स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या कुटुंबियांची भेट; नगरपरिषद येथे आढावा बैठक
चंद्रपूर, दि. 16 : 16 ऑगस्ट 1942 रोजी झालेल्या चिमूर क्रांती दिनानिमित्त आज राज्याचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शहिदांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी त्यांनी चिमूर येथील हुतात्मा स्मारक आणि किल्ला परिसरातील शहीद स्मारक तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि शहीद बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडीया, माजी खासदार अशोक नेते उपस्थित होते.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, चिमूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष थिटे, उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रीधर माने, नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनीसुध्दा शहीद स्मारकाला अभिवादन केले.
त्यानंतर नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, 16 ऑगस्ट 1942 रोजीचा चिमूर क्रांतीचा लढा जगाच्या इतिहासात अजरामर ठरला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने येथे शहिदांना श्रध्दांजली अर्पण करून सर्व शहिदांसमोर आपण नतमस्तक झालो. बंटीभाऊ सारखा कर्तव्यदक्ष आमदार या क्षेत्राला लाभला आहे. चिमूर विधानसभा क्षेत्राच्या 100 टक्के मागण्या पूर्ण करण्यात येईल. चिमूरचा कृती विकास आराखडा त्वरीत मंजूर करून निधी उपलब्ध करून देऊ.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे विशेष लक्ष चिमूरकडे आहे. त्यामुळे चिमुरच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. चिमूर येथे भगवान बिरसा मुंडा सामाजिक सभागृहासाठी त्वरीत जागा उपलब्ध करून द्या, पाहिजे तेवढा निधी या सभागृहासाठी देण्यात येईल. तसेच मुक्ताई पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठीसुध्दा निधी दिला जाईल, असे पालकमंत्री डॉ. उईके यांनी सांगितले.
आमदार कीर्तिकुमार भांगडिया म्हणाले, 16 ऑगस्ट 1942 रोजी सर्वात पहिला तिरंगा चिमूरमध्ये फडकला. चिमूरच्या पुर्वजांनी आपल्या गावचा इतिहास लिहिला आहे. आपल्या शहिदांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आजच्या तरुणांना जाणीव व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. स्वातंत्र्यासाठी अनेक लढे, आंदोलने उभारण्यात आले. त्यामुळे हे स्वातंत्र टिकविणे आपली सर्वांची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूरला भरभरून दिले आहे. येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणले आहे. जेव्हा राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती होईल, तेव्हा सर्वात प्रथम चिमूर जिल्हा तयार करण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले, चिमूर विधानसभा क्षेत्रात नगर परिषदेच्या इमारती, नागभीड येथील उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात आले आहे. तसेच कानपा-चिमूर-वरोरा रेल्वेलाईन मंजूर झाली असून नगरोत्थान मधून चिमूर करीता 125 कोटी, नागभीड करीता 70 कोटी आणि भिसी करीता 40 कोटी देण्यात आले आहेत. चिमूरच्या उर्वरीत विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात यावा, अशी मागणी आमदार कीतिकुमार भांगडिया यांनी पालकमंत्र्यांकडे केली. कार्यक्रमाचे संचालन राजू देवतळे यांनी तर आभार मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांनी मानले.
स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या कुटुंबियांची घरी जाऊन भेट : यावेळी पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि माजी खासदार अशोक नेते यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांनी स्वातंत्र संग्राम सैनिकांच्या घरी भेट दिली. चिमूर येथील डोंगरवार चौकातील कमलाबाई माधव कटाने (वय 85) आणि सुलोचनाबाई महादेव मिसार (वय 83) या स्वातंत्र संग्राम सैनिक कुटुंबातील सदस्यांची पालकमंत्र्यांनी आस्थेने विचारपूस करून सन्मान केला.
हुतात्मा स्मारक ते किल्ला परिसर पदयात्रा : मुख्य मार्गावरील हुतात्मा स्मारक येथे स्मारकाला अभिवादन केल्यानंतर दीड ते दोन किलोमीटरवर असलेल्या किल्ला परिसरापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय’, ‘शहीद बालाजी रायपुरकर अमर रहे’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
000