गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 201

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. १४ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी आज मंत्रालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मंत्रालयीन अधिकारी-कर्मचारी यांनीही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

0000

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १४ : मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. मुंबई आणि महाराष्ट्र हे एकमेकात रमलेले आहे. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि बाबासाहेब यांचे अतूट नाते असल्याचे प्रतिपादित केले.

वडाळा पूर्व येथील कोरबे मिठागर भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमास व्यासपीठावर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार कॅप्टन तमिल सेलवन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील त्यांच्या कार्य कर्तृत्वाला उजाळा देण्यासाठी राज्य शासन इंदू मिल येथे त्यांचे भव्य स्मारक साकारत आहे. त्यांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधान आहे. संविधानाच्या तत्त्वावर देशाचा कारभार सुरू आहे.  या संविधानानेच देशाच्या महासत्तेचा मार्ग प्रशस्त केला आहे. बाबासाहेबांचा पुतळा हा संविधानशिवाय अपूर्ण असतो. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून शोषित, पीडित लोकांना न्याय देण्याचे काम केले. संविधानाने सर्वांना समान संधी उपलब्ध करून दिली. संविधान निर्माण करताना त्यांची दूरदृष्टी आणि बुद्धीची प्रगल्भता लक्षात येते.

डॉ. बाबासाहेबांचा मॅट्रिक उत्तीर्ण झाल्यानंतर पहिला सत्कार मुंबईत झाला. एवढेच नव्हे तर, केंद्रीय मंत्री, प्रांतिक अध्यक्ष, गोलमेज परिषदेवरून देशात परत आल्यावर, राज्यघटना पूर्ण करून परत आल्यानंतर अशा अविस्मरणीय क्षणी बाबासाहेब आंबेडकर यांचा सत्कार मुंबईमध्येच झाला. बाबासाहेब यांनी वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चैत्यभूमीवर अभिवादन सभाही मुंबईतच पार पडल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

बाबासाहेबांच्या संपूर्ण जीवनपटात त्यांना उजाळा देणारे, त्यांच्या स्मृती जागविणारे अनेक प्रसंग मुंबईने अनुभवले आहेत. त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन आणि प्रिंटिंगही मुंबईतच झाले. त्यांच्या राजकीय आयुष्याचे अनुष्ठान हे मुंबईतूनच सुरू झाले. शोषितांचा आवाज बनवून ते आयुष्यभर लढले, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

प्रास्ताविक आमदार कोळंबकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. तसेच  रुग्णवाहिकेचे लोकार्पणही करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0000

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करावेत- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. १४ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेतअसे आवाहन राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांनी केले.

चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदेसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटसांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारमृद व जलसंधारण मंत्री संजय राठोडमुख्य सचिव सुजाता सैनिकमुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणीयांची प्रमुख उपस्थिती होती.

 राज्यपाल श्री. राधाकृष्णन म्हणालेडॉ. बाबासाहेबांना भारताच्या संविधानाचे शिल्पकारमहान समाजसुधारक आणि देशभक्त म्हणून गौरविले जाते. बाबासाहेबांनी लोकशाहीसामाजिक समता व लिंग समानतेसाठी दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली.

राज्यपाल महोदयांनी सांगितले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेताना संविधानालाच आपले मार्गदर्शक मानले. इंदू मिल येथे उभारण्यात येणारे डॉ. आंबेडकर स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेलअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भारताच्या एकतेचा आणि संविधानिक मूल्यांचा पाया डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रचला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारताच्या संविधानाच्या माध्यमातून देशाची एकता आणि अखंडता कायम ठेवण्याचे अमूल्य कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे. आज आपण जो एकसंघ भारताचा अनुभव घेत आहोत, त्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान हेच आधारस्तंभ आहे. संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असल्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहेत. देशातील सामाजिक विषमतेला आव्हान देत समता आणि बंधुत्वाचे मूल्य देशात रुजवण्याचे ऐतिहासिक कार्य बाबासाहेबांनी केले. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक नागरिकाला जगण्याचा समान अधिकारसंधीची समानता आणि आपली स्वप्ने साकार करण्याचा विश्वास दिलाअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी यावेळी सांगितले.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे आजचा आधुनिक भारत घडला असूनत्यांच्या विचारांचे पालन करून संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा ठेवणे हीच त्यांच्या जयंतीला खरी आदरांजली ठरेलअसेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे कीभारताचे संविधान हे माझ्यासाठी सर्वोच्च आहे. भारताच्या विकासात आणि प्रगतीच्या दिशेने देशाला पुढे नेण्यात संविधानाची भूमिका मोलाची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत शिक्षणसामाजिक न्यायऔद्योगिक विकास आणि मानवी हक्कांचे जसे मोलाचे योगदान आहेतसेच आधुनिक भारताच्या संरचनेतही त्यांचे कार्य अतुलनीय आहे. पाटबंधारे योजनाराष्ट्रीय विद्युत ग्रीडकामगार हक्कांचे संरक्षणतसेच अन्य महत्त्वाच्या धोरणांचे शिल्पकार म्हणून त्यांनी देशाला दीर्घकालीन दिशा दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास व विचारांना अभिवादन करणे आणि संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा राखत समताबंधुता व न्याय यांचा अंगीकार करणेहीच त्यांना खऱ्या अर्थाने मानवंदना ठरेलअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचे छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी यावेळी भेट दिली.

