प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र सरकार कडून निधी मिळावा – मंत्री जयकुमार रावल यांची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे मागणी

नवी दिल्ली, दि.6  :- पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या प्रकाशा-बुराई उपसा जलसिंचन योजनेसाठी केंद्र सरकारकडून निधीची मागणी केली. याबाबतचे मागणी पत्रही केंद्रीय मंत्री श्री.पाटील यांना दिले. यावेळी केंद्रीय जलशक्ती मंत्री श्री.पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

प्रकाशा-बुराई योजना ही नंदुरबार तालुक्यासह साक्री व शिंदखेडा तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून ही योजना पूर्ण झाल्यावर सुमारे 7,085 हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे. राज्य शासनाने योजनेला 793 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून, काम संथ गतीने सुरू आहे. केंद्र सरकारच्या सहाय्य पात्र योजनेत या प्रकल्पाचा समावेश करावा. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळाल्यास कामाला गती मिळेल आणि या भागाचा सिंचनाचा प्रश्न सुटेल. तसेच यामुळे शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल. रोजगाराच्या संधी ही वाढतील,असा विश्वास मंत्री श्री.रावल यांनी व्यक्त केला.

या योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदी बारमाही होऊन माथा ते पायथा नदी टप्प्यात येणारी सर्वच शेत जमीन सिंचनाखाली येईल. बागायती शेती झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्यामुळे ही योजना केंद्र सरकारच्या साहाय्य पात्र योजनेमध्ये समाविष्ट करावी, अशी मागणी मंत्री श्री. रावल यांनी यावेळी केली.

 

0000