नंदुरबार, दिनांक 16 (जिमाका) : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवनात तृतीयपंथी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे व समाज कल्याण निरीक्षक विवेकानंद चव्हाण उपस्थित होते.
तृतीयपंथी कक्षाच्या माध्यमातून तृतीयपंथीय बांधवांच्या तक्रारींचे निवारण, त्यांना शासनाच्या पात्र योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच शंभर टक्के उद्दिष्ट साध्य करणे हे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. संजय गांधी निराधार योजना, घरकुल योजना, आबा कार्ड, आरोग्य विमा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण यांसह शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक समावेश व हक्क संरक्षण यासाठी हा कक्ष कार्यरत राहणार आहे.
महाराष्ट्रातील अशा प्रकारचा हा दुसरा स्वतंत्र कक्ष असून, नंदुरबार जिल्ह्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. या उपक्रमासाठी समाज कल्याण विभागाबरोबरच विघ्नहर्ता, नंदुरबार नवचैतन्य फाउंडेशन, नवनिर्माण, नंदुरबार व सीवायडीए, नंदुरबार या स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य केले.
तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन व सामाजिक संस्था मिळून सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सहाय्यक आयुक्त श्री. वसावे यांनी सांगितले.
000