अतिवृष्टी, पुराच्या अनुषंगाने यंत्रणांनी अधिक सतर्क रहावे – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. १९ : भारतीय हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षात उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेतला.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी मुंबई शहर आणि परिसरासह राज्यातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क साधून मुंबईतील माहिती जाणून घेतली. नांदेड व रायगड जिल्ह्यातील परिस्थितीविषयी संबधित जिल्हाधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून शासकीय यंत्रणांनी अधिक सतर्क राहण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.

पावसामुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्तीजन्य परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविणे, तातडीने मदत व बचाव कार्य यासंबंधी यंत्रणांनी कार्यक्षमतेने काम करावे, अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री श्री. महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना योग्य वेळी सतर्कतेचे संदेश पाठवावेत, नद्यांच्या पाणी पातळीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक ते निर्णय घ्यावेत, तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून आपत्तीग्रस्त भागात तात्काळ मदत पोहोचवावी, असे निर्देशही या वेळी देण्यात आले.

मदत, पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी आणि राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी संदर्भात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांना माहिती दिली.

००००