रविवार, ऑगस्ट 3, 2025
Home Blog Page 1540

मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनीमुळे पडीक जमिनीतूनही शेतकऱ्यांना मिळणार प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न

लातूर, दि. 23 (जिमाका) : राज्यातील वीजेची वाढती मागणी लक्षात घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जा निर्मितीवर भर दिला आहे. शेतीला दिवसा वीज पुरविण्यासाठी महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी खासगी जमीन भाडेपट्ट्याने घेता येणार असून त्याचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना प्रत्येक हेक्टरला दरवर्षी 75 हजार रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे.

शेतीला दिवसा वीज पुरविण्यासाठी महावितरणतर्फे विद्युत वाहिन्यांचे सौर उर्जीकरण केले जाणार असून यासाठी मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकरी, ग्रामपंचायत, कारखाने यांच्याकडून जमीन भाड्याने घेण्याची तरतूद आहे. याठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या खासगी जमिनींना दरवर्षी प्रतिहेक्टरी 75 हजार रुपये भाडेपट्टा देण्यात येणार आहे. याबाबतचा पुनरुच्चार राज्याच्या नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पडीक जमिनीतूनही वार्षिक हेक्टरी 75 हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे.

लातूर जिल्ह्यातून १०० प्रस्ताव सादर

प्रत्येक जिल्ह्यात महावितरणच्या कृषि वाहिन्यांपैकी किमान 30 टक्के कृषि वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण गतीने करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी लातूर जिल्ह्यातून आतापर्यंत 100 प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. त्यामधून सुमारे 1437.73 एकर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून 160.11 मेगावॉट विद्युत निर्मिती अपेक्षित आहे. यापैकी 21 ठिकाणी सुमारे 496 एकर शासकीय जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असून यामधून सुमारे 87.75 मेगावॉट वीज निर्मिती होईल. तसेच 79 ठिकाणी एकूण सुमारे 941.73 एकर खासगी जागेवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामधून सुमारे 72.36 मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून रोजगार निर्मिती !

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्याबरोबरच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ सुरु करण्यात आली आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करुन स्वत:च्या पायावर उभे राहत नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे होण्याच्या दृष्टीने या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात उभारण्यासाठी कृषी विभाग सहाय्य करत आहे.

शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विशेषतः नाशवंत शेतमाल बाजारात आल्यावर त्याला योग्य तो भाव मिळेलच असे नाही. त्यामुळे त्याच्या कष्टाचे चिज होत नाही. अशा नाशवंत शेतमालावर प्रक्रिया करून त्यातून त्या शेतकऱ्याला उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण, शेतकऱ्यांनी  घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी यासाठी कृषी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

66% अन्नप्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात असून त्यापैकी 80 टक्के कुटुंब- आधारित उद्योग आहेत. या घरगुती उद्योगांमुळे ग्रामीण भागातील कष्टकरी लोकांच्या संसाराला आर्थिक हातभार लागतो आणि त्यांचे शहराकडे होणारे स्थालांतर टाळले जाते.  या योजनेसाठी लागणारा खर्च केंद्र आणि राज्य सरकार अनुक्रमे 60:40 अशा प्रमाणात करणार आहे. केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षात एक जिल्हा एक उत्पादन (ONE DISTRICT ONE PRODUCT) या धर्तीवर राबविली जाणार आहे.

योजनेचा उद्देश :

सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट /संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक गट यांची पतमर्यादा वाढविणे. उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे. सामाईक सेवा जसे साठवणूक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, यासाठी प्रयत्न करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

लाभार्थ्यांना प्रशिक्षण : या योजने अंतर्गत कर्ज मंजुरी झालेल्या लाभार्थ्यास 50 तासांचे प्रशिक्षण तर अन्न व प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत कामगार यांना 24 तासांचे प्रशिक्षण निवड केलेल्या जिल्हा स्तरीय प्रशिक्षण संस्थेत देण्यात येते.