मा. राज्यपाल यांच्या हस्ते सर्व भिक्षूंना चिवरदान करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते यावेळी अंध विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.

यावेळी भन्ते डॉ.राहूल बोधी महाथेरोडॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्रिशरण बुद्धवंदना म्हणण्यात आली. तसेच मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. हेलिकॉप्टर मधून चैत्यभूमीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.

 

००००

गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,दि.१३ (जिमाका) :- कोणताही गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो, हा आदर्श त्यांनी आपल्यासमोर ठेवला आहे . हा आदर्श पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

नवी मुंबईच्या  एनएमएमसी मैदान येथील गुरुद्वाराजवळ आयोजित गुरमत समागम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा ताई म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, संजीव नाईक, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता पक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुरुमत समागम कार्यक्रमात गुरुजींचा आशीर्वाद घेण्यासाठी उपस्थित राहता आले, हे माझे सौभाग्य आहे. आपण सर्वजण गुरुजींचा आशीर्वाद घेतो. गुरु ग्रंथ साहेब यांच्या माध्यमातून जे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात ते केवळ शीख समुदायाच्या कल्याणासाठी नसून समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत. गुरुनानक देव साहेब यांनी जे विचार संपूर्ण देशांमध्ये पोहोचविले. त्यामुळे एक मोठा नानकपंथी समाज उभा राहिला, त्यामध्ये शीख समाजाबरोबर सिंधी लमानी बंजारा शिकलगार समाजही आहे. गुरुनानक देव साहेब यांनी जे विचार आपल्यासमोर ठेवले त्या विचारांवर चालण्याचे काम आपल्याला करावयाचे आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, दहा गुरूंची परंपरा खूप महान आहे. आपल्या गुरूंनी नुसते विचार दिले नसून लढण्याची हिंमत व ताकद पण आपल्याला दिली आहे. गुरु तेग बहादूर सिंग यांच्या शहादतचा ३५० वे पर्व सुरू आहे. त्यांना आजही “हिंद की चादर” असे संबोधले जाते. त्यांनी काश्मिरी पंडितांची जुलुमातून सुटका करण्यासाठी लढा दिला. गुरुगोविंद सिंग यांनी हा वारसा पुढे चालविला.

श्री.फडणवीस म्हणाले की, गुरु पुरव पर्वात महाराष्ट्र सरकार सामील होईल. शासनाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गुरूंची गाथा जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. पंजाब साहित्य अकॅडमीची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून त्यांचे विचार जनसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यास मदत होईल. अकरा लोकांची कमिटी स्थापन करण्यात आली असून या कमिटीच्या माध्यमातून संवाद साधला जातो. समाजासाठी आवश्यक बाबींची माहिती या कमिटीच्या मार्फत शासनास कळविली जाते. निर्वासित लोक, प्रार्थना स्थळे यांना जागा देण्यात येणार आहे. मदरसे यांना ज्याप्रमाणे मदत केली जाते त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना शासनाकडून मदत करण्यात येणार आहे.

यावेळी आयोजक आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुख्यमंत्री महोदयांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

००००

घटनाकार बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर जयंती; लोकशाही बळकटीसाठी राष्ट्रहित प्रथम, तर व्यक्तिपूजा नकोच

भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांचा उदय म्हणजे उपेक्षित, तेजोहिन अन् सामाजिक चेहरा नसलेल्या समाजघटकांमध्ये मानवी हक्कांबद्दल जागृतता निर्माण करणाऱ्या क्रांतीसूर्याचे उदयच म्हणावे.

जाती-पातीच्या विषमतेवर मनुवादी समाजव्यवस्थेतून शेकडो वर्षे गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या दलित-पददलित मागास लोकांना नवा सामाजिक चेहरा देण्याचं व त्यांना बोलकं करण्याचं ऐतिहासिक कार्य महानायक बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांनी केलं.त्यातून  तथाकथित समाजातली वर्णव्यवस्था व जातीभेदाचे समूळ उच्चाटन करत देशात सामाजिक समता प्रस्थापित केली. अशा युगपुरुष  विश्वरत्न बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त सर्वधर्मीय भारतीयांची भावपूर्ण आदरांजली!

सामाजिक क्रांती घडवून आणणाऱ्या बाबासाहेबांचे स्थान आजही आधुनिक भारताच्या इतिहासात सह्याद्रीसारख अढळ आहे. अखिल मानवजातीला सामाजिक समतेचा संदेश देणारे महामानव बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांचा १४ एप्रिल हा जयंती दिन कॅनडा सरकारने मागील वर्षी “समता दिन” म्हणून देशात साजरा करण्याचा निर्णय घेतला.याबद्दल आम्ही भारतीय कॅनडा सरकारचे आभार प्रकट करतो विश्वरत्न बाबासाहेब डॉ . भिमराव आंबेडकर हे केवळ भारतालाच नव्हे तर,साऱ्या जगताला हवे हवेसे वाटायचे.मागील काळात ऑक्सफर्ड विद्यापीठाने जगातील १०० महान विद्वानांची यादी तयार केली होती,त्यात बाबासाहेबांचे नाव अग्रभागी होते,ही गोष्ट भारतीयांच्या दृष्टीने मोठ्या अभिमानाची आहे.

