वेव्हज् २०२५ मध्ये होणार बीसीजी अहवालाचे प्रकाशन
मुंबई, दि. २ :- सृजनशील निर्मिती अर्थव्यवस्थेत होणाऱ्या वाढीमुळे भारताच्या डिजिटल परिदृश्यात लक्षणीय परिवर्तन घडून येत आहे. “फ्रॉम कंटेंट टू कॉमर्स: मॅपिंग इंडियाज क्रिएटर इकॉनॉमी” असे शीर्षक असलेल्या बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (BCG) च्या नवीन अहवालाचे उद्या (३ मे २०२५) मुंबईतील वेव्हज २०२५ मध्ये प्रकाशन होणार असून या अहवालानुसार, भारतातील सृजनशील निर्मिती अर्थव्यवस्थेचा ३५० अब्ज डॉलर्सहून अधिक ग्राहक खर्चावर प्रभाव असून २०३० पर्यंत ही आकडेवारी १ ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे.
भारतात १००० पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या व्यक्ती अशी व्याख्या करण्यात आलेले २ ते २.५ दशलक्ष डिजिटल सृजनशील निर्माते असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे. इतकी मोठी संख्या असूनही त्यांच्यापैकी केवळ ८–१०% निर्माते त्यांच्या आशयातून सध्या चांगले उत्पन्न मिळवत आहेत, ज्यामधून अतिशय झपाट्याने वाढणाऱ्या या क्षेत्राचा पुरेशा प्रमाणात वापर होत नसल्याचे अधोरेखित होत आहे. या सृजनशील निर्मात्यांच्या परिसंस्थेतील प्रत्यक्ष महसूल सध्या २०-२५ अब्ज डॉलर असण्याचा अंदाज असून या दशकाच्या अखेरपर्यंत तो १००-१२५ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
अहवालातील प्रमुख निष्कर्षांमध्ये खालील बाबींचा समावेश असेल :
सध्या सृजनशील निर्मात्यांचा ३०% पेक्षा जास्त ग्राहकांच्या निर्णयांवर असलेल्या प्रभावामुळे आज ३५०-४०० अब्ज डॉलर्सचा खर्च केला जातो.
या परिसंस्थेचा जेन झेड आणि महानगर केंद्रांच्या पलीकडे विस्तार होत असून विविध वयोगट आणि विविध श्रेणीतील शहरांपर्यंत पोहोचत आहे.
शॉर्ट-फॉर्म व्हिडिओ (लघु कालावधीची दृश्ये) हे सर्वाधिक पाहिले जाणारे आशयांचे (कंटेंट) स्वरूप आहे, ज्यात विनोदी, चित्रपट, दैनंदिन मालिका आणि फॅशन यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे.
ब्रँड स्ट्रॅटेजींचा उदय होत असून वेगाने आशय निर्मितीवर, सर्जनशील निर्मिती स्वातंत्र्यावर, विविध प्रकारच्या ग्राहकांना विचारात घेण्यावर आणि फलनिष्पत्ती आधारित चाचणीवर जास्तीत जास्त भर दिला जात आहे.
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आभासी भेटवस्तू, लाईव्ह कॉमर्स आणि सदस्यत्वाचे फायदे अशी आर्थिक आकर्षणे असलेली उत्पन्नाची विविध साधने तयार केली जात आहेत.
येत्या काही वर्षात हे ब्रँड सर्जनशील निर्मात्यांच्या बाजारपेठेत आपली गुंतवणूक १.५ ते ३ पट करण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे विपणन आणि वाणिज्य क्षेत्रावर डिजिटल सर्जनशील निर्मात्यांच्या परिसंस्थेच्या प्रभावाचे संकेत मिळत आहेत.
हा बीसीजी अहवाल उद्या मुंबईत वेव्हज २०२५ मध्ये औपचारिकपणे प्रकाशित होणार आहे. सध्या सुरू असलेल्या वेव्हज २०२५ या भव्य कार्यक्रमात एआय (AI), सोशल मीडिया, एव्हीजीसी (AVGC) क्षेत्र आणि चित्रपट यातील उदयोन्मुख पैलूंवरील चर्चा डिजिटल माध्यम क्षेत्रात भारताचा वाढता प्रभाव दाखवत आहे.
00000
सागरकुमार कांबळे/ससं/