अर्जासाठी ऑनलाईन पोर्टल : वैयक्तिक व गट लाभार्थ्यांसाठी – www.pmfme.mofpi.gov.in  बीजभांडवलासाठी – ग्रामीण भागासाठी www.nrlm.gov.in  आणि शहरी भागासाठी www.nulm.gov.in या संकेतस्थळांवर अर्ज करता येईल.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अकॅडमिक क्रेडिट बँक उघडण्यात देशात महाराष्ट्र आघाडीवर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. २३ : देशभरातील विद्यार्थी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये (एबीसीआयडी) आपले खाते उघडत आहेत.आत्तापर्यंत देशातील १ हजार १६० शैक्षणिक संस्थांनी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट मध्ये सहभाग घेतला आहे.यात राज्यातील ११० शैक्षणिक संस्थांचा सहभाग आहे. देशात सक्रिय असलेली पहिले चारही राज्याचे विद्यापीठ यात आघाडीवर राहिले आहेत, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

श्री. पाटील म्हणाले, आंतरविद्याशाखीय शिक्षण आणि कौशल्याभिमुख अभ्यासक्रमाच्या दृष्टीने श्रेयांकासाठी (क्रेडिट) एक बँक तयार केली  जात आहे. विद्यार्थ्यांच्या गुणांच्या व्यवहारासाठी अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट आहे. परीक्षेद्वारे दरवर्षी प्राप्त होणारे क्रेडिट या बँकेत साठवले जातील. विद्यार्थी अथवा शैक्षणिक संस्था पदवी बहाल करताना या क्रेडिटचा वापर करतील. दोन वेगवेगळ्या महाविद्यालयात जरी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले तरी क्रेडिट मात्र याच एबीसी आयडीवर जमा होतील.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार जेव्हा क्रेडिट ट्रान्सफर करावे लागतील तेव्हा विद्यार्थ्यांना याचा फायदा  होईल. संस्थेबाबत प्रथम क्रमांक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, दुसऱ्या क्रमांकावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि तिसऱ्या क्रमांकावर मुंबई विद्यापीठ आहे. तर चौथ्या क्रमांकावर जळगावचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा क्रमांक आहे. विद्यापीठातील विद्यार्थी संख्या पाहिली तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ५ लाख ४हजार ९३६ सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ ४ लाख ४५ हजार ४५३ मुंबई विद्यापीठ २ लाख १४ हजार ५६०, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठ १ लाख १९हजार ९३६  एवढी आहे.

यामध्ये सहभागी होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत उच्च शिक्षण संचालक यांनी यासाठी कार्यशाळा, अभियान घेऊन विशेष मोहिम राबविली आणि जनजागृती केली. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे, असे म्हणता येईल, असे सांगून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील आणि  त्याचे अभिनंदन केले आणि यामध्ये संस्था आणि विद्यार्थी यांनी अधिक सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/

विधानसभा कामकाज

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार येणारा शिवराज्याभिषेक उत्साहात

साजरा करण्यात येणार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबईदि. २३ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास पुढील वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेतत्यासाठी राज्यात विविध कार्यक्रमांसाठी ३५० कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशकानुसार शिवराज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष आहे. २ ते ९ जून २०२३ या कालावधीमध्ये शिवराज्याभिषेक महोत्सव आयोजित करण्यात येणार असून हा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभेत सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पावरील अनुदानाच्या मागण्यांवर पर्यटन व सांस्कृतिक कार्यअल्पसंख्याक विकासइतर मागास बहुजन कल्याण आणि दिव्यांग कल्याण या विभागांची विधानसभेत सदस्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेसांस्कृतिक विभागाकडे  मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह आहे. त्यासाठी अत्याधुनिक संग्राहालय उभारण्यात येणार आहे. राज्यात गड -किल्ल्यांचे जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्य शासनाकडून देण्यात येणारा महाराष्ट्र भुषण पुरस्कार आशा भोसले यांना उद्या गेटवे आँफ इंडिया येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेराज्यात पर्यटनातून रोजगार उपलब्ध करण्यासाठी खासगी भागीदार नेमून त्यांना जागेसह इतर सुविधा उपलब्ध करून मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जुने मंदिर दुरुस्ती ,मुंबई फेस्टिवल,पर्यटनासाठी योग्य अशा ठिकाणांचा विकास असे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्पसंख्याक विकास विभागाबाबत मंत्री शंभुराज देसाई, इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे, दिव्यांग कल्याण विभाग यांची माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिली. सर्व सदस्यांच्या सूचनांच्या सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

000

राजू धोत्रे/विसंअ/

 

विधानपरिषद कामकाज

इन्फ्लूएंझा उपप्रकाराच्या प्रादुर्भावात वाढ, आरोग्य यंत्रणा

दक्ष – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई दि. २३ : राज्यात सध्या एच३एन२ या इन्फ्लूएंझा ‘ए’ च्या उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढल्याचे व रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, याबाबत आरोग्याच्या सर्व संस्थांना सर्वेक्षण वाढविण्याच्या आणि उपचाराबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेतअशी माहिती, आरोग्य मंत्री प्रा. डॉ  तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली.

आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले कीएच३एन२ या इन्फ्लूएंझा ‘ए’ च्या उपप्रकाराचा वाढत्या प्रादुर्भावाचा राज्यातील सर्व स्तरावर सतत आढावा घेण्यात येत आहे. राज्यात सर्व स्तरावर सनियंत्रण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारीजिल्हा शल्य चिकित्सकवैद्यकीय अधिकारी यांची व्हीसीद्वारे आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री यांनी देखील आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचा आढावा घेऊन केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार कार्यवाहीच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच राज्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी पुर्नप्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले आहे.

राज्यात गंभीर आजारीवृद्ध नागरिकअतिजोखमीच्या व्यक्तीगरोदर माता व आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली आहे. तसेच जिल्हा व महानगरपालिकांना स्थानिक स्तरावर लस खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. सन २०२२-२३ मध्ये ९९.७७८ लोकांना लस देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार लस उपलब्ध ठेवण्यासाठी स्थानिक स्तरावर अनुदान देण्यात आलेले आहेअसेही त्यांनी सांगितले.

राज्यात १ जानेवारी २०२३ पासून २० मार्च २०२३ पर्यंत एच१ एन१ चे एकूण बाधित रुग्ण  ४०७ तर एच३एन२ चे बाधित रुग्ण २१७  रुग्ण आढळून आलेले  आहेत. या आजारा बाबत प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सुविधा तसेच रुग्णालयात विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या आजाराच्या उपचारासाठी लागणारी ऑसेलटॅमीवीर हे औषध शासकीय संस्थांमध्ये उपलब्ध आहे. तसेच नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. याबरोबरच काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहेअसे डॉ. सावंत यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्याची आढावा बैठक घेऊन कोविड प्रतिबंधक जीवनशैली बाबत जनतेचे प्रबोधन करण्याचे निदेश दिले आहेत. राज्य शासन कोविड उपचाराबाबत दक्ष आहे. त्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी  आवाहन करण्यात येत असल्याचेही मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी सांगितले.

०००

मनीषा पिंगळे/विसंअ/

 

माळरानावरच्या यशस्वी फळबागेतून सुमनबाईंनी साधला लखपती बनण्याचा मार्ग 

नांदेडच्या सीमा ओलांडून भोकर तालुका लागला की लहान डोंगरांची माळ सुरू होते. भोकरच्या पायथ्याला मुदखेड-अर्धापूर तालुक्यातील जमिनीचा पोत हा केळी, ऊस, हळद व इतर फळबागांसाठी पोषक आहे. त्या तुलनेत भोकरच्या माळरानावर शेतीला फुलवणे हे तसे आव्हानात्मक आहे. भोसी येथील सौ. सुमनबाई दिगंबर गायकवाड या महिलेने आपल्या माळरानावर असलेल्या शेतीसाठी स्वप्न पाहिले. ते सुद्धा फळबाग शेतीची. या स्वप्नाला आकार देण्यासाठी तेथील कृषि सहाय्यक, कृषि अधिकारी पुढे सरसावले.

उराशी स्वप्न घेऊन माळरानावर फळबागेसाठी खड्डे खोदणे, त्यात काळी माती, शेणखत भरून झाडांसाठी हे खड्डे तयार करणे, पाण्याचे नियोजन करणे आदी एकापाठोपाठ एक गायकवाड कुटुंबाने काम हाती घेतले. पाण्याशिवाय शेती नाही, कष्टाशिवाय पाणी नाही हे गणित सुमनबाईने बरोबर ओळखले. त्यांनी कृषि विभागाशी संपर्क साधला. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्गंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजनेच्या माध्यमातून त्यांना विहिर मिळाली. या विहिरीवर सुरू झाली त्यांची फळबाग शेती!

