मुंबई, दि. 29 : मृद व जलसंधारण विभागाच्या पदभरती प्रक्रियेस गती द्यावी असे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, मृद व जलसंधारण विभागाचा आकृतीबंध बदलेला नाही. विभागाच्या सुरुवातीच्या टप्प्यात १६,४७९ पदांना मान्यता देण्यात आली. मात्र पदांमध्ये बदल होत गेले. मे २०२५ मध्ये वित्त विभागाने ८,७६७ पदांच्या आकृतीबंधास मान्यता दिली आहे.
या आकृतीबंधानुसार विभागाच्या क्षेत्रीय पातळीवर अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळे विभागाची कार्यक्षमता वाढेल आणि ० ते ६०० हेक्टर क्षेत्रात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे पार पडतील. नव्याने प्रस्तावित आकृतीबंधानुसार जिल्हास्तरीय व उपविभागीय कार्यालयांची संख्या २९२ वरून ३५१ पर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद स्तरावर १७५ व राज्यस्तरावर १७६ कार्यालयांची तरतूद आहे.
याशिवाय, नव्या पदांची निर्मिती, विद्यमान पदांना अपग्रेड किंवा रूपांतर करणे अधिक व्यवहार्य ठरेल, असेही श्री. राठोड यांनी सांगितले.
या सर्व प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी विभागाचे सचिव दर आठवड्याला बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेतील. पदभरतीची जाहिरात लवकर प्रसिद्ध व्हावी आणि प्रक्रिया तात्काळ सुरू व्हावी, याची दक्षता घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.
००००
राजू धोत्रे/विसंअ/