डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई, दि .१४ : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५०० चौरस फुटांचे घर केवळ २५.५० लाख रुपयांत उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर शासकीय योजनांच्या माध्यमातून हा परवडणारा गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वांद्रे पश्चिम येथे ‘डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रा’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी डबेवाल्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होणार असल्याची घोषणा केली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार श्रीकांत भारतीय, योगेश सागर, तमिळ सेल्वन यांच्यासह नूतन मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष उल्हास मुके, मुंबई टिफीन बॉक्स सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे, सचिव किरण गवांदे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, १३५ वर्षांच्या प्रवासात आमचे डबेवाले संगणक किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न वापरता मानवी बुद्धिमत्तेच्या जोरावर जगप्रसिद्ध व्यवस्थापन कौशल्य दाखवत आले आहेत. एकही चूक न करता, एकही दिवस उशीर न करता त्यांनी काम केले. ही जगातली अद्वितीय परंपरा आहे. ‘डबेवाला भवन’ चे रूपांतर आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्रात झाल्यामुळे आणि येथे व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून सकाळच्या भजनापासून लोकल प्रवास, डबे वितरित करणे आणि जेवणापर्यंत असा डबेवाला संस्कृतीचा थेट अनुभव घेता येत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. डबेवाला समाजाची निर्व्यसनी, वारकरी परंपरेवर आधारित सेवा ही जगभरासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुढील काळात या केंद्रासाठी अधिक चांगल्या सुविधा आणि उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी डबेवाल्यांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे श्री.त्रिपाठी यांचे, तसेच नफा न घेता उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्याची जबाबदारी स्वीकारणारे जयेश शाह आणि संपूर्ण टीमचे विशेष कौतुक केले. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करून आज या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

 डबेवाला केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा देईल मंत्री ॲड.आशिष शेलार

डबेवाल्यांच्या कार्याचा गौरव करताना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी विठ्ठलाचे नाव घेत लोकांच्या पोटापाण्याची सेवा करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांचे आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र उभे राहणे हा मुंबईकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले. हे केंद्र जगभरातील पर्यटकांना प्रेरणा आणि व्यवस्थापनाचे धडे देणारे केंद्र ठरुन मुंबईची ओळख द्विगुणित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री ॲड. शेलार यांनी, गिरणी कामगार, बीडीडी चाळ, धारावी, कामाठीपुरा येथील रहिवासी तसेच कोळी बांधव, पदपथावरील विक्रेते यांसारख्या विविध घटकांसाठी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी गृहनिर्माण व पुनर्विकासाची कामे मार्गी लावल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार श्रीकांत भारतीय यांनी जगातले 27 विद्यापीठे संशोधन करीत असलेल्या डबेवाल्यांच्या संस्कृतीची माहिती देणाऱ्‍या आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असल्याचे सांगून त्यांची पुढची पिढीच या केंद्राचे संचालन करणार असल्याची माहिती दिली.

प्रारंभी डबेवाला असोसिएशनचे सचिव किरण गवांदे यांनी मुंबईच्या डबेवाल्यांच्या 135 वर्षांच्या परंपरेची माहिती देऊन कोविड काळात काम ठप्प असताना नागरिकांनी केलेल्या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/