छत्रपती संभाजीनगर, दि.29, (विमाका) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पूर्वतयारीबाबत आज निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आढावा घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज महानगरपालिका निवडणुकीबाबत विभागातील पाचही महानगरपालिका आयुक्तांशी सर्व सोईसुविधा, मतदान केंद्र, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, मतदान केंद्र, शासकीय, निमशासकीय ठिकाणे, खाजगी ठिकाणे याबाबतच्या तयारीचा आढावा घेतला.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, छत्रपती संभाजीनगर महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जालनाचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जालना महानगर पालिका आयुक्त संतोष खांडेकर, नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, परभणी महानगरपालिका आयुक्त महेश जाधव, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, लातूर महानगरपालिका आयुक्त मानसी मीना उपस्थित होते.
निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 26 जून, 2025 रोजीच्या आदेशानुसार आवश्यक केलेल्या सोईसुविधांचा आढावा घेऊन सोईसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मनपा आयुक्तांनी माहिती दिली.
निवडणूक आयुक्त श्री.वाघमारे म्हणाले की, मतदार यादी तयार करणे हेच या निवडणुकीतील महत्वाचे काम आहे. त्या प्रभागातील मतदार त्याच प्रभागात मतदान करतील याकडे मतदार यादीचे विभाजन करताना कटाक्षाने लक्ष द्यावे. महानगरपालिकांना आवश्यक ईव्हीएमची उपलब्धता करून देण्यात येणार असून साठवणूकीची जागा आणि वापरलेले ईव्हीएम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावेत. निवडणुकीच्या अनुषंगाने वेबसाईट व ॲप अद्ययावत करण्यात आले असून या दोन्हीचा वापर करता येईल. या ॲपचा व वेबसाईचा सर्वसाधारण मतदारालाही वापर करता येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी.श्रीकांत यांनी सीसीटीव्ही यंत्रणेबाबत माहिती दिली.
यावेळी निवडणूक यंत्रणेशी सबंधित अधिकारी उपस्थित होते.