 

सुमनबाईंसारख्या शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात दूरदृष्टी ठेऊन व्यापक नियोजन केले आहे. यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहनावरही भर आहे. तीन वर्षात 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणले जाणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीत वाढ केली जाणार आहे. शाश्वत शेती समृद्ध शेतकरी ही भूमिका शासनाने अधिक दृढ केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आता 12 हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जाईल. यात प्रधानमंत्री कृषि सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर असून केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्याचे 6 हजार असे 12 हजार रुपये प्रतीवर्षी शेतकऱ्यांना मिळतील. याचा राज्यातील सुमारे 1.15 कोटी कुटुंबातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.

 

सुरूवातीला पेरू सारखे पीक आपल्याला किती पैसे देईल याची खूप चिंता होती. या चिंतेला बाजुला सारून सुमनबाईने पेरूची लागवड केली. सुरूवातील अडीच एकर शेतीत त्यांनी एकरी 666 प्रमाणे अडीच एकरमध्ये 1 हजार 666 घनदाट लागवड पद्धतीने पेरूची लागवड केली. पहिल्याच वर्षी त्यांना फुलोरा मिळाला. या फुलोऱ्याला निसवत पहिल्याच वर्षी 10 लाख रुपयाचे उत्पन्न घेतले. याच्या जोडीला आंब्याचीही लागवड केली. दोन एकर शेतीत अती घनदाट पद्धतीने 1 हजार 300 झाडाची लागवड केली. आंबा लागवड करून 5 वर्षे झाली. यावर्षी त्यांनी भरीव उत्पादन घेऊन शेतकऱ्यांना चालना दिली. पेरूच्या उत्पन्नातून सुमारे 1 हजार सिताफळाची लागवड करून त्यांनी शेतीतला पैसा पुन्हा शेतीसाठी वळवला. आजच्या घडीला 10 एकर शेतीत माळरानावर त्यांच्या कष्टातून फुलविलेल्या शेतातील आंब्यानेही 5 लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न देऊ केले आहे.

सुमनबाईच्या जोडीला त्यांचे पती दिगंबर गायकवाड व मुलगा नंदकिशोर हे कायम तत्पर राहिले. एमपीएससी परिक्षेचा अभ्यास करत करत कोरोनाच्या काळात नंदकिशोर यांनी शेतीला जवळ करण्याचा निर्णय घेतला. एका बाजुला अभ्यास तर दुसऱ्या बाजुला शेतासाठी कष्टाची तयारी त्यांनी ठेवली. आज या माय-लेकरासह सारेच शेतात राबत असल्याने या मुलानेही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून देण्यात काहीही कमी पडू दिलेले नाही. नंदकिशोर यांनी आता शेतात शेडनेट उभारायला कमी केले नाही. शासनाच्या विविध योजनांचा त्यांनी शेतीसाठी लाभ घेतला. यात एमआरजीएस अंतर्गत 1 हजार 666 पेरू झाडाची लागवड केली. या झाडांसाठी पंतप्रधान सुक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक योजनेचाही लाभ घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी शासनाच्या विहिर योजनेचा लाभ घेतला. झाड झाली, पाण्याची व्यवस्था झाली, ठिबक झाले. विजेचा प्रश्न तेवढा बाकी होता. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना विनंती केली. मेडा अंतर्गत त्यांना सोलार पंपाचा लाभ मिळाला. या योजनेंतर्गत 95 टक्के सबसीडीवर पाच एचपीचा सोलारपंप मिळाला. अंतर्गत मशागतीसाठी कृषि विभागाकडून त्यांनी मिनी ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतला.

शेतीतील उत्पन्न आज मोहून टाकणारे असले तरी प्रत्यक्ष शेती करतांना खूप आव्हानाचा सामना करावा लागतो. परिसरातील शेतकऱ्यांसाठी सुमनबाईचे शेत आता एक आदर्श शेत झाले आहे. या माळरानावर फणसाच्या झाडापासून मसाला, ईलायची पर्यंत झाडाचे नियोजन केले आहे.  पंचक्रोशितील शेतकरी आता त्यांच्याकडे विविध फळांच्या रोपाची मागणी करीत आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी सुमनबाई पदर खोचून कामाला लागले आहेत. कृषि अधिकाऱ्यांना बोलावून त्यांनी याही स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी मार्ग मागितला. अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजनेतून त्यांना निकषानुसार 50 टक्के सबसीडीवर शेडनेट मिळाले. आता त्या फळउत्पादक शेतकरी म्हणून आपली ओळख वाढवत रोपविक्रेत्याही झाल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या गारपिटीतून सावरत शासनाच्या कृषि योजनांच्या साह्याने व त्यांचा परिवार पुन्हा तेवढ्याच जोमाने उभा राहिला आहे. जेवढे प्रयत्न लावू तेवढे आम्ही मिळू या संदेशाला जवळ करीत गायकवाड कुटुंब आता प्रगतीचे नवे मार्ग चाखत आहेत. हिंमत हारायची नाही, कष्टाला कमी पडायचे नाही, निसर्गाचे आव्हान आले तरी गांगारून जायचे नाही हे साधे तत्त्व शेतीतून सुमनबाईने घेतले आहे. हाच मंत्र आता त्या इतर शेतकऱ्यांना देत आहेत. 

