सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा

मुंबई, दि. ११ : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत.

शासन निर्णय क्र. पुलदे-२०२५/प्र.क्र.७४ (ई-११४४०९५)/सां.का. २, दिनांक २० जून, २०२५ या अन्वये शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला असून या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या शासन निर्णयातील परिशिष्ट ‘अ’ मधील विहीत नमुन्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर गणेश चतुर्दशीच्या एक दिवसापूर्वीपर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरीता स्पर्धा आयोजन करुन अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून ही समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहेत. या जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करण्यात येवून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र आणि व्हीडीओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी मार्फत प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांचेकडे सादर करतील.

या गणेशोत्सव स्पर्धेच्या निकालाचा दिनांक, सर्व विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बक्षीस वितरणचा समारंभ कोठे व कसा करायचा याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय यांच्याकडून स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असे मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

संजय ओरके/विसंअ/