नाशिक, दि. २७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
नाशिक रोड परिसरातील दुर्गादेवी मंदिर परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकाचा जीर्णोद्धार केला. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार श्री. पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आदी उपस्थित होते. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला. नद्यांवर घाट बांधले. बारव, विहिरी बांधून जलसंवर्धनाचे काम त्यांनी केले.
सुवर्ण पदक विजेते महेश हिरे यांचा सत्कार
अमेरिकेत झालेल्या जागतिक पोलिस आणि फायर स्पर्धा २०२५ मध्ये 10 मीटर एअर पिस्टल शुटिंग या प्रकारात सुवर्ण पदक विजेते सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांचा आज दुपारी जलसंपदा मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार सीमा हिरे, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका अत्रे, डॉ. आरती हिरे, सामाजिक कार्यकर्ते सुनील केदार, रतन लथ आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले की, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश हिरे यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या कामगिरीत सातत्य ठेवत नव्या पिढीला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी पोलिस दलाचे वरीष्ठ अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.