आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न

ठाणे,दि.16(जिमाका):- आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे. जनतेच्या हिताच्या कामांसाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक त्या परवानग्या घेवून कुणाचीही अडवणूक न करता कामे तातडीने पूर्ण करावीत. जनतेच्या हिताच्या आड येतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. सर्वसामान्यांच्या विकासाला चालना देणे, हे या शासनाचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे आज संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार किसन कथोरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, राजेश मोरे, सुलभा गायकवाड, शांताराम मोरे, डॉ.बालाजी किणीकर या मान्यवर लोकप्रतिनिधींसह जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, एमएमआरडीएच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल, सह व्यवस्थापकीय संचालक आस्तिक पांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, पोलीस उपायुक्त रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त पंकज शिरसाठ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ आणि विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री.शिंदे म्हणाले की, नालेसफाई व्यवस्थित करा. जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या होर्डिंग्जची तपासणी करा, त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर पूर्ण करा. धोकादायक असणारी होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकावीत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी खड्डे दुरुस्ती तात्काळ करा. कोणत्याही परिस्थितीत मॅनहोल उघडे राहता कामा नयेत, त्यावर जाळीची झाकणे लावावीत. रेल्वे आणि महापालिकांनी आपापसातील समन्वय आणि नालेसफाई योग्य रीतीने पूर्ण करा. झाडांची छाटणी पूर्ण करा. महावितरणने विशेष काळजी घ्यावी. सर्पदंश, विंचूदंश यावरील औषध साठा योग्य प्रमाणात करून ठेवावा. आरोग्य अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंद्रांवर उपस्थित राहावे.

मोडकळीस आलेल्या शाळांची विशेष काळजी घ्यावी. तात्पुरत्या निवारास्थळांची तयारी ठेवावी. पावसाळ्यात पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी पर्याय व्यवस्था तयार ठेवावी. सखल भागात पाणी तुंबणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना तयार ठेवाव्यात. पट्टीच्या पोहणाऱ्या स्वयंसेवकांची पथके सज्ज ठेवावीत. धोकादायक इमारतींची नोंद अद्ययावत करून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी वेळेत स्थलांतरित करावे. पुरेसा धान्यसाठा करून ठेवावा, असे सांगून टीडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके सज्ज ठेवावीत. ठाणे जिल्ह्याची एकूण परिस्थिती पाहता एनडीआरएफच्या ठाणे आणि कल्याण येथील पथकांनी सप्टेंबर महिन्यापर्यंत ठाणे जिल्ह्यात थांबावे, अशा सूचना त्यांनी शेवटी दिल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांना निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप माने यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील मान्सूनपूर्व उपाययोजनांच्या तयारीबाबत तर ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त श्री.गजानन गोदेपुरे यांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व उपाययोजनांच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, एनडीआरएफ, आरोग्य विभाग, टीडीआरएफ इत्यादी विभागांनी आपापल्या विभागाने मान्सूनपूर्व उपाययोजनांबाबत केलेल्या तयारीची माहिती उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांना दिली.