राज्यासह नागपूर विभागात समाधानकारक पाऊस झाला व पेरणीही पूर्णपणे झालेली आहे. आता शेतात पीके डौलाने उभी राहत आहेत. त्यांच्या वाढीसाठी व निकोपतेसाठी शेतकऱ्यांना कसोशीने लक्ष द्यावे लागणार आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांच्या वाढीबरोबरच कीड व अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या शेतकऱ्यांना नियोजनही करावे लागणार आहे. कापूस पिकावर होणारा फुलकीडे व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव तसेच सोयाबीन, तूर व कापूस पिकांवर दिसून येणाऱ्या हुमणी अळीच्या धोक्यापासून रक्षण करण्यासाठी कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्यावर आधारित हा विशेष लेख.
कापूस पिकावर जुलै महिन्याच्या दूसऱ्या आठवड्यापासून आढळून येणाऱ्या तूडतुड्यांचा व याच महिन्यात शेवटच्या आठवड्यापासून तसेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणारा फुलकीड्यांचा प्रादूर्भाव व गुलाबी बोंड अळीच्या प्रादूर्भावापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाने एकीकृत व्यवस्थापनांतर्गत रस शोषक किडींचे व गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. तसेच सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे बहुभक्षीय हुमणी अळीपासून (होलोट्रीचीया प्रजाती) नुकसान टाळण्यासाठी कृषी विभागाकडून किड व्यवस्थापनाचा सल्ला देण्यात आला आहे.
कापूस पिकावर सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकीडे या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. कोरडवाहू कापूस पिकावर मावा या किडीचा प्रादुर्भाव जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून आढळून येतो तर तुडतुड्यांचा प्रादूर्भाव जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून व फुलकीड्यांचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून आढळून येतो. तर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्याच्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसून येतो. तसेच हुमणी अळी (होलोट्रीचीया प्रजाती) ही एक बहुभक्षी किड असून महाराष्ट्रामध्ये होलोट्रीचीया सेरेंटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे नुकसान होते. या सर्व प्रकारच्या किडींच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
एकात्मिक व्यवस्थापनांतर्गत कपाशीवरील रस शोषक कीडींचे व्यवस्थापनासाठी विशेषत: बीटी कपाशीला किटकनाशकांची फवारणी करू नये. वेळोवेळी प्रादुर्भावग्रस्त फांद्या, पाने व इतर पालापाचोळा जमा करून किडींसहीत नष्ट करावा. कपाशीवरील किडींच्या नैसर्गिक शत्रू किटकांचे पोषण करण्यासाठी चवळीचे आंतर पीक घ्यावे. वेळेवर आंतरमशागत करून पीक तणविरहीत ठेवावे. मृद परीक्षणाच्या आधारावर खतमात्रेचा अवलंब करावा आणि जास्तीचा नत्र खताचा वापर टाळावा. तसेच मावा, तुडतुडे आणि फुलकिडे यांची एकत्रित सरासरी संख्या जास्त आढळून आल्यास नियंत्रणासाठी रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. त्यासाठी बुप्रोफेझीन 25 टक्के प्रवाही 20 मि.ली. किंवा फिप्रोनील 5 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मि.ली. यापैकी कोणत्याही एका किटकनाशकाची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी उगवणीनंतर 40 ते 45 दिवसांनतर फेरोमेन (कामगंध) सापळे वापरावे. एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन (कामगंध) सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करिता हेक्टरी 15 ते 20 कामगंध सापळे लावावेत. पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्यात. पीक उगवणी नंतर 35 ते 40 दिवसांपासून दर 15 दिवसांनी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझॅडिरेक्टिन 300 पीपीएम 50 मिली प्रति 10 लीटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाची टक्केवारी 5 टक्के पेक्षा जास्त आढळल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के मिली किंवा क्लोरपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली किंवा प्रोफेफॉस 50 टक्के 30 मिली किंवा इंडोक्साकार्व 15.8 टक्के 10 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के 10 मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हुमणी अळीच्या प्रादुर्भावापासून रक्षण
सोयाबीन, कापूस, तूर पीकांचे बहुभक्षीय हुमणी अळीपासून (होलोट्रीचीया प्रजाती) नुकसान टाळण्यासाठी सातत्याने ही किड येणाऱ्या भागात बाभुळ, कडूलिंब आणि बोर यासारख्या झाडांवर किटकनाशकाची पहिली फवारणी करावी. किटकनाशकांचा वापर करतांना मजुरांना संरक्षण साधने पुरवावीत. गरज भासल्यास दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 3 आठवड्यांनी करावी.
हुमणी अळी पाऊस पडल्यानंतर जमिनीत अंडी देते. ज्वारी, बाजरी, मका, भात, गहु, ऊस, मिरची, मुंग, करडई, वांगी, कापूस आणि सुर्यफुल आदी पिकांची मुळे ही अळी फस्त करतात. याकारणाने पिके उधळून जमिनीवर कोलमडून पडतात. या किडीचा सौम्य प्रादुर्भाव तुरळक ठिकाणीच असल्यास जैविक मित्र बुरशी मेटॅरायझियम 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाशी आळवणी करावी किंवा मेटॅरायझियम 1 किलो प्रति 100 किलो शेणखतात मिसळून प्रति हेक्टरी शेतात फेकावे. मित्र बुरशीचा वापर करतांना ओलावा असणे आवश्यक असते.
लक्षणीय प्रादुर्भाव असल्यास व्यवस्थापनाकरिता फिप्रोनील 40 टक्के इमिडॅक्लोप्रिड 40 टक्के दानेदार 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडांजवळ टाकावे किंवा कार्बोफ्यूरॉन 3 टक्के दानेदार 33.30 किलो किंवा थायोमेथोक्झाम 0.4 टक्के बायफेनथ्रिन 0.8 टक्के दानेदार 12 किलो प्रति हेक्टर किंवा थायोमेथोक्झाम 0.9 टक्के फिप्रोनिल 2 टक्के दानेदार 12 ते 15 किलो प्रति हेक्टर खोडांजवळ जमिनीत ओलावा असतांना मातीत मिसळून द्यावे, असा मोलाचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
कृषी विभाग सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शास्त्रोक्त माहितीद्वारे शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य सल्ला देवून पिकांचे नुकसान टाळून भरघोस उत्पादन घेण्यासाठी सल्ला देण्यात येतो. याचे काटेकोर पालन करून शेतकरीही जोमाने पीक उत्पादन घेवून आनंदी व समाधानी निश्चीतच होवू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार पिकांची निगा राखणे गरजेचे आहे.
संकलन व संपादन : रितेश मो. भुयार
माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क, नागपूर