नवी दिल्ली, 6 : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉक ड्रिल घेण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा यात समावेश असून, बुधवार दि. 7 मे रोजी एकाचवेळी या मॉक ड्रिल्स केले जाणार आहे.
देशातील 259 शहरांमध्ये युद्धजन्य मॉकड्रिल घेण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सतर्कता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील 16 ठिकाणांची तीन गटांमध्ये विभागणी
पहिला गट : अतिसंवेदनशील ठिकाणांचा असून, यामध्ये मुंबई, उरण व तारापुर या तीन ठिकाणांचा समावेश आहे.
दुसरा गट : ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे.
तिसरा गट : छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे.
या ठिकाणी बुधवारी दि. 7 मे रोजी मॉकड्रिल घेण्यात येणार असून, नागरी संरक्षण यंत्रणांना त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्री करून घेणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
००००
अमरज्योत कौर अरोरा, /वि.वृ.क्र.101 /दि.06.05.2025