माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार – अभिनेते अमीर खान

मुंबई, दि. 2 : राज्य शासनाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या क्षेत्रासाठी सकारात्मक विचार होत असून भारत या क्षेत्रामध्ये उत्तुंग आघाडी घेईल, असा विश्वास अभिनेते अमीर खान यांनी व्यक्त केला.

जिओ वर्ल्ड सेंटर येथील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद, 2025 मधील ‘भविष्यातील स्टुडिओ : भारताला जागतिक स्टुडिओ नकाशावर नेण्यासाठी पुढाकार’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते, या चर्चासत्रात पीव्हीआर आणि इनॉक्सचे संस्थापक अजय बिजिली, अमेरिकन चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन, चित्रपट निर्माते दिनेश विजन, प्राइम फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा, आणि चित्रपट निर्माते रितेश सिधवानी सहभागी झाले होते. यावेळी चित्रपट समीक्षक मयंक शेखर यांनी सूत्रसंचालन केले.

अभिनेते अमीर खान म्हणाले, मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी शासन या दिशेने ठोस पावले उचलत आहे. शासन आणि मनोरंजन क्षेत्र यांच्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने संवाद सुरु झाला आहे आणि ही सुरुवात निश्चित आशादायक आहे. संवादातून या क्षेत्रासाठी दूरगामी परिणाम करणारी धोरणं निश्चित तयार होऊ शकतील.

 भारतातील कंटेंट क्रिएशन आणि मनोरंजन व्यवसायाची जागतिक स्तरावर दमदार छाप – चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन

भारतामध्ये कंटेंट क्रिएशन, मनोरंजन व्यवसाय आणि स्ट्रीमिंग किंवा लीजिंगसारख्या विविध माध्यमांचा अनुभव घेताना जाणवते की, हा उद्योग पूर्णपणे वेगळ्या मॉडेलवर चालतो. जागतिक पातळीवर काम पाहत असताना आणि येथील काम देशांतर्गत केंद्रित आहे, त्यामुळे दृष्टिकोनही वेगळा आहे, असे मत अमेरिकन चित्रपट निर्माते चार्ल्स रोव्हेन यांनी व्यक्त केले.

श्री. रोव्हेन म्हणाले, मी चित्रपट किंवा कंटेंट तयार करताना आधीच ठरवतो की, ते स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर की, चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण येथे आधी कंटेंट तयार होतो आणि मग त्याचे प्रदर्शन करण्याचा मार्ग ठरवला जातो. या ठिकाणी कधी स्वतः तर कधी इतरांकडून गुंतवणूक  केली जाते, ही पद्धत वेगळी आहे आणि ती खूपच छान आहे.

वेव्हज कार्यक्रमाचं सर्वात चांगलं वैशिष्ट्य म्हणजे भारत आता जागतिक स्तरावर या क्षेत्रात आपले लक्ष केंद्रीत करत आहे. खरं तर, भारताला जगाकडे पाहण्याची गरज नाही, कारण आता जगच तुमचा कंटेंट शोधून येऊ लागले आहे, असंही त्यांनी नमूद केले.

भारतीय चित्रपटांच्या जागतिक वितरणासाठी भाषा आणि सुस्पष्ट संवाद महत्त्वाचा – चित्रपट निर्माते रितेश सिधवानी

मार्केटमध्ये पुन्हा एकदा भावना जागृत होत आहेत. पूर्वी 80 च्या दशकात, स्थानिक वितरण सर्वात मोठे मानले जात होते आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही फक्त त्याचा एक भाग असायची. पण आजच्या घडीला, भाषेच्या विविधतेमुळे आणि विविध प्रेक्षकसमूहांच्या गरजांमुळे, वितरणाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे, असे चित्रपट निर्माते रितेश सिधवानी यांनी सांगितले.

श्री. सिधवानी म्हणाले की, आज एकाच चित्रपटासाठी वेगवेगळ्या मार्केटसाठी वेगळे ट्रेलर्स तयार केले जातात. यूकेसाठीचा ट्रेलर अमेरिकेसाठीच्या ट्रेलरपेक्षा वेगळा असतो. युरोपियन मार्केटसाठी एक ट्रेलर असतो आणि उत्तर अमेरिकेसाठी दुसरा ट्रेलर असतो. त्यामुळे भाषांतर नक्कीच मदत करते, पण त्या माहितीचा योग्य प्रकारे संवाद आणि वितरण कसे होईल, हे अधिक महत्त्वाचे आहे.

पश्चिमेकडील देशातील प्रेक्षक फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश चित्रपट सहज स्वीकारतात. ते त्यांची भाषा समजतात आणि त्या चित्रपटांकडे उत्सुकतेने पाहतात. ते आता भारतीय चित्रपटांची ओळख करून घेत आहेत. योग्य वितरण व्यवस्था आणि सादरीकरण त्यांच्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतीय कथा जागतिक प्रेक्षकांसाठी स्थानिक वाटू शकतात – फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा

योग्य प्रतिभा, तंत्रज्ञान आणि भविष्यातील दिशादर्शक दृष्टिकोन यांच्या योग्य संमिश्रणातून जगभरातील प्रेक्षकांना आपली गोष्ट स्थानिक वाटते. आज तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण चित्रपट विविध भाषांमध्ये केवळ भाषांतरित नाही, तर त्या भाषेत ‘लिपसिंक’सह प्रदर्शित करू शकतो, ज्यामुळे उपशीर्षकांची किंवा व्हॉइसओव्हरची गरज उरत नाही, असे मत प्राइम फोकस लिमिटेडचे संस्थापक नमित मल्होत्रा यांनी व्यक्त केले.

श्री.मल्होत्रा म्हणाले, भारतीय चित्रपट इंग्रजी, स्पॅनिश, जपानी अशा विविध भाषांमध्ये तयार करता येईल आणि हे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. त्याच वेळी, आपली कथा, तिचे पात्र आणि त्यांचा आत्मा जपून ठेवते, आपण ती जागतिक स्तरावर पोहोचवू शकतो. कारण अनेक वेळा भाषा ही सर्वात मोठी अडचण ठरते. चांगला कंटेंट ही अडचण पार करू शकतो, पण व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाषेची अडचण दूर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

0000