प्रत्येक नागरिकाला महाराष्ट्रात सुखरूप आणणे हीच प्राथमिकता – उपमुख्यमंत्री अजित पवार

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या भाविक, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार

राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून

मुंबई, दि.०६ : उत्तराखंड राज्यात उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात झालेल्या ढगफुटीच्या घटनेमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरूप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंड राज्याचे सचिव (वित्त) दिलीप जवळकर, पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) निलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे आणि त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे हीच प्राथमिकता आहे. उत्तराखंडमध्ये अडकलेल्या पर्यटक, भाविकांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले आहे.

अडकलेल्या पर्यटकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ आणि इतर जिल्ह्यातील ४० अशा एकूण ५१ पर्यटकांचा समावेश आहे. त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी राज्य शासन तत्पर असून पर्यटकांशी सतत संपर्क साधत आहे. उत्तराखंडच्या प्रशासनाशी सुद्धा राज्य शासन सातत्याने संपर्कात असून अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी व त्यांना महाराष्ट्रात लवकरात लवकर परत आणण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आवश्यकतेनुसार राज्यातील जिल्हा प्रशासनाला सूचनाही देण्यात आल्या आहेत,अशी माहितीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक :

1) राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र

माहितीसाठी संपर्क: 93215 87143/ 022-22027990/022-22794229

2) राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड

संपर्क 0135-2710334/8218867005

00000