बनावट डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी ‘नो युवर डॉक्टर’ प्रणाली विकसित – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, १७ : राज्यातील बनावट डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमार्फत ‘नो युवर डॉक्टर’ ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
विधानसभा सदस्य संजय दरेकर, धर्मरावबाबा आत्राम यांनी यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता.
‘नो युवर डॉक्टर’ या डिजिटल प्रणालीवर रुग्ण क्यूआर कोडद्वारे डॉक्टरांची ओळखपत्रे, डॉक्टरांचे स्पेशलायजेशन, नोंदणी क्रमांक हे तपशील पाहू शकतो. तसेच बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता जिल्हा दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे. बोगस डॉक्टर विरोधात मोहीम सुरू आहे, असेही श्री. मुश्रीफ यांनी सभागृहात सांगितले.
सदस्य नाना पटोले यांनी उपप्रश्न विचारला.
000
अकोला ‘एमआयडीसी’च्या तत्कालीन प्रादेशिक अधिकाऱ्याची चौकशी सुरू – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 17 :- अकोला एमआयडीसीमध्ये झालेल्या कामकाजातील गैरव्यवहार व अनियमिततेबाबत संबधित तत्कालीन प्रादेशिक अधिकाऱ्याची चौकशी सुरू असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.
विधानसभा सदस्य साजिद पठाण यांनी अकोला एमआयडीसीतील प्रादेशिक कार्यालयातील कामकाज संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य प्रशांत बंब यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नियमबाह्य काम करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही. अकोला ‘एमआयडीसी’ मधील कामकाज संदर्भात चौकशी सुरू असलेल्या संबधीत अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असून चौकशीअंती ते दोषी आढळल्यास त्यांची विभागीय चौकशी केली जाईल आणि नियमानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
०००००
बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये सुधारणा विधेयक पुढील अधिवेशनात आणणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई दि.१७:- बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर यांच्याकडूनही सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या क्षेत्रातील तज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून सूचना मागवून बॉम्बे नर्सिंग अॅक्टमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी पुढील अधिवेशनात विधेयक आणले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.
राज्यातील नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची तपासणी यासंदर्भात विधानसभा सदस्य प्रशांत बंब यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. सदस्य मनोज जामसुतकर, सदस्य अतुल भातखळकर आणि सदस्य अजय चौधरी यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, बॉम्बे नर्सिंग अॅक्टमधील मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णांना आरोग्याच्या दर्जेदार सेवा मिळाव्यात, शासकीय नियमांचे पालन व्हावे यासाठी आरोग्य विभागामार्फत राज्यातील सर्व खाजगी रुग्णालय तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २३ हजार ३५३ रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये मुंबई नर्सिंग ॲक्ट मधील आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध नसल्याबद्दल ५ हजार १३४ रुग्णालयांना नोटीस देऊन सुधारणा करण्यासाठी सूचित करण्यात आले. त्यानंतर ४ हजार ८७६ रुग्णालयांची पुनर्तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्रुटी राहिलेली रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार खाजगी रुग्णालयांची तपासणी करण्याची मोहीम राज्यात प्रथमच राज्यस्तरावरून राबवण्यात आली. यापूर्वी तपासणीचे काम सिव्हिल सर्जन व महापालिकास्तरावर केले जात होते. यापुढे प्रत्येक वर्षी तसेच दरवर्षी ही तपासणी मोहीम राबविण्यात येणारा असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
०००००
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाचा आढावा घेऊन आवश्यक निधी दिला जाईल – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १७ : राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत असलेल्या सर्व सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या आस्थापनेचा आढावा घेऊन आवश्यक मनुष्यबळ निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य सुनील प्रभू यांनी राज्यातील रुग्णालयात भारतीय सार्वजनिक आरोग्य मानांकानुसार रुग्णांना मूलभूत सुविधा देण्यासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
दुर्गम व ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना आवश्यक मूलभूत सुविधासह औषधोपचार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व आस्थापनाचा आढावा घेऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिल्या जाईल तसेच रिक्त पदांचाआढावा घेऊन ही पदभरती प्रक्रिया लवकर करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. तसेच मुंबईतील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली जाईल, असे मंत्री श्री. आबिटकर यांनी सभागृहात सांगितले.