दलित पददलित मागास समाजाचे नव्हे तर मानव  तेचे कैवारी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील *महू* येथे सुभेदार रामजी मालोजीराव आंबेडकर यांच्या कुटुंबात झाला अन् जणू ज्ञानाचं एक नवं विद्यापीठ नावरूपाला आलं.वंदनीय भीमाबाई ह्या बाबासाहेबांच्या मातोश्री, बाबासाहेब हे पाच वर्षाचे असतानाच त्या दिवंगत झाल्या.परिणामी बाबासाहेबांचं मातृछत्र बालपणीच विरून गेलं.पिताश्री सुभेदार रामजी हे लष्करात नोकरीला होते.इतकेच नव्हे तर,बाबासाहेबांचे आजोबा मालोजीराव हे देखील लष्करात होते.खरं तर,त्यांनी राष्ट्रसुरक्षेसाठी आपलं सारं जीवन समर्पित केलं.पुढे त्यांचेच सुपुत्र भीमराव उर्फ बाबासाहेब डॉ. आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार बनून स्वतंत्र भारताचे भाग्यविधाता झाले. वास्तवात आंबेडकर कुटुंब हे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळील *आंबावडे* गावचे मुळ रहिवाशी.दरम्यान वडिलांचे निधन झाल्यावर थोरले बंधू आनंदराव यांनी बाबासाहेबांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. विशेष म्हणजे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज या द्वय महापुरुषांनी बाबासाहेबांना विदेशातील उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करुन मोलाची मदत केली.त्यांनाही आमचा त्रिवार मानाचा मुजरा!

वंदनीय बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांच्या अर्धांगिनी माता रमाई भिमराव आंबेडकर यांनी आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांना भक्कम साथ दिली.बाबासाहेबांच्या त्या खऱ्या अर्थाने सावलीच होत्या.संघर्षमय अन् स्वाभिमानी जीवन जगत अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.दरम्यान बाबासाहेब आजारी पडले असता,ते हॉस्पिटलमध्ये दाखल असताना,तेथे त्यांची देखभाल करणाऱ्या डॉ.सविता कबीर यांच्याशी ओळख झाली अन् पुढे त्याचं रूपांतर सन १९४८ मध्ये विवाहात झालं.असा हा संमिश्र जीवन प्रवास युगपुरुष बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांचा राहिला.ते स्वतः स्वाभिमानाने जगले अन् आपल्या अनुयायांनादेखील स्वाभिमानाने जगण्याची दीक्षा दिली.म्हणूनच त्यांना महामानव म्हणून संबोधिले जाते.

समाजातील गोरगरीब, उपेक्षित,दलित-पददलित, मागासवर्गीय प्रवर्गातील विभिन्न जाती-जमातीतील लोकांचा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकास साधण्यासाठी प्रथम आपल्याला उच्च शिक्षित व्हावे लागेल,हे जाणून बाबासाहेबांनी विभिन्न शास्त्रांचा सखोल अभ्यास करण्याचा दृढनिश्चय केला. अशाप्रकारे त्यांनी विद्वत्ता, कठोर परिश्रम,जिद्द,चिकाटी च्या बळावर शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली.केंब्रिज,ऑक्सपर्ड सारख्या जागतिक दर्जाच्या नामवंत विद्यापीठांमध्ये विविध सामाजिक शास्त्रांमध्ये एम.ए.(अर्थशास्त्र,राज्य शास्त्र,समाजशास्त्र) केलं.त्यानंतर त्यांनी *दि प्रॉब्लेम ऑफ रुपी* या प्रबंधातून पी.एचडी.संपादन केली.पुढे त्यांनी डी.लिट.(उस्मानिया विद्यापीठ),डी.एस्सी., एम.एससी.,एल.एल डी(कोलंबिया विद्यापीठ) व बॅरिस्टर आदी उच्चतम पदव्या आपल्या कठोर परिश्रम अन् बुद्धिमत्तेच्या जोरावर संपादन केल्या.त्यानंतर सिडनहॅम कॉलेजमध्ये काही काळ त्यांनी प्राध्यापकाची नोकरीही केली.ख्यातनाम अर्थशास्त्रज्ञ,थोर राजनितिज्ञ व समाजशास्त्रज्ञ,चतुरस्त्र संपादक-पत्रकार,लेखक, साहित्यिक,घटनातज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ञ अशी बाबासाहेबांची बहुआयामी ओळख देशासह जगभरात आजही आहे.कारण त्यांनी भारतीय राज्यघटनेसह गतकाळात स्वतंत्र झालेल्या अनेक देशांना घटना तयार करताना नि:स्पृहपणे मोलाची मदत केली.म्हणूनच बाबासाहेब यांच्या कार्याचा ठसा जगभरात आहे.

