अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चोंडी येथे आज पार पडलेल्या विशेष मंत्रिपरिषद बैठकीत राज्यातील महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. “आदिशक्ती अभियान” राबविण्यास आणि “आदिशक्ती पुरस्कार” सुरु करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महिला आणि बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचा उद्देश आरोग्य, पोषण, शिक्षण, आर्थिक सबलीकरण, सामाजिक सहभाग आणि नेतृत्व विकासाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करणे हा आहे. बालमृत्यू व मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, पंचायतराज व्यवस्थेत महिलांचा सहभाग वाढवणे, किशोरवयीन आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबवणे तसेच कौटुंबिक हिंसाचार आणि बालविवाहास प्रतिबंध करणे हेही अभियानाचे महत्त्वाचे घटक असतील.
राज्यभर प्रभावी जनजागृतीसाठी शासकीय योजना व उपक्रमांचा प्रचार विविध माध्यमांद्वारे केला जाणार आहे. ग्रामपातळीपासून राज्यस्तरापर्यंत विशेष समित्या स्थापन करण्यात येणार असून, या समित्यांचे वार्षिक मूल्यमापन केले जाईल. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समित्यांना “आदिशक्ती पुरस्कार” प्रदान करण्यात येईल. या पुरस्कारांचे वितरण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
या अभियानासाठी दरवर्षी सुमारे १०.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यास मंत्रिपरिषदेने मान्यता दिली आहे. राज्यस्तरावरील धोरणात्मक निर्णय महिला व बाल विकास मंत्री आदिती वरदा तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मंजुरीनंतर राबविले जातील.
राज्याच्या सर्वांगीण महिला सक्षमीकरणासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे, असा विश्वास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
Ooo
श्रद्धा मेश्राम/विसंअ/