छत्रपती संभाजीनगर, दि.8, (विमाका) :- विमुक्त भटक्या जमाती, अर्ध भटक्या जमातीतील गरजू कुटुंबाला योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र शासनाने डीएनटी (बीज) ही आर्थिक सक्षमीकरणासाठीची योजना सुरू केली आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांनी केले.
केंद्र सरकारच्या डीएनटी (बीज) या आर्थिक सक्षमीकरणासाठीची योजनेच्या संदर्भात तिसगाव येथे केंद्रीय मंत्री डॉ.विरेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला आमदार प्रशांत बंब, डीएनटी बोर्डाचे सदस्य प्रवीण घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डी.एन.टी बोर्ड भारत सरकार श्री. आप्पाराव, समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त शेख जलील आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री.कुमार म्हणाले की, समुदायांच्या आर्थिक विकासाला चालना देणे, त्यांच्या पारंपारिक व्यवसायांचे पुनरुज्जीवन करणे, त्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यांच्या जीवनाच्या दर्जाची सुधारणा करण्यासाठी योजना आखण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये या समुदायांसाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. डीएनटी संघटनांच्या कल्याणकारी अहवालांमध्ये अनेक शिफारशीकडे सामाजिक-आर्थिक, सांस्कृतिक, विमुक्त, भटक्या आणि विमुक्त जमातींच्या विविधतेच्या संदर्भात लक्ष देणे आवश्यक आहे.
समाजातील गरजू घटकाला आर्थिक मदतीसोबत शैक्षणिक विकास, रोजगार निर्मिती आणि विमुक्त जमातींचे पुनर्वसन यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. डीएनटी युनिट्सच्या सक्षमीकरणासाठी एक छत्री योजना तयार करण्यात आली आहे आणि पाच वर्षांच्या कालावधीत अंदाजे २०० कोटी रुपये खर्च करून शैक्षणिक सक्षमीकरण, आरोग्य उपजीविका, जमीन आणि गृहनिर्माण यावर भर दिला जाणार आहे. डीएनटी उमेदवारांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भाग घेण्यास सक्षम करण्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण, समुदायांना आरोग्य विमा प्रदान करणे, डीएनटी/एनटी/एसएनटी समुदाय संस्थांचे क्लस्टर तयार करण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी समुदाय पातळीवर उपजीविकेच्या उपक्रमाला चालना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री श्री. कुमार म्हणाले.
श्रीमती शीला प्रकाश पवार, श्रीमती इंदुबाई कैलाश राठोड, श्रीमती जयश्री बेन सुरमाने, वसंत पुरा राठोड, देव गुणा राठोड, पंडीत राठोड यांनी मंत्री महोदयांकडे आपल्या अडचणी मांडल्या.
यावेळी नागरिकांना बांधकाम कामगार कल्याण पेटी, कामगार कल्याण स्मार्ट कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड आदी योजनेचे कार्ड मंत्री महोदयांच्या हस्ते वाटप करण्यात आले.