शिक्षणाचा सर्वदूर प्रसार व्हावा,या उद्देशाने बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज तर,मुंबईमध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सिद्धार्थ कॉलेज,लॉ कॉलेज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आर्ट्स,कॉमर्स महाविद्यालय सुरू केलीत. तसेच महाड,दापोली,पंढरपूर,नांदेड आदी ठिकाणी सुमारे २० हून अधिक शैक्षणिक संस्था स्थापन केल्यात. बाबासाहेबांनी गोरगरीब,गरजू,

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व मागास घटकांसाठी शैक्षणिक सोयी-सुविधा व शिष्यवृत्त्या जाहीर करून त्यांच्यासाठी शिक्षणाची कवाडं उघडी केली.महत्वाचे म्हणजे मागासवर्गीयांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी शैक्षणिक संस्थांचे जणू जाळेच विणले.इतकेच नव्हे तर दलित-पददलित, मागासवर्गीय समाज बांधवांना शिका,संघटित व्हा व संघर्ष करा हा पथदर्शक संदेश दिला. मागासवर्गियांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी केंद्र व राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांच्याकरिता राज्यघटनेत आरक्षण व बढतीच्या तरतुदी केल्या.जेणेकरून शेकडो वर्षांपासून पिछाडीवर राहिलेला मागास समाज राष्ट्राच्या मुख्यप्रवाहात सामील होऊ शकेल.खरं तर,बाबासाहेब हे मागासवर्गीयांचे नव्हे तर संपूर्ण मानव जातीचे आधारवड होते.

शिक्षणतज्ञ बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून मागास समाजातील निरक्षरता दूर करण्यावर आपलं सारं जीवन वेचलं.या पार्श्वभूमीवर  मागासवर्गीयांना *शिकाल तर टिकाल* हा मोलाचा सल्ला दिला.गोरगरीब मागास घटकांच्या पाल्यांना अभ्यासाची व अन्य विषयांची पुस्तके सहजपणे उपलब्ध व्हावीत,या उद्देशाने बाबासाहेबांनी दादर येथील त्यांच्या राजगृह निवासस्थानी विविध विषयांची सुमारे ५०,००० पुस्तकांचे ग्रंथालय उभारले आहे.वास्तविक पहाता, बाबासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजातील उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी व्यतित केलं.ते खऱ्या अर्थानं  तमाम मागासवर्गीयांचे भाग्यविधाता होते.

उल्लेखनीय गोष्ट म्हणजे घटनाकार बाबासाहेब डॉ.आंबेडकर हे शेतकऱ्यांचे कैवारी होते.शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी त्यांनी पार्लमेंटमध्ये अनेकदा आवाज उठविला.त्यांच्या मते, भारतीय शेतकरी हा कर्जात जन्मतो,कर्जात जगतो अन् कर्जातच मरतो यासाठी व्यवहार्य मार्ग म्हणजे सामुदायिक शेतीचा प्रयोग करून जे उत्पादन येईल,त्यातील सरकारचा हिस्सा वगळून,उर्वरित उत्पादन शेतकऱ्यांना सम -समान पद्धतीने वाटप करावे,असा मोलाचा सल्ला बाबासाहेबांनी सरकारला दिला.कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग क्षेत्रावर भर दिला गेला पाहिजे.सरकारने कृषीपूरक उद्योग उभारले पाहिजेत,जेणेकरून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.कृषी उत्पन्नावर कर लावू नये. शेतकऱ्यांविषयीचा सरकारचा दृष्टिकोन  पारदर्शक व सकारात्मक असावा.त्यांचे सर्वांगीण हित जपणारा असावा.”शेती” हा सरकारी धंदा(व्यवसाय)म्हणून असावा,असे त्यांचे प्रामाणिक मत होते.कारण त्यामुळे नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची झळ थेट बळीराजाला पडू शकणार नाही. छोटे अल्पभूधारक,कोरडवाहू शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर  बाबासाहेबांनी लोकसभेत परखड अन् रोखठोक मतं मांडली होती.सरकारने    “अन्नदाता” शेतकऱ्यांचे कुठल्याही परिस्थितीत हित जपावे,हा त्यांचा नेहमी आग्रह असायचा.त्यांनी सदैव बळीराजाची पाठराखण केली,कारण ते शेतकऱ्यांचे भाग्यविधता होते.

केंद्रीय कायदा मंत्री असताना बाबासाहेबांनी स्री शिक्षण, स्री-पुरुष समानता अन् स्री स्वातंत्र्यावर अधिक भर दिला.तसेच महिलांच्या हितासाठी वीसहून अधिक कायदे केलेत.हिंदू मॅरेज ॲक्टचे निर्माते खऱ्या अर्थानं बाबासाहेबच आहेत.कायद्याद्वारे वडिलांच्या संपत्तीत मुलीला लग्नानंतरही मुलाबरोबरीचा समान हक्क प्रदान केला.. तो बाबासाहेबांनीच.स्री शिकली तर,कुटुंबासह समाजाला शिक्षित करण्याची तिच्यात धमक असल्याचे बाबासाहेबांचे ठाम मत होते.महिलांना शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात आणून आत्मनिर्भर बनविण्याचं अन् स्वाभिमानाचं जीवन जगण्याची सकल स्त्री जातीला त्यांनी दिशा दाखविली.परिणामी आज महिला सबलीकरण होऊन त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात आघाडी घेतांना दिसत आहेत.महिलांना राजकारणात पुरेसं अन् योग्य स्थान द्या,असा सल्लाही त्यांनी राज्यकर्त्यांना दिला.महिला ह्या देशाचा राज्यकारभार निष्ठापूर्वक,सक्षमपणे व कर्तव्यबुद्धीने करू शकतात,याचा त्यांना विश्वास होता.वास्तवात बाबासाहेब हे स्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.