 

 

 

– विनोद रापतवार,

जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड 

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करण्याची राज्य शासनाची भूमिका – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, दि. २३ : राज्यात १५ ते २० मार्च दरम्यान झालेल्या गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी विधानभवनातील समिती कक्षात संवाद साधला. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत करण्याची भूमिका असल्याचे सांगितले.

या बैठकीला महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्यासह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळात द्राक्ष बागातदार संघाचे प्रतिनिधी म्हणून भाऊलाल तांबडे,  प्रकाश पाटील, कैलास भोसले, प्रकाश शिंदे, चंदू पगार उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या गारपीट आणि अतिवृष्टीमुळे गहू, कांदा, द्राक्ष, मका तसेच फळवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकहून आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचे म्हणणे मंत्री श्री. सत्तार यांच्यासमोर मांडले. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पंचकेश्वर कुंभारी, रानवड, नांदुरशिवार, खेडे, वनसगाव, खानगांव भागात असलेल्या निर्यातक्षम द्राक्षांचे  अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्लास्टिक कव्हरसाठी 50 टक्के अनुदान देण्यात यावे, तसेच मागेल त्याला शेततळे या धर्तीवर मागेल त्याला प्लास्टिक क्रॉप कव्हर देण्यात यावे. कांदा चाळ अनुदान योजनेप्रमाणे बेदाणा निर्मितीसाठी शेड उभारण्यास अनुदान द्यावे. द्राक्ष पीक विमा योजना त्या-त्या विभागातील हंगामाप्रमाणे लागू करण्यात यावी, या वर्षीचा द्राक्ष निर्यात हंगामामध्ये काही द्राक्ष नमुना तपासणी मध्ये केमिकलचा अंश आढळून आलेला आहे. यामुळे निर्यात क्षम द्राक्षमालाचे नुकसान झाले आहे. संबंधित कंपन्यांवर कारवाई करुन शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांमार्फत नुकसान मिळण्यासाठी शासन स्तररावरुन प्रयत्न व्हावेत, चालू हंगामात द्राक्ष बागांवरील कर्ज परतफेड करणे शक्य होणार नाही. त्यामुळे चालू हंगामातील कर्ज, व्याज माफ करावे व बँकाकडून वसुली पथकांद्वारे केली जात असलेली सक्ती थांबवावी, अशा मागण्या या शेतकऱ्यांच्या होत्या.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

 

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतलेल्या प्रश्नमंजुषेला भरघोस प्रतिसाद

मुंबई, दि. २३ : यंदाच्या महिला दिनानिमित्त मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रश्नमंजूषा आयोजित केली होती. या प्रश्नमंजूषेत स्त्री (२४४८), पुरुष (२३४९) आणि पारलिंगी (Transgender) (१७) यांनी सहभाग घेतला, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

ऑनलाईन घेतलेल्या या प्रश्नमंजूषेत स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांनी विवाहानंतर नाव बदलावे की नाही, पारलिंगी महिला (Transwoman), पारलिंगी पुरुष (Transman) या घटकासंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते.

या प्रश्नमंजुषेनुसार, समाजात स्त्री-पुरुष समानता येण्यासाठी पुरुषांनी दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे ९५ टक्के स्त्री-पुरुषांनी, तर ८२ टक्के पारलिंगीं व्यक्तींना वाटते. तर पुरुषांना बदलण्याची गरज नाही असे पाच टक्के स्त्री-पुरुषांनी आणि १८ टक्के पारलिंगिंनी म्हटले आहे. विवाहानंतर स्त्रीने स्वतःचे नाव आणि आडनाव बदलावे, असे ६५ टक्के स्त्रियांना आणि ५१ टक्के पुरुषांना, आणि ५३ टक्के पारलिंगी व्यक्तींना वाटते.

