मुंबई, दि. ११ : सणासुदीच्या काळात होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा या राज्यव्यापी मोहिमेचा आरंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते नाशिक येथे करण्यात आला.
यावेळी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले, ही मोहीम दिवाळी संपेपर्यंत संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असून मिठाई, खाद्यतेल, खवा, मावा दूध आदी अन्न पदार्थांच्या गुणवत्तेवर यामध्ये विशेष लक्ष देण्यात येणार आहे.
राज्यात आगामी काळात साजरे होणारे सण पोळा, गणेशोत्सव, ईद, गौरी पूजन, नवरात्र महोत्सव, दसरा व दिवाळीच्या अनुषंगाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. तपासणीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्यास त्या आस्थापनांचे परवाने रद्द करण्याबाबत नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. अखाद्य, अपायकारक नमुने नियमानुसार नष्ट करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ व अन्न सुरक्षा आणि मानके नियम, २०११ नुसार शास्तीबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तपासणी मोहिमेत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त यांचाही सहभाग असणार आहे. सणासुदीच्या काळात महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतील टोलनाक्यांवर परराज्यातून येणाऱ्या खव्यासारख्या पदार्थ्यांच्या अचानक तपासणी मोहिम सोबतच सुरक्षित अन्न पदार्थाबाबत प्रचार प्रसिध्दी करण्यात येणार आहे. ही मोहीम दिवाळीसंपेपर्यंत दर महिन्याला नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/