उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर न्यावा – ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख मनोज पद्मनाभन यांचे आवाहन

‘स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड टेक्नॉलॉजीची मदत’ चर्चासत्र

मुंबई, दि. ४ : नवीन ‘स्टार्टअप्स’च्या व्यावसायिक यशासाठी त्यांना सर्व प्रकारचे सहाय्य मिळण्यासंदर्भात ‘क्लाऊड सर्विस’ प्रणाली लाभदायक ठरू शकते. त्यामुळे नवीन उद्योगांनी क्लाऊड सर्विसच्या माध्यमातून आपला व्यवसाय-उद्योग कमी कालावधीत, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘लोकल टू ग्लोबल’पर्यंत न्यावा, असे आवाहन ॲमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्यवसाय विकास प्रमुख (माध्यम आणि करमणूक) मनोज पद्मनाभन यांनी केले.

‘स्टार्टअप्सच्या व्यवसाय वाढीसाठी क्लाऊड टेक्नॉलॉजीची मदत’ यासंदर्भात ‘वेव्हज २०२५’ या जागतिक परिषदेत ‘वेव्हजएक्स’ चर्चासत्र झाले. यावेळी ॲमेझॉन वेब सर्विसेसचे उद्योग विषयतज्ज्ञ महेश्वरन जी. यांनीही मार्गदर्शन केले.

आजच्या युगात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी उद्योगांना अनेक संधी आहेत. आपला कंटेंट चांगला असेल तर उद्योगांनी वेगवेगळ्या क्लाऊड सर्विसेसच्या सहाय्याने आपल्या क्षेत्राचा विस्तार करावा. त्यासाठी बाजारात ‘क्लाऊड सर्विसेस’च्या विविध प्रणाली उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून उद्योगांनी आपला कंटेंट आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असा सल्ला श्री. पद्मनाभन यांनी दिला.

श्री. महेश्वरन यांनी क्लाऊड सर्विसेसमध्ये असणाऱ्या प्रत्येक टप्प्याची माहिती दिली. त्यात सॉफ्टवेअर व अप्लायन्सेस, लिंक, मीडिया कनेक्ट, मीडया लाईव्ह, मीडिया कन्वर्ट, मीडिया पॅकेज, मीडिया टेलर, व्हिडिओ सर्विस, डेडलाईन थिंकबॉक्स, डेडलाईन क्लाऊड, ॲमेझॉन क्लाऊड फ्रंट, अमेझॉन एफएसएक्स, डीसीव्ही यांचा समावेश आहे. या टप्प्यांच्या माध्यमातून कंपनी ते ग्राहक अशी साखळी निर्माण करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्टार्टअपच्या प्रगतीसाठी इकोसिस्टीम तयार होत आहे. नवीन उद्योगांचा खर्च कमी करणे, त्यांना डेटा ॲनालिसिस उपलब्ध करून देणे, त्यांच्या कंटेंटचे मूल्यवर्धन करणे यासारख्या सुविधा उपलब्ध होत असून याचाही वापर नवीन स्टार्टअप यांनी करणे गरजेचे आहे, असे श्री. महेश्वरन यांनी सांगितले.

——- ०००——

संतोष तोडकर/विसंअ/