जिल्ह्यातील ६९ हजार शेतकऱ्यांना २६२ कोटींचे प्रोत्साहन अनुदान – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.26 (जिमाका) : शेती आपल्यासाठी अतिशय प्राधान्याचे क्षेत्र आहे. शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांना आवश्यक सर्व सहकार्य करण्यावर शासनाचा भर आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली. या योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रत्येकी 50 हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली होती. जिल्ह्यात 69 हजार शेतकऱ्यांना 262 कोटींचे प्रोत्साहन वितरीत करण्यात आले आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

प्रजासत्ताकदिनाचा मुख्य ध्वजारोहन समारंभ येथील समता मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी ध्वजारोहन केले. त्यावेळी शुभेच्छा देतांना पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.

सुरुवातीस पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील शुरविरांना अभिवादन केले. देशाच्या इतिहासात स्वातंत्र्य दिन जितका महत्वाचा आहे, तितकेच महत्व प्रजासत्ताक दिनाचे आहे. जगात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते. घटनाकारांनी अतिशय दुरदृष्टीने तयार केलेल्या राज्यघटनेचे हे फलीत आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यात जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न केले. त्यामुळेच यावर्षी आतापर्यंत 2 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 2 हजार 126 कोटीचे पिककर्ज वाटप झाले आहे. प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत केवळ 1 रुपयात शेतकऱ्यांच्या पिकांना संरक्षण उपलब्ध झाले आहे. यावर्षी जिल्ह्यात पहिल्यांदाच 3 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी योजनेत सहभाग नोंदविला. गेल्या जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 2 लाख 55 हजार7 शेतकऱ्यांना 181 कोटी रुपयांची पिकविमा नुकसान भरपाई वितरीत करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन देखील मदत देते. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जिल्ह्याला 238 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत 1 लाख 19 हजार शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यात आले. रेशीम शेतीकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वळविण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यामुळेच यावर्षी 567 शेतकऱ्यांनी 623 हेक्टर क्षेत्रासाठी नोंदणी केली आहे.

वन्यप्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खनिज विकास निधीतून यावर्षी 21 हजार शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. खनिज निधीतूनच 63 शाळा आपण ‘मॅाडेल स्कूल’ तर 15 प्राथमिक आरोग्य केंद्र ‘मॅाडेल केंद्र’ बनवतो आहे. शाळांसाठी 65 कोटी तर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 20 कोटी 92 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतून 5 लाखापर्यंतचे उपचार विनामुल्य केले जातात. जिल्ह्यात 6 लाख 17 हजार लाभार्थ्यांनी योजनेचे कार्ड काढले आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत सुविधा असलेले 4 मॅाड्युलर ऑपरेशन थिएटर तसेच ह्युमन मिल्क बॅंक सुरु करण्यात आली. जल जीवन मिशन योजनेतून 3 लाख 85 हजार ग्रामीण कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. या योजनेतून 1 हजार 777 कामे केली जात आहे. योजनेत जिल्ह्यातील 312 गावांचा समावेश करण्यात आला आहे. आराखड्यात समाविष्ट गावांमध्ये साधारणपणे 16 हजारावर कामे केली जात आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद सातबारावर होणे महत्वाचे आहे. नोंदणीची प्रक्रिया गतीमान होण्यासाठी ई-पिक पाहणी कार्यक्रम आपण राबवितो. या कार्यक्रमांतर्गत खरीप हंगामात 5 लाख 18 हजार शेतकऱ्यांनी तर रब्बीत 88 हजार शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणीद्वारे पिकांची नोंद केली. इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध होण्यासाठी मोदी आवास योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्याला 30 हजार घरांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 20 हजार घरांना मंजुरी दिली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करता यावी, यासाठी आपण बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान राबवतो आहे. या अभियानातून ग्रामस्तरावरच विद्यार्थ्यांना पुस्तके आणि अभ्यासासाठी सुविधा उपलब्ध होणार आहे. यातून मेहनती, होतकरू विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील, अशी आशा आहे, असे पालकमंत्री संजय राठोड म्हणाले.

सुरुवातीस पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहन झाले. पोलिस व विविध दलांच्यावतीने मानवंदना देण्यात आली. पालकमंत्र्यांनी परेडचे निरिक्षण केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी कवायती व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमास विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी, माजी सैनिक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी तंबाखुमुक्तीची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रबोधी घायवटे व शुभांगी वानखडे यांनी केले.

000