विधानपरिषद इतर कामकाज

कृष्णराव भेगडे यांना विधानपरिषदेत श्रद्धांजली

मुंबई, दि. २ : माजी विधानपरिषद सदस्य कृष्णराव धोंडीबा भेगडे यांच्या निधनाबद्दल विधानपरिषदेत शोक प्रस्ताव मांडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभापती प्रा.राम शिंदे यांनी शोक प्रस्ताव मांडला.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी कृष्णराव धोंडीबा भेगडे यांच्या निधनाबद्दल सभागृहाच्यावतीने दुःख व्यक्त केले. शोक प्रस्ताव मांडताना ते म्हणाले की, दिवंगत कृष्णराव धोंडीबा भेगडे यांचा जन्म १० ऑगस्ट १९३६ रोजी तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथे झाला. भेगडे यांनी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, मावळ या संस्थेच्या माध्यमातून गोर-गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये सुरू केले. मावळ तालुक्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले होते. त्यांनी तळेगाव जनरल हॉस्पिटल संस्था गोर-गरीब रुग्णांची सेवा करण्यासाठी निर्माण केली. त्यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, इंद्रायणी औद्योगिक सहकारी संस्थेचे चेअरमन, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले. त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला होता. कर्जग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. मावळ तालुक्यात जलव्यवस्थापन योजना राबवून त्यांनी हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली होती. शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्या कल्याणासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले होते. दिवंगत भेगडे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे अनेक वर्ष सदस्य होते.

सन १९७२ व १९७८ मध्ये पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघातून ते महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते तर, सन १९९२ ते १९९३ व १९९४ ते २००० या कालावधीत महाराष्ट्र विधानपरिषदेचे ते सदस्य होते. विधानमंडळाच्या अनेक समित्यांवर त्यांनी काम केल्याची माहिती सभापतींनी दिली.

या प्रस्तावावर सर्व सदस्यांनी स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली आणि शोक प्रस्तावास समर्थन दिले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

 

बालसुधारगृहातील मुलींचे पलायन प्रकरण; चौकशीसाठी समिती गठीत समितीचा अहवाल सभागृहासमोर ठेवणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. २ : छत्रपती संभाजीनगर शहरातील एका बालसुधारगृहातील नऊ मुलींनी गच्चीवरून उड्या मारून पलायन केल्याची घटना ३० जून २०२५ रोजी घडली. या प्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल सात दिवसात येणार असून हा अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

विधानपरिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या औचित्य च्या मुद्द्यावर निवेदन करताना मंत्री तटकरे बोलत होत्या.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बालकल्याण समिती व इतर अधिकाऱ्यांनी १ जुलै रोजी संस्थेला भेट देत चौकशी केली. तीन मुलींनी निवास कक्षात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर आक्षेप घेत गोंधळ घातला होता. त्यानंतर बालगृहातील नऊ मुलींनी पलायनाचा प्रयत्न केला.

या प्रकारानंतर सात मुलींना पोलीस व दामिनी पथकाच्या मदतीने ताब्यात घेतले, दोन मुली पळून गेल्या होत्या. त्यापैकी एक मुलगी सापडली असून एक मुलगी अद्यापही फरार आहे. पाच मुलींना पालकांच्या ताब्यात देण्यात आले असून, इतर तीन मुलींना इतर बालगृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. संस्थेतील अधीक्षक बदलण्यात आला असून, बालगृह व्यवस्थापन व बालकल्याण समितीस कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. उपायुक्त बालविकास यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.

०००

किरण वाघ/विसंअ/