स्वतंत्र देशाचा राज्यकारभार सनदशीर मार्गाने चालविण्यासाठी राज्यघटनेची आवश्यकता असते,हे जाणून घटना समितीचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांना मसुदा समितीचे अध्यक्ष नेमून भारतीय संविधान तयार करण्याची जबाबदारी सोपविली.याशिवाय मसुदा समितीत काही तज्ज्ञ मान्यवरांची देखील सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.या समितीने विविध देशांचे दौरे केले.अन् तेथील राज्यघटनांचा सखोल अभ्यास करून त्यातील आपल्या देशास उपयुक्त असणाऱ्या तरतुदी संकलित केल्या.तब्बल २ वर्षे,११ महिने,१८ दिवस विविध देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास केल्यावर देशांतर्गत दौरे करुन राज्यांमधील भौगोलिक परिस्थिती,संस्कृती,जीवन पद्धती,रीतिरिवाज,भाषा आदी बाबींचा सखोल अभ्यास करून अंतत: भारतीय संविधान नावरूपाला आले अन् २६ नोव्हेंबर १९४९ रोजी त्याला मान्यता मिळून,त्याद्वारे २६ जानेवारी १९५० पासून  स्वतंत्र देशाचा राज्यकारभार सनदशीर मार्गाने हाकण्यास प्रारंभ झाला.त्या दिवसापासून भारतात सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य म्हणून एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.

भारतीय नागरिकांना व्यक्ती स्वातंत्र्य(जीवन जगण्याचे स्वातंत्र्य),विचार स्वातंत्र्य(अभिव्यक्ती स्वातंत्र्य),धार्मिक स्वातंत्र्य, उदरनिर्वाहासाठी व्यवसाय-नोकरी करण्याचे स्वातंत्र्य,न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र्य,शिक्षण स्वातंत्र्य हे मूलभूत अधिकार(हक्क) राज्यघटनेच्या माध्यमातून बहाल करण्यात आले.या हक्कांचा उपभोग घेताना प्रत्येक नागरिकाने इतरांच्या हक्कांची पायमल्ली होणार नाही,याची पुरेपूर खबरदारी घ्यावी,असं त्यांनी राज्यघटनेत प्रकर्षाने नमूद केलं.मूलभूत हक्कांसह राष्ट्राप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीवही घटनेच्या माध्यमातून नागरिकांना करून देण्यात आली.

लोकसभा,विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपले पसंदीचे लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी सर्वधर्मीय स्त्री- पुरुषांना मतदानाचा अधिकार देण्यात आला.याशिवाय वरील संवैधानिक संस्थांमध्ये विविध मागासवर्गीय प्रवर्गांसाठी लोकसंख्येच्या निकषांवर राखीव जागा ठेवण्यात आल्या.घटनाकार बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांनी समाजातील आहे रे अन् नाही रे यातील दरी मिटवून सामाजिक समता प्रस्थापित करण्यावर अधिक भर दिला.वास्तविक पहाता, बाबासाहेबांनी आपलं सारं आयुष्य देशात *स्वातंत्र्य, समता व बंधुता* प्रस्थापित करण्यासाठी पणाला लावलं.अत: बाबासाहेब हे सच्चे देशभक्त अन् सामाजिक समता प्रस्थापित करणारे महान  समाजसुधारक होते,हे केवळ भारतानेच नव्हे तर,जगाने शिक्कामोर्तब केलं याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे.

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यास अनन्यसाधारण महत्व असते. बाबासाहेब डॉ.आंबेडकर यांच्या पत्रकारितेला १९२० मध्ये प्रारंभ झाला.*पंखाशिवाय पक्षी जसा आकाशात भरारी मारू शकत नाही.त्याप्रमाणेच वृत्तपत्राशिवाय लोकशाहीला पूर्णत्व येऊ शकत नाही*.कारण लोकशाही राज्यपद्धती म्हणजे लोकांसाठी,लोकांनी निवडलेले,लोकांचे राज्य असते.लोकशाही राज्यपद्धतीत सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्याचे काम वृत्तपत्रे करत असतात.सरकारच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये काही उणिवा असल्यास,वृत्तपत्रे त्याविरुद्ध वाचा फोडून सरकारला संबंधित निर्णय

लोकहितासाठी बदलण्यास बाध्य करतात.खरं तर, बाबासाहेबांनी पारतंत्र्याच्या काळात लोकजागृती व लोकशिक्षणासाठी आपल्या वृत्तपत्रांचा वापर केला.त्याप्रमाणेच मागास वर्गीय समाजघटकांना आपल्या मानवी अधिकारांची जाणीव व्हावी,त्यांना शिक्षणाचे महत्व कळावे अन् मागासवर्गीयांना आपल्या हक्कांसाठी लढण्याची ऊर्जा निर्माण करण्याचे अहमकार्य बाबासाहेबांनी आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून केलं.समाजातील दुर्लक्षित,उपेक्षित मागास वर्गीय घटकांचा आवाज बनून त्यांना बोलकं करण्यासाठी बाबासाहेबांनी मूकनायक,बहिष्कृत भारत,एकता,प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे सुरू केली.त्याद्वारे बाबासाहेबांनी वंचित व उपेक्षित लोकांच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडली.याशिवाय मागास  पददलितांना मानसिक,बौद्धिक व आर्थिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी वृत्तपत्र या आयुधचा अचूक प्रयोग केला.त्याची परिणती म्हणजे दलित,पददलित व मागासवर्गीयांमध्ये मानवी हक्कांची जाणीव निर्माण झाली.

