मुंबई, दि. 4 : शिल्पकला ही इतिहासाची साक्षीदार असते. एखादी शिल्पकृती पाहिली की त्यामधून प्राचीन काळातील घटना, प्रसंग आणि संस्कृती समजते. शिल्पकलेद्वारे आपल्याला इतिहास समजून घेऊन तो इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. शिल्पकलेला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ती कलात्मक अभिव्यक्ती न राहता समाजाशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम तयार होते, असे टेक्निकल गेम्स कंपनीचे कला दिग्दर्शक पी.एम. विचारे यांनी यावेळी सांगितले.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेत आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्कशॉप ऑन डिजिटल स्कल्पटिंग अँड फिल्ममेकिंग युजिंग मोबाईल कॅमेरा’ या विषयावर श्री विचारे यांनी मनोगत व्यक्त केले.
श्री. विचारे यांनी स्वतः तयार केलेल्या शिल्पातून श्रोत्यांना शिल्प तयार करण्याचे तंत्रपद्धत विषद केली. त्यांनी भारतीय दंतकथेवर आधारित शिल्पकलेबद्दल त्यांनी माहिती दिली. सामाजिक जीवनातील प्रसंग, दिनचर्या आणि सामजिक संदेश शिल्पकलेतून त्यांनी मांडला आहे. वनातील सीता, अहंम ब्रह्मा यांची शिल्पे तयार करताना तंत्रज्ञानाचा वापर केल्याने विविध भावमुद्रा, हालचाली जीवंत होत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह दाखवून दिले.
ब्युटी अँड बिस्टमधून सामाजिक जाणिवेचा संदेश
शिल्पातून कथा सांगणे किती प्रभावी होऊ शकते, याचे उदाहरण देताना त्यांनी ‘ब्युटी अँड द बीस्ट’हे शिल्प सादर केले. “सामान्यतः ब्युटी म्हणजे स्त्री आणि बीस्ट म्हणजे प्राणी, अशी समजूत असते. पण त्यांनी हे उलटे मांडले आहे. माणसंच खरे बीस्ट आहेत, जी प्राण्यांची कातडी वापरतात, त्यांना ठार करतात. प्राणी हेच खरे सौंदर्य आहेत,” असा सामाजिक जाणिवेचा संदेश त्यांनी दिला.
याबरोबरच त्यांनी ‘सायलंट म्युझिक’या शिल्पाची ओळख करून दिली. “ही कलाकृती म्हणजे नाद नसलेली पण जाणवणारी संगीतातील एक अवस्था आहे. डोळ्यांनी बघताना शांततेत सुद्धा संगीताची अनुभूती येते,” असं ते म्हणाले. या संकल्पनेत त्यांनी पंचमहाभूतांचा समावेश करून सर्जनशीलतेचा वापर केला आहे.
शिल्पकलेमध्ये रचना महत्वाची असते. यामध्ये नैसर्गिक कृतीचा केंद्रबिंदू ठरतो, बॅलन्सिंग कला, त्रिमितीय पेंटिंग, आर्मीचर या शिल्पकलेमध्ये विविधता केली तरच प्रेक्षकांच्या मनाला भावते. शिल्प कलेमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि मोबाईलच्या वापरामुळे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. शिवाय यातून समाज प्रबोधनाचा संदेश देता येत असल्याचे त्यांनी सांगितले.
0000
धोंडिराम अर्जुन/ससं/