केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते ‘प्रभागसंघ आत्मनिर्भर संघटन पुरस्कार २०२४’ पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचा सन्मान

भंडारा, रत्नागिरीतील उमेद अभियानाच्या महिला ठरल्या राष्ट्रीय प्रेरणास्थान

नवी दिल्ली, दि.१४ : देशभरातील ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (DAY-NRLM) ‘प्रभागसंघ आत्मनिर्भर संघटन पुरस्कार २०२४’ चा भव्य वितरण सोहळा आज, १४ ऑगस्ट २०२५ रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झाला. या ऐतिहासिक सोहळ्यात महाराष्ट्राच्या ‘उमेद’ अभियानाने आपला ठसा उमटवत राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते महाराष्ट्रातील दोन प्रभागसंघांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्राला ‘शिखर’ आणि ‘हिरकणी’ प्रभागसंघांचा अभिमान

या पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्रातून भंडारा जिल्ह्याच्या ‘शिखर प्रभागसंघाने’ देशात प्रथम क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. तर रत्नागिरी जिल्ह्याच्या ‘हिरकणी प्रभागसंघाला’ द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. या दोन्ही प्रभागसंघांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या संघटित कामातून आणि कठोर परिश्रमातून ग्रामीण विकासाचा एक आदर्श घालून दिला आहे.

भंडारा येथील सौ.उषाताई कावले यांची ‘लखपती दीदी’ पर्यंतची गाथा

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देशभरातील निवडक ‘लखपती दीदीं’सोबत विशेष संवाद साधला. या संवादासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व भंडारा जिल्ह्याच्या ‘शिखर प्रभागसंघा’च्या अध्यक्ष सौ. उषा राजू कावले यांनी केले. सौ. उषाताई यांनी आपला अभियानातील संघर्ष आणि यशाचा प्रेरणादायी प्रवास, त्यांच्या प्रभागसंघाने महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी केलेले यशस्वी कामकाज आणि भविष्यातील विकासाचे दूरदृष्टीचे नियोजन याबद्दल मंत्र्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांच्या प्रभावी आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांना थक्क केले.

राज्यस्तरावर विजेत्यांचे अभिनंदन

या राष्ट्रीय सन्मानाबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, ग्रामविकास मंत्रालयाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, ‘उमेद’ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  निलेश सागर आणि अतिरिक्त संचालक  निखिल ओसवाल यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या दिशेने हे एक मोठे यश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

हा राष्ट्रीय सन्मान केवळ पुरस्कार नसून, राज्यातील ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला मिळालेली मोठी पावती आहे. भंडारा आणि रत्नागिरीच्या महिलांनी केलेल्या या कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या ‘उमेद’ अभियानाची ओळख राष्ट्रीय स्तरावर अधिक दृढ झाली असून, लाखो महिलांना नव्या उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

000