दिल्लीतील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये १६ ऑगस्टपासून गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री

नवी दिल्ली, १४ : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्रीला यावर्षी  16 ऑगस्ट पासून सुरुवात होणार आहे. हे प्रदर्शन व विक्री 27  ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.

महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन देणे, त्यांच्या मूर्तींना दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच दिल्लीतील मराठी आणि अमराठी गणेशभक्तांना दर्जेदार गणेशमूर्ती सहज उपलब्ध करून देण्यासाठी मागील 30 वर्षांपासून हे प्रदर्शन भरवले जाते. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील  30 पेक्षा अधिक गणेश मंडळांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. यासह मराठी तसेच मराठी कुटुंबात गणेशोत्सव साजरा केला जातो.

यावर्षी एम्पोरियमच्या दालनात सहा इंच ते तीन फूट उंचीच्या एकूण 1,000 शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध असतील. या मूर्तींची किंमत 600 रुपये ते 30 हजार रुपयांपर्यंत आहे. यासोबतच, गणेशमूर्ती सजावटीसाठी लागणारे विविध साहित्यही येथे उपलब्ध आहे. नंदा एस्कोर्टस, त्रिभोवनदास झवेरी, विविध उद्योजक व मान्यवर दरवर्षी येथून गणेशमूर्ती खरेदी करतात. ठाणे येथील मूर्तिकार मंदार सुर्यकांत शिंदे हे अनेक वर्षांपासून येथे गणेशमूर्ती विक्री व प्रदर्शनासाठी ठेवतात.

बाबा खडकसिंह मार्गवरील ‘मऱ्‍हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियममध्ये हे प्रदर्शन व विक्री गणेशचतुर्थी 27 ऑगस्ट   2025  पर्यंत दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 7  वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या 011-23363366 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000