बाबासाहेब हे संसदिय लोकशाही शासनप्रणालीचे पूजक होते.राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना घटनाकार म्हणतात,”सामाजिक व आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी केवळ घटनात्मक मार्गांचाच वापर करावा.घटनेशी प्रामाणिक राहून स्वहितापेक्षा राष्ट्र हिताला प्राधान्य द्यावे.लोकशाही अधिकाधिक बळकट करण्यासाठी व्यक्तीपुजेला थारा न देता,राष्ट्र विकासाला प्राथम्य द्यावे.प्रजासत्ताक राज्याच्या निर्मितीसाठी राजकीय लोकशाहीला सामाजिक व आर्थिक लोकशाहीची जोड द्यावी.भारताचे सार्वभौमत्व,अखंडता व एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी राज्यकर्त्यांनी सर्वंकष प्रयत्न करावेत.आपले राज्य  धर्मनिरपेक्ष असल्याने प्रत्येकाने दुसऱ्याच्या धर्माचा आदर करावा.कुठल्याही घटनात्मक प्रमुखाने  राज्यकारभार करताना विशिष्ठ धर्माला झुकते माप देऊ नये,तर सर्व धर्मांना समान लेखावे.राज्यकर्त्यांनी जाती-धर्माच्या नावावर भेदाभेद करू नये. राज्यघटना,राष्ट्रध्वज अन् राष्ट्रगीत यांचा राज्यकर्ते व सर्वधर्मीय नागरिकांनी सन्मान करावा.यातूनच भारतीय संसदिय लोकशाही  ही जगात आदर्श राज्यप्रणाली ठरेल,हे निश्चित”.

घटनाकार बाबासाहेब डॉ. आंबेडकर यांनी स्वतंत्र भारताचे संविधान तयार करून सामाजिक समता प्रस्थापित केली.याबद्दल सर्वधर्मीय लोक बाबासाहेबांचे सदैव ऋणाईत राहतील.परंतु भारताला स्वातंत्र्य मिळूनही जातीपाती-धर्माच्या नावावर दलित-पददलितांवर जो अन्याय झाला,

याबद्दल बाबासाहेबांना मनस्वी दुःख होत असे. नाशिकच्या काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश नाकारणे,महाडचे चवदार तळे जे अनेक वर्षांपासून दलितांसाठी बंद होते,अमरावतीचे अंबादेवीचे मंदिर असो वा पुण्याचे पार्वती टेकडीवरील मंदिरात दलितांना प्रवेश बंदी ह्या अमानवीय घटनांमुळे बाबासाहेबांचे मन उद्विग्न झालं.या असामाजिक कृत्यांविरुद्ध त्यांनी जागोजागी तीव्र जनआंदोलने करून अखेर दलितांना या स्थळांमध्ये प्रवेश मिळवून दिला.दरम्यान आंबेडकरांनी आपल्या पाच लाख अनुयायींसह नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला.बाबासाहेब हे मानवतावादी विचारांचे युगपुरूष होते.या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने सामंजस्याच्या भूमिकेतून दादरमधील इंदू मिलच्या प्रांगणात बाबासाहेब डॉ.आंबेडकरांचे स्मारक उभारलं जात आहे.खरं तर,हीच खरी युगपुरुष बाबासाहेब डॉ. भिमराव आंबेडकर यांना आदरांजली ठरेल.

0000

पालकमंत्र्यांच्या हस्ते माळशिरस तालुक्यातील  विविध विकास कामांचे उद्घाटन

सोलापूर, दि:-13(जिमाका)-  माळशिरस तालुक्यातील  म्हेत्रे मळा (वेळापूर), नातेपुते व माळशिरस येथील विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नातेपुते शहरासाठी पुणे – पंढरपूर रोडवर आधुनिक स्ट्रीट लाईट बसविण्यात आली आहे. याचा उद्घाटन समारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी आमदार राम सातपुते, मुख्याधिकारी डॉ कल्याण हुलगे,नगराध्यक्षा अनिता लांडगे, तसेच नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.

राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी, रस्ते, गटारीसाठी, सभामंडप, मंदिरांचे जीर्णोद्धार यासाठी सुमारे   27 कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे. श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर नगर विकास खात्याच्या योजनेमधून अत्याधुनिक स्ट्रीट लाईट 2 कोटी 65 लाख रुपयांची  विशेष निधी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हि योजना मंजूर करून आणली असल्याचे माजी आमदार राम सातपुते यांनी यावेळी सांगितले.

तत्पूर्वी म्हेत्रे मळा (वेळापूर),येथे  वेळापूर- पिसेवाडी 4 किमी व अन्य 7 रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन कामांचे उद्घाटन पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच संबंधित ग्रामस्थांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. तसेच  वेळापूर येथील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर येथे भेट देऊन पालकमंत्री गोरे यांनी दर्शन घेतले. यावेळी मान्यवर पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

