छोटेसे स्टार्टअप सुरु करण्याला प्राधान्य द्या – वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

नागपूर,दि. 11 : देशाच्या उज्ज्वल भविष्याला आकार देण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राातील नाविण्यपूर्ण कालानुरुप होणारे बदल हे अत्यंत महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञानाला आत्मसात करण्यासह नोकरी करण्याऐवजी आपण उद्योजक होऊन आपल्या छोट्याशा स्टार्टअपला सुरु करण्याच्या  मानसिकतेला स्वीकरण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन वित्त राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी केले.

मेहमुदा शिक्षण आणि महिला ग्रामीण विकास बहुदेशीय संस्थेच्या सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसीच्या दीक्षान्त समारंभात ते बोलत होते. वनामती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून अमृता फडणवीस, मुदस्सीर पटेल,डॉ. तन्झीम, डॉ. उनैजा, वैद्यनाथ ग्रुपचे अध्यक्ष प्रणव शर्मा, डॉ. एस. एस. सोनवणे, संस्थेच्या अध्यक्षा हफसा अहमद, संस्थेच्या उपाध्यक्ष हुस्ना अहमद, माजी मंत्री डॉ. अनीस अहमद, झैद अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.

 

आपल्या येथे पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि पर्यावरण या क्षेत्रात मोठ्या संधी दडलेल्या आहेत. त्या कवेत घेण्यासाठी पदविधरांनी आपल्या पारंपारिक करिअरपेक्षा वेगळा मार्ग निवडला पाहिजे. नागपुरात येथील स्थानिक गुणवंतांच्या बळावर औषध निर्माण क्षेत्रातही मोठी संधी आहे. यासाठी संस्थेतील औषध निर्माण शास्‍त्राच्या विद्यार्थ्यांनी पुढे आले पाहिजे अशी अपेक्षा राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केली.

बदलत्या परिस्थितीत महिलांना सुरक्षित अशा अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. भारताला  महासत्ता होण्याच्या प्रक्रियेत महिलांचे योगदान हे अनन्य साधारण राहणार असून मुलींनी बदलत्या जगाप्रमाणे संशोधन कौशल्य व नवतंत्रज्ञान आत्मसात करण्यावर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले.

यावेळी माजी कॅबिनेट मंत्री डॉ. अनीस अहमद, जनाब मुदस्सीर पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संचालक झैद अहमद यांनी तर संचालन प्रा इफ्तेशाम अन्सारी यांनी केले. व्हीआयपी रोडवरील वनामती सभागृहात झालेल्या या समारंभात बॅचलर ऑफ फार्मसीच्या पदवीधर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.