मुंबई, दि.५ : राज्याचे लोक आयुक्त न्या. वि. मु. कानडे (नि.) यांनी उप लोक आयुक्त संजय भाटिया यांच्यासह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे भेट घेऊन आपल्या कामकाजासंबंधीचा ५२ वा वार्षिक एकत्रित अहवाल राज्यपालांना सादर केला.
महाराष्ट्र लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त अधिनियम, १९७१ च्या कलम १२ पोटकलम (६) नुसार, सन २०२४ मधील लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांच्या कामकाजासंबंधी हा अहवाल सादर करण्यात आला.
लोकायुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२४ या अहवालाधीन वर्षात लोकायुक्त कार्यालयाकडे ६९२५ नवीन तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २३१० तक्रारी स्वाक्षरी विरहित व इतर प्राधिकाऱ्यांना उददेशुन लिहिलेल्या अर्जाच्या प्रति असल्यामुळे नोंदविण्यात आल्या नाहीत. अशा प्रकारे अहवालाधीन वर्षात ४६१५ नवीन तक्रारी नोंदविण्यात आल्या.
वर्षाच्या सुरुवातीला ४८१८ प्रकरणे प्रलंबित होती. अशा प्रकारे सन २०२४ मध्ये ९४३३ प्रकरणे कार्यवाहीकरीता उपलब्ध झाली.
नोंदणी केलेली ५१४६ प्रकरणे अहवालाधीन वर्षात निकाली काढण्यात आली आणि सन २०२४ च्या वर्षअखेरीस ४२८७ प्रकरणे प्रलंबित राहिली, असे लोकायुक्त कार्यालयाकडून यावेळी कळविण्यात आले.
महाराष्ट्रातील लोक आयुक्त संस्थेने गेल्या पाच दशकांमध्ये अनेक तक्रारदारांची गाऱ्हाणी दूर केली असून गेल्या काही वर्षात ७५% पेक्षा जास्त तक्रारींमधील तक्रारदारांच्या गाऱ्हाण्यांचे निवारण करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले.
0000