रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी क्रीडा मंत्र्यांकडून जिमनॅस्ट संयुक्ता काळे हिला शुभेच्छा

“महाराष्ट्राची हिरकणी” म्हणून गौरव – क्रीडा सोयीसुविधांसाठी थेट संपर्क साधण्याचे आवाहन

मुंबई, दि. २१ : महाराष्ट्राची युवा रिदमिक जिमनॅस्ट संयुक्ता प्रसेन काळे हिची वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२५रिओ दि जानेरो (ब्राझील) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी संयुक्ताशी दूरध्वनीवरून संवाद साधत तिला शुभेच्छा दिल्या.

या संभाषणात मंत्री कोकाटे यांनी महाराष्ट्राची हिरकणी असा संयुक्ताचा गौरव करत तिच्या खिलाडूवृत्तीचे कौतुक केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीनेही तिला शुभेच्छा दिल्या. संयुक्ताच्या पालकांसह प्रशिक्षक मानसी गावंडे आणि पूजा सुर्वे यांचेही अभिनंदन करण्यात आले. खेळासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांसाठी थेट फोन करण्याचे आवाहनही मंत्री कोकाटे यांनी केले.

संयुक्ता ही या जागतिक स्पर्धेसाठी भारतातून निवड झालेली एकमेव जिमनॅस्ट असून ती पाचव्या वर्षापासून फिनिक्स जिम्नॅस्टिक्स अकादमीठाणे येथे प्रशिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूप्रशिक्षक व शिवछत्रपती पुरस्कार विजेती पूजा सुर्वे यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.

आजवर संयुक्ताने  इंडिया युवा खेळराष्ट्रीय व इतर स्पर्धा मिळून १५० पदकं (१२५ सुवर्ण) जिंकून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. तसेच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ७ वा क्रमांक मिळवत आंतरराष्ट्रीय पातळीवरही ठसा उमटवला आहे. याच स्पर्धेत मानसी गावंडे यांची भारताच्या संघाच्या प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे.

किमया कार्लेचंही अभिनंदन

नव्या ऑलिंपिक सायकलमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर २३ मार्क ओलांडणारी पहिली भारतीय जिमनॅस्ट म्हणून किमया कार्ले हिचंही मंत्री कोकाटे यांनी अभिनंदन केलं. क्लुज-नापोका (रोमानिया) २०२५ क्लब स्पर्धेत किमयाने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. तिचं कौतुक करताना कोकाटे यांनी तिला रिदमिकची किमयागार अशी उपाधी दिली.

0000

 

श्रद्धा मेश्राम/विसंअ/