अवयवदान मोठं पुण्याईच काम आहे… – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि ६ : “रक्तदानासारखं अवयवदानही समाजाने भीती न बाळगता स्वीकारलं पाहिजे. मृत्यू नंतर सुद्धा, अवयव रूपाने कोणाला तरी नवजीवन देणं, हे मोठं पुण्याईच काम आहे. लोकांचे प्रबोधन करून अवयवदान चळवळ अधिक गतिमान, व्यापक लोकचळवळ करूया” असे आवाहन सार्वजनिक आरोग्य  व कुटुंब  कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

केईएम हॉस्पिटलच्या सभागृहात (आरओटीटी ओ- एसओटीटीओ) संस्थेच्या वतीने जागतिक अवयवदान पंधरवडा निमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात अवयवदान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टर, रुग्णालये, सेवाभावी संस्था तसेच अवयव रोपण केल्यानंतर विविध क्रीडा प्रकारात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. अवयवदात्यांच्या प्रेरणादायी अनुभवांचे कथन करणाऱ्या चित्रफिती दाखवण्यात आल्या, तसेच आरओटीटीओ- एसओटीटीओ मॉडेलचे मंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

लोकांच्या मनात अवयवदानाबद्दल अकारण भीती असते, अशीच भीती पूर्वी रक्तदानाबद्दल होती. आता रक्तदान सर्वत्र केले जाते. अवयवदानाबद्दल असलेली भिती व गैरसमज सुद्धा दूर करून अवयवदान ही लोक चळवळ झाली पाहिजे. सर्व पातळीवरून लोकाचे प्रबोधन, जनजागृती केली पाहिजे. प्रबोधनाची ही चळवळ अधिक गतिमान करून किडनी, डोळे, हृदय अशा अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक लोकांना आपण नवजीवन देवूया, असे आवाहन मंत्री.श्री.आबिटकर यांनी केले.

अवयवदानाच्या क्षेत्रात काम करणारे झीटीसीसी, (आरओटीटी ओ- एसओटीटीओ), विविध रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टर, सेवाभावी संस्था यांचे कार्य उत्तम असून येत्या वर्षभरात अवयवदानाची प्रतीक्षा यादी कमी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, आरओटीटी ओ- एसओटीटीओ चे संचालक आकाश शुक्ला यांच्यासह महाराष्ट्रातील नामांकित डॉक्टर व विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी लोकमान्य टिळक रुग्णालय, सायन रुग्णालय, नायर, बी.जे. मेडिकल कॉलेज, कमांड हॉस्पिटल पुणे, इंदिरा गांधी गव्हर्नमेंट हॉस्पिटल नागपूर, एआयआय एमएस नागपूर, डी.वाय पाटील मेडिकल कॉलेज पुणे तसेच, री-बर्थ फाऊंडेशन, लिव्ह बियॉण्ड लाईफ फाऊंडेशन यांसारख्या एनजीओंच्याही योगदानाचा गौरव करण्यात आला.

अवयवदान क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल डॉ. राहुल पंडित (एचएन रिलायन्स हॉस्पिटल) आणि डॉ. सुजाता पटवर्धन (केईम) यांना बेस्ट एनटीआरसी ॲवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

000

संजय ओरके/वि.सं.अ/