भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

मुंबई, दि. १५ : विधान भवन, मुंबई येथे आज भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे व विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, सचिव मेघना तळेकर, सचिव डॉ.विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठ्ये यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी राजू भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

या प्रसंगी सभापती यांनी भारताच्या शूर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दहशतवाद्यांचे तळ उद्धस्त करीत राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल त्यांनी भारतीय सैन्याचे अभिनंदन केले. तसेच भारताला अधिक सामर्थ्यशाली आणि वैभवशाली बनविण्याचा आपल्या सर्वांचा संकल्प सिद्धीस जावा, अशी मनोकामना व्यक्त करुन भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

०००००