गुरूवार, ऑगस्ट 14, 2025
Home Blog Page 1088

बृहन्मुंबई शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

मुंबई, दि. 12 : मानवी जीवन, मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी, सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून यांनी पोलीस उप आयुक्त (अभियान) तथा कार्यकारी दंडाधिकारी बृहन्मुंबई यांच्याद्वारे  सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त अधिकारानुसार बृहन्मुंबई शहर हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

या आदेशानुसार दि. 20 डिसेंबर 2023 अखेर पाच किंवा अधिक व्यक्तींच्या एकत्र येण्यास प्रतिबंध, मिरवणूक आणि मिरवणुकीत वाद्ये, बँड आणि फटाके वाजविणे इत्यादीस प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही, असे कळविण्यात आले आहे.

००००

 

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत संधी

मुंबई, दि. १२ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (Service Selection Board) (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतीसाठी दिनांक ०८ जानेवारी ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत एस.एस.बी.(SSB) कोर्स क्र. ५६ आयोजित करण्यात येत आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची  निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची  नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाच्या संधीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी मुलाखतीस हजर  रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील एस.एस.बी.-५६ कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

एस.एस.बी. कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेऊन यावे.

कंम्बाईंड डिफेन्स सव्हींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.एनसीसी  ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ ‍ किंवा  ‘B’   ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी  ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबी साठी  शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे.

विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी  एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व  प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र.  ०२५३-२४५१०३२ किंवा हॉट्सअप क्र. 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मुंबई शहर यांनी केले आहे.

0000000

शैलजा पाटील/विसंअ

विधानपरिषद इतर कामकाज :

शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शनबाबत राज्य सरकार सकारात्मक; संप करू नये – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर दि. 12 : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांनी संप करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केले.

सदस्य कपिल पाटील यांनी याबाबत अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी श्री. फडणवीस म्हणाले की, जुन्या पेन्शन संदर्भात शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने माजी सनदी अधिकारी सुबोधकुमार, के. पी. बक्षी आणि सुधीर श्रीवास्तव या तिघांची समिती स्थापन केल्यानंतर त्या समितीने आपला अहवाल नुकताच राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालातील शिफारशी व जुन्या पेन्शन संदर्भात विविध शासकीय कर्मचारी संघटनांशी चर्चा केली जाईल.

जुन्या पेन्शन योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असून १४ डिसेंबर पासूनचा शासकीय कर्मचारी संघटनांचा संप मागे घेण्यात यावा, असे आवाहन श्री. फडणवीस यांनी केले.

०००००

 

 

 

अहमदनगर जिल्ह्यातील कांद्याला रास्त भावाबाबत  व लाल कांदा खरेदी केंद्र सुरु करण्याचे निर्देश

नवी दिल्ली  12 : नाशिक, छत्रपती संभाजी नगर आणि पुणे येथे कांदा उत्पादनाला मिळत असलेला बाजारभाव, अहमदनगर जिल्ह्यालाही मिळण्याबाबत तसेच शिर्डी, अहमदनगर  येथे लाल कांदा खरेदी केंद्र  त्वरित  सुरु करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश केंद्रीय कृषी सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिल्याची माहिती शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव‍राव लोखंडे यांनी दिली.

खासदार श्री. लोखंडे यांनी याबाबत केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्री पियुष गोयल यांची लोकसभा परिसरातील त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी केंद्रीय कृषी विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग उपस्थित होते.   श्री. लोखडे यांनी श्री. गोयल यांच्याकडे कांदा खरेदी भावाच्या संदर्भात तीन महत्वाचे मुद्दे मांडले व याबाबत सविस्तर चर्चा केली. नाशिक, छत्रपती संभाजीनगर व पुणे जिल्ह्याप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातही भाव मिळण्याकरिता संबंधीतांना आदेश देण्याची विनंती केली.

अहमदनगर येथे लाल कांदा खरेदी केंद्र  त्वरित सुरु करण्याची  व केद्र शासनाकडून कांदा निर्यात बंदी  हटवून त्याची निर्यात लवकर सुरु करण्याचीही मागणी केली. सोबतच तातडीने केंद्र शासनाकडून नाफेड आणि  एनसीसीएफ कडून कांदा खरेदी करुन चांगला भाव देण्यात यावा अशीही मागणी यावेळी केली.

००००

 

सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग स्विकारुन हित साध्य करावे- वस्त्रोद्योग सचिव विरेंद्रसिंग

नागपूर, दि.12 : विदर्भातील रेशीम उत्पादक शेतकरी पूर्ण क्षमतेने उद्योगातून विकसित होण्यासाठी रेशीम संचालनालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोमाने प्रयत्न करावे. सिल्क समग्र दोन व मनरेगा या दोन्ही योजनातून शेतकरी आर्थिकदृष्टया सुदृढ होऊ शकतो, त्यासाठी सर्वतोपरी शासनाची मदत मिळेल. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग स्विकारुन आपले हित साध्य करावे, असे वस्त्रोद्योग सचिव विरेंद्रसिंग यांनी सांगितले.

हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील दिनेश लोखंडे यांच्या रेशीम शेतीला वस्त्रोद्योग सचिव श्री. सिंग यांनी भेट दिली. त्यांच्यासोबत रेशीम संचालक गोरक्ष गाडीलकर, उपसचिव श्रद्धा कोचरेकर, अवर सचिव वस्त्रोद्योग चित्रा, उपसचिव श्रीकृष्ण पवार, वस्त्रोद्योग विभागाचे सहाय्यक आयुक्त गंगाधर गजभिये आणि रेशीम उपसंचालक  महेंद्र ढवळे उपस्थित होते.

शासकीय योजना शेतकऱ्यापर्यंत कमीत कमी कालावधीत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा व योजनेतील अडथळे दूर लगेच करता येईल, असा विश्वास श्री. सिंग यांनी व्यक्त केला. नवीन तंत्रज्ञान वापरुन शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.  रेशीम उत्पादकांना  उमेदीने रेशीम उद्योगात क्रांतिकारक कामगिरी करण्यासाठी  त्यांनी प्रेरीत केले.

रेशीम उद्योजकाचे मनोगत

वडील रेशीम शेती चार वर्षांपासून करीत असून इतर शेतीपेक्षा जास्त पटीने चांगली असून महिन्याकाठी 70 ते 80 हजार रुपये उत्पन्न दोन एकर रेशीम उद्योगातून मिळते. त्यामुळे नवीन मुलांनी ही शेती करावी. माझा मुलगा रेशीम शेती करतो व वर्षाचे 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न या शेतीमधून काढत आहे. कोषाची विक्री रामनगर, बंगळूरू येथे करत असतो, तसेच नवीन युवकाचा ग्रुप असून आम्ही अंडीपूज एक दिवसाला बुक करुन उत्पन्न घेतो, असे मनोगत श्री.लोखंडे यांनी व्यक्त केले.

 

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठातांची चौकशी सुरु– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. १२ : पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्ज प्रकरणी रुग्णालयाच्या अधिष्ठातांची चौकशी सुरू असून चौकशीत पुरावे असतील तर बडतर्फाची कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषदेत पुणे येथील ससून रुग्णालयाच्या गेटवरून कोट्यवधी रुपयांचे अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केल्याबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ तस्करी प्रकरणी तपासात ससून रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधिकारी यांचा तस्करीत सहभाग असल्याचे अद्यापपर्यंत निष्पन्न झालेले नाही. आरोपीच्या संरक्षण कामी नेमलेले अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याने दोन पोलीस अधिकारी व दोन कर्मचारी यांना बडतर्फ केले असून सहा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.

ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कैद्याकडून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालवले जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने उघडकीस आणला असून ससून रुग्णालयाच्या गेटवरून २ कोटी १४ लाखांचे मेफेड्रॉन हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे. अशा प्रकारच्या कारवाया राज्यात करण्यात येत आहेत. त्यामध्ये विविध घटना उघडकीस येत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राज्यातील काही भागात बंद असलेल्या कंपन्यांमध्ये ड्रग्ज तयार करण्यात आले असल्याचे निदर्शनास येत आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढे संशयित हालचाली होत असलेल्या राज्यातील बंद कारखान्यांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पुणे अधिष्ठाता डॉ. ठाकूर  यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ललित पाटील विविध व्याधीने ग्रस्त होता. त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आलेली नाही. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका अशा स्वरूपाची धमकी ससूनचे अधिष्ठाता यांनी तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना दिल्याची तक्रार आली नसल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, अमली पदार्थ तस्करी हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र असून याचे पुरावेही सापडले आहेत. इतर राज्याच्या समन्वयाने कारवाई करण्यात येत आहे. हुक्का पार्लर बंद करण्यात आले आहेत. संशयास्पद व्यक्ती व आरोपींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. नार्को टेस्ट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

सर्व सदस्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करून अमली पदार्थ तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या प्रकरणातील कोणासही पाठिशी घातले जाणार नाही. भावी पिढीचे भवितव्य महत्त्वाचे असल्याने सरकार ही लढाई लढत राहणार असल्याचे त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले.

या प्रश्नांच्या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सचिन अहीर, भाई जगताप, राजहंस सिंह, अनिल परब,  अरुण लाड यांनी सहभाग घेतला.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

————————————————————————–

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांची फसवणूक केलेल्यांवर तपासून कारवाई उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 12 : नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला असूनही याप्रकरणी जाणीवपूर्वक कारवाई झाली नसेल, तर तपासून कारवाई करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य आमश्या पाडवी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांची फसवणूक प्रकरणाविषयी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

नंदुरबार जिल्ह्यात सरदार सरोवर प्रकल्पामुळे बाधित झालेल्या 51 शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध होण्यासाठी त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांना कोणतेही साहित्य न देता त्यांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यातील पाचही आरोपींना न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. याविषयी अधिक माहिती घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अनिल परब यांनी सहभाग घेतला.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

————————————————————————–

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्त्वावर वसतिगृह घेणार उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, दि. 12 : स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शासनाने निर्णय घेतल्याप्रमाणे सर्व जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. वसतिगृह बांधकामासाठी काही कालावधी लागणार असून या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरुपात भाडेतत्वावर वसतिगृह घेण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्यासंदर्भात सदस्य रणजितसिंह मोहिते -पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सारथी, महाज्योतीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निधीत फरक होता. तो समान करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विविध शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आवश्यकतेनुसार वाढविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील ‘छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह’ योजनेअंतर्गत खासगी नोंदणीकृत संस्थांचे वसतिगृह चालवण्यास तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेशी संलग्नित करून या योजना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून अंमलात आणण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार खासगी वसतिगृह सुरू करण्यासाठी इच्छुक नोंदणीकृत संस्थेची निवड करण्याची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात येत आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.

सारथी संस्थेमध्ये स्पर्धा परीक्षा, संशोधन, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी, सामाजिक न्याय, सांख्यिकी असे विभाग कार्यान्वित असून सन २०२२-२३ या वर्षामध्ये स्पर्धा परीक्षा विभागाच्या केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोगाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, संशोधन विभागातील पीएचडी, एम.फिल. करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य तसेच शिक्षण विभागाकडील छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती इतक्या योजना कार्यान्वित होत्या. या योजनांवर ऑक्टोबर, २०२३ अखेर सुमारे १३०.८३ कोटी इतका खर्च झाला असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले.

सन २०२३-२४ आर्थिक वर्षात स्पर्धा परीक्षा अंतर्गत युपीएससी, नेट, सेट, आयबीपीएस यासाठी आर्थिक सहाय्य, संशोधन विभागाच्या पीएच.डी., एम.फिल करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य, कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांना आर्थिक सहाय्य, कृषी विभागाच्या आयएफएटी, डब्ल्यूबीएटी या कोर्सेस करीता आर्थिक सहाय्य, शिक्षण विभागाच्या राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती, निबंध स्पर्धा तसेच सामाजिक न्याय विभागाच्या डॉ. पंजाबराव देशमुख देशांतर्गत शिष्यवृत्ती तसेच परदेशी शिष्यवृत्ती अशा मोठ्या प्रमाणावर योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना या योजनांतून चालू आर्थिक वर्षात खर्च करण्यात येणार असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले.

या प्रश्नांच्या वेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सतेज पाटील यांनी सहभाग घेतला.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

 

राष्ट्रकुल संसदीय मंडळ अभ्यासवर्ग : “विविध संसदीय आयुधे, विधिमंडळ समिती व अर्थविषयक समिती कामकाज”

नागपूर, दि. 12 : संसदीय लोकशाहीने लोकप्रतिनिधींना विविध आयुधे दिली आहेत. या आयुधांचा वापर लोकप्रतिनिधी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करतात. या आयुधांचा विधिमंडळाच्या अधिवेशनात लोकप्रतिनिधींकडून प्रभावीपणे वापर होतो, असे प्रतिपादन आमदार, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज येथे केले.

राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात आज “विविध संसदीय आयुधे, विधिमंडळ समिती व अर्थविषयक समिती कामकाज” या विषयावर मार्गदर्शन करताना आमदार श्री. थोरात बोलत होते.

आमदार श्री. थोरात म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशनाचे महत्व अनन्य साधारण आहे. प्रश्नोत्तरे, तारांकित, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव, अंतिम आठवडा प्रस्ताव अशा विविध आयुधांचा वापर सदस्य करतात. संसदीय लोकशाहीने आपल्याला ही आयुधे दिली आहेत. या आयुधांच्या  माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडले जातात व चर्चेतून त्याची उत्तरे शोधली जातात. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून सभागृहामध्ये मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होते. त्यामुळे प्रश्नोत्तरांना एक वेगळे महत्व आहे. या चर्चेतूनच मांडलेल्या प्रश्नावर उत्तर शोधण्याचे काम सर्व सदस्य करत असतात.

सार्वजनिक हिताचा आणि तातडीचा प्रश्न असल्यास त्यासाठी लक्षवेधी सूचना मांडली जाते. या लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधणे हा उद्देश असतो. तसेच घडलेल्या घटनेवर मार्ग काढणे,  गरज असल्यास मदत देणे यासारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा होत असते. एखादी घटना अचानक घडल्यास आणि त्यावर सभागृहामध्ये चर्चा होणे अत्यंत आवश्यक असल्यास सदस्य स्थगन प्रस्ताव मांडतात. स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून महत्वाच्या व तातडीच्या विषयांवर चर्चा होत असताना सर्व सदस्य चर्चेमध्ये सहभागी होतात. अशाच प्रकारे सविस्तर चर्चा होऊनच कायदे तयार केले जातात. कायदे तयार करणे हे कायदे मंडळ म्हणून विधानमंडळाची जबाबदारी आहे.

विधिमंडळाचे कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी विविध समित्या आहेत. त्यामध्ये कामकाज सल्लागार समिती, लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, अनुसुचित जाती – अनुसुचित जमाती समिती यांचा समावेश आहे. लोकलेखा समिती ही आर्थिक नियोजन, खर्चाचे बारकावे याविषयी नियंत्रण ठेवते. अधिवेशन काळात विधानमंडळाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी व कामकाजाचे नियमन करण्याचे काम कामकाज सल्लागार समिती करत असते.  या समित्यांच्या माध्यमातून यंत्रणांवर नियंत्रण ठेवले जाते. खर्चाच्या नियंत्रणासाठी अर्थ विषयक समित्याही असतात. या सर्व समित्यांच्या समन्वयातून विधानमंडळाचे कामकाज चालते. शासकीय व अशासकीय प्रस्ताव अधिवेशन काळात सभागृहामध्ये मांडले जात असतात. कधी कधी अशासकीय प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर त्याचे शासकीय प्रस्तावामध्ये रुपांतर होऊन तो शासकीय प्रस्ताव म्हणून मंजूर केला जातो, असेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रकुल संसदीय अभ्यास वर्गात उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना आमदार श्री. थोरात म्हणाले की, जनतेच्या लोकप्रतिनिधींकडून असणाऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी नेहमीच मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यात अग्रेसर तसेच या कामी व्यस्त राहतात. मुंबई विद्यापीठाची विद्यार्थिनी ऋतुजा गजभारे हिने आभार मानले.

०००००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

विधानसभा इतर कामकाज

नाशिक- पुणे महामार्गावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जखमी वारकऱ्यांच्या उपचारांचा खर्चही राज्य शासन करणार

नागपूर, दि. १२ : नाशिक- पुणे महामार्गावर शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर शिरल्याने अपघात होऊन पायी चालणाऱ्या चार वारकऱ्यांचा मृत्यू  झाला. याप्रकरणी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत देण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. तसेच या घटनेत जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या उपचाराचा खर्च राज्य शासन करेल, असेही त्यांनी सांगितले.

विधानसभेत ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी हा विषय उपस्थित केला होता.

आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिक वारी सोहळ्यासाठी शिर्डीवरून आळंदीकडे येणाऱ्या दिंडीतील भाविकांना अपघात झाला होता. भरधाव कंटेनर दिंडीत शिरल्याने चार वारकरी मृत्युमुखी तर आठ वारकरी जखमी झाले होते. नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी परिसरात हा अपघात घडला होता.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

 

राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा, युवा महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन करा – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि. १२ : १९ वर्षाखालील मुलींकरिता आयोजित करण्यात येणाऱ्या ६७ व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंसाठी मैदानांची उपलब्धता तसेच सुरक्षित निवासव्यवस्था करण्यात यावी. क्रीडा स्पर्धांबरोबरच जिल्हा आणि विभागस्तर युवामहोत्सव २०२३-२४ चे देखील सर्वोत्कृष्ट आयोजन प्रशासनाने करण्याचे निर्देश मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय येथे ६७ व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा व जिल्हास्तर, विभागस्तर युवा महोत्सव २०२३-२४ च्या आयोजनाकरिता जिल्हाधिकारी  राजेंद्र क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. या बैठकीला क्रीडा उपसंचालक नवनाथ फडतरे, कृषीचे उपसंचालक डी. एस. घोलप, क्रीडा पोलिस निरीक्षक राजेंद्र काळभोर, राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी डॉ. सुभाष दळवी, शिक्षण निरीक्षक रा. दि. पाटील, महाराष्ट्र ऑल्मिपिक संघटनेचे  सदस्य गोविंद कुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण  उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेकरिता येणारे खेळाडू आणि त्यांचे प्रशिक्षक यांच्यासाठी सुरक्षित निवासव्यवस्था आणि खेळाची चांगली मैदाने उपलब्ध करण्यात यावी. अशा सुरक्षित ठिकाणांची परवानगी प्रशासनाने घ्यावी. या स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट आयोजन करावे. जिल्हा व विभागस्तर युवामहोत्सव २०२३ साठीही खबरदारी घेवून जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे. कोणत्याही स्पर्धेसाठी येणारे खेळाडू आणि युवा महोत्सवासाठी सहभागी होणारे स्पर्धक आणि शिक्षक यांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला दिल्या.

दादर येथे मुंबई शहरचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव १३ डिसेंबरला

मुंबई शहरचा जिल्हास्तरीय युवा महोत्सव १३ डिसेंबर २०२३ पासून महाराष्ट्र स्काऊट गाईड प्रशिक्षण केंद्र, दादर येथे आयोजित केला जाणार आहे.  या महोत्सवाकरिता प्रत्येक विभागासाठी परीक्षक नेमण्यात आले आहेत. जिल्हास्तर युवा महोत्सवमध्ये १५ ते २९ वयोगटातील युवकांच्या कला गुणांना वाव देण्याकरिता सांस्कृतिक, कौशल्य विकास, विविध कृती व तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर इत्यादी विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. यावर्षी या स्पर्धेत सहभागी युवकांना शासनाकडून रोख बक्षिस देण्यात येणार आहे. मुंबई विभागातील विजेते युवा हे बालेवाडी पुणे येथे २० डिसेंबर २०२३ रोजी होणा-या युवा महोत्सवात सहभागी होतील, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण यांनी यावेळी बैठकीत दिली.

0000

 

 

शासकीय योजनांची माहिती घेऊन विकसित भारत संकल्प यात्रा आली दारी…

भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे.  मोहिमेअंतर्गत केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात फिरविला जात असून त्या माध्यमातून लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे.

जनजातीय गौरव दिनापासून सुरू झालेली ही यात्रा पहिल्या टप्प्यात लक्षणीय अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेल्या देशातील 110 जिल्ह्यात सुरू करण्यात आली. यात आपल्या नाशिक जिल्ह्याचा समावेश होता. त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून उर्वरित सर्व जिल्ह्यात यात्रा सुरू करण्यात आली असून 26 जानेवारीपर्यंत देशातील सर्व भागात पोहोचणार आहे. यात्रेच्या निमित्ताने लाभार्थ्यांशी संवाद देखील साधण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादाजी भुसे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आाशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत 15 नोव्हेंबर 2023 रोजी या विकसित संकल्प यात्रेचा शुभारंभ दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे करण्यात आला. तर 21 नोव्हेंबर रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे कार्यक्रम संपन्न झाला. केंद्र सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी केंद्र शासनाच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम आखण्यात आली आहे. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचविण्याची संधी या यात्रेच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांसाठी विकसित भारत संकल्प यात्रेसाठी 14 एलईडी व्हॅन प्राप्त झाल्या आहेत. या प्रत्येक व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील दररोज दोन ग्रामपंचायतींमध्ये याप्रमाणे एकूण 28 गावांमध्ये शासकीय योजनांची माहिती देऊन त्यांचा जागर करण्यात येत आहे. याबाबतचे परिपूर्ण नियोजन या विकसित संकल्प यात्रेच्या नोडल अधिकारी तथा उप कार्यकारी अधिकारी डॉ.  वर्षा फडोळ या करीत आहेत.

ग्रामीण भागात आयुष्मान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, किसान क्रेडीट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, हर घर जल-जलजीवन मिशन, जन धन योजना, जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, नमो फर्टीलायझर या 17 योजनांबाबत माहिती देण्यात येत आहे.

आदिवासी भागासाठी सिकलसेल ॲनिमिया निर्मुलन कार्यक्रम, एकलव्य निवासी शाळेत प्रवेश, शिष्यवृत्ती योजना, वन धन विकास केंद्र आदींबाबतही जनजागृती करण्यात येत आहे. तर शहरी भागात प्रधानमंत्री स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना, आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, मुद्रा कर्ज, स्वच्छ भारत अभियान (शहरी), पीएम आवास योजना, पीएम ईबस सेवा, खेलो इंडिया, सौभाग्य योजना, वंदे भारत रेल्वे, उडान आदी विविध योजनांच्या जनजागृतीवर भर देण्यात येत आहे.

माहिती प्रसाराद्वारे शासकीय योजनांबाबत जागरुकता निर्माण करण्यासोबतच संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणीदेखील यात्रेदरम्यान होत असल्याने या यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. विविध योजनांची माहिती देणारा दृकश्राव्य माध्यमाने सज्ज चित्ररथ या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. दृकश्राव्य माध्यमाद्वारे नागरिकांशी संवाद साधतांना त्यांना विविध योजनांची माहिती देणाऱ्या हस्तपत्रकांचे आणि कॅलेंडरचे वाटपही करण्यात येत आहे. यात्रेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संदेशही दाखविण्यात येत आहे. यात्रेला भेट देणारे नागरिक शपथ घेऊन  विकसित भारतासाठी संकल्प करीत आहेत.

शेतकऱ्यांसाठी ड्रोन प्रात्यक्षिक आणि नैसर्गिक शेती व मृदा आरोग्य पत्रिकेवरील चर्चा ग्रामीण भागासाठी उपयुक्त ठरत आहे. स्थानिक पातळीवर यश संपादन केलेल्या महिला आणि खेळाडूंचा सत्कार हेदेखील या यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. यात्रेदरम्यान आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्य तपासणी आणि किसान क्रेडीट कार्ड नोंदणी करण्यात येत आहे.

जिल्ह्यात 15 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत साधारण 379 ग्रामपंचायतींमध्ये ही विकास यात्रा पोहचली असून  या यात्रेच्या माध्यमातून साधारण एक लाख 43 हजार 502 नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली आहे.  या यात्रेदरम्यान प्रत्येक ठिकाणी महसूल, जिल्हा परिषद तसेच महापालिका, नगरपालिका प्रशासनासह इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करीत असून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहेत. या यात्रेला भेट देऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक

 

ताज्या बातम्या

शासनाच्या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी – राज्यमंत्री मेघनाताई साकोरे-बोर्डीकर

0
हिंगोली(जिमाका), दि. 13: शासन सर्वसामान्य जनतेसाठी अनेकविध योजना राबवित आहे. या सर्व योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावेत, असे निर्देश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य...

उद्योग मंत्री उदय सामंत यांची कौशल्य विकास केंद्रास भेट

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज नांदगाव पेठ येथील एमआडीसीच्या कौशल्य विकास केंद्रास आज भेट दिली. यावेळी त्यांनी केंद्रामधील...

आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध – आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक...

0
छत्रपती संभाजीनगर, दि.13, (विमाका) :- आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहास आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले. आदिवासी...

‘महाज्योती’कडून मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाची संधी

0
पुणे, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या समान धोरणांतर्गत कार्यरत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर येथे सन २०२५-२६ साठी मोफत स्पर्धा...

शंकरबाबाची मानसकन्या माला होणार जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले अभिनंदन

0
अमरावती, दि. 13 (जिमाका) : जिल्ह्यातील वझ्झर येथील पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या सानिध्यात वाढलेल्या माला हिला जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहायक म्हणून नियुक्त देण्यात आली...