विवाहानंतर नाव बदललेल्या स्त्रियांनी मतदार यादीतही आपले नाव बदलले आहे, असे ७५ टक्के स्त्रियांनी म्हटले आहे, तर विवाहानंतर नाव बदललेल्या कुटुंबातल्या स्त्रियांची मतदार यादीतही नावे बदलली आहेत, असे ७८ टक्के पुरुषांनी आणि ७७ टक्के पारलिंगी व्यक्तींनी म्हटले आहे.

पारलिंगी महिला (Transwoman) व पारलिंगी पुरुष (Transman) यांच्याविषयी माहिती असल्याचे ७३ टक्के स्त्रियांनी, ७८ टक्के पुरुषांनी आणि विशेष म्हणजे ७१ टक्के पारलिंगी व्यक्तींनी म्हटले आहे, तर पारलिंगी महिला व पारलिंगी पुरुष यांच्याविषयी माहीत नसल्याचे २७ टक्के स्त्रियांनी, २२ टक्के पुरुषांनी आणि २९ टक्के पारलिंगींनी म्हटले आहे, अशी माहिती श्री.देशपांडे यांनी दिली आहे.

000

संजय ओरके/विसंअ

‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार आशा भोसले यांना शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करणार

मुंबई. दि.२३ : राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार २४ मार्च, २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता गेट वे ऑफ इंडिया येथे होणाऱ्या एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित राहणार आहेत.

कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते. सन २०२१ या वर्षीचा पुरस्कार आशा भोसले यांना प्रदान करण्यात येईल

या कार्यक्रमप्रसंगी ‘आवाज चांदण्याचे’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून गायक सुदेश भोसले, साधना सरगम, ऋषिकेश कामेरकर, आर्या आंबेकर, बेला शेंडे, मधुरा दातार हे गायक कलाकार आशा भासले यांच्या सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करतील. अभिनेते सुमीत राघवन हे या कार्यक्रमाचे निवेदन करतील. हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून शिवाजी नाट्यमंदिर, दादर, दामोदर हॉल, परळ, प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली, दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले, काशिनाथ घाणेकर नाटयगृह, ठाणे, वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल, आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण, गडकरी रंगायतन, ठाणे, विष्णूदास भावे नाट्यगृह, वाशी या नाट्यगृहावर कार्यक्रमाच्या सन्मानिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर उपलब्ध आहेत. या पुरस्कार समारंभास तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

०००

वर्षा आंधळे/विसंअ

शहीद दिनानिमित्त राज्यपालांचे भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांना अभिवादन

मुंबई, दि. २३ : शहिद दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज (दि. २३) राजभवन येथे क्रांतिकारक हुतात्मा भगत सिंह, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.

०००

 Governor pays tribute to Shahid Bhagat Singh, Rajguru, Sukhdev

 

Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portraits of great revolutionaries Bhagat Singh, Rajguru and Sukhdev on the occasion of the Martyrs’ Day at Raj Bhavan, Mumbai on Thursday (23 Mar).

Officers and staff of Raj Bhavan and police personnel also offered their floral tributes to the great revolutionaries.

000

ताज्या बातम्या

दिल्लीत क्रांतिसिंह नाना पाटील जयंती साजरी

0
नवी दिल्ली, ३ : स्वातंत्र्यसंग्रामातील महान सेनानी, ‘परदेशी नव्हे, स्वराज्य हवे’ या विचारांचा पुरस्कार करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद...

अवयवदान पंधरवड्यास सुरुवात; आजपासून राज्यात जनजागृतीपर विविध उपक्रम

0
मुंबई, दि. ३ : राज्यातील अवयवदानाचे प्रमाण वाढावे व अवयवदानाच्या प्रतीक्षेतील रुग्णांना नवजीवन मिळावे यासाठी आजपासून विविध उपक्रमांनी अवयवदान पंधरवडा साजरा होत आहे. सार्वजनिक आरोग्य...

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर दि.३ : महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक...

‘संपूर्णता’ अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल चंद्रपूर जिल्हाधिकारी सन्मानीत

0
चंद्रपूर दि. ३ : ‘आकांक्षित जिल्हे व तालुके’ कार्यक्रमांतर्गत १ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियान मधील उल्लेखनीय...

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0
मुंबई, दि 3 – क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून...