मुंबई, दि. 6 : आरे कॉलनी परिसरातील अतिक्रमाणांवर प्रतिबंध घालावेत, तसेच या भागात बांधकामांना महापालिकेने परवानगी देऊ नये, अशा सूचना दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिल्या.
आरे कॉलनीचे पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धन व्हावे तसेच येथील अतिक्रमणे संरक्षित करून आरे कॉलनीतील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी निवेदनाद्वारे केली होती. याच विषयावर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) या कार्यालयात मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या, ‘मित्रा’ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, मनपाचे सहाय्यक आयुक्त अजय पाटणे व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. सावे म्हणाले,आरे कॉलनी परिसरात 15 हजारांहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. या भागातील रिक्त जागेवर मोठ्या प्रमाणात टाकाऊ पदार्थ टाकले जातात. तसेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. ही अतिक्रमणे तत्काळ थांबली पाहीजेत, यासाठी खासगी सुरक्षा यंत्रणा नेमण्याच्या सूचना मंत्री श्री. सावे यांनी दिल्या.
म्हाडा, एसआरए, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच दुग्धविकास विभागाने समन्वयाने या भागाचा विकास साधावा, मनपाने गोडाऊन तसेच बांधकामांना परवानगी देऊ नये, यासाठी आदर्श कार्य प्रणाली तयार करावी, मनपाने याबाबत कडक कारवाई करावी अशा सूचना मंत्री श्री. सावे यांनी दिल्या.
०००
शैलजा पाटील/विसंअ