गेवराई, जिल्हा बीड :- गेवराई नगर परिषदेच्या माध्यमातून तब्बल 18 कोटी रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच अतिक्रमण धारकांना हक्काच्या पी.टी.आर. (Property Tax Receipt) चे वाटप उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमास पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार विजय सिंह पंडित. आमदार सर्वश्री सतीष चव्हाण, विक्रम काळे, माजी आमदार अमरसिंह पंडीत, कल्याण आखाडे, प्रा.सुनील मगरे, राजेश्वर चव्हाण, शंकर देशमुख, स्वप्नील गलधर यांच्यासह अनेक मान्यवर, नगरसेवक, प्रशासनातील अधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमाचा उद्देश शहरी भागात भौतिक सुविधा वाढवणे, अनधिकृत बांधकामांना अधिकृत दर्जा देणे व नागरी विकासाला गती देणे हा आहे. कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत, भविष्यात आणखी निधी देण्याचे संकेत दिले.
या विकास योजनेत रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट आणि इतर नागरी सुविधा यांचा समावेश आहे. हा उपक्रम गेवराई शहराच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
18 कोटी रुपये किंमतीच्या विविध विकास कामांमध्ये शिवाई नगरी येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, अहिल्यानगर येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, सेवालाल नगर येथे सिंमेट रस्ता व डोम बांधकाम, सावता नगर येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, इस्लामपूरा भागातील कब्रस्थान संरक्षक भिंत बांधकाम, ताकडगाव रोड येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, कृष्णाई नगर येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, पंचायत समितीलगत व्यापारी संकुल बांधकाम, छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभिकरण, जुने गेवराई शहर सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, कोरबू मोहोल्ला येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, विरशैव समाज स्मशानभूमीचे बांधकाम, तय्यब नगर येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, संजयनगर येथे सिंमेट रस्ता व नाली बांधकाम, संघमित्र नगर येथे बौद्ध विहार बांधकाम, वीर लहुजी नगर येथे आरोग्य केंद्र बांधकाम, जलशुद्धीकरण केंद्र येथे एक्सप्रेस फिडरची जोडणी, गेवराई शहर येथे शादीखाना बांधकाम करणे इत्यादी कामांचा समावेश आहे.
***