मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा यश बेडगेला आधार

त्याची आई कर्णबधीर… वडीलही कर्णबधीर… कोशिश चित्रपटासारखी त्यांची कहाणी…  त्यातच साडेतीन वर्षांचा चिमुकला यशही कर्णबधीर असल्याने आई वडिलांसह आजीच्या जीवाला काळजी…. पण, कर्णबधीर म्हणून जन्मला तरी तो आयुष्य कर्णबधीर म्हणून व्यतित करणार नाही.. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केलेल्या कॉकलियर इम्प्लांटमुळे यश विजय बेडगेला ऐकू येऊ लागले आहे. त्यामुळे आई, वडील, आजीचा आनंद गगनात मावेना झाला आहे.

कहाणी आहे तासगाव तालुक्यातील मणेराजुरीच्या बेडगे कुटुंबियाची. यश बेडगे व त्याचे आई वडील, बहीण, आजी यांची.. यशच्या आजीने त्याच्या वडिलांना मोठ्या काबाडकष्टातून वाढवले. ते कर्णबधीर असले तरीही परिस्थितीला शरण न जाता त्यांना मूकबधीर शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण दिले. त्यांचा विवाह मूकबधीर मुलीशी केला. पहिली मुलगी जन्मली आणि सुदैवाने निकोप. तिला ऐकू येत असल्याने ती बोलूही शकते. त्यामुळे कुटुंबातील सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. यशच्या बाबतीत तसे झाले नाही. तो ऐकू शकत नाही, हे समजल्यावर बेडगे कुटुंबीय निराश झाले. मात्र, त्यांच्या मनावरचे निराशेचे हे मळभ राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेच्या अधिकाऱ्यांनी दूर केले आणि आशेचा किरण त्यांच्या जीवनात आला.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजनेच्या अधिकाऱ्यांनी शालेय तपासणीदरम्यान कॉकलियर इम्प्लांटचा पर्याय बेडगे कुटुंबियांना सांगितला. मात्र, त्यासाठी सात लाखापेक्षा जास्त खर्च येणार होता. त्यामुळे आर्थिक जमवाजमव हा मोठा प्रश्न उभा राहिला. पण, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांच्या एकत्रिकरणातून दोन महिन्यांपूर्वी यशवर कॉकलियर इम्प्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कक्षाच्या माध्यमातून यशवरील शस्त्रक्रियेसाठी सात लाखहून अधिक रूपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे. यश आता सर्वसामान्य मुलांच्या शाळेत जातो.

याबाबत यशच्या आजी आशाराणी कुमार बेडगे म्हणाल्या, माझा नातू अंगणवाडीत जायला लागल्यावर आमच्या लक्षात आले की त्याला बोलता येत नाही. अंगणवाडीत तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितले. त्यांच्याबरोबर तासगाव पंचायत समितीच्या विशेष शिक्षिका वर्षाराणी जाधव यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. आमदार रोहित पाटील यांनीही शिफारस केली. त्यामुळे आरोग्य योजनांच्या माध्यमातून यशवर यशस्वी शस्त्रक्रिया होऊन त्याला आता ऐकू यायला लागले आहे आणि तो बोलूही शकत आहे. तो सर्वसामान्य मुलांच्या शाळेत जात आहे. त्याची प्रगती होताना दिसत आहे. याबद्दल मदत केलेल्या सर्व यंत्रणांचे व मुख्यमंत्री महोदयांचे त्यांनी आभार मानले आहेत.

एकूणच कुछ किए बिना जयजयकार नही होती…

कोशिश करने वालों की कभी हार नही होती….

समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू आणि दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून अर्थसहाय्य पुरविले जाते. या कक्षाच्या माध्यमातून अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण आला आहे.

संप्रदा बीडकर

जिल्हा माहिती अधिकारी, सांगली