, हुंड्यासाठी होणारा छळ, महिला व अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, शाळा व महाविद्यालयात होणारी छेडछाड, सायबर गुन्हे, ॲसिड हल्ला, कामाच्या ठिकाणी त्रास, बलात्कार, जबरदस्तीने देहव्यापार, पळवून नेणे अथवा महिलांसंबंधी इतर त्रासाने पीडित महिला ‘सखी वन स्टॉप सेंटर’ची मदत घेऊ शकतात. वन स्टॉप सेंटर २४ तास सुरु असून गरज भासल्यास या केंद्रामार्फत पिडीत महिलेला तातडीची मदतही दिली जाते. यामध्ये वैद्यकीय मदत, पोलीस रेस्क्यू व्हॅन, रुग्णवाहिका, पोलीस तक्रार नोंदणीस मदत, समुपदेशन, तात्पुरता निवारा, कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन दिले जाते.

कोल्हापूरातील शासकीय निवासस्थान आवारात सखी वन स्टॉप सेंटर सुरु झाल्यापासून आतापर्यंत ४८४ पिडीत महिला याठिकाणी दाखल झाल्या आहेत. यापैकी ४६० महिलांना सेवा देण्यात आली आहे. एप्रिल २०२३ ते आत्तापर्यंत १९८ पिडीत महिलांना सखी वन स्टॉप सेंटर मध्ये सेवा देण्यात आल्या आहेत. या केंद्रात ४३ पिडीत महिलांना निवासाची सोय देण्यात आली असून या सेंटरमुळे महिलांना संकटाच्या काळात आवश्यक मदत मिळत आहे.

 महिला व बाल विकास विभागाच्या वतीने शासकीय महिला राज्यगृह/ सरंक्षण गृह कार्यरत आहेत.  या वसतीगृहामध्ये १६ ते ६० वयोगटातील निराश्रित, परीत्यक्ता, घटस्फोटीत, कुमारी माता, लैंगिक अत्याचारीत, अनैतिक व्यापारात अडकलेल्या, सामाजिक संकटग्रस्त महिलांना प्रवेश दिला जातो. या वसतीगृहांमध्ये महिला स्वेच्छेने, स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने तसेच पोलीसांमार्फत न्यायालयाच्या आदेशाने दाखल होवून २ ते ३ वर्षापर्यंत वसतिगृहात राहू शकतात.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण – कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम २००५ आणि नियम २००६ ची अंमलबजावणी राज्यात ऑक्टोबर २००६ पासून करण्यात येत आहे. या अधिनियमांतर्गत रक्तसंबंधाच्या नात्याने सामाईक घरात राहणारी महिला ही तिच्यावर हिंसा करणाऱ्या व्यक्ती विरुध्द दाद मागू शकते.

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक अत्याचारास आळा – नोकरी करणाऱ्या महिलांवर कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचारास आळा घालण्यासाठी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ ची  अधिनियमाची अंमलबजावणी केली जाते. यासाठी राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक तक्रार समिती तर शासकिय, निमशासकिय, खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत  करण्यात आल्या आहेत.

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ (ITPA)- अनैतिक मानवी देह व्यापार प्रतिबंधासाठी राज्याने २००७ साली कृती आराखडा तयार केला असून त्याअंतर्गत कृती कार्यक्रम आखण्यात आले आहेत. यामध्ये सुटका, पुनर्वसन, घरी परत पाठविणे, माहितीचे संकलन यासाठी राज्यस्तरीय समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला असून कृती दलाची स्थापना देखील करण्यात आली आहे. या महिलांसाठी राज्यात संरक्षणगृह व उज्वलागृह कार्यरत आहेत.

हेल्पलाईन – केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांर्तगत महिला हेल्पलाईन १८१ आणि चाईल्डलाईन १०९८ हे दोन स्वतंत्र टोल फ्रि क्रमांक देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यासाठीचा नियंत्रण कक्ष महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे येथे कार्यरत आहे. संकटग्रस्त महिलांनी “सखी” वन स्टॉप क्रायसिस सेंटरच्या मदत व माहितीसाठी १८१ या हेल्पलाईन क्रमांकावर अथवा मोबाईल क्रमांक – ८९९९७२०९३३ व कार्यालय दूरध्वनी क्रमांक – ०२३१ – २९२४०० वर संपर्क साधावा. विभागाच्या योजना व उपक्रमांसाठी वेबसाईट https://womanchild.maharshtra.gov.in  पहावी. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय दुरध्वनी क्रमांक ०२३१ २६६१७८८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुहास वाईंगडे यांनी केले आहे.

महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाजसेविका व संस्थांना राज्य शासनाच्यावतीने जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्यावतीने मुली व महिलांच्या सक्षमीकरणासाठी भरीव योगदान देण्यात येत आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील महिला दिवसेंदिवस प्रगती साधत आहेत. तसेच कोल्हापूर जिल्ह्यात अनेक शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून यामुळे जिल्ह्यातील महिला येत्या काळात शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक दृष्ट्या सक्षम होऊन सर्वांगीण प्रगती साधतील, हे नक्की..!

  • वृषाली पाटील,माहिती अधिकारी,जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर

    0000

सर्वसामान्यांसाठीच्या योजना सुलभतेने पोहचाव्यात यावर भर – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर,दि.०१ : केंद्र सरकार व राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहचाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वसामान्यांना अधिकाधिक योजनांचा लाभ व्हावा, यादृष्टीने ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रा’ ही अनेक गोरगरिबांना आपल्या इच्छापूर्ती करणारी यात्रा म्हणून महत्त्वाची आहे. पहिल्याच यात्रेत आमच्या कष्टकरी लाडक्या बहिणींना अयोध्या येथील तिर्थदर्शनाचा लाभ होत असल्याचा मनस्वी आनंद आहे, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

कोराडी महालक्ष्मी संस्थांच्यावतीने आयोजित तिर्थयात्रेचा शुभारंभ महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. वातानुकुलीत बसद्वारे सुमारे ५४ महिला यात्रेकरुंना यात संधी मिळाली.

यावेळी श्री.बावनकुळे यांनी महिन्यातून दोन वेळा ही यात्रा अयोध्याला जाईल. अनेक सर्वसामान्य बहिणींचे  तिर्थयात्रेला जाण्याचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होत आहे. कालांतराने ही योजना मुख्यमंत्री तिर्थदर्शन यात्रेच्या स्वरुपात अधिक परिपूर्ण करु, असे स्पष्ट केले.

00000

ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे पारदर्शक, गुणवत्तापूर्ण करावी- मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. : ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ व ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजने’च्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामात पारदर्शक व गुणवत्तापूर्ण कामाला प्राधान्य द्यावे, असे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

मंत्रालयात प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तसेच कंत्राटी कामगार वेतन थकबाकीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव सतिश चिखलीकर, वित्तीय नियंत्रक अभय धांडे, उपसचिव प्रशांत पाटील, कार्यासन अधिकारी विवेक शिंदे, अच्युत इप्पर, विजय चौधरी उपस्थित होते.

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री श्री. गोरे म्हणाले की, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतील निकषात बदल करण्यासाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात येईल, जेणेकरुन कामात सुलभता निर्माण होईल. ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे विस्तारण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्यात यावेत. ग्रामीण तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत पुढील कामे मंजूर करण्यासाठी बाह्य वित्तीय संस्थांकडून आर्थिक मदत घेण्याबाबत प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कंत्राटी कामगार वेतन थकबाकीसंदर्भातील आढावाही यावेळी घेण्यात आला.

०००

मोहिनी राणे/ससं/

ताज्या बातम्या

आर्थिक अडचणीतील जिल्हा बँकांसाठी निधीची गरज

0
नवी दिल्ली, दि. ३०: राज्यातील आर्थिक अडचणीत असणाऱ्या सात जिल्हा बँकांना शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वर्ष 2004 प्रमाणे किंवा वर्ष 2014 मध्ये केंद्र...

विकिरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यासाठी नियोजन करा – पणन मंत्री जयकुमार रावल

0
मुंबई, दि. ३०: निर्यातीला चालना देण्यासाठी वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर आणि आवश्यक मनुष्यबळ या माध्यमातून गतीने चालवण्यात यावे. अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय...

सर्वांच्या सहकार्याने विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार – मुख्य सचिव राजेश कुमार

0
मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम...

नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी पदभार स्वीकारला

0
मुंबई, दि. ३०: शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य...

पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते बोरी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण

0
यवतमाळ, दि.३० (जिमाका): दारव्हा तालुक्यातील बोरी अरब गावाजवळ अडान नदीच्या पुलावर बांधण्यात आलेला उड्डाणपूल व पोहोच मार्गाच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण...