जिल्हा वार्षिक योजनेतून नगरपालिकांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांची तसेच विशेष घटक योजनेंतर्गत कामांची यादी द्यावी. 15 ऑगस्ट नंतर प्रत्येक कामाला सुरुवात झाली पाहिजे. प्रशासकीय मान्यता देण्याबाबत मागे पडू नये. ज्या विभागांना खर्चाचे उद्दिष्ट दिले आहे ते पूर्ण करावे, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता जिल्हा वार्षिक योजनेतील कामे पूर्ण करण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही. हे लक्षात घेता सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. या प्रस्तांवाना तातडीने मान्यता देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.
0000
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गणेशात्सव 2025 च्या तयारीचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व तहसीलदार, नगर पालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
लेझर लाईटला जिल्ह्यात पूर्णपणे बंदी घालावी, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा होण्याची दाट शक्यता आहे. कुठल्याही सार्वजनिक गणेश मंडळाने लेझर लाईटचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. गौरी विसर्जनानंतर महिला मोठ्या प्रमाणात गणपती पाहण्यासाठी बाहेर पडतात. छेडछाड किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवावे.
विसर्जन मिरवणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारचा तंटा निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी. गणेशोत्सव काळात नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रशासनाने गणेश उत्सवाचे चांगले नियोजन केले असून यंदाचा गणेशोत्सव सुखात, आनंदात व उत्साहात पार पाडूया, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देसाई यांनी केले.