निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आता वेल्फेअर ऑफिसर – जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

0
12

मुंबई उपनगर, दि. १५ : मुंबई उपनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी आता युद्धपातळीवर सुरू आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जवळपास ५० हजार अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक कालावधीत या कर्मचाऱ्यांना कोणतीही समस्या उद्भवू नये यासाठी आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय कल्याण अधिकारी अर्थात वेल्फेअर ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत.

निवडणुक कालावधीत एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व यंत्रणा सुसज्ज असतानाच या यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी यांचीही काळजी आता विशेषत्वाने घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदार संघात हे वेल्फेअर ऑफिसर नियुक्त केले आहेत. निवडणूक प्रक्रिया आणि विशेष करून मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना निवास, भोजन, पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतागृहे या सुविधा पुरविण्याबाबत येत आहेत.

कॅशलेस आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देणार

            आरोग्यविषयक समस्या उद्भवल्यास तत्काळ उपचार करण्याबाबतची कार्यवाहीही वेल्फेअर ऑफिसर यांच्या माध्यमातून केली जाणार आहे.

            या वेल्फेअर ऑफिसर यांच्याकडे मतदान केंद्राजवळ असलेली सर्व रुग्णालये, तेथे उपलब्ध असणाऱ्या आरोग्याच्या सुविधा, रुग्णवाहिकेची उपलब्धता आदींची माहिती असणार आहे. याशिवाय, कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांना आवश्यकता भासल्यास तत्काळ कॅशलेस आरोग्य सुविधा संबंधित रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

            मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांना या कालावधीत कोणतीही अडचण उद्भवू नये याची सर्वतोपरी काळजी घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी सांगितले.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here