ग्रामस्थांसोबत संवाद, इंटरनेट, वायफाय सुविधेचा वापर करा; ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत विविध कंपन्यांचा सहभाग
नागपूर, दि. 8: देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या सातनवरी या गावामध्ये व्हॉईस ऑफ इंडिया कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या संस्थेच्या माध्यमातून विविध डिजिटल उपक्रमांना सुरूवात झाली आहे. डिजिटल बेस विविध सुविधांचा प्रत्यक्ष लाभ गावाच्या सर्वांगिण विकासासाठी होणार असल्यामूळे ग्रामस्थांनी या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन, विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी केले.
विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी स्मार्ट इंटेलिजंट गाव म्हणून निवड झालेल्या सातनवरी या गावाला भेट दिली. तसेच व्हाईस संस्थेशी निगडीत विविध पंधरा कंपन्यांनी सुरू केलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकरी विनायक महामुनी, इंटेलिजंट गाव या संकल्पनेचे विशेष कार्यधिकारी रमेश भटनागर, सातनवरी गावाचे सरपंच श्रीमती वैशाली विजय चौधरी, उपसरपंच अनिल रामभाऊ गोतमारे, उपविभागीय अधिकारी श्रीमती वंदना सरंगपते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपील कलोडे आदी उपस्थित होते.
देशातील स्मार्ट इंटेलिजंट गाव तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार ऑप्टीकल फायबर कनेक्टिविटी असलेल्या सातनवरी या गावाची निवड करण्यात आली आहे. इंटरनेट व वायफाय सुविधेच्या माध्यमातून मेक इन इंडिया अंतर्गच्या विविध पंधरा कंपन्या या गावात सुविधा निर्माण करणार आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पामूळे कृषी, आरोग्य, शिक्षण तसेच जनतेच्या सुविधेसाठी ग्रामस्तरावरील योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे. ग्रामस्थांना अंमलबजावणी संदर्भात प्रशिक्षण देण्याची संस्थांची जबाबदारी महत्वाची असल्याचे, विभागीय आयुक्त श्रीमती बिदरी यांनी यावेळी सांगितले.
मोबाईल कनेक्टिविटीच्या माध्यमातून विविध डिजिटल उपक्रम येथे राबविण्यात येणार आहे. सातनवरी हे गाव आता जगाशी जोडल्या जाणार आहे. या गावाला डिजिटल सुविधा पुरविण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमामध्ये शेतीला प्राधान्य दिले आहे. शेतामध्ये बसविण्यात आलेल्या सेन्सरमुळे शेतातील पेरणीपासून कापणीपर्यंत तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, माहिती, पीक पद्धतीचे नियोजन आदी सर्व माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध झाली आहे. या माहितीमूळे शेतकऱ्याला पीक पद्धतीचे नियोजन सुलभ झाले आहे. या पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी विभागीय आयुक्तांनी यावेळी केली.
इंटेलिजंट गाव या उपक्रमांतर्गत या गावात ई-स्कील सेंटर, मोबाईल हेल्थ कनेक्टिविटी, हेल्थ कार्ड आणि टेलिमेडिसीन सुविधा उपलब्ध झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ञ डॉक्टर या उपक्रमामध्ये सहभागी होवून ग्रामस्थांना आरोग्य सुविधांचा लाभ देणार आहे. शाळा व अंगणवाडीमध्ये स्मार्ट ईसीसीई व्हिडियो मार्गदर्शन पुस्तक, ए.आय. च्या माध्यमातून रिमोट क्लास रूम तसेच डिजिटल अंगणवाडी केंद्र ही सुविधा उपलब्ध होत आहेत. संगणकामूळे ग्रामपंचयातमधील सर्व कामे जलद गतीने पूर्ण होतील. तसेच ग्रामस्थांना वायफायच्या माध्यमातून गाव व शहराशी जोडणे सुलभ होणार आहे. गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, तलावांमधील मत्स्यपालनासाठी आवश्यक असलेल्या पाण्यातील घटकांची माहिती डॅशबोर्डवर दिसणार आहे. यासंपूर्ण उपक्रमाचा लाभ ग्रामस्थांसाठी असल्यामूळे प्रत्येक उपक्रमाची माहिती सर्व नागरिकांना देण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करावे, अशा सूचना श्रीमती बिदरी यांनी दिल्या.
मुख्यमंत्री भेट देवून पाहणी करणार
सातनवरी या गावाला देशातील सर्वात स्मार्ट इंटेलिजंट गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देवून येथील स्मार्ट डिजिटल उपक्रमाची पाहणी करणार आहे. या उपक्रमाची उपयुक्तता व झालेला प्रत्यक्ष बदल यासंदर्भात लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहे.
प्रारंभी सातनवरी या गावाच्या सरपंच श्रीमती वैशाली चौधरी यांनी स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात व्हाईस संस्थेशी निगडीत विविध दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांनी इंटेलिजंट गावात सुरू करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची तसेच प्रत्यक्ष अंमलबजावणी संदर्भातील माहिती यावेळी सादर केली. या उपक्रमामूळे गावाच्या ग्रामीण विकासाला तसेच नागरिकांच्या जीवनपद्धतीत होणाऱ्या बदलाबद्दलही यावेळी चर्चा करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रशिक्षण सत्राचे आयोजन करावे तसेच या सुविधांचा लाभ निरंतर घेण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करावी, अशी सूचना केली. यावेळी या प्रकल्पाचे प्रमुख व केंद्र शासनाचे विशेष कार्यअधिकरी रमेश भटनागर यांनी या प्रकल्पाची अंमलबजावणी, विविध कंपन्यांचा सहभाग त्यांची कार्यपद्धती व प्रत्यक्ष होणारा लाभ आदी संदर्भात यावेळी माहिती दिली. यावेळी तहसिलदार कल्याण कुमार डहाट, गट विकास अधिकारी सचिन सुर्यवंशी तसेच विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0000