विधानसभा सदस्य योगेश सागर, नाना पटोले, गोपीचंद पडळकर यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.
0000
काशीबाई थोरात/विसंअ/
गोंदिया जिल्हा रुग्णालयातील अडचणींबाबत तात्काळ बैठक घेणार – मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई, दि. १७ : गोंदिया जिल्हा रुग्णालयातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या रुग्णालयात ज्या सुविधा सध्या उपलब्ध नाहीत, त्या आरोग्यसुविधा तात्काळ उपलब्ध होणे व इतर अडचणींबाबत बैठक घेण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य राजकुमार बडोले यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, या रुग्णालयात सोनोग्राफी, डायलेसिस यंत्रणा व इतर वैद्यकीय सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. थॅलेसिमिया व सिकलसेल रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या रक्तघटक पुरवठ्याबाबतही तातडीने उपाययोजना केली जात आहे. गंगाबाई रक्तपेढी ही गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असून, रक्तघटक वेगळे करणारे (सेपरेशन) यंत्र सध्या कार्यान्वित नाही. या मशीनसाठी आवश्यक असलेले लायसन्स सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन व राज्य शासनाच्या ‘एफडीए’ विभागाच्या संयुक्त तपासणीनंतर दिले जाते. ही तपासणी १ जुलै २०२५ रोजी होणार असून, त्यानंतर एका महिन्यात लायसन्स मिळेल.गोंदियामध्ये नव्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले आहे. यापुढे अधिष्ठाता यांच्याकडेच संपूर्ण कार्यभार असेल, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तो दिला जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000
आशा, स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मानधनाची प्रक्रिया सुरू – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १७ : राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचे मानधन केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येते. केंद्र शासनाचा निधी आला नसल्याने मधल्या काळात मानधन प्रलंबित राहिले होते. आता निधी प्राप्त झाला असून मानधन वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. असे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत सांगितले
विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
राज्य शासनाकडील मानधन नियमित देण्यात येते. केंद्र शासनाकडून जानेवारी २०२५ पासूनचा निधी येणे प्रलंबित होते. त्यामुळे दरम्यानच्या कालावधीत मानधन वितरित झाले नाही. दिनांक ४ जून २०२५ रोजी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रलंबित मानधन वितरण प्रक्रिया सुरू आहे. या मानधना संदर्भात आर्थिक तरतूद उपलब्ध आहे.
000
डॉक्टर व कर्मचारी यांना निवास सुविधा देण्यासाठी कालबद्ध आराखडा – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १७ : राज्यातील आरोग्य सेवांमध्ये कार्यरत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी हॉस्पिटलसोबतच निवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने कालबद्ध आराखडा तयार केला असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
याबाबत सदस्य अभिजीत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफसाठी नियमित उपस्थिती बंधनकारक करण्यात आली असून, बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सेवेसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. प्रत्येक गोष्टीची नोंदणी सक्तीने करण्यात येत असून, गैरप्रकार आढळल्यास चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. माढा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, मानेगाव येथील मुख्य इमारत व कर्मचारी निवास्थान इमारती जीर्ण झाल्याने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यानुसार या आरोग्य संस्थेचे बांधकाम पाडण्यास हरकत नसल्याबाबत विभागीय अधीक्षक अभियंता (सा.बां.वि.) यांच्याकडून प्रमाणपत्र प्राप्त करुन घेऊन इमारत बांधकाम निर्लेखित करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणार आहे. या आरोग्य संस्थेच्या जीर्ण इमारतींचे बांधकाम निर्लेखित करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी नवीन इमारत बांधकाम करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000