0000

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक स्मरण व अभिवादन

मुंबई, दि. १३ :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे तसेच राज्यातील नागरिकांना डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अलौकिक कार्याचे, विचारांचे स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “डॉ. बाबासाहेबांनी या देशातील अज्ञान, अनीती, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेदासारख्या कुप्रथांविरुद्ध निर्णायक लढा दिला. या देशातील माणसाला माणसाप्रमाणे जगण्याचा हक्क केवळ त्यांच्यामुळे मिळाला. समाजातील गरीब, वंचित, दुर्बल, उपेक्षित बांधवांना समानतेचा हक्क, स्वाभिमानासाठी लढण्याचं बळ दिलं. ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा’ या त्यांच्या संदेशानं बहुजनांच्या कित्येक पिढ्यांचं कल्याण केलं. डॉ. बाबासाहेबांनी देशाला जगातील सर्वश्रेष्ठ संविधान दिलं. त्या संविधानानं राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक, भौगोलिक विविधतेच्या भारताला एकता, समता, बंधूतेच्या सूत्रात बांधण्याचं, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम ठेवण्याचं काम केलं. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या राज्यघटनेनं गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा भेदाभेद न करता प्रत्येक नागरिकाला एका मताचा समान अधिकार दिला. प्रत्येक देशवासियाला मानानं, स्वाभिमानानं जगण्याचा हक्क आणि विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणारे डॉ. बाबासाहेब युगपुरुष होते. त्यांचे विचार कुठल्या एका जातीच्या, धर्माच्या, पंथाच्या, प्रांताच्या कल्याणासाठी नव्हते, अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद त्यांच्या विचारांमध्ये आहे,” असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, “डॉ. बाबासाहेबांचा मानवकल्याणाचा विचार पुढे घेऊन जाणं, समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाचा सर्वांगीण विकास करणं हेच डॉ. बाबासाहेबांना खरं अभिवादन ठरेल. देशाच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारणाला आश्वासक दिशा देण्याचं काम डॉ. बाबासाहेबांनी केलं. त्यांच्यासारखे महामानव आपल्या देशात जन्मले, त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना दिली हे आपलं भाग्य आहे. डॉ. बाबासाहेब दूरदृष्टीचे नेते होते. त्यांचं व्यक्तिमत्त्व बहुआयामी होतं. ते कायदेतज्ञ, घटनातज्ञ, अर्थतज्ञ होते. लेखक, पत्रकार, चित्रकार, संगीतकार होते. डॉ. बाबासाहेबांनी केलेला महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहनाचं आंदोलन, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेले लढे, रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेतील त्यांची भूमिका; हे सारं देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक सुधारणांच्या चळवळीतील क्रांतिकारी टप्पे आहेत. डॉ. बाबासाहेबांचे मानवकल्याणाचे विचार सर्वदूर पोहोचावेत; त्यातून देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता कायम रहावी. एकता, समता, बंधूतेचा विचार अधिक मजबूत व्हावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया,” असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या संदेशात केलं आहे.

००००

जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणार – सभापती प्रा. राम शिंदे

नांदेड दि. १३ एप्रिल :- अनेक वर्षापासून जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने पुढील वर्षापर्यंत म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीपर्यत त्यांचे स्मारक उभारणी करण्यात येईल, अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली.
आज नांदेड येथे मातोश्री मंगल कार्यालय, कौठा येथे धनगर समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. समाजातील वंचित, शोषित,उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी जे-जे करता येईल ते कामे करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.


यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार श्रीजया चव्हाण तसेच अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आतापर्यंत धनगर समाजाच्या विकासासाठी संविधानिक मार्गाने जे-जे करता येईल ते सर्व कामे केली आहेत. यापुढेही नियमांच्या चौकटीत राहून संविधानिक मार्गाने वंचित घटकांना न्याय मिळावा यादृष्टीने काम करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासन सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.
समाजाच्या सर्व मागण्या बाबत सकारात्मकपणे शासनाकडे बाजू मांडण्यात येईल. ती कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न – खासदार अशोक चव्हाण
महाराष्ट्रातील तळागाळातील उपेक्षित घटकाला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी सर्वानी मिळून काम करणे गरजेचे आहे. उपेक्षित वर्गाला कायदेशिर मार्ग काढून टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे. वंचित घटकांचे  प्रश्न मार्गी लावण्यासाठी संविधानिक मार्गाचा अवलंब करुन प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येईल, असे खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
तसेच शासन स्तरावर नांदेडच्या विकास कामाबाबत मागणी केली असून याबाबत लवकरच शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल ,असे आश्वासन मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याची माहिती खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. तसेच महाराष्ट्रात मागासलेल्या मराठवाड्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार आनंदराव बोंढारकर यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व आमदार महोदयांनी नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मागण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याची मागणी सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे केली. तसेच सभापती प्रा. राम शिंदे यांना त्यांची सभापती म्हणून बिनविरोध निवड झाल्याबाबत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांचा धनगर समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.


00000

नागपूर येथे स्कीन बँक साकारण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर, दि. १३ : उमरेड येथील एमपीएम कंपनीमध्ये झालेली घटना ही दुर्देवी आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या घरातील सदस्य गमावले त्या कुटुंबासमवेत शासन खंबीरपणे उभे आहे. जे कामगार जखमी झाले आहेत त्यांच्या उपचारासाठी कोणतीही कमतरता पडणार नाही. वेळप्रसंगी आवश्यकता भासल्यास रुग्णांना एअर ॲम्बुलन्सने ऐरोली येथील बर्न हॉस्पीटलमध्ये हलवू या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमरेड घटनेतील जखमी कामगारांच्या नातेवाईकांना धीर दिला.

