सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या स्मारकासाठी प्रस्ताव सादर करावा – सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, दि. 6 : सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या प्रशस्त स्मारकाच्या निर्मितीसाठी जलसंपदा विभागाकडील जमीन ताब्यात घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव सादर करावा. असे निर्देश सामाजिक राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीस माजी आमदार दिलीप येळगावकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव श्री. बागुल, समाज कल्याण आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त शितल सोनटक्के, सातारा सहायक आयुक्त सुनील जाधव उपस्थित होते, तर दूरदृष्यप्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला.

सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, सुभेदार रामजी आंबेडकर ब्रिटिशकालीन मायणी धरणाच्या बांधकामावेळी देखरेखीसाठी होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळण्यासाठी या ठिकाणी हे स्मारक पूर्णत्वास आल्यास सुभेदार रामजी आंबेडकर यांचे हे पहिलेच स्मारक असेल. चांगल्या वास्तुविषारदांकडून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात यावा.

स्मारकाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेने स्विकारावी. यासंदर्भात  ग्रामपंचायतीने ठराव घ्यावा. सर्व नियमांनुसार बाबी पूर्ण करून प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही श्रीमती मिसाळ यांनी दिले.

००००

निलेश तायडे/विसंअ