गुरूवार, ऑगस्ट 14, 2025
Home Blog Page 1718

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत मोहीमेत लोकसहभाग वाढविणे गरजेचे- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

नागपूर, दि. २२ :  भारतातून सन 2025 पर्यंत क्षयरोगाचे दूरीकरण झाले पाहिजे. यासाठी निक्षय मित्रांची संख्या वाढली पाहिजे. क्षयरोगाचे दूरीकरण करण्यासाठी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत मोहीमेत लोकांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

आज 22 डिसेंबर रोजी राजभवनातील सभागृहात श्री. कोश्यारी यांनी प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानाच्या अनुषंगाने नागपूर आणि अमरावती आरोग्य परिमंडळातील क्षयरोगाबाबतचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. सभेला सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, राज्यपालांचे प्रधान सचिव श्री. संतोषकुमार, उपसचिव श्वेता सिंगल, नागपूरचे मनपा अपर आयुक्त राम जोशी, नागपूर आरोग्य परिमंडळाच्या उपसंचालक डॉ. विनिता जैन, आरोग्य अभियान पुण्याच्या डॉ. सुनिता गोलहीत, डॉ. रामजी अडकेकर, डॉ. अशोक रणदिवे यांचेसह नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

श्री. कोश्यारी म्हणाले, क्षयरुग्ण क्षयरोगमुक्त व्हावा यासाठी विविध प्रकारच्या तपासण्या व औषधोपचार करण्यात येतात. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांना क्षयरोगमुक्त अभियानात सहभागी करुन घ्यावे. आपल्या देशात परोपकाराची भावना असल्यामुळे निश्चितपणे लोकांचा सहभाग यामध्ये मिळेल. आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाशी संपर्क करुन त्यांच्यासोबत सभा घेऊन स्वयंसेवी संस्था, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्तींना सभेला बोलावून या मोहिमेत त्यांचा सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.

तालुका आणि जिल्हा पातळीवर निक्षय मित्र तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे सांगून श्री. कोश्यारी म्हणाले, कोणताही अधिकारी-कर्मचारी निक्षय मित्र होण्यास तयार असतील तर त्यांना यामध्ये सहभागी करुन घ्यावे. एका महिण्याच्या आत प्रत्येक रुग्णामागे एक निक्षय मित्र असला पाहिजे. क्षयरुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर वेळेत उपचार सुरु करावे. त्यामुळे हे रुग्ण उपचारातून त्वरीत बरे होतील. क्षयरोगमुक्तीसाठी येत्या काही दिवसात जास्तीत जास्त वेगाने आरोग्य विभागाने काम करुन ही मोहीम गांर्भीयाने घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

श्री. खंदारे यांनी आपल्या प्रास्ताविकातून क्षयरोगमुक्त भारत अभियानात करण्यात येत असलेल्या उपाययोजना, पौष्टीक आहार, निक्षय मित्र योजना, क्षयरुग्णांसाठी उपचार पद्धती, तपासणीसाठी करण्यात येत असलेल्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची उपलब्धता आणि राज्यातील क्षयरुग्णांची माहिती दिली.

यावेळी क्षयरोगमुक्त भारत अभियानात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल पारसमल पगारिया फाऊंडेशन नागपूरचे जीवल पगारिया, डॉ. सुभाष राऊत व सहयोग फाऊंडेशनचे तारक धनवाणी यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सभेला उपस्थित विदर्भातील 11 जिल्ह्यातील सर्व जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी आपआपल्या जिल्ह्यातील प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानात करण्यात येत असलेल्या कामाची माहिती यावेळी दिली.

कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये

जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची पालकमंत्र्यांनी दक्षता घ्यावी

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

नागपूरदि. २२ : जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नयेअसे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये आरोग्य सुविधा सज्ज राहतील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांनी देखील तातडीने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून कोविड अनुरूप वर्तन, पंचसूत्रीचे काटेकोर पालन होईलहे पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात विशेष बैठकीत राज्यातील कोविड परिस्थितीचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसवैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजनआरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंतअन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोडमुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीनजपानअमेरिकाब्राझील या देशांमध्ये रूग्ण वाढताना दिसत आहेत. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ.७ हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा यावेळी घेण्यात आला.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय खंदारे यांनी कोविड परिस्थितीबाबत सादरीकरण केले.  राज्यात सध्या २२१६ कोविड रुग्णालये असून १ लाख ३४ हजार विलगीकरण खाटा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

चाचण्याट्रॅकींगउपचारलसीकरण आणि कोविड अनुरूप वर्तन अशी पंचसूत्री राबविण्याचे केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व जिल्ह्यांमध्ये पंचसूत्रीची अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा

नवी दिल्ली, दि. 22 : प्रसिध्द लेखक प्रवीण बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीकरिता सा‍हित्य अकादमी पुरस्कार तर प्रमोद मुजुमदार यांना ‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या अनुवादित पुस्तकासाठी आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला.