नागपूर येथील ओरियस इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सॉयन्सेस येथे उपचार घेत असलेल्या कामगारांची प्रत्यक्ष भेट देवून त्यांनी डॉक्टरांकडून माहिती घेतली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, हॉस्पीटलचे क्रीटकल केअर प्रमुख डॉ. ए.एस. राजपूत, स्कीन सर्जन डॉ. एस. जहागीरदार, पोलीस अधीक्षक हर्ष पोतदार, माजी आमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते.

रुग्णांच्या उपचाराची माहिती घेतांना नागपूरमध्ये स्कीन बँकेची नितांत आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना नागपूर येथे अद्ययावत स्कीन बँक साकारण्याबाबत निर्देश दिले. नागपूर येथे मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातूनही विविध घटनांमध्ये अतीगंभीर असलेल्या रुग्णांना स्कीनची आवश्यकता भासते. याबाबत त्यांनी डॉक्टरांकडून अधीक माहिती घेवून शासन स्तरावरील कार्यवाही जलद गतीने पूर्ण होईल असे सांगितले.

00000

 

 

जनाई उपसा सिंचन योजनेच्या रायझिंग ते बोरकरवाडी तलावापर्यंतच्या पाईपलाईनचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

बारामती, दि.१३: जनाई उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याच्या रायझिंग मुख्य पाईपलाईन ते बोरकरवाडी तलावापर्यंत करण्यात आलेल्या पाईपलाईनच्या कामाचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. भूजलपातळीचा विचार करता नागरिकांनी पाणी वापराबाबत काटेकोरपणे नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे पाईपलाईनचे काम करण्यात आले आहे. कार्यक्रमास महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, जनाई शिरसाई योजनेचे कार्यकारी अभियंता अशोक शेटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता राजकुमार जाधव, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, कुतवळवाडी- बोरकरवाडीच्या सरपंच रुपाली भोसले, उपसरपंच राणी बोरकर, टी.सी.एस. फाउंडेशनचे सिद्धार्थ इंगळे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, नागरिकांना पाणी पुरवठा करणे शासनाचे कर्तव्य असून नागरिकांना पाणी मिळण्याकरीता जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेचा ४६० कोटी रुपयाचे बंद पाईपलाईनचे काम हाती घेण्यात आले आहे. आज लोकार्पण झालेल्या पाईपलाईनमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे.  पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे अत्याधुनिक साधनाचा वापर करुन शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. शासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या देखभाल दुरुस्ती करण्याकरीता निधीची गरज असते, त्यामुळे नागरिकांनीही नियमितपणे पाणीपट्टी भरुन सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

उपसा सिंचन योजनेसाठीवर सौर पॅनल बसविण्यात येणार

आगामी काळात जनाई शिरसाई आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी सौर पॅनल बसविण्यात येणार आहेत. सौर उर्जेद्वारे निर्मिती होणारी वीज महावितरण कंपनीला दिली जाणार असून यामुळे योजनेच्या वीज देयकात कपात होईल, त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपट्टीतही लाभ होईल, अशी माहिती देखील श्री. पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्र्यांकडून पाणी पुरवठा योजनांची पाहणी

श्री. पवार यांनी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत करण्यात येणाऱ्या मुर्टी व इतर ७ गावे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना आणि मुर्टी व लोणी भापकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सस्तेवाडी येथील तलावाच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, या योजनेच्या माध्यमातून परिसरातील ११ गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे, नागरिकांना पूर्णवेळ पाणी पुरवठा होण्यासाठी महावितरणने वीजेच्या फिडरचे काम वेळेत पूर्ण करावे. पाईपलाईनमधून पाणी गळती होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. तालुक्यात रेल्वे, रस्ते, पाणी, आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रात विविध विकास कामे सुरु असून ही सार्वजनिक विकासकामे करताना ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना पाहणीप्रसंगी श्री. पवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

नागरिकांना पक्की घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न

राज्यात २० लाख घरे मंजूर करण्यात आली असून पुणे विभागातील ३० हजारपैकी बारामती तालुक्यात ५ हजार घरे मंजूर करण्यात आली आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक दूर्बल घटकातील कुटुंबाना पक्की व हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

नागरिकांना विश्वासात घेऊनच सुपा ग्रामपंचायत प्रारुप विकास आराखडा अंतिम करण्यात येईल.

नागरिकांच्या मुलभूत गरजा भागविण्याच्यादृष्टीने सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता विकास आराखडा तयार करण्यात येतो. यामध्ये रस्ते, शाळा, भाजी मंडई, स्मशानभूमी, दफनभुमी, मंदिरे, घनकचरा व्यवस्थापन केंद्र, महावितरण केंद्र, दवाखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, घरकुल योजना, मैदान, क्रीडांगण आदी पायाभूत सुविधा उभारण्याकरीता आरक्षण निश्चित करण्यात येते. आगामी सन २०४६ मधील लोकसंख्येचा विचार करून सुपा ग्रामपंचायतीचा प्रारुप विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या अनुषंगाने नागरिकांकडून प्राप्त सूचना व हरकतींच्या सुनावणीदरम्यान नागरिकांना विश्वासात घेवून प्रारुप आराखडा अंतिम करण्यात येईल. संपादित केलेल्या जमिनीचा नागरिकांना योग्य तो मोबादला देण्यात येईल, याकामी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. पवार म्हणाले.

0000

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...