मुंबई, दि. ६ – इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानामुळे शासनाच्या विविध सेवांमध्ये गतिमानता येऊन कार्यक्षमता वाढीस लागणार आहे. तसेच नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन नॅसकॉमचे सिस्टिम इंटिग्रेशन तज्ज्ञ रवींद्र देशपांडे यांनी केले.
सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यामध्ये प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ या विषयावर श्री. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपसचिव दिलीप देशपांडे, अवर सचिव स्मिता जोशी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
इंटरनेट ऑफ थिंग्ज हे इंटरनेटसेवेवर आधारित असून याद्वारे रिअलटाईम लक्ष ठेवून एखादे काम परिपूर्ण करता येते. स्मार्ट सिटीमधील वाहतूक संचालन, पाण्याचे नियोजन, रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, वाहनतळ नियोजन, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक सुरक्षा प्रणाली आदीसाठी इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. त्याचप्रमाणे कृषी, औद्योगिक क्षेत्रातही इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याचेही त्यांनी यावेळी उदाहरणांसह सांगितले.
इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाचा वापर करताना सायबर सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेटवर माहिती पाठविली जात असल्याने सायबर सुरक्षाविषयक संभाव्य जोखीमही पहावी, असेही श्री. देशपांडे यांनी सांगितले.
उपसचिव श्री. देशपांडे व श्रीमती जोशी यांनी स्वागत केले.
0000
नंदकुमार वाघमारे/विसंअ/