अकादमीचे सचिव, श्री के. श्रीनिवासराव यांनी साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून नावलौकिक असणाऱ्या साहित्य अकादमीने, येथील कोपर्निकसमार्ग स्थित रविंद्र सभागृहात वर्ष 2022 साठी साहित्य पुरस्कारांची घोषणा केली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील 23 प्रादेशिक भाषांसाठी  साहित्य अकादमी साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

प्रवीण बांदेकर यांच्या लेखनकार्याविषयी

मूळचे सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील प्रसिध्द लेखक प्रवीण दशरथ बांदेकर यांना ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरी करिता साहित्य अकादमी पुरस्कार 2022 साठी जाहीर झाला.

त्यांच्या कविता, कादंबरी, ललित लेखन, बाल साहित्य व अनेक समीक्षा प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी महाविद्यालयीन दिवसांपासून लेखनाला सुरूवात केली असून त्यांची चाळेगत कादंबरी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व सोलापूर विद्यापीठ येथे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.

गेल्या 20-25 वर्षांपासून लेखन कार्य करत आलेल्या श्री. बांदेकर यांनी त्यांच्या कादंबरीत कोकणातील विविध सामाजिक प्रश्न, मानवी नात्यातील गुंते,  धार्मिक व राजकीय अनुभव बाहुल्यांच्या माध्यमातून कथन केले आहेत. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला व साहित्याच्या माध्यमातून कथन केलेले अनुभव, वेगवेगळ्या समस्या जास्तीत-जास्त लोकांसमोर येतील, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

प्रमोद मुजुमदार यांच्या लेखनकार्याविषयी

सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ या मराठी अनुवादित पुस्तकासाठी प्रमोद मुजुमदार यांना  आज मराठी भाषेकरिता अनुवादाचा साहित्य अकादमी पुरस्कार 2022 जाहीर करण्यात आला.

मूळचे पुण्याचे असलेले  श्री. प्रमोद श्रीनिवास मुजुमदार यांनी मुंबई विद्यापीठातून विज्ञान क्षेत्रात पदवी प्राप्त केली आहे. वर्ष 1999 पासून मुक्त पत्रकार म्हणून कारकीर्द आरंभ करत, त्यांनी दैनिक महानगर, साप्ताहिक कलमनामा या नियतकालिकांत पंधरा वर्षे लिखाण केले व आरोग्य, शहरीकरण आणि पर्यावरण इ. विषयांवर स्तंभ लेखन करत आले आहेत.  सध्या ‘सलोखा संपर्क गटात’ त्यांचा सहभाग आहे. त्यांनी विविध प्रकारचे लेखन केले असून त्यांची अनेक पुस्तके ही प्रकाशित झाली आहेत.  अस्तित्वाचे प्रश्न, गुजरात पॅटर्न, आरोग्याचा बाजार, (अनुवाद आणि रूपांतर),  सलोख्याचे प्रदेश (अनुवाद), दास्ताँ-ए-जंग सारखी अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

‘सलोख्याचे प्रदेश, शोध सहिष्णू भारताचा’ हे पुस्तक, श्री मुजुमदार यांनी इंग्रजी पुस्तक, ‘इन गुड फेथ’ या मूळ पुस्तकाचा मराठी भाषेत केलेला अनुवाद आहे. प्रख्यात लेखिका श्रीमती  सबा नक्वी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. श्रीमती नक्वी यांनी कश्मीर ते कन्याकुमारी व मणीपूर ते महाराष्ट्रात असलेल्या सार्वजनिक, धार्मिक स्थळांना व लोकप्रिय दैवतांचे दर्शन घेवून, मंदिरांना प्रत्यक्ष भेट देवून त्यांचा सार्वत्रिक सलोख्यासाठी पुस्तकात इतिहास मांडला आहे. या पुस्तकाचा अनुवाद श्री मुजुमदार यांनी केला असून त्याबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला.

परिक्षक मंडळ व पारितोषिकाविषयी

ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, प्रख्यात साहित्यिक प्रो. भालचंद्र नेमाडे व प्रसिद्ध लेखक नितीन रिंधे  या साहित्यिकांचा मराठी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार निवडीच्या परिक्षक मंडळात समावेश होता. साहित्य अकादमी पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये रोख रक्कम तसेच अनुवादनासाठी निवड झालेल्या पुरस्कारकर्त्यांना 50 हजार रुपये आणि ताम्रपत्र असे आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा 11 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथील कमानी ऑडिटोरियम येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती, सचिव श्री. के. श्रीनिवासराव यांनी दिली. तसेच अनुवादाबाबतचे पुरस्कारांच्या वितरणाबाबतची तारीख निश्चित झाल्यावर कळविण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

000

 

कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा महाराष्ट्रात रुग्ण नाही – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

विधानसभा निवेदन, इतर कामकाज

नागपूर, दि. २२ : जगातील चीनसह अन्य देशांत कोरोना विषाणूचा बीएफ 7 हा नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराचा महाराष्ट्रात एकही रुग्ण आढळून आलेला  नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचे कारण नाही. मात्र, दक्षता म्हणून मास्कचा वापर करीत गर्दीत जाताना सुरक्षित अंतर ठेवावे, असे निवेदन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत केले.

मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या संसर्गाची तीव्रता ओमीक्रॉनपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर चाचणी, पाठपुरावा, उपचार आणि लसीकरणावर भर देण्यात येईल. आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात आतापर्यंत 95 टक्के लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तसेच येत्या सोमवारपासून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना नुसार आंतरराष्ट्रीय प्रवास करून येणाऱ्या दोन टक्के प्रवाशांची ताप चाचणी करण्यात येईल.

०००००

गोपाळ साळुंखे/स.सं.

वरळी नाका येथील महापालिकेच्या शाळेत शनिवारी रोजगार मेळावा

मुंबई, दि. २२ : रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत असलेल्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मुंबई शहर यांच्यावतीने शनिवार दि. २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत महानगर पालिका शाळा, डॉ. ऍनी बेझंट मार्ग, वरळी नाका, वरळी येथे “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” होणार आहे.

यामध्ये मुंबई शहर येथील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. तसेच या मेळाव्यामध्ये उद्योजकता मार्गदर्शन आणि करीयर समुपदेशन या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या महारोजगार मेळाव्यामध्ये बी.व्ही.जी. इंडिया लि., आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती इम्पेरेटीव्ह, हिंदू रोजगार, एअरटेल इ. कंपन्या सहभागी होणार असून दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक व इंजिनीअरींग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यामध्ये बँकिग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पीटीलिटी, एच आर, अॅप्रेंटीसशीप, डोमॉस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मिडीया ॲण्ड एन्टरटेंमेंट अशा प्रकारे विविध क्षेत्रातील पदे उपलब्ध असणार आहेत.

या मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरिता स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य उपलबध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी होणार असून यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ इ. ची माहिती देणारी दालने असतील. याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याचबरोबर विविध शासकीय व खाजगी क्षेत्रातील बँकांचाही यामध्ये समावेश असेल.

मुंबई शहर येथील बेरोजगार युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर कार्यालयाचे सहायक आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.

000

कृषी विद्यापीठांना संशोधन कार्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

नागपूर, दि. २२: शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्य शासन कार्य करीत आहे. उत्पादन  खर्च कमी करून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी, या दिशेने शासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी कृषी विद्यापीठांमध्ये सुरु असलेले संशोधन कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता शासन कृषी विद्यापीठांना सर्वतोपरी सहाय्य करेल, असे आश्वासन कृषीमंत्री तथा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रति कुलपती अब्दुल सत्तार यांनी दिले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूर स्थित कृषी महाविद्यालयाच्या (बजाजनगर) कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन श्री. सत्तार यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मोरेश्वर वानखडे, केशव तायडे आदी उपस्थित होते.

श्री. सत्तार म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन चांगले निर्णय घेत आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. शेतकऱ्यांना उत्तम वाण व आधुनिक यंत्रसामग्री मिळावी यासाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये संशोधनकार्य सुरु आहे. विदर्भात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही उत्तम कामगिरी करीत १७६ वाण आणि ४३ शेतकी यंत्र विकसीत केली आहेत. संशोधनाचे हे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याकरिता शासनाकडून कृषी विद्यापीठांना सर्वतोपरीत सहाय्य करण्यात येत आहे. याच श्रृंखलेत विद्यापीठाच्या नागपूर येथील ११६ वर्ष जुन्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची सुंदर इमारत उभी राहिली आहे. आता येथे देश-विदेशातील शास्त्रज्ञांना राहण्याची उत्तम सोय होईल. तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शने आयोजित करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी  राज्य शासनाकडून आवश्यक मदत करण्यात येईल, असे आश्वासनही श्री. सत्तार यांनी दिले.

सिल्लोड येथील कृषी प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन

सन २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’म्हणून देशभर साजरे केले आहे. त्यानिमित्त सिल्लोड जि. औरंगाबाद येथे येत्या १ ते ५ जानेवारी  दरम्यान ‘कृषी प्रदर्शन’ आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठ आणि महाबीजचे एकूण ६०० स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. तसेच, कृषी संबंधीत विविध कंपन्याही सहभागी होणार आहेत. कमी उत्पादन खर्चात किफायतशीर शेती करण्यासाठी लागणारे सर्व मार्गदर्शन याठिकाणी उपलब्ध असेल. या प्रदर्शनात राज्यातील शेतकरी, संशोधक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. सत्तार यांनी केले.

कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी कृषी विद्यापीठाच्या आजपर्यंतच्या कार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

अशी आहे वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची वास्तू

येथील बजाजनगर भागात एकूण ८७७ चौ.मिटर परिसरात कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेत्र कार्यालयाची इमारत आहे. यात ४ व्हीआयपी तर अन्य ८ असे एकूण १२ कक्ष आहेत. दोन वर्षांत ही इमारत पूर्णत्वास आली असून यासाठी राज्यशासनाकडून २ कोटी ६५ लाख रुपये मंजूर करण्यात आले होते.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २२:- ‘लोकमान्य टिळकांचा वारसा लाभलेलं एक लढवय्या नेतृत्व आपण आज गमावलं,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, “लोकमान्य टिळकांचा वारसा असला, तरी आपल्या कामातून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच पुणे महापालिकेत सलग चार वेळा नगरसेविका, नंतर पुण्याच्या महापौर आणि आमदार हा प्रवास त्या करू शकल्या. कर्करोगाशी झुंज देत असतानाही राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावून आपल्या कर्तव्यभावनेचा परिचय त्यांनी दिला. कर्तव्यनिष्ठ, लढवय्या नेतृत्व आपण गमावले आहे. आमदार मुक्ता टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

नागपूर, दि. 22 : पुण्याच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान आमदार मुक्ताताई टिळक यांच्या निधनाने ध्येयनिष्ठ आणि समर्पित नेतृत्व हरपले आहे, अशा शोकसंवेदना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मुक्ताताई या भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या होत्या. सुमारे 30 वर्ष त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिले. पुण्याच्या महापौर म्हणून त्यांनी शहरात विविध विकासकामांना चालना दिली होती. विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कर्तव्यांना प्राधान्य दिले. अलीकडेच झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत त्यांनी आजारपणातही मतदानात सहभाग नोंदवून लोकशाहीवरील आपली निष्ठा तसेच पक्षाचा उमेदवार जिंकलाच पाहिजे, यासाठी पक्षनिष्ठा दाखवून दिली होती. मी त्यांना या आजारपणात न येण्याची विनंती करूनसुद्धा त्या दोन्ही निवडणुकीत रुग्णालयातून मतदानाला आल्या होत्या. पुण्यात विविध सामाजिक कामे करताना सर्वसामान्य जनता आणि विशेषतः महिलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याला त्यांचे प्राधान्य होते. या कठीण प्रसंगात आम्ही सारेच त्यांच्या कुटुंबियांच्या सोबत आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबियांना लाभो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

000

युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी – आमदार प्रणिती शिंदे

नागपूर, दि. 22 :- युवकांनी जनसामान्यांच्या मूलभूत समस्या घेऊन चळवळ उभी करावी, या चळवळीतूनच जनसामान्यांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या ४९ व्या संसदीय अभ्यासवर्गात आज ‘संसदीय कार्यप्रणाली व लोकशाही संवर्धनासाठी युवक चळवळींचे योगदान” या विषयावर आमदार प्रणिती शिंदे  यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार महादेव जानकर, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेन्द्र भागवत, अवर सचिव सुनिल झोरे तसेच राज्यातील बारा विद्यापीठांतील विद्यार्थी व अधिव्याख्याते उपस्थित होते.

यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, देशातील सामान्य जनतेच्या विविध प्रश्नावर युवकांनी जागृत राहून चांगल्या भावनेतून काम करणे आवश्यक आहे. या कामातूनच आपले राजकीय भवितव्य घडवायचे आहे. यासाठी आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. युवकांनी लोकशाहीसाठी मतदार नोंदणीमध्ये सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. महिला व युवकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडविण्यासाठी काम केले पाहिजे. देशात विविध विचारप्रणाली आहेत. आपल्या आवडीच्या व योग्य विचाराप्रणालीत सहभागी होऊन नागरिकांच्या समस्या सोडवून देशातील लोकशाहीसाठी काम करणे आवश्यक आहे. देशात विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून युवकांना राजकीय भवितव्य घडविण्यासाठी संधी मिळू शकते. महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहे. युवक-युवतींना राजकारणामध्ये येण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठी संधी आहे.

युवकांनी जनमत व कार्यप्रणाली याची सांगड घालून काम करावे. स्वावलंबी होण्यासाठी कठोर मेहनत घेवून सतत प्रयत्न केले पाहिजे. समुपदेशनाद्वारे वैयक्तिक समस्या सोडवाव्यात. त्यासाठी मदत घ्यावी, संकोच बाळगू नये. महिलांचा आदर केला पाहिजे. घरापासूनच महिलांचा सन्मान करणे आवश्यक आहे. समाजाच्या आशा आकांक्षा युवकांच्या हाती असतात. लोकशाही संवर्धनासाठी युवकांनी सतत जागरुक राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. अभ्यासवर्गात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आमदार श्रीमती शिंदे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.

यावेळी प्रधान सचिव राजेन्द्र भागवत यांनी श्रीमती शिंदे यांचा परिचय करुन दिला. अवर सचिव सुनिल झोरे यांनी आभार व्यक्त केले.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/

संसदीय अभ्यासवर्गात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे उद्या मार्गदर्शन

नागपूर, दि. 22 : राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या विद्यमाने राज्यातील विद्यापीठांतील राज्यशास्त्र व लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या 49 व्या संसदीय अभ्यासवर्गात शुक्रवार, दि. 23 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वा. ‘द्विसभागृह पद्धतीमध्ये परस्परांतील समन्वय आणि संसदीय लोकशाहीतील वरिष्ठ सभागृहाचे महत्त्वपूर्ण योगदान’ या‍ विषयावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सकाळी 9.30 वा. ‘आदर्श लोकप्रतिनिधी : अपेक्षा आणि वास्तव व संसदीय लोकशाहीत लोकशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मार्गदर्शन करणार आहेत.

भारतातील संसदीय लोकशाही कशा पद्धतीने कार्यरत आहे, कार्यकारी मंडळावर विधानमंडळामार्फत कशाप्रकारे नियंत्रण ठेवले जाते, त्यासाठी कोणकोणत्या संसदीय आयुधांचा  वापर केला जातो, अर्थसंकल्पीय प्रक्रिया, विधिमंडळाची समिती पद्धती, कायदा तयार करण्याची प्रक्रिया इत्यादी बाबतची प्रत्यक्ष माहिती नामांकित संसदपटू व तज्ज्ञांच्या व्याख्यानांमधून तसेच सभागृहाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या अवलोकनद्वारे विद्यार्थ्यांना या व्याख्यानांतून मिळत असते.

००००

दत्तात्रय कोकरे/जिमाअ/22.12.22

 

 

ताज्या बातम्या

शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

0
हिंगोली(जिमाका), दि. 13: शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेकविध योजना राबवित आहे. या सर्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य...

उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नांदगाव पेठ येथील एमआडीसीच्या कौशल्य विकास केंद्रास आज भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रामधील...

आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक...

0
छत्रपती संभाजीनगर, दि.13, (विमाका) :- आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहास आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. आदिवासी...

‘महाज्योती’कडून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

0
पुणे, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे सन २०२५-२६ साठी मोफत स्पर्धा...

शंकरबाबाची मानसकन्या माला होणार जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले अभिनंदन

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेल्या माला हिला जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून नियुक्